Thursday, January 21, 2016

क्षण

क्षण

          थंड वाऱ्याची एखादी हळुवार झुळूक क्षणभर सुखद गारवा देऊन जाते ना, तसेच काहीसे हे 'क्षण' असतात आपल्या आयुष्यातले... हळुवार कधीतरी  कुठूनतरी, गुपचूप संधी साधून येतात अन तना मनात उत्साह निर्माण करतात. मनी असलेल्या अपेक्षांची पूर्तता होते आणि सुखावून जातो आपण त्या क्षणात.

          आनंदाच्या परमोच्च शिखरावर ताठ मानेने, अभिमामाने आपण विराजमान होतो. बेधुंद होतो बेभान होतो अगदी... पण हे सगळं क्षणभर हो क्षणभरच असतं सगळ... वाऱ्याची झुळूक तेवढ्यापुरतीच असते नाही का? पुन्हा ती, कधी, कुठून, कशी येईल सांगता येत नाही पण तोपर्यंत असंच, असंच चालत राहायचं. असंच निरंतर आयुष्य जगत रहायच...पण आपलं हे मनं ऐकेल तेव्हा ना... ते एकच हेका घेऊन बसत. जे हवं ते कायम स्वरूपी... क्षणभरासाठी नको...इथूनच  मग सुरु होते...  मनाच्या वेदनेची कथा...

          वेदनेची जखम, जखमेचा वर्ण आणि व्रणाची सल ही कायम रहाते मनात. काही जखमा ह्या वेदना विरहित असतात. त्या कधी आपलं व्रण सोडून देतात ते कळून येत नाही. रक्त ओघळलं तरी त्याची जाणं होत नाही. पण जेव्हा ते नजरेत येतं, तेव्हा कपाळी प्रश्नार्थी आठ्या पडतात? हे कधी झालं? कस झालं? कुठे झालं?शोधार्थी मन मागोवा घेत राहतं. पुन्हा ते थांबत. किंचितसं कळवळतं आणि पुन्हा हसतं, पुन्हा भरारी घेत नवीन सुखद क्षणाकडे...

          काही वेदना कळून न येणाऱ्या असतात. त्याच काही वाटत नाही. पण  काही भरून न येणाऱ्या असतात... पण प्रत्येकवेळी मनाला भरारी घ्यावीच लागते नवीन सुखद क्षण शोधत.

          रहदारीच्या ऐन रस्त्यावर माणसाच्या गर्दीत कितीसा वेळ काढतो आपण, त्यातून मोकळी वाट काढावीच लागते तेव्हा कुठे मोकळा श्वास घेता येतो. तसेच काहीसे हे क्षण असतात... त्यातून बाहेर पडून मोकळा श्वास घेत मन तयारीला लागत नवीन सुखद क्षण शोधण्यासाठी...

          या सुख दुःख मिश्रित क्षणांनाच आयुष्य म्हणतात. म्हणून येणार्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यावा कारण गेलेला क्षण परत येत नाही. परत येतात त्या फक्त आठवणी......

- डॉ संदीप टोंगळे