Monday, May 9, 2016

सैराट - एक व्हायरस

          हे नागराजा… तुझ्याकडे जो दगड आहे ना तो असाच जपून ठेव कारण तू ज्याला स्पर्श करतोय त्याचं परिस होतंय रे... असं परिस जे समाजाला बदलविण्याची ताकत ठेवतंय. "सैराट" पाहिला आणि खरंच मन सैराट, सुसाट झालं. सुसाट गतीने विचार डोक्यात रेंगाळत होते. का? कसं? कोण? कशासाठी? असे कितीतरी प्रश्न डोक्यात भुंगा फिरल्यासारखे फिरत होते. डोकं अगदी सुन्न झालं होतं पण माझ्या सवयीनुसार मी लेख लिहायला सुरुवात केली या सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी...... आमच्या डॉक्टरी भाषेत बोलायचं झालं तर सैराट एक व्हायरस च आहे. कारण मानवी शरीरात गेलेला व्हायरस जसा पांढऱ्या पेशी कमी करतो तसा "सैराट" हा व्हायरस नसानसात भिनून काळ्या विचारांचा नायनाट करतोय आणि करत राहील.......

          "सैराट" म्हणजे एका खेडेगावातली निरागस प्रेम कथा. नुसती कथा नाही तर अधूनमधून पेपर मध्ये झळकणारी एक चार ओळींची बातमीच. पण एका संवेदनशील, भावनाशील दिग्दर्शकाच्या प्रतिभावान कलाकृतीमुळे थेट काळजाला भिडलेली आणि शेवटच्या मिनिटात काळीज अक्षरशः पिळवटून टाकणारी वास्तवतली व्यथा आहे. शेवटचं दृश्य तर अगदी परिणामकारक, सुन्न करणारं आणि अनेक प्रश्नांचं वादळ डोक्यात घोंगावणारं आहे. ती पावलं अक्षरशः झोप उडवणारी आहेत. जातींच्या नशेत विनाकारण झिंगाट झालेल्या आपल्या या समाजाला "आर्ची" च्या रुपाने "मिर्ची" लागलीय एवढं मात्र खरं. आपण एखाद्या कलाकृतीकडे निव्वळ कलाकृती म्हणून कधी बघायला शिकणार आहोत? प्रत्येक गोष्टीकडे जातीच्या भिंगातून पाहिलंच पाहिजे असा नियम आहे का कुठे?

          "सैराट" हा सिनेमा पहायला सर्वच जाती जमातीतील आणि सर्वच धर्मातील लोक थिएटर मध्ये गर्दी करतायत. सिनेमा पाहताना बेधुंद होऊन नाचतायत, मनसोक्त हसतायत, गहिवरून रडतायत आणि सिनेमाचा शेवट पाहून सुन्न होतायत. मग यात भावनेत फरक कुठे आहे? यात जात कुठे आहे? प्रत्येकाच्या भावना सारख्याच, मन सारखच प्रत्येकाला वाटणारा विचार सारखाच मग हा जातीपातींचा विषय आला कुठून? नाना पाटेकर यांचा क्रांतिवीर सिनेमातला dialogue आठवतोय. "बनाने वाले फरक नही किया तो तू कौन होता है फरक करनेवाला". आज आपल्या समाजात जन्मजात जातींबरोबर अजून एक जात घर करतेय ती म्हणजे सत्ताधारी श्रीमंत आणि स्वत:च्या आयुष्यावरही सत्ता नसलेले गरिब. पण खरं तर एक स्त्री आणि एक पुरुष या पलीकडे कोणतीच जात आपण मानली नाही पाहिजे असं मला तरी वाटतं.

          "सैराट" पाहताना तब्बल 3 तास मी एक वेगळं आयुष्य जगतोय याचं भानात होतो, त्यातल्या पात्रात समरस होत गेलो. परश्याचे मित्र, सल्या आणि लंगड्याच्या व्यक्तीरेखेसाठी नागराजमधल्या कथाकाराला खरंच सलाम करावा वाटतोय. आपल्याला आवडलेल्या मुलीचं प्रेम मिळत नाही हे स्विकारणारा लंगड्या हे खूप चांगला संदेश देऊन जातोय. सिनेमात कलाकारांइतकंच ग्रेट काम अधून मधून आकाशाच रूप सुंदर करणाऱ्या पक्षांच्या थव्यांनी केलंय. "किड्यामुंगी सारखं नाही जगावं वाटत", म्हणत आपल्या बळावर अचानक भेटलेल्या वास्तवाला धीरानं तोंड देणारी नायिका आणि लग्नानंतर आपल्या पुरुषी स्वभावावर जात तिच्यावर संशय घेऊनही तिच्या नसण्याने कोसळणारा नायक अतिशय वास्तविक रेखाटलाय. प्रेमविवाह करून निसरड्या वाटेवर उभे राहण्याची हिम्मत लागते ती पुरुषापेक्षा स्त्रीमध्येच असते आणि तिला पुरुषातल्या कोमलतेची साथ मिळाली की ते आयुष्य खूप सुंदर होतं जातं याची जाण होते.

          "सैराट" पाहताना काहीतरी वेगळं पाहतोय अशी जाण होत होती. सिनेमात जे काही जातीसूचक वाटतंय ते आजचं सामाजिक वास्तव दाखवण्या पुरतंच आहे. हा सिनेमा जातीपाती वर आधारित नाहीच. एका सुंदर प्रेमकथेत दिग्दर्शकानी एकाच वेळी बऱ्याच गोष्टी कल्पकतेने उभ्या करून दाखवल्या आहेत. Interval च्या आधी जे काही दाखवलं आहे, ते आज कुठल्याही गावात अगदी तसंच पाहायला मिळतं. आणि interval नंतर... मनाला घाव घालणारे काही प्रश्न उभे केले आहेत. पळून जाणे फार सोपी गोष्ट आहे, पण निभावणं? यानंतरच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणं? प्रेमाची वाट लग्नापर्यंतच नाही तर त्यापुढेही जास्त निसरडी असते, त्या वाटेवर पाय रोवून ठामपणे उभं रहाणं एकमेकांना समजून घेणं किती सुंदर होऊ शकतं आणि त्या सुंदरतेचा आपल्या अंहभावाने कसा विचका होऊ शकतो हे अतिशय सुंदररित्या मांडलय. आणि सगळ्यात शेवटी आपल्या संपूर्ण भारतीय समाजव्यवस्थेला मारलेली "झापड" अगदी मन हेलावणारी आहे. यातूनच "सैराट" - एक व्हायरस च्या रूपानेच काम करत राहील असं वाटलं. एकंदरीत मन सैराट करणारा अनुभव आहे......

- डॉ संदीप टोंगळे