Sunday, December 11, 2016

"एक सुंदर जमलेली रेसिपी"


          एखादा खाद्यपदार्थ तयार करताना अनेक पदार्थ एकत्र मिसळुन ती "रेसिपी" तयार केली जाते. त्यात मिसळलेल्या प्रत्येक पदार्थाचे कमी किंवा जास्त असे योग्य प्रमाणच ती रेसिपी चविष्ट आणि सुंदर जमायला मदत होते. त्यातल्या प्रत्येक पदार्थाचे आणि त्याच्या योग्य प्रमाणाचे विशेष महत्व आहे. एखादा पदार्थ कमी किंवा जास्त पडला तर त्या रेसिपी ची मज्जाच जाते. नेमकं असचं असत नवरा बायकोच्या नात्याचं. हो ना! खरच नवरा बायकोचं हे नातं म्हणजे "एक सुंदर जमलेली रेसिपी"च आहे. एखाद्या रेसिपीमध्ये असलेल्या अनेक पदार्थांप्रमाणे नवरा बायकोच्या आयुष्यात येणारे अनेक क्षण असतात. हे क्षण आनंद, सुख:, समाधान, यश, इच्छापूर्ती, प्रेम, हुरहुरी, काळजी, विश्वास या आणि अशा अनेक भावनांनी सजलेले असतात आणि दुःख, अपयश, अपेक्षाभंग, संशय, अविश्वास, समस्या, राग, अहंकार, वेदना अशा अनेक अनुभवांनी भरलेले असतात. वैवाहिक आयुष्यात येणाऱ्या अशा प्रत्येक क्षणाला महत्व आहे. यातल्या प्रत्येक क्षणाला सकारात्मकपणे शिकून आणि अनुभव घेवून आयुष्याची "रेसिपी" अगदी सुंदर करता येईल.

          खरच नवरा बायकोचं नातं हे किती अनाकलनीय असतं ना......? पूर्वी कधीच एकमेकांना पाहिलेले नसताना सुद्धा जन्मभर एकमेकांसोबत तितक्याच आत्मीयतेने रहाण्याची ओढ़ असते. आधी अनोळखी असणारं हे नातं हळूहळू होत जाणारी ओळख आणि स्पर्श यामुळे अधिकच फुलू लागतं. नंतर रुसवा, फुगवा, हट्ट, भांडण, अबोला या भावना विश्वात हे नातं चांगलच बहरू लागतं. एकमेकांशी समजुतीने वागताना, विश्वास ठेवताना, आधार देताना, सांभाळताना नकळत हे नातं चांगलच मूरतं. लोणचं मुरलं की त्याचा आस्वाद जेवणातली लज्जत वाढवतो तसच नवरा बायकोच नातं मुरलं की आयुष्याला एक हवीहवीशी वाटणारी वेगळीच चव येते. हे नातं विश्वास आणि प्रेम यावर अवलंबून असतं. वेळोवेळी कसोटीचे कठीण क्षण येत जातात. कोणत्या क्षणी कसे वागावे हे नीट कळले आणि पाऊलं सांभाळून पडली तरच हे आयुष्य चवदार होऊ शकते. नवरा बायकोचं नातं हे एकमेकांबद्दलच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपापल्या आवड निवडींना मुरड घालून जोडीदाराच्या आवड निवडीला प्राधान्य देत स्विकारलेले सुंदर सहजीवन आहे असं माझं मत आहे.

          आपण सर्वजणच आपल्या आयुष्यात अगदी लहानपणापासूनच किती तरी नाती निर्माण करतो तर काही नाती नकळत निर्माण होतात पण या सगळ्या नात्याना एकच बाजू असू शकते आणि एकच नाव असत. या नात्यांचा आवाका, मर्यादा, अपेक्षा ह्या सगळ्यांना एक सीमा असते. काही नात्यांसाठी ठळक अधोरेखित केलेली तर काही नात्यांसाठी अस्पष्ट होत गेलेली. पण ह्या सगळ्या पलिकडच अमर्याद असं नातं नवरा बायकोच आहे. सुरवातीला जरी अपेक्षाचं ओझ असलं तरी हळु हळु ते कमी होत जातं. एकमेकांच्या मनातील भावना न सांगता कळु लागतात. या नात्यात भांडण, वादविवाद किंवा मतभेद असणं अगदी साहजिकच आहे, कारण दोन वेगवेगळ्या वातावरणात वाढलेले, दोन वेगवेगळया विश्वात जगलेले हे दोन लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा तो कलह सहाजिकच नैसर्गिक असतो. आणि तो व्हायला ही हवा कारण ज्या दिवशी तुम्ही हक्काने भांडता त्या दिवशी तुमचा एकमेकांवरचा विश्वास वाढलेला असतो की हे नातं आपलं आहे, हक्काचं आहे. तो दिवस खरतर साजराच केला पाहिजे. 

          आपल्या वैवाहिक, व्यावसायिक आणि सामाजिक आयुष्यात रोज नवनवीन समस्या आपली परीक्षा घेण्यासाठी तयारीतच असतात. पण अशा समस्यांना प्रगतीतले अडथळे न समजता आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याच्या पायऱ्या समजून समस्येवर उपाय शोधला पाहिजे. पण त्या आधी आपण त्या समस्येचा मनापासून स्वीकार करायला शिकलं पाहिजे. ज्या क्षणी आपण समस्येचा स्वीकार करू, त्या क्षणी त्या समस्येचा आपल्या मनावरील ताण कमी झालेला आढळेल. त्यानंतर ती समस्या सोडविण्यासाठी आपण यशस्वी प्रयत्न करू शकू आणि अशाप्रकारे वैवाहिक जीवनातल्या तणावातुन सहजरित्या मुक्त होता येईल. आपल्या सर्वांचेच आयुष्य म्हणजे असंख्य चांगल्या आणि वाईट घटनांची साखळी असते. काही घटना अपेक्षित असतात, तर काही घटना अनपेक्षित घडतात आणि त्याची वेळही माहित नसते. प्रत्येक घटनेच्या वेळी बरेच वेळा आपण ‘प्रतिक्रिया‘ (Reaction) देत असतो. त्याऐवजी आपण 'प्रतिसाद' (Response) देण्याचा प्रयत्न केला तर आयुष्यातील बराच ताणतणाव (tensions) कमी होण्यास मदत होईल.

          या वैवाहिक, सांसारिक जीवनात आपण रोज नव्या आनंदांना, नव्या मानसिक धक्यांना, सुख दुःखाला सामोरे जातं असतो आणि ह्या सगळ्यांत आपण एकटे नाही ही भावनांच नेहमी खूप उत्साह, उमेद आणि बळ देऊन जाते. त्यामुळे नवरा बायकोचं हे सुंदर नातं खूप प्रेमाने जपलं पाहिजे आणि फुलांना पाणी शिंपडून फुलवतात तसं वेळोवेळी या नात्यावर प्रेम शिंपडून हे नातं फुलवलं पाहिजे. एकमेकांच्या सवयी, त्रुटी, गुण दोष जाणून घेऊन त्यासह एकमेकांना स्विकारायची तयारी ठेवली पाहिजे. नवरा बायकोच्या या नात्यामध्ये एकमेकांचा आदर करुन स्वाभिमान जपणे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि कसल्याही बिकट परिस्थितीत या एकमेकांबद्दलच्या आदराला आणि स्वाभिमानाला  तडा जाऊ न देणं ही दोघांची ही नैतिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी दोघांनीही नीट संभाळली तर नक्कीच हे नात मजबूत होईल, यशस्वी वैवाहिक आयुष्याची सुंदर घडी बसायला मदत होईल आणि मानसिकरित्या मजबूत राहून आपल्या व्यवसायात प्रगती करता येईल.

          मला तर असं वाटतं की, नवरा बायकोचं नातं हे नेहमी मित्र मैत्रिणीच्या नात्या सारखंच असलं पाहिजे. आणि तसं खूप ठिकाणी असतही पण मध्येच एखाद्या विषयात इगो जागा होऊन आपल्या नकळत आपल्यातले नवरा बायको जागे होतात आणि कलह सुरु होतो मग छान रंगत आलेली मैत्री फिसकटते. आपण नेहमीच मैत्रीत केलेली थट्टा किती सहज सोडून देतो. पण हेच जर का नवरा बायको मध्ये घडलं तर आपण थोडा वेळ एकूण घेतो आणि नंतर आपल्या आतली मैत्री विसरून नवरा बायको या नात्याला जाग येते, इगो जागा होतो आणि कलह सुरु होतो. म्हणून आपण ज्या त्या वेळी जे ते नाते जपू शकलो तर नवरा बायकोतली खूप सारी भांडणे सुरु होण्या आधीच संपू शकतील. एखाद्या क्षणी नवऱ्याचा किंवा बायकोचा खूप राग आला तर तेव्हा मित्र किंवा मैत्रीण बनुन समजुन घ्यायला पाहिजे म्हणजे राग आपोआप कमी होईल आणि काही वेळ मित्र किंवा मैत्रीण होण्याने आपली चिडचिडही होणार नाही. बिकट परीस्थिती शांतपणे हाताळायची आपल्याला सवय लागेल आणि मनात आणि घरात शांतता राहिल. असचं जर प्रत्येक नवरा बायको पक्के मित्र मैत्रीण झाले तर हे नातं म्हणजे नक्कीच "एक सुंदर जमलेली रेसिपी"च असेल.

          आज आमच्या वैवाहिक जीवनाला ६ वर्षे पूर्ण झाली. या जीवन प्रवासात आयुष्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या कठीण टप्प्यांवर माझी सावली बनून खंबीरपणे मला साथ देणाऱ्या माझ्या पत्नीला या ६ वर्ष यशस्वी सहजीवनाच्या खुप खुप शुभेच्छा......

- डॉ. संदीप सोमेश्वर टोंगळे.

Saturday, November 26, 2016

अशी माझी स्वरा......


दोन पाय माझ्या स्वराचे
घरभर मला फिरवणारे
पप्पा पप्पा म्हणत
आनंदी विश्वात मिरवणारे......

दोन हात माझ्या स्वराचे
गालावर माझ्या फिरणारे
मार्गातले अडथळे सारून
नवी वाट दाखविणारे

दोन शब्द माझ्या स्वराचे
मन शांत करणारे
गोंधळ गर्दी असतानाही
एकांत गाठणारे......

दोन डोळे माझ्या स्वराचे
सदा प्रफुल्लित असणारे
सतत आनंदी राहून
आयुष्याचा अर्थ सांगणारे......

दोन गाल माझ्या स्वराचे
गुबगुबीत दिसणारे
तीचं हसणं पाहून
दुःख सारं विसरवणारे......

गोड बोल माझ्या स्वराचे
बोबडे बोबडे बोलणारे
अर्थ न कळून सुद्धा
खूप काही सांगणारे......

दोन कान माझ्या स्वराचे
हळूच काही तरी ऐकणारे
तेच शब्द लक्षात ठेवून
पुन्हा ओठ पुटपुटणारे......

ते हसणे माझ्या स्वराचे
सर्वांना लोभवणारे
दुःख सारं विसरून
नवी उमेद देणारे......

असे सर्व नखरे माझ्या स्वराचे
सर्वांना आनंद देणारे
दुखाला सारून बाजूला
सुखाचे अनमोल क्षण देणारे......

हे सुंदर आयुष्य मुलींचे
जीवन जगण्याची कला शिकवणारे
तरी पण का हे जग
मुलींचा नाश करणारे,
तरी पण का हे जग
मुलींचा नाश करणारे......

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

"जिलेबी" या माझ्या ब्लॉग ची लिंक - http://drsandeeptongale.blogspot.in/2016/03/blog-post_8.html?m=1

Sunday, November 20, 2016

"वाट चुकलेली पाखरं"


          या तारूण्याचं रूपच काहीस वेगळं असत ना.......? एक निराळा उत्साह, उमेद, जिद्द, ध्येय, आनंद आणि अविट तारुण्यात रंगवत गेलेलं आपलं हे सुंदर विश्व...... हे सगळं कसं हेवा वाटणारं आणि हवहवसं वाटणारं आहे, पण आजकाल हे तारुण्य भरकटत चाललय की काय असा प्रश्न उभा राहतोय. पहाटेच्या सुंदर धुक्यापेक्षा सिगारेट चा धुर च जास्त आवडतोय आजच्या तरुणाई ला...... सदविचारांच्या नशे पेक्षा वेगळ्याच नशेच्या धुंदीत असते आजची तरुणाई...... स्वच्छ भारताच स्वप्न पाहणाऱ्या या देशात रस्त्यावर गुटखा, तंबाखु खावुन थुंकते ही तरुणाई...... सांसारिक, सामाजिक बांधिलकीत न अडकता, नेत्यांच्या नावाने नुसत कार्यकर्ता बनुन अडकलीय आजची तरुणाई...... म्हणूनच एकदा विचार करावासा वाटला "वाट चुकलेली ही पाखरं" पुन्हा येतील का दारी?

          मला डॉक्टरच व्हायचय, मला इंजिनीयरच व्हायचय अशा चाकोरीबद्ध करीयरच्या विळख्यातून काही तरुण, तरुणी केव्हाच बाहेर पडले आहेत. आजकाल आपल्या आवडीच्या क्षेत्रात करियर करण्यात मुले आणि मुलीही जिगर दाखवतात. भारतीय अर्थकारणात नळ दुरुस्तीपासून ते स्वतःच्या कंपन्या उभारणारी ही मुलं बघता बघता बिजनेस आयकॉन बनली आहेत. शिक्षण क्षेत्रात आवडीने काम करतानाही काही तरुण दिसतात. मोठा अधिकारी व्हायचा निश्चय करून जिद्दीने दिवसरात्र एक करणारी तरुणाई सुद्धा आज आपण पाहतोय. भीषण दुष्काळाने डबघाईला आलेल्या शेतीत काम करायला आणि शेतीत काहीतरी आमूलाग्र बदल घडवून आणायचा म्हणून राबयलाही काही तरुण तयार आहेत. अस असताना काही तरुण का भरकटत चालले आहेत. ते स्वतःच्या मनातला स्वच्छंदी पाण्याचा झरा का आडवून धरत आहेत?

          तरुणांची मने ही उंचावरुन पडणाऱ्या धबधब्यांसारखी स्वच्छंदी असतात. ती ओढ्या नाल्यातुन प्रगतीचा मार्ग काढत शिक्षणाच्या प्रवाहात स्वतःला झोकुन देतात. नंतर सांसारिक व सामाजिक क्षेत्राद्वारे नदीच्या खळखळाटात विलीन होतात आणि शेवटी प्रचंड अशा ज्ञानरूपी सागराला जावून मिळतात. पण आजकाल ही तरुणांची मनं कुठे तरी ओढ्यात किंवा नदीत बंधारा लावून अडवली जात आहेत. आयुष्यात नक्कीच काहीतरी उत्कृष्ट करून दाखवू शकणारे हे तरुण राजकीय हव्यासापोटी कार्यकर्ता म्हणून अडवले जातात आणि हेच तरुण मी अमक्याचा कार्यकर्ता, मी तमक्याचा कार्यकर्ता अस स्वतःला म्हणवून घेत आयुष्यभर निष्कारण अडकुन पडतात. अशा तरुणांचा ज्ञानरूपी वैचारिक प्रगतीचा प्रवाहच खुंटतो. काही तरुण तर क्षणिक सुखाच्या शोधात नशेच्या चक्रव्युहात अडकून राहतात आणि आयुष्यभर स्वतः मधल्या अस्मितेला आणि कर्तुत्वाला गमावून बसतात.

          सतत चुकीच्या गोष्टींच आणि चुकीच्या प्रवृतींच केलेलं अनुकरणच  या तरुणांच्या भीषण परिस्थितीला कारणीभूत आहे. त्यात अपुरे संस्कार, मोजक शिक्षण किंवा वैचारिक दारिद्रय या गोष्टींमुळे तरुण दिशाहीन होतात. आणि एकदा मार्ग चुकला की पुन्हा योग्य मार्गावर येणं खुप कठीन होवून जात. आजची शिक्षण पद्धती आणि संस्कार सुद्धा माणूस निर्माण करणारे न राहता पैसा निर्माण करणारी मशीन बनविण्याचा कारखाना झालीय. जो तो फक्त पैश्याच्या मागे धावतोय, पण हा पैसा आपल्याला धावत धावत कुठे घेवुन चाललाय हे बघायला ही कोणाकडे वेळ नाहिये. तरुण पीढी पण याच अनुकरण करत कसलाही विचार न करता नुसत धावतीय त्या मृगजळाच्या पाठीमागे...... तरुणांची ही अधोगती कशामुळे झाली? आपली परंपरा, संस्कृती, संस्कार, विचार कुठ गेले? हे सगळ पुन्हा उभ राहील पाहिजे. ही परीस्थिती बदलली पाहिजे, ती नक्कीच बदलली जाऊ शकते. त्यासाठी आपल्या समोर सकारात्मक वैचारिक दूरदृष्टी हवी आहे, त्याचाच अभाव आज कुठतरी दिसून येतो.

          सकारात्मक दृष्टीकोनातून विचार केला तर या सर्व प्रश्नांची बरीच उत्तरं मिळतील. आजचा तरुण हा पत्राकडून ई मेलकडे, हितगुज आणि गप्पागोष्टी कडून chatting कड़े, सूर तालाकडून DJ कडे, खेड्याकडून शहराकडे, पृथ्वीवरून मंगळाकडे आणि अंधश्रद्धेकडून निष्ठेकडे जात आहे. पण मला असे वाटते आजही हा तरूण विशिष्ट समाज रचनेकडून वैचारिक समाज बांधिलकीकडे जाणारा असला पाहिजे. तरच अशा सकारात्मक दृष्टिकोनातून निर्माण झालेली तरूण पिढी एक आदर्श पिढी असेल. आणि ही तरुण वयातच "वाट चुकलेली पाखरं" नक्कीच मार्ग शोधत योग्य वळणावर येतील.

- डॉ. संदीप सोमेश्वर टोंगळे.




Tuesday, October 25, 2016

"कला" जीवन जगण्याची


          तब्बल दीड एक महिन्यानंतर माझ्या "खेळ मनाचे" ब्लॉगवर एक विषय लिहायला घेतला आणि माझा शब्दसंग्रह, वाचन एवढंच काय डोक्यातले विचार सुद्धा अनोळखी असल्यासारखे माझ्याशी वागू लागले. रोजच्या कामाचा ताणतणाव, रोटरीच्या सामाजिक कार्यातुन अनुभवलेल्या भावनिक गोष्टींचा कल्लोळ, खांद्यावरच्या वाढत चाललेल्या जबाबदाऱ्या आणि डोळ्यातली महत्वाकांक्षी स्वप्नं या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ घालता घालता मी कधी कधी स्वतःला विसरुन जातो आणि देहभान विसरुन छाती फुटेस्तोवर नुसता पळत सुटतो. माणसाच्या गरजा त्या किती असतात, पण आपण त्याचच जास्त दडपण घेतो. अन्न, वस्त्र आणि निवारा या साध्यासुध्या गरजाचं रुपांतर मग 3 BHK फ्लॅट, ब्रँडेड कपडे खरेदी, फिरायला एक कार, आठवड्यातून एकदा हॉटेलींग आणि वर्षातून कमीत कमी दोन वेळा कुठेतरी ट्रिप एवढ्या मोठ्या लिस्ट मध्ये होतं. स्वप्न उराशी बाळगणं, ते पुर्ण करण्यासाठी धडपडणं, जिद्दीने मेहनत करून ते पुर्ण ही करणं यात एक आनंद असतो हे मला माहित आहे. पण माणुस या सुंदर आयुष्याचा आनंद मिळविण्यासाठी पैसा कमावतो की आनंद गमावण्यासाठी? हे मला अजूनही न उमगलेलं कोडं आहे. आयुष्यात सुखः आणि आनंद मिळवायचा असेल तर ते उपभोगायला ही शिकलं पाहिजे पण ते उपभोगण्यासाठी समाधानी वृत्ती हवी. माणूस आपले स्वतःचे सगळे हट्ट पुरवतो पण समाधानी वृत्तीनं जगण्याचा हट्ट करायला विसरत चाललाय, माणूस जीवन जगण्याची "कला"च विसरत चाललाय.

          मागे एकदा काय झालं, संध्याकाळी माझ्या consulting मधील खिडकीच्या ग्रीलमध्ये एक कबुतर शिरलं आणि त्याचा पाय अडकल्यामुळे ते तिथेच अडकून राहिलं. त्याला निघता येईना आणि तिथून उडुनही जाता येईना. पंखांची फडफड, चोची आपटणं, कर्कश्‍श ओरडणं सगळं करून झालं. मी ही त्याचा अडकलेला पाय काढण्याचा प्रयत्न केला पण पिंजऱ्यात अडकवून ठेवतील या भीतीमुळे त्याने मला तेही करू दिलं नाही. मग मी त्याला थोडं खाद्य म्हणून ज्वारीचे दाणे वाटीत ठेवून घरी निघून आलो. रात्र झाली, काहीच उपाय सापडत नाहीये असं लक्षात आल्यावर ते ही थकून झोपी गेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तोच झगडा. या वेळेस मात्र कालच्या पेक्षा जास्त आकांत मांडला होता त्याने. मी स्तब्ध होऊन फक्त त्याची धडपड बघत राहिलो आणि अचानक एका क्षणी त्याला एक बारीक वाट सापडली. जरासं खरचटलं, पंखही दुखावले... पण बाहेर पडलच ते कबुतर. त्या चुकून अंगावर पडलेल्या पिंजऱ्यातून... शक्‍य तितका सगळा जीवाचा आकांत करून बाहेर पडलं... बाहेर पडल्या पडल्या आकाशात सुंदर गिरकी घेऊन आनंद साजरा केला, या सुंदर निसर्गाचा, त्याला मिळालेल्या आयुष्याचा... त्याच्या अंगात उडण्याची "कला" आहे, त्याचा मनसोक्त आनंद घेत, समाधानी होऊन उडत उडत ते दृष्टी आड झालं. मी तिथेच त्यांच्याकडे बघत स्तब्ध... माझ्या चार भिंतींच्या consulting मध्ये... उगाचच पिंजऱ्यात अडकल्या सारखा... मोकळा श्वास घेण्याचा प्रयत्न करत... मनात विचार आला आपणही जीवन जगण्याची "कला" मनसोक्त अनुभवली तर......

          जन्म आणि मृत्यू च्या मधला काळ म्हणजे हे सुंदर आयुष्य. आपल्या या आयुष्यातला प्रत्येक क्षण अनमोल आहे, तो मनसोक्त जगता आला पाहिजे. टोचणाऱ्या, बोचणाऱ्या क्षणिक भावनिक गोष्टींचा लगेच विसर पडून वर्तमान क्षणातला आनंद उपभोगता आला पाहिजे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षडरिपू पासून परावृत्त होऊन निर्मळ आणि स्वच्छंदी जीवन जगण्याची "कला" अवलंबता आली पाहिजे. पिंजऱ्यातल्या कबुतरापेक्षा अमर्यादित आसमंतात मनसोक्त उडणाऱ्या कबुतरा सारखं आयुष्य जगता आलं पाहिजे. तरच या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद घेता येईल. मी तर पक्क ठरवलं आहे की आयुष्य कसं जगायचं. या सुंदर निसर्गाचा, या सुंदर आयुष्याचा आनंद घेत, आकाशात झेप घेत समोर येईल त्या क्षणाला सकारात्मक दृष्टीने पहातच आयुष्य जगायचं.

साध्या सरळ रस्त्यापेक्षा मला वळणावळणाचे रस्ते फार आवडतात, त्यांना सहज, सोपेपणा कधीच माहीत नसतो.

उंच उंच अशोक किंवा निलगिरी पेक्षा मला आवडतो तो सगळीकडे उभा आडवा पसरलेला वड, त्याला मर्यादा नसतात.

एका सरळ रेषेतच जाणाऱ्या सुर्यकिरणांपेक्षा मला आवडतो तो वारा, मन वाटेल तिकडे सैरा वैरा पळणारा, त्यात मनसोक्तपणा असतो.

सरळ पडणाऱ्या पावसाच्या थेंबापेक्षा जागा मिळेन तिथे वळणारी, डोंगरावरुन खळखळत वाहणारी नदीच मला जास्त वेड लावते. समोर येणाऱ्या कसल्याही अडथळ्याची तिला तमा नसते.

माझं आयुष्यही मला असंच जगायचंय, अगदी बेभान होऊन, ते जसं नेईल तस मला त्याच्याबरोबर जायचंय, अगदी मोकाट, सैराट, सुसाट, बेधुंद होऊन...... जीवन जगण्याची "कला" जोपासत, पूर्ण आकाशच काबीज करू पाहणाऱ्या त्या कबुतरा सारखं......

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.



Friday, September 9, 2016

"चष्मा"


           या सृष्टीची निर्मिती करताना खरं तर निसर्गाचं किंवा त्या सृष्टी निर्मात्याचं चुकलंच...... हो खरंच चुकलंय. जातीनुसार, धर्मानुसार वेगवेगळी माणसं तयार करायची विसरला तो...... जातीनिहाय शरीर रचना, धर्मनिहाय शरीर बांधा आणि जातीपातीवर आधारित सर्व शरीराची ठेवणं वेगवेगळी पाहिजे होती...... हा अमक्या जातीचा त्याचं नाक सरळ, तो तमक्या जातीचा त्याचे हात लांब, याला हाताला पंचवीस बोटे, त्याला तीनच...... म्हणजे सोपं झालं असतं. हो ना! मग आता तुम्ही म्हणालं की जाती,धर्म त्याने तयार केले नाहीत ते आपणच तयार केलेत...... हो खरंच आहे! "बनाने वाले ने फरक नहीं किया तो तू कोण होता है फरक करने वाला" हा क्रांतिवीर सिनेमा मधला dialouge हाच खरा माझ्या लेखाचा सार आहे. आपण आज जाती,धर्माच्या बंधनात एवढे अडकलोय की माणुसकीचा "चष्मा" घालायचं विसरून गेलोय. सर्वात आधी आपण माणूस आहोत आणि माणुसकी हिच आपली जात आणि धर्म. जातीच्या चष्म्यामुळे प्रगतीचा मार्ग धूसर दिसतोय, हे जातीचे चष्मे फेकून दिल्याशिवाय प्रगतीचा मार्ग आपल्याला दिसणार च नाही. पण कोणीच हा जातीचा चष्मा उतरवायला आज तयार नाही. उलट काळाच्या पलिकडचा विचार करुन समाजाच्या सुखासाठी झगडणार्‍या, समाजसेवेत संपूर्ण आयुष्य अर्पण करणाऱ्या महापुरुषांची ही जातीनिहाय वाटणी होताना दिसतेय. ज्यांच्या कार्याने समाज उभा राहिला, त्यांच्याच नावाने समाज पेटवला जातोय. तुमचं नाव, प्रतिमा, मान अपमान महत्त्वाचे की जाती, धर्माची बंधनं जुगारणारे महापुरुषांचे विचार महत्त्वाचे?

          आपण लहान असताना यात्रा-जत्रांतले घोळक्‍यातले जादूचे खेळ पाहण्यासाठी वडिलांच्या खांद्यावर बसून पहावे लागायचे. त्यांच्या खांद्यावर बसून तो खेळ त्यांच्यापेक्षाही अधिक चांगल्या तऱ्हेने पाहता येतो. लहान मुलांनी वडिलांच्या पायावर लोळण घेतली, तर जे वडिलांना दिसते, ते त्यांना दिसणार नाही. अर्थात, त्यांचे लहानपण हीच त्यांची मर्यादा होय. म्हणून वडिलांच्या खांद्यावर बसून म्हणजेच त्यांच्या विचारांवर स्वार होऊन त्यांनी अनुभवलेले, शिवाय त्यांच्यापेक्षाही पुढचे-लांबचे त्यांना अधिक स्पष्ट आणि चांगले दिसते. त्यामुळे त्यांचे ज्ञान अधिक समृद्ध होते. हे एक प्रतीक समजून आपण महापुरुषांकडे आपल्या सर्वांचे वडील म्हणून पाहू शकतो. महापुरुषांच्या खांद्यावर म्हणजे त्यांच्या विचारांवर स्वार होऊन, त्यांचे विचार आत्मसात करून, समजून घेऊन, अभ्यासून, त्यानंतर नवीन ज्ञानाच्या-काळाच्या, संदर्भाच्या आणि स्वतःच्या बुद्धीच्या प्रकाशात त्यांची मांडणी केली तर आपण काळाची गरज पूर्ण करू शकू आणि हे जातीचे चष्मे नक्कीच उतरवू शकू. त्यामुळे प्रगती चा धूसर मार्ग अगदी स्पष्ट दिसायला लागेल. या सर्व महापुरुषांच्या विचारसरणी प्रमाणे च आज या पृथ्वी तलावरील सर्वच लोक समान आहेत हे समाजाने मान्य केले पाहिजे. मी कोणत्याही विशिष्ट जाती, पंथाचा म्हणून मान सन्मान घेऊन मिरवू नये. जात ही उपमा त्याच्या व्यवसायावरुन भेटलेली आहे. (व्यवसाय हीच जात आणि जात हाच व्यवसाय. बस्स. इतकंच त्या जातीचं महत्व) पूर्वकाळात जात अशी काही कल्पना होती असे मला तरी वाटत नाही. त्यामुळे मी या जातीपाती मानत सुद्धा नाही आणि तशा विचारात सामील ही होत नाही. प्रत्येकाने आपण कितपत सुज्ञ व्हायचे व कितपत अडाणी राहायचे तो ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे. पण किमान जातीपातीच्या बंधनात अडकून एकमेकांचा द्वेष तरी करु नये.

          इतिहासातल्या कोणत्याही महापुरुषाने जाती, धर्म मानला नाही किंवा त्यानुसार प्रचार सुद्धा केला नाही. त्यांनी अगदी संपूर्ण आयुष्य झोकून जाती, धर्मातून समाजाला बाहेर काढून प्रगतीच्या मार्गावर आणून सोडले होते. पण आपण त्यांचीच जातीनिहाय वाटणी करून त्याचं प्रगल्भ समाजकार्य जातीपुरतं मर्यादित ठेवून त्यांना लहान करतोय असं नाही का वाटत? खरंतर आपल्या या कृतींमुळे ते लहान होणारच नाहीत पण त्यांनी जे त्यांच्या विचारांचं बीज रोवलं होत त्याचं लहानसं रोपटं निर्माण झालं खरं पण अजूनही त्या वटवृक्षाच्या सावलीची वाट पाहतेय आमची तरुण पिढी...... जाती, धर्माच्या चष्म्यातून पाहिलं तर मला त्या थोर महापुरुषांचे विचार अडगळीत पडल्यासारखे वाटतात. ज्या विचारांची खरी आज गरज आहे, जे विचार आजचा तरुण घडवू शकतात ते विचार आपण जाती, धर्मात बांधून ठेवणं किती योग्य आहे? थोड्या फार फरकाने सर्व महापुरुषांच्या बाबतीत हीच अवस्था आहे. फक्त वादाचे मुद्दे बदलतात, वाद चालूच राहतो आणि विचार मागेच पडले (किंवा पाडले?) जातात. थोर महापुरुषांनी केलं ते दिव्यच होतं आणि दिव्यच राहील पण त्यांना दैवत्व देऊन त्यांचे अनुकरण न करण्याची काढलेली पळवाट योग्य आहे का? खरे तर, महापुरुष माणसेच असतात आणि आपणही माणसेच आहोत(हो ना?). हे ओळखले, की महापुरुषांनी दिलेले विचार आणि केलेले कार्य पुढे घेऊन जाणे, प्रसंगी त्यात भर टाकणे हे माणूस या नात्याने समाजाप्रती आपले कर्तव्यच आहे. महापुरुषांनी माणुसकीचा "चष्मा" घालून जाती पातीची बंधन जुगारली आणि प्रगल्भ विचार मांडले, आज आपणही घालूयात का हाच "चष्मा"?

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे

Thursday, August 18, 2016

मनं गुंफणारा "धागा"


          खरंच काय विलक्षण ताकत आहे ना या "राखी"च्या धाग्यात! भावा-बहिणीच्या नात्याला अगदी घट्ट बांधून ठेवतो हा "धागा". हा नुसताच सुताचा दोरा नसतो तर ते एक शील, स्नेह आणि पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे पुरुषार्थाचे पवित्र बंधन आहे. ह्या एवढयाशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावा मिळतो आणि मन अगदी प्रफुल्लीत होऊन जातं. राखी बांधण्याचा अर्थ आपण त्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वत:ला वाहून घेऊन तिच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो. स्त्री कितीही मोठी, मिळवती झाली तरी तिच्या रक्षणाची जबाबदारी तिच्या भावावरच आहे हेच ती यातून त्याला सुचवत असते. यात तिचा दुबळेपणा नसून भावाच्या कर्तृत्वावरचा विश्वास दिसून येतो. रक्षाबंधन या सणाला बहिण भावाच्या हातावर राखी बांधते व भाऊ तिला प्रेमाची भेटवस्तू देतो. एवढेच नाही तर तिच्या संरक्षणासाठी खंबीर आहे याची ग्वाहीही देतो. पण ज्यांना भाऊ, बहीण, आई, वडील किंवा नातेवाईक कोणीच नाही त्यांना या नात्याचा अर्थ लागेल तरी कसा?

          आई-वडील नाहीत, नातेवाइक सांभाळत नाहीत, कोणाला आई, वडिलांनी जन्मताच सोडून दिलेले. कोणाचे आई, वडील वारल्यानंतर नातेवाइकांनी झिडकारलेले अशा अवस्थेत अगदी लहानवयातच कपाळावर अनाथपणाचा शिक्का बसलेला. अशी अवस्था असल्यामुळे नात्यांचा जिव्हाळा तर दूरच; परंतु नाते म्हणजे काय, याची ओळखही नाही. आई-बाप नसल्यामुळे संस्काराचा अभाव. नाते म्हणजे काय, हे कळण्यापूर्वीच अनाथाश्रमात दाखल झाल्यामुळे नात्यांतील ओलावा, प्रेम, आपुलकी या शब्दांशी कोणताही संबंध नसलेली अनाथ मुले आहेत. बहिणीला भाऊ नाही किंवा भावाला बहीण नाही आणि आपली संस्कृती सांगायला आई वडील नाहीत मग सणवार, संस्कृतीशी ओळख असणार कशी? अशा "उम्मीद फौंडेशन, कुर्डुवाडी मधील अनाथांना नात्यांच्या धाग्यामध्ये जोडण्याचे काम "रक्षाबंधन'चे औचित्य साधून आम्ही रोटरी क्लब मार्फत केले. त्या अनाथ बहिणी कडून राखी बांधून घेताना, तिच्याशी पवित्र नातं जोडताना जो आनंद झाला तो खूप मोठा आनंद आहे. त्या सर्व बहिणींना आम्ही म्हणालो कि "आता तुम्ही अनाथ नाहीत, तर रोटरी क्लब हा भावासारखा तुमच्या पाठीशी खंबीर उभा राहील". त्यामुळे अशा भाऊ आणि बहिणींच्या प्रेमातील पवित्र "धागा" जोडला गेला आणि मुलांमध्ये नात्यांची जाणीव निर्माण झाली, त्यांच्यातील नकारात्मक मानसिकता नाहीशी झाली, समाजाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला. म्हणूनच मी म्हणतो मन गुंफणारा हा "धागा" खरोखरचं अनमोल आहे.

          "रक्षाबंधन" हा भावा-बहिणींच्या प्रेमाचा दिवस. राखीच्या एका धाग्याने दोघांतील नाते आणखी घट्ट होत असते. अनाथाश्रमात राहणाऱ्या अशा शेकडो भावांना एक बहीण मिळावी, बहिणींना एक भाऊ मिळावा, प्रत्येकाला बहीण-भावाचे प्रेम कळावे, पोरकेपणाची भावना दूर व्हावी, नात्यातील गोडव्याने संस्कार व्हावेत यासाठी रक्षाबंधनादिवशी सर्व अनाथाश्रमात हा उपक्रम राबवला गेला पाहिजे. नशिबाने अनाथ बनवले असले तरी सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या असंख्य भावा-बहिणींकडून अनाथ भावांचे हात एका धाग्याने बळकट होतील. तर अनाथ बहिणींना रक्षणकर्ते भाऊ असल्याची जाणीव होईल. त्यामुळे राखीचा हा एक "धागा" केवळ सण किंवा औचित्य न राहता इथून पुढे प्रत्येक रक्षाबंधानाला अनाथांसाठी नात्यांच्या बंधनात जोडणारा एक मोलाचा "धागा" व्हावा असं मला वाटतं.

          भावा-बहिणीचं हे पवित्र नातं असतं च किती सुंदर. कधी भांडण कधी रुसवा, फुगवा, कधी ओरडणं कधी समजावणं, कधी मारणं कधी प्रेम करणं, कधी दुर्लक्ष तर कधी काळजी कधी लपवाछपवी, कधी उगीउगी रडणं तर कधी खदखदून हसणं या प्रत्येक गोष्टीत हे नातं ठळक दिसतच. याचं ताईचं लग्न होऊन तिला निरोप देण्याचा क्षण येतो, तेव्हा तिचा भाऊ पाहुण्यांच्या पाहुणचारात मग्न असतो. ताई विरहाच्या दुःखाने ढसाढसा रडत असताना भावाला लहानपण आठवत आणि तोही अश्रूभरल्या डोळ्यांनी बहिणीला भेटतो. त्यांच्या डोळ्यातला थेंब न थेंब त्यांच्या लहानपणातील आठवणींचा उजाळा असतो. खरंच भाऊ व बहिणीचे नाते अगदी रेशमी धाग्यासारखे नाजूक असते म्हणून ते व्यवस्थित जपले पाहिजे. आपल्या देशात प्रेम, आपुलकी अजुनही कायम असल्याने मनं गुंफणारा हा नाजूक "धागा" कायम अतुटच राहील.

माझ्या सर्व बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा

- डॉ. संदीप सोमेश्वर टोंगळे.

Tuesday, July 19, 2016

"गुरुदक्षिणा"


          ॥गुरुर ब्रम्हा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा
            गुरु साक्षात् परब्रह्म, तैस्मय: श्री गुरुवे नमः॥

          आपल्या भारत देशात आदर्श गुरु शिष्य परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. सात्विक ज्ञान संपादनासाठी ही गुरु शिष्य परंपरा आजच्या प्रगत काळात ही तेवढीच महत्वाची आहे. केवळ आपल्याला ज्ञान देणारे मानवरूपी गुरूच पूजनीय आहेत असे नाही, तर ज्या ज्या घटकांपासून आपण ज्ञान मिळवितो उदा. ग्रंथ, पुस्तके, इंटरनेट, पशु, पक्षी, वृक्ष एकूणातच सर्व निसर्ग या सर्वांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असला पाहिजे अशी धारणा मनात बाळगली पाहिजे. निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीपासून आपण काहीना काही शिकत राहतो, हा निसर्ग च आपला खरा गुरू आहे असं माझं मत आहे.

          नवजात जन्मलेल्या बालकाची प्रथम गुरू असते ती माता. चालायला, बोलायला लागला की त्या जीवावर संस्कार घडवतो तो पिता. शालेय जीवनात ज्ञान, कला, विज्ञान ह्यांचे जे आपल्याला धडे देतात ते शिक्षक-शिक्षिका, आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत ते आपलं मन. आणि या सुंदर आयुष्याला आणखीच सुंदर बनवितो तो निसर्ग हे सर्वच श्रेष्ठ गुरू आहेत. खरं गुरू पूजन, खरी गुरू पूजा म्हणजे या सर्व गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जो बोध केला आहे, जी शिकवण दिली आहे त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे आणि हीच खरी "गुरूदक्षिणा".

गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

-डॉ. संदीप सोमेश्वर टोंगळे
 डिस्ट्रिक्ट ऑफिसर पोलिओ प्लस
 रोटरी डिस्ट्रिक्ट 3132.

Tuesday, June 7, 2016

"गावं माझं वेगळं"


आदरणीय "दादा",

                    सप्रेम नमस्कार विनंती विशेष. क्षमा असावी, कारण "दादा" हे एकेरी नाव जरी वाटतं असलं तरी त्यामागे आदरच आहे हे समजून घ्यावं. गेली कित्येक वर्ष "एकच वादा, ...... दादा" असं म्हणत म्हणत आता प्रत्येक घरोघरी एकतरी "दादा" तयार झालायं, खरं तर भारतीय लोकशाहीसाठी, राजकारणासाठी ही चांगलीच गोष्ट आहे पण हे सर्व "दादा" आपल्या देशाच्या, गावाच्या विकासासाठी केलेला "वादा" विसरत चाललेत हे ही लक्षात घेतलं पाहिजे. पण आज खरी गरज आहे या सर्व "दादा" नी एकत्र येऊन स्वतःच्या गावाचा आणि पर्यायाने देशाचा विकास करण्याची. राजकारण हा लोकशाही चा अविभाज्य घटक आहे तो त्यापद्धतीने झालाच पाहिजे पण हे राजकारण असं नकोय कि ज्याने गावाचा विकास खुंटला जाईल. माझ्यासारख्या अराजकीय व्यक्तीने राजकारणाबद्दल बोलू नये असं खूप जणांचं मत असेल ही पण खरं तर लोकशाहीत, राजकारणात किंवा गावाच्या विकासात राजकीय लोकांइतकीच अराजकीय लोकांची भूमिका महत्वाची असते असं मला तरी वाटतं. आपल्या गावाविषयीच्या आपुलकीमुळे "गावं माझं वेगळं" असं प्रत्येकाच्याच मनात असतं. पण हे माझं गावं अजून वेगळं कसं करता येईल यासाठी हा पत्र प्रपंच......

                    "दादा", पण हे गाव म्हणजे असतं तरी नेमकं काय? आडव्या उभ्या गल्लीने उभी असलेली घरे म्हणजे गाव? मोठमोठ्या इमारती, झोपड्या, घरे आणि रस्त्यावरील वाहनांची गर्दी म्हणजे गाव? वस्ती वस्तीने राहणारा मानवी समूह म्हणजे गाव? छे छे! नाही ओ. मग काय असते ओ गाव? तर शांतता, सलोख्यानं आणि माणुसकी जपून एकत्र नांदणारा सुसंकृत समाज म्हणजे गाव. राजकीय स्पर्धा बाजूला ठेवून सर्व स्तरातल्या माणसांच्या विकासासाठी झटणारी ध्येयवेडी माणसं म्हणजे गाव......! सर्वांनाच आपल्या गावाबद्दल नितांत प्रेम असते. किंबहुना इतर ठिकाणापेक्षा आपले गावच जास्त आवडत असते. पण आज प्रकर्षाने हे विचार पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे कि माझे गाव खरेच आदर्श गाव आहे का? ज्या चांगल्या विकासाभिमुख सुविधा आहेत त्या माझ्या गावात आहेत का? स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षात काय विकास झाला माझ्या गावाचा? इतर गावांच्या  तुलनेत का मागे राहिले माझे गाव? आणि या सर्वाला जबाबदार कोण? आमच्या सारखी जागरूक नसलेली निष्क्रिय जनता कि सुस्त झालेले प्रशासन कि घराणेशाही च्या नावाखाली सत्तेचा सारीपाट नुसताच खेळवत राहिलेले कातडी बचाऊ राजकारणी? कोण, कोण आहे जबाबदार? कधी केलाय आपण विचार? काय केल आपण सर्वांनी आपल्या गावाच्या विकासासाठी? किती जागरूक आहोत आपण सर्व आपल्या हक्कासाठी? या सर्व गोष्टींचा विचार करण्याची वेळ आज आली आहे हे मात्र नक्की.

                    गावाचा विकास ही काही रातोरात होणारी गोष्ट नाही. विकास ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. केवळ भौतिक सोयी केल्या म्हणजे विकास झाला असे नाही तर लोकांच्या दृष्टिकोनात बदल होणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. पूर्वीच्या काळी जी समाजव्यवस्था होती, ती खूप चांगली होती. त्या वेळी लोकांच्या गरजा कमी होत्या. एकमेकांबद्दल प्रेम, माणुसकी आणि सहकार्याची भावना होती त्यामुळे गावं गुण्यागोविंदाने नांदायची. परंतु नंतरच्या तांत्रिक आणि भौतिक सुधारणांच्या काळात माणूस माणसाला पारखा झाला, पैशाला जास्त महत्त्व आले, व्यक्तिगत विकासाकडे जास्त लक्ष पुरवले गेले आणि त्यानंतर समाज, समूह, गाव या गोष्टींना दुय्यम महत्त्व येत गेले. त्यातूनच पूर्वी आदर्श असणारी समाज व्यवस्था पूर्णतः ढासळली आणि पुन्हा गावांच्या विकासासाठी नव्याने प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली. अर्थात यामागे काही दुष्काळ, अतिवृष्टी यांसारखी नैसर्गिक कारणेही आहेत, असे असले तरी संकटांच्या काळात एकमेकांना सांभाळून घेण्याची प्रवृत्ती गावाच्या उभारणीस नेहमीच हातभार लावत असते, म्हणूनच गावाच्या विकासासाठी लोकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असतो. लोक सहभागातून विकासकामे करायला प्रशासकांना ही सोप जातं. पण "दादा", कसा होतो गावाचा विकास? काय कराव लागत त्यासाठी? काय योजना असतात सरकारच्या ज्या आजपर्यंत आपण राबवू शकलो नाही? तथाकथित सुसंकृत, श्रीमंत आणि उच्चशिक्षितांचे गाव म्हणुन गणल्या गेलेल्या गावात याबाबतची जागरूकता अजून म्हणावी तितकी झाली नाही याचीच खंत वाटते. गावाने आपल्यासाठी काय केले म्हणण्यापेक्षा आपण गावासाठी काय केले, काय करतोय आणि काय करू शकतो असा विचार करणाऱ्या माणसांची आज गावाला खरी गरज आहे, किंबहुना त्याहून जास्त कृतीतून दाखवून देणाऱ्या माणसांची !!

                    "दादा" माझ्या गावाला अकलूज, बारामती किंवा कॅलिफोर्निया सारखं तयार करा असं मी अजिबात म्हणणार नाही. पण परिसरातल्या गावांना ही हेवा वाटावा, त्यांना असं वाटलं पाहिजे कि त्यांचं गाव पण माझ्या गावासारखं व्हायला हवं असा आदर्श गाव तयार करू. हा निश्चय आपण केला पाहिजे. कसे असते आदर्श गाव? तर, जिथे गरीब श्रीमंत, उच्च-नीच असले जातीभेद गाडून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झगडणारी जिंदादिल माणसे असतात, ते आदर्श गाव !! रस्ते, पाणी, वीज यासारख्या मुलभूत सुविधा प्रत्येकापर्यंत पुरेशा आणि मुबलक प्रमाणात पोहोचविण्यात यशस्वी होते, ते आदर्श गाव !! सार्वजनिक खतोत्पादक शौचालये, व्यायामशाळा, सौरदिवे, सेंद्रिय शेती, स्मशानभूमी, समाजमंदिर, वाचनालये, बचत गट, बिनविरोध निवडणुका, गावातच रोजगाराची निर्मिती इत्यादी गोष्टींनी युक्त असणारे गाव म्हणजे आदर्श गाव !! पण "दादा" या सर्व संकल्पनांचा विचार केला तर आपले गाव यातल्या प्रत्येक गोष्टीत कुठेतरी कमी पडतेय याबद्दल अतिशय खेद वाटतो. पण इतिहासाचे गोडवे गात भविष्याच्या कोरड्या आशेवर जगणाऱ्याचा वर्तमानकाळ बहुदा चांगला नसतो हाच आजवरचा अनुभवसिद्ध इतिहास आहे, नव्हे  तेच आजचे खरे वास्तव आहे. मग काय केले पाहिजे आपण? आजपासून आपण प्रतिज्ञा करूया, एक नवा इतिहास घडविण्याची !! प्रतिज्ञा करूया एका नव्या परिवर्तनाची !! सगळे मिळून एकदिलान प्रयत्न करण्याची !! एक नवं आदर्श गाव निर्माण करण्याची !!!

                    बदल हा घडत नसतो तो घडवावा लागतो, परीवर्तन ही काळाची गरज आहे, जो बदल घडवून आणतो तोच टिकतो हे हि इतिहासाने अनेकवेळा सिद्ध केलेले आहे. म्हणून परिवर्तनाची हि लढाई आता आपल्या सारख्या तरुण पिढीला लढावीच लागणार आहे, बदल हा घडवावा लागणारच आहे. यासाठी लोकांच्या दृष्टिकोनात बदल घडला पाहिजे. श्रमदान, सामूहिक प्रयत्न यांचे महत्त्व समजावून सांगून लोकांना ते पटले पाहिजे. आळस झटकून लोक गावासाठी पर्यायाने स्वतःसाठी कामाला लागले पाहिजेत. आपला प्रश्‍न आपणच एकत्रित येऊन व्यवस्थितरित्या सोडवू शकतो असा लोकांना विश्‍वास वाटला पाहिजे आणि जादूची कांडी फिरावी तसा गाव बदलत गेला पाहिजे. सामूहिक कामात लोकांच्या एकीची आवश्‍यकता आणि शासकीय विकासकामात लोकसहभागाचं महत्व गावाला पटलं पाहिजे. गावातला तरुण सुशिक्षित होतकरू वर्गच गावाची खरी संपत्ती आहे आणि हा तरुण वर्गच गावाचा विकासाभिमुख बदल घडवू शकतो. गावातील तरुणांच्या विचार आणि आचारांची दिशा आणि दशा योग्य असली की समृद्ध गाव निर्मिती ला वेळ लागणार नाही. गावाच्या विकासात अशा विचार आणि आचारांची श्रीमंती असलेल्या तरुणपिढीचा सहभाग असेल तर आदर्श गावं निर्मिती नक्की होईलच. तेंव्हाच आपण सर्वार्थाने आणि अभिमानाने म्हणू शकू की, "गावं माझं वेगळं"......

धन्यवाद......!

आपलाच एक तरुण गावकरी
- डॉ. संदीप टोंगळे

टीप - ब्लॉग वर प्रतिक्रिया देता येत नसेल तर तुमच्या प्रतिक्रिया 9561646178 या नंबर वर व्हाट्सअँप वर दिल्या तरी चालतील. धन्यवाद.

Monday, May 9, 2016

सैराट - एक व्हायरस

          हे नागराजा… तुझ्याकडे जो दगड आहे ना तो असाच जपून ठेव कारण तू ज्याला स्पर्श करतोय त्याचं परिस होतंय रे... असं परिस जे समाजाला बदलविण्याची ताकत ठेवतंय. "सैराट" पाहिला आणि खरंच मन सैराट, सुसाट झालं. सुसाट गतीने विचार डोक्यात रेंगाळत होते. का? कसं? कोण? कशासाठी? असे कितीतरी प्रश्न डोक्यात भुंगा फिरल्यासारखे फिरत होते. डोकं अगदी सुन्न झालं होतं पण माझ्या सवयीनुसार मी लेख लिहायला सुरुवात केली या सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी...... आमच्या डॉक्टरी भाषेत बोलायचं झालं तर सैराट एक व्हायरस च आहे. कारण मानवी शरीरात गेलेला व्हायरस जसा पांढऱ्या पेशी कमी करतो तसा "सैराट" हा व्हायरस नसानसात भिनून काळ्या विचारांचा नायनाट करतोय आणि करत राहील.......

          "सैराट" म्हणजे एका खेडेगावातली निरागस प्रेम कथा. नुसती कथा नाही तर अधूनमधून पेपर मध्ये झळकणारी एक चार ओळींची बातमीच. पण एका संवेदनशील, भावनाशील दिग्दर्शकाच्या प्रतिभावान कलाकृतीमुळे थेट काळजाला भिडलेली आणि शेवटच्या मिनिटात काळीज अक्षरशः पिळवटून टाकणारी वास्तवतली व्यथा आहे. शेवटचं दृश्य तर अगदी परिणामकारक, सुन्न करणारं आणि अनेक प्रश्नांचं वादळ डोक्यात घोंगावणारं आहे. ती पावलं अक्षरशः झोप उडवणारी आहेत. जातींच्या नशेत विनाकारण झिंगाट झालेल्या आपल्या या समाजाला "आर्ची" च्या रुपाने "मिर्ची" लागलीय एवढं मात्र खरं. आपण एखाद्या कलाकृतीकडे निव्वळ कलाकृती म्हणून कधी बघायला शिकणार आहोत? प्रत्येक गोष्टीकडे जातीच्या भिंगातून पाहिलंच पाहिजे असा नियम आहे का कुठे?

          "सैराट" हा सिनेमा पहायला सर्वच जाती जमातीतील आणि सर्वच धर्मातील लोक थिएटर मध्ये गर्दी करतायत. सिनेमा पाहताना बेधुंद होऊन नाचतायत, मनसोक्त हसतायत, गहिवरून रडतायत आणि सिनेमाचा शेवट पाहून सुन्न होतायत. मग यात भावनेत फरक कुठे आहे? यात जात कुठे आहे? प्रत्येकाच्या भावना सारख्याच, मन सारखच प्रत्येकाला वाटणारा विचार सारखाच मग हा जातीपातींचा विषय आला कुठून? नाना पाटेकर यांचा क्रांतिवीर सिनेमातला dialogue आठवतोय. "बनाने वाले फरक नही किया तो तू कौन होता है फरक करनेवाला". आज आपल्या समाजात जन्मजात जातींबरोबर अजून एक जात घर करतेय ती म्हणजे सत्ताधारी श्रीमंत आणि स्वत:च्या आयुष्यावरही सत्ता नसलेले गरिब. पण खरं तर एक स्त्री आणि एक पुरुष या पलीकडे कोणतीच जात आपण मानली नाही पाहिजे असं मला तरी वाटतं.

          "सैराट" पाहताना तब्बल 3 तास मी एक वेगळं आयुष्य जगतोय याचं भानात होतो, त्यातल्या पात्रात समरस होत गेलो. परश्याचे मित्र, सल्या आणि लंगड्याच्या व्यक्तीरेखेसाठी नागराजमधल्या कथाकाराला खरंच सलाम करावा वाटतोय. आपल्याला आवडलेल्या मुलीचं प्रेम मिळत नाही हे स्विकारणारा लंगड्या हे खूप चांगला संदेश देऊन जातोय. सिनेमात कलाकारांइतकंच ग्रेट काम अधून मधून आकाशाच रूप सुंदर करणाऱ्या पक्षांच्या थव्यांनी केलंय. "किड्यामुंगी सारखं नाही जगावं वाटत", म्हणत आपल्या बळावर अचानक भेटलेल्या वास्तवाला धीरानं तोंड देणारी नायिका आणि लग्नानंतर आपल्या पुरुषी स्वभावावर जात तिच्यावर संशय घेऊनही तिच्या नसण्याने कोसळणारा नायक अतिशय वास्तविक रेखाटलाय. प्रेमविवाह करून निसरड्या वाटेवर उभे राहण्याची हिम्मत लागते ती पुरुषापेक्षा स्त्रीमध्येच असते आणि तिला पुरुषातल्या कोमलतेची साथ मिळाली की ते आयुष्य खूप सुंदर होतं जातं याची जाण होते.

          "सैराट" पाहताना काहीतरी वेगळं पाहतोय अशी जाण होत होती. सिनेमात जे काही जातीसूचक वाटतंय ते आजचं सामाजिक वास्तव दाखवण्या पुरतंच आहे. हा सिनेमा जातीपाती वर आधारित नाहीच. एका सुंदर प्रेमकथेत दिग्दर्शकानी एकाच वेळी बऱ्याच गोष्टी कल्पकतेने उभ्या करून दाखवल्या आहेत. Interval च्या आधी जे काही दाखवलं आहे, ते आज कुठल्याही गावात अगदी तसंच पाहायला मिळतं. आणि interval नंतर... मनाला घाव घालणारे काही प्रश्न उभे केले आहेत. पळून जाणे फार सोपी गोष्ट आहे, पण निभावणं? यानंतरच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणं? प्रेमाची वाट लग्नापर्यंतच नाही तर त्यापुढेही जास्त निसरडी असते, त्या वाटेवर पाय रोवून ठामपणे उभं रहाणं एकमेकांना समजून घेणं किती सुंदर होऊ शकतं आणि त्या सुंदरतेचा आपल्या अंहभावाने कसा विचका होऊ शकतो हे अतिशय सुंदररित्या मांडलय. आणि सगळ्यात शेवटी आपल्या संपूर्ण भारतीय समाजव्यवस्थेला मारलेली "झापड" अगदी मन हेलावणारी आहे. यातूनच "सैराट" - एक व्हायरस च्या रूपानेच काम करत राहील असं वाटलं. एकंदरीत मन सैराट करणारा अनुभव आहे......

- डॉ संदीप टोंगळे

Thursday, April 14, 2016

"शिक्षणाची भीमगर्जना"


          ''शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही,'' - भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर

          "शिक्षणाची भीमगर्जना" करताना शिक्षणाचं महत्व बाबासाहेबांनी अतिशय उत्तम रित्या सांगीतलं आहे. खडतर जीवन जगत असताना त्यांना आलेल्या अनुभवातूनच शिक्षणाला किती महत्व आहे हे त्यांना समजत गेलं असेल. शिक्षणाने माणूस समृद्ध होतो, माणसाचे विचार समृद्ध होतात. शिक्षण हे समाजात बदल घडविण्याचे एक प्रभावी शस्त्र बनू शकते. शिक्षण माणसाला कर्तव्य आणि हक्कांची जाणीव करून देते. उच्चशिक्षित व्यक्ती बुद्धीने सशक्त होत जातो. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. इतरांप्रती आदर, विनयभाव आणि क्षमाभाव हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची अत्यंत गरज आहे. शाळेत जाणा-या मुलांना नुसती बाराखडी शिकवून उपयोग नाही तर बाराखडी सोबत मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय झाली पाहिजेत आणि समाजाच्या हितासाठी या शिक्षण समृद्ध मुलांनी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. शाळा म्हणजे उत्तम आणि कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत. याचे भान या प्रक्रियेत भाग घेणार्‍यां शिक्षकांनी मनात घ्यावे. राष्ट्रहीत व समाजहीताचे भान ठेवणारे हेच खरे शिक्षण आहे असे बाबासाहेबांचे स्पष्ट मत होते.

          आज शिक्षण क्षेत्रात इतके प्रभावी, प्रयत्नशील आणि गुणवत्तायुक्त शिक्षक आहेत की असं वाटत प्रत्येक व्यक्तीपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचं बाबासाहेबांच स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहाणार नाही. माझ्या परिसरातील अनेक शाळेत प्रभावी शिक्षक आहेत. माझा मित्र श्रीकांत काशिद याने तर त्याची शाळा इतकी सुंदर बनविली आहे आणि सुंदर शाळेसोबत तिथल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता इतकी वाढली आहे की प्रत्येक विद्यार्थी प्रभाव पाडून जातो. नागटिळक गुरूजी, सुहास चवरे गुरूजी आणि असे अनेक शिक्षक प्रभावी काम करताना दिसत आहेत. या देशाचं भवितव्य असणारी पीढी हे शिक्षक प्राथमिक शाळेत तयार करताना दिसत आहे. बाबासाहेबांच्या विचारानुसार शिक्षण हे जर वाघिणीच दूध असेल तर आज हे गुणवत्तायुक्त शिक्षक तळागाळातल्या मुलांपर्यंत हे वाघिणीच दूध पोहोचविण्याचं उत्कृष्ठ काम करत आहेत. "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा मूळमंत्र देताना सुद्धा बाबासाहेबांनी शिक्षणाला आधी महत्व दिलं आहे. शिक्षण, शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण प्रक्रिया हे सर्वच घटक इतके सक्षम बनले पाहिजेत की स्पृश्य अस्पृश्य ही भावनाच दूर लोटून दैदीप्यमान समाजनिर्मिती झाली पाहिजे. हेच बाबासाहेबांच ध्येय होत आणि आहे.

          पूर्वीच्या काळी जातीय विषमता हा आपल्या देशातील समाजव्यवस्थेचा आधार होता हे सर्वांनाच माहित आहे. पण आज शिक्षणामूळे जातीय विषमता नष्ट होताना दिसून येत आहे. आज प्रत्येक जाती-जमातीतील आपले समाज बंधू IAS, IPS, IRS म्हणून आपले नाव समाज मनात कोरत आहेत. आज बारा बलुतेदार जाती प्रक्रिया नष्ट होऊन तुमच शिक्षण, तुमचा व्यवसाय, तुमच सामाजिक कामच तुमची जात बनत चालली आहे ही समाजासाठी चांगली गोष्ट आहे. पण हा बदल फक्त आणि फक्त सर्वांना दिलेल्या समानशिक्षणाच्या हक्कामूळेच घडतोय आणि याची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या सारख्या अनेक महान नेत्यांनी केलीय हे देखील विसरून चालणार नाही. या महान नेत्यांनी दिलेली प्रेरणाशक्ती आज कोणालाच शिक्षणापासून वंचित ठेवत नाही. परिणामी आता जातीय समाजव्यवस्था बदलून शिक्षणावर आधारित अशी सामाजिक व्यवस्था बनत चालली आहे. आणि याचा परिणाम आपल्या देशाच्या उज्वल भविष्यासाठी नक्कीच होईल.

          डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रगल्भ ज्ञानसाधनेकडे पाहता हे लक्षात येते की त्यामुळेच ते स्वत: उत्कृष्ट शिक्षक व पुढे व्यापक अर्थाने समाजशिक्षक होऊ शकले. त्यांच्या विचारांची आणि मूल्यांची आठवण प्रकर्षाने होते. परंतु त्यांना अभिप्रेत असलेले सामाजिक परिवर्तन अजूनही ख-या अर्थाने झालेले नाही हे लक्षात घ्यायला हवे. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन शैक्षणिक परिवर्तनाद्वारे समतेचा लढा लढण्याचा निर्धार व्यक्त व्हायला हवा. अशा या महामानवाचे महान कार्य म्हणजे देशासाठी व समाजासाठीचे सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली महान देणगी आहेत. त्यांच्या प्रभावी विचारांचा उपयोग जर आज समाजनिर्मितीत झाला तर नक्कीच समाजपरिवर्तन घडून येईल. यासाठी सर्वांनी ही "शिक्षणाची भीमगर्जना" लक्षात ठेवली पाहिजे.

माझ्या सर्व बंधु आणि भगिनींना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती निमित्त खुप खुप शुभेच्छा

- डॉ संदीप टोंगळे

Friday, April 8, 2016

नात्यातली सुंदरता


          आजच्या प्रगत दुनियेत नातेसंबंध जपायला किंवा त्या बद्दल विचार करायला कोणाकडे वेळच नाही. प्रत्येक जण आपापलं जीवन जगण्यात मग्न आहे. कारण परिस्थिती च तशी आहे. अडीअडचणीवर मात करत प्रत्येक जण या जगात आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतोय. गरज नसलेला नात्यातला ताणतणाव, चिडचिड, सहनशीलता, अतिविचार या गोष्टींमुळे मानसिकरित्या आपण कमकुवत होत चाललो आहोत. त्याचा परिणाम आपल्या कामावर होतो, नात्यात तणाव निर्माण होतो आणि पर्यायाने करियर वरच परिणाम होऊ लागतो आणि पुन्हा चिडचिड सुरु होते मग हे कालचक्र सुरुच रहात. या कालचक्रात अडकून कितीतरी लोकांच आयुष्य उध्वस्त झालेल आपण पाहतोय. त्यामुळे मला वाटत आज प्रत्येकाला गरज आहे ती "नात्यातली सुंदरता" जपण्याची. आपण आपली नाती सहज आणि सुंदर बनवली पाहिजेत जेणेकरून नात्यात ताणतणाव येणार नाही आणि परिणामी आपलं करियर सुद्धा प्रगतीपथावर जाईल.

          आपण म्हणतो यशस्वी व्यक्ती च्या पाठीशी एक अशी व्यक्ती असते ती साथ देते म्हणून यश मिळते पण मला वाटत एखाद्या व्यक्तीला यशस्वी व्हायच असेल तो स्त्री असो वा पुरुष त्याच्या सर्व कुटुंबानेच दिलेली साथ ही खुप मोलाची असते. आज आपण पहातोय की स्पर्धा परीक्षेत खुप विद्यार्थी यश मिळवत आहेत. त्यांच्या पाठीशी त्यांच कुटुंब आहे म्हणून ही मूल यशस्वी होतात. त्या यशात या मुलाचाच सिंहाचा वाटा असतो हे जरी खर असल तरी त्याच कुटुंब मानसिकरित्या त्याला प्रबळ करून खुप मोलाची साथ देत असतं हेही तितकच खर आहे. माझे जवळचे मित्र डॉ विकास नाईकवाडे यांचे बंधू विशाल याची निवड तहसीलदारपदी झाली. त्याने खुप मोठ यश मिळवलं पण या यशात त्याच्या कुटुंबाने जी खंबीर साथ दिली तीच त्याला प्रेरणा देत गेली. मला वाटत त्यांच्या कुटुंबाने "नात्यातली सुंदरता" जपली म्हणून त्याला हे कष्ट करण्याची जिद्द येत गेली आणि तो यशस्वी झाला. असचं प्रत्येक नातं सहज आणि सुंदररित्या जर आपण जपलं तर नात्यातले ताणतणाव खुप प्रमाणात कमी होऊन ध्येय गाठायला मदत होईल.

          नातं आई वडिलांशी असो, भावाबहिणीशी असो, बायको मुलांशी असो वा जगातलं सगळ्यात सुंदर नातं म्हणजे ते मैत्रीच असो प्रत्येक नातं हे महत्वाचं असतं. ते अगदी सहजरित्या निभावता येऊ शकत पण काही लोक उगीच वाकडा मार्ग अवलंबून नात्याला किचकट बनवतात आणि आयुष्यभर स्वत:ला त्रास करून घेतात, दुसऱ्यालाही त्रास देतात. त्यापेक्षा सहज सोपा मार्ग अवलंबून सामजस्य दाखवून नाती खुप सुंदर बनवता येतात. खरं तर नाती ही मनाचं उत्तम टॉनिक आहेत ती मनाची ताकद वाढवतात. कठीण प्रसंगी एकमेकांना सांभाळण, जपन खुप महत्वाच आहे. त्यामुळे नाती टिकवण हे मानसिक स्वास्थ्यासाठी खुप आवश्यक आहे. नाती ही झाडासारखी असतात सुरवातीला त्यांची काळजी घ्यावी लागते पण एकदा ती बहरली की आयुष्यभर कोणत्याही बिकट परिस्थितीत सावली देत राहतात. हीच नात्यातली सावली आणि नात्यातली ताकत माणसाला मानसिकरित्या प्रबळ बनवतात आणि कोणतही कठीन काम करायला प्रेरणा देतात.

          पैसा हेच जीवनाचं ध्येय बनत चाललय. ‘use and through’ ही प्रवृत्ती सर्वत्र वाढत चाललीय. कामपुरता नात्याचा वापर करायचा आणि नंतर विसरून जायच ही मानसिकता बोकाळलीय त्यामुळे जीवनातली ‘नाती’ आता ‘माती’ सम होऊ लागली आहेत. पूर्वापार चालत आलेले नातेसंबंध आता नकोसे वाटू लागलेत. पण माणसाला जर प्रगती करायची असेल तर नात्यागोत्यात प्रेम असलच पाहिजे. कोणत्याही नात्यामध्ये हवा प्रामाणिकपणा, विश्‍वास, प्रेम आणि दुसऱ्याला प्रामाणिकपणे समजून घेण्याची भावना. वेळप्रसंगी समोरच्या व्यक्तीला माफ करणही जमलं तर नात्यात अधिक सुंदरता येते. नात्यातली 'use and through' ची प्रवृत्ती बदलली पाहिजे. आयुष्यातलं प्रत्येक नातं हे मोत्याच्या हारासारखं असतं त्यातला प्रत्येक मोती महत्वाचा असतो तसच प्रत्येक नात्याच महत्व आहे. म्हणून सर्वच नाती ही मोत्याप्रमाणे जपली पाहिजेत.

          नवराबायको मधलं नातं तर अनेकदा सत्त्वपरीक्षा बघणारच असतं. विश्‍वासाच्या आणि समजुतीच्या पायावर हे नातं घट्ट तग धरून उभं असतं. एकमेकांना सोबत करताना, आधार देताना, सांभाळताना नकळत हे नातं चांगलच मुरतं, दृढ होत जातं. लोणचं मुरलं की त्याचा आस्वाद जेवणातली लज्जत वाढवतो. तसंच या नवराबायकोच्या नात्याचं आहे, ते मुरलं की आयुष्य जगायला खुप मजा येते. आपल्या मुलांसोबत खेळताना स्वत: पण लहान मूलासारखं वागताना, मनातला एक निरागस कप्पा उघडतो आणि मग सगळं कसं सहज सोपं वाटायला लागतं. मनातल्या चिंता, निराशा विसरून जायला लावणारं हे लोभसवाणं नातं असतं. या नात्यात निखळ आनंद मिळतो. घरातल्या वडीलधा-यांच्या गरजा ओळखून त्यांच्याशी केलेली मैत्री कर्तव्यपूर्तीचा आनंद देऊन जातेच, पण मोठ्यांचे आशीर्वाद आपल्या कायम पाठीशी आहेत, ही भावनाच अधिक काम करायला बळ देत रहाते.

          मैत्रीचं नातं तर हक्काचं असतं. जिथं आपण आपल्या मनाचे राजे असतो. तिथं जीवाला जीव देणं असतं... रुसन फुगन असतं... समजून घेणं असतं... गृहीत धरणं असतं... प्रसंगी हट्ट करणंही असतं. मैत्रीच हे नातं निभावताना सर्वच गोष्टीचा उत्तम ताळमेळ राखणं गरजेचं असतं. तो जमला तर मग तुमच्या आयुष्याचं गणित कधीच चूकत नाही. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करणारं हे निर्मळ नातं असतं ते जपलच पाहिजे. या सर्व नात्यांमध्ये स्वत:चं स्वत:सोबत असलेलं नातं सुद्धा दृढ असलं पाहिजे. हे नातं हे अतिशय आतलं, खोलवरचं नातं आहे. स्वत:वर विश्वास, प्रेम असेल तर तोच विश्वास आणि प्रेम इतर नात्यांतही सहजपणे दिसून येतो. स्वत:वरच नाराजी, अविश्वास असेल तर त्याची सावली इतर नात्यावरही पडते. आपल्या मनाला नवीन काही स्वीकारता येत नाही तेव्हाही इतर नात्यांवर ताण येतोच. त्यासाठी इतर नात्यांसारखंच स्वत:चं स्वत:शी असलेलं नातंही मोकळं, मैत्रीचं असायला पाहिजे तरच प्रत्येक "नात्यातली सुंदरता" जपता येईल.

तुम्हाला आणि तुमच्या सर्व कुटुंबाला मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

- डॉ संदीप टोंगळे 

Wednesday, March 16, 2016

"विचारांची श्रीमंती"


          वैज्ञानिक प्रगत तंत्रज्ञान आपल्याला क्षणात एका क्लिकवर पाहिजे ती माहिती उपलब्ध करुन देत आहे, मोबाईल सारखी विविध भौतिक साधने पायाशी लोटांगण घेत आहेत, अत्याधुनिक आकर्षक सुखसाधनांच्या या जगात आर्थिक श्रीमंती उच्च शिखर गाठत आहे पण समृद्ध जीवनाचा ध्यास बाळगणाऱ्या आजच्या आमच्यासारख्या तरुण पिढीला गरज आहे ती विचारांनीही श्रीमंत असण्याची. आजची आमची तरुण पिढी भरकटत चालली आहे. चांगल्या विचारांच्या अभावाने चुकीच्या विचारांचा पगडा तरुण पिढीवर बसत चालला आहे.  आम्हाला आज भौतिक प्रगतीसोबत वैचारिक प्रगतीचीही गरज आहे. आमचे विचार उत्तम असण्याची गरज आहे. आपले विचार उत्तम असले की आपोआपच जीवन समृद्ध व्हायला लागतं. आपल्या आयुष्याला समृद्ध बनवते ती "विचारांची श्रीमंती".

          परवा अशाच एका चुकीच्या विचारांचा पगडा असलेल्या चाळीशीतल्या तरुणाशी माझा वाद झाला.(हो चाळीस वर्षाचा असला तरी तरुणच होता तो कारण त्याचे अपक्व विचार अगदी नुकतच कॉलेजात गेलेल्या तरुणासारखे होते) वैचारिक मतभेद असले असते तर तो वाद न होता एक सुंदर चर्चा झाली असती पण अगदी चुकीचे विचार मांडून त्या तरुणाने वादच घातला.(त्याचा वाद घालण्याचा उद्देश मला अजुन पण नाही कळला) असो पण माझा विषय हा नाही मला एवढच म्हणायच आहे की आजच्या आमच्यासारख्या तरुण पिढीवरील चुकीच्या विचारांच्या पगड्यामुळे तरुण पिढी किती भरकटत चालली आहे हे पाहून खरच आश्चर्य वाटतं आणि राग न येता अशा तरुण पिढीची किव येते. महात्मा गांधी, फुले, आंबेडकर, सावरकर आणि शिवाजी महाराजांच्या विचारांची देणगी असलेला 'तरुण' आज भुरसट विचारसरणी बाळगतो याची लाज वाटते.

          35 हजारांचा iphone घेऊन श्रीमंती मिरवणारे खुप भेटतील पण किमान 35 लोकांपर्यंत आपले चांगले विचार पोहोचवणारा खरा श्रीमंत असतो. 35 हजारांच्या iphone पेक्षा 10 हजारांचा android phone घेऊन त्या phone द्वारे 35 हजार लोकांना आपण आपल्यातल्या चांगल्या विचाराने समृद्ध करु शकतो. आज काल लाँग वे साइकलिंग च खुप खुळ आलयं. काही लोकं 2000km सायकल चालवतात. त्याने काही चांगल सिद्ध होत असेल असं मला तरी वाटत नाही.(आणि यात कुठे समाजासाठी उपयोगी अशा चांगल्या विचारसरणीचा पाया ही दिसत नाही)अशी साइकलिंग साठी 50 हजार रूपये फुकट घालवण्यापेक्षा किमान 3 गरीब गरजू विद्यार्थ्यांना 10-10km दूर असणा-या शाळेत जाण्यासाठी सायकल देऊन त्यांच्या भविष्याचा पाया रचणे म्हणजे खरी "विचारांची श्रीमंती" आहे असं मला तरी वाटतं. आणि त्याचीच या समाजाला गरज आहे.

          मी लेख लिहितो यात माझा कसलाही स्वार्थ नसतो. मी काही मोठा लेखक नाही किंवा कवी ही नाही. जे जे चांगल डोक्यात येत ते मी अगदी प्रामाणिकपणे कागदावर उतरवतो. हा माझा एक छंदच आहे. पण मी लिहित असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आपण जे विचार मांडतोय त्या विचारांशी आपण नकळत बांधील राहतो आणि नेमक तसच वागण्याचा प्रयत्न करतो. लिखानाने माणूस नक्कीच समृद्ध होतो पण त्या समृद्धिचा उपयोग, त्या विचारांचा उपयोग समाजासाठी व्हावा हा माझा प्रमाणिक उद्देश आहे. त्याच कारणाने मी लेख लिहून पोस्ट करतो. काहीना आवडतो, काहीना आवडत नाही, काही जन खुप चांगला प्रतिसाद देतात तर काही जन खुपच वाईट प्रतिक्रिया देतात. पण मी लिहितो ते सर्वांसाठीच. काही जन मला त्यांचे लेख कविता पाठवतात. खुप चांगले विचार असतात. अशी विचारांची देवाण घेवाण झाली की माणूस आपोआपच विचाराने श्रीमंत होत जातो.

              ''जो कर्म करी अहेतु निरंतर

                वेद तयास कळो न कळो रे

                ओळख पटली ज्यास स्वतःची

                देव तयास मिळो न मिळो रे'' - विदर्भकवी - डोंगरे

          A Bird sitting on the branch of tree isn't afraid of branch breaking because the bird trusts not the branches, but its own wings. Believe in yourself. जो स्वत:ला ओळखु शकतो तो जग जिंकु शकतो. आपल्या आतल्या चांगल्या विचारांच्या शक्तीला ओळखुन त्या विचारांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. फक्त समोरचा जो करतोय त्यात उणीवा काढून, समोरच्या व्यक्तीला चुकीच ठरवून काही साध्य होत नसतं. आपल्या आतल्या उणीवा, चुका काढून त्यात सुधारणा करणं गरजेच असतं. फाजील आत्मविश्वास ठेवून आंधळेपणाने जगण्यात काही अर्थ नाही. सर्वांच्या मनात खुप चांगले विचारही असतातच, त्याच विचारांना प्रोत्साहन देऊन एक चांगल काम आपण नक्कीच करु शकतो.

          मी माझे मनातले चांगले विचार मांडत असताना मी त्या विचारांशी बांधील होत जातो आणि माझा वाचक ही त्याच्या मनातल्या चांगल्या विचारांशी कायम बांधील असावा असा हा स्पष्ट आणि स्वच्छ उद्देश आहे माझ्या लिखाणा मागचा. लिहित लिहितच मीही खुप काही शिकतोय, खुप काही समजुन घेतोय. स्वत:च्या विचारांना प्रगल्भ बनविण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचा उपयोग सर्वांना व्हावा हीच प्रामाणिक इच्छा आहे. हे लिहित असताना माझ्या वाचकाला माझा मुद्दा समजावा म्हणून मी काही गाजलेल्या कविता, काही विचारवंतांचे मुद्दे किंवा सुविचार लिहित असतो. पण त्यामागचा उद्देश एवढाच की माझे विचार तुमच्या पर्यंत अगदी सहज पोहोचावे, ते तुमच्याच मनातले विचार आहेत हे उमजावे. या अत्याधुनिक भौतिक श्रीमंतीच्या जगात "विचारांची श्रीमंती" ही तितकीच गरजेची आहे हेही लक्षात यावं याच उद्देशाने मी लिहितोय आणि लिहित राहीन.

- डॉ संदीप टोंगळे

Tuesday, March 8, 2016

"जिलेबी"


          आपण जेवायला बसल्यावर स्वीट डिश म्हणून आनंदाने खातो ती "जिलेबी". एखाद्या कार्यक्रमात आग्रहाने खाऊ घालतात ती "जिलेबी". प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ असते ती "जिलेबी". मुलगी झाल्यावर वाटतात ती "जिलेबी". पण मुलगी झाली की त्या जिलेबीचा आनंद, आग्रह आणि आवड का कमी होत असेल बरं? "अरेरे मुलगीच झाली का?" असं का म्हणतात लोकं? त्यांच्याच पोटचा गोळा असतो ना तो मग मुलगी झाल्यावर एवढी निराशा का? 'ताटात स्वीट डिश म्हणून जिलेबी आवडते पण आयुष्यात स्वीट मुलगी नको' असं का? जितक्या आवडीने आपण जिलेबी खातो तितकीच आवड त्या मुली बद्दल का दाखवत नाही? या सुंदर सृष्टी ची निर्मिती झाली ती स्त्री मुळेच ना? आपल्या आयुष्याची सुरुवात झाली तीही स्त्री मूळेच ना? वैवाहिक जीवनाची सुरुवात केली तीही स्त्री सोबतच ना? आणि आयुष्याच्या शेवटी एक स्त्रीच मुलगी किंवा बायको बनुन साथ देते. पण आज एवढ्या प्रगतीपथावर असलेला माणुस कुठेतरी स्वत:च्याच मुलीला गृहीत धरायला, तिला सोबत घ्यायला विसरत चालला आहे की काय? असा प्रश्न आज माझ्या डोक्यात येतोय. समाजाने मुलीबद्दल एवढा तिरस्कार करण्याचं कारण तरी काय असेल? 'मुलगी नकोच' असा आग्रह का?

          'स्त्री भ्रूणहत्या' ही आपल्या समाजमनाला पोखरत चाललेली फार मोठी कीड आहे. याचा सामना कशा पद्धतीने करायचा हे एक मोठे आव्हान सरकार, सामाजिक संस्था आणि आपल्या सारख्या प्रत्येक सजग नागरिकापुढे आहे. या समाजात मुलीलाच दुय्यम वागणूक का? त्यांचा एवढा तिरस्कार का? त्यांच एक वेगळं अस्तित्व आहे, त्यांना त्याप्रमाणे जगु दया. 'मुलगी म्हणजे संकट' अशी समाजाची मानसिकताच स्त्री भ्रूण हत्येला कारणीभुत आहे. ही सामाजिक मानसिकता बदलली पाहिजे. अशा कितीतरी तेजोमय पणत्या विजवुन वंशाच्या दिव्याचाच आग्रह करणारे लोक समाजात आहेत याचच आश्चर्य वाटतं. 'मुलगाच पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे' असं म्हणणार्‍या बापाला मुलगा म्हणजे आयुर्विम्यासारखा वाटत असतो. तो मोठा झाल्यावर सोबत राहून आधार देईल. मरणानंतर मोक्ष देईल आणि आपला वंश पुढे चालवत ठेवील, असं वाटत असतं. वास्तविक, वंशाचा दिवा पाहिजे असं म्हणणार्‍याला वंशावळ तर माहिती असते का? आपल्या पणजोबाच्या अगोदरच्या कुणाचेच नाव सांगता येणार नाही, तरीही वंशाच्या दिव्यासाठी हट्टाहास केला जातो. बर समजा वंशाला दिवा मिळालाच नाही तर काय होईल ओ? असा काय फरक पडेल वंश नाही वाढला तर?

          गरोदरपणात सोनोग्राफी या तंत्रज्ञानाद्वारे गर्भजल प्रमाण, गर्भाची योग्य वाढ, गर्भाला जन्मत: असणारे व्यंग किंवा व्याधी कळु शकतात. या सोनोग्राफी तंत्राचा वापर गर्भाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. हा शोध लावल्यावर मानवजातीची मान उंचावली खरी पण तीच मान केवळ तो गर्भ एका स्त्रीचा आहे असं समजू शकल्यामुळे आणि शस्त्राचा वापर करून निर्घुणपणे नष्ट केल्यामुळे शरमेने किती झुकली आहे, याची कल्पनाही करता येत नाही. कोणतही तंत्रज्ञान हे आपल्या सोयी साठी असतं, सुरक्षितते साठी असतं पण सध्या मानवजातीला काळीमा लागेल अशी स्त्री भ्रूणहत्या या तंत्रज्ञानाद्वारे होताना दिसत आहेत. 'स्त्री भ्रूणहत्या' हा विचार करणारा कोणी "एक" नाही. हा इतका निष्ठुर विचार कोणा एका व्यक्तीकडून मार्गी लागत नसतो. "मुलगी नकोच" असा अविचार करणारा पिता, गर्भलिंग निदान करून घेणारी माता, गर्भलिंग निदान करून, स्त्री-भ्रूणहत्या सारखं अमानवी कृत्य करणारा डॉक्‍टर, हे कृत्य न होऊ देण्यासाठी असलेली शासकीय यंत्रणा, अशा प्रकारात रंगेहात सापडुन अडकलेल्यांना सुखरूप सोडविणारे राजकीय वरदहस्त, भावना शून्य समाज आणि हे सगळं निमूटपणे उघड्या डोळ्यांनी पाहून, वर्तमानपत्रातून वाचून आणि टीव्हीवर पाहून सुद्धा कमालीचे थंड राहून नसत्या फालतू गोष्टीचा अभिमान बाळगणारे आपण सर्व हे सगळे सामाजिक घटक स्त्री भ्रूणहत्येला कारणीभूत आहेत असं माझं स्पष्ट मत आहे.

          स्त्रीच्या गरोदरपणात तिच्या पोटी जन्म घेणारं स्त्री भ्रूण हे जिजामाता, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, समाजाप्रती कर्तव्यदक्ष असणा-या (माझ्या गावाकडंच्या) रोहिणी भाजीभाकरे यांच्या सारख्या अधिकारी किंवा एक आदर्श स्त्री आहे हे जर कळू शकल असतं तर स्त्री भ्रूणहत्या नक्कीच थांबली असती. हा एक काल्पनिक भाग झाला पण खरच प्रत्येक स्त्री ही याच रुपात जन्म घेते पण समाजाची क्रुर मानसिकता तिला वेगळ्या रुपात जगायला भाग पाडते. समाजातली स्त्री विषयीची ही मानसिकता जर अशीच राहिली आणि एक दिवस या छळाला कंटाळुन स्त्री ने जर प्रजनन कार्याला कायमची सुट्टी दिली तर काय होईल? ना पुरुष जन्माला येईल ना स्त्री. मग कसं चालेल हे जग? नुसती कल्पना तरी करा की काय होईल? भयानक आहे ना ही कल्पना. मग ज्या स्त्री शिवाय हे जग चालवण्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही त्याच स्त्रीला गर्भातच संपवण्याचा अमानवी विचार समाजात का होतोय? हे कुठेतरी थांबलंच पाहिजे. महात्मा जोतिबा फुले, शाहू महाराज, टिळक, आंबेडकर, महात्मा गांधी, सावरकर अशा अनेक समाजसुधारक नेत्यांच्या अथक प्रयत्नांमुळे समाजात थोडीफार सुधारणा जरी झाली असली तरी आजदेखील सर्व काही ठीक आहे असं म्हणण्याचं खरच धाडस होत नाही.

          गर्भातल्या मुलींची काल्पनिक पत्रं खुप आहेत. आणि खुप भावनिक ही आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या पत्रातील मजकुर सांगतो, 'आई तुला आठवत का? माझा भाऊ राजा आणि माझी मोठी ताई जेव्हा रडायचे, तेव्हा तू त्यांना समजवायचीस, कि रडू नका, आता थोड्याच दिवसात तुमच्याशी खेळायला आणखी एक भाऊ येईल. तेव्हा मी तुझ्या पोटात खळखळून हसायचे आणि म्हणायचे, "आई भाऊ नाही अगं ताईची आणि राजाभाईची छोटी बहिण येणार आहे" असचं सांग अगं त्यांना'. खुप साधाच पण माझ्या मनात उतरलेला संवाद. हा संवाद खुप काही सांगुन जातो. ते गर्भातलं बाळ ही खुप काही सांगण्याचा प्रयत्न करत असतं, पण ते आजच्या समाजातल्या क्रूर बुद्धिपर्यंत पोहोचत का नाही याची मनाला खुप खंत वाटते. स्त्री भ्रूण हत्या या विषयावर बरेच भावनिक लेख, बऱ्याच हृदयस्पर्शी कविता आणि पत्रे, संभाषणे आहेत. खुप समाजसेवी लोकं स्त्री भ्रूण हत्या विरोधी प्रभावी काम करत आहेत ही समाजासाठी खुप चांगली गोष्ट आहे पण मला एकच म्हणायचं आहे की "फक्त स्त्री भ्रूण हत्या थांबवुन उपयोग नाही, समाजमनाला लागलेली ही किड संपली पाहिजे, प्रत्येक आई बापाला मुला इतका मुलीचा लळा लागला पाहिजे. 'मुलगी म्हणजे संकट' ही चुकीची भावना नष्ट झाली पाहिजे. मुलगी म्हणजे ओझं न वाटता ओज (तेज) वाटलं पाहिजे."

          या सुंदर सृष्टीतलं हे सुंदर आयुष्य जगण्याचा प्रत्येक जीवाला अधिकार आहे. निसर्ग नियमाच्या विरुद्ध जावून काहीही केलं तर ते विनाशाच्याच दिशेने जात हे विसरून चालणार नाही. स्त्री भ्रूण हत्ये विषयी खुप जण बोलतात (माझ्यासारखे) पण आता प्रत्यक्षात कृती करण्याची वेळ आली आहे. जेवताना ताटात "जिलेबी" (स्वीट डिश) असली की जेवण पूर्ण झालं असं आपण म्हणतो. मग जी मुलगी झाल्यावर आपण "जिलेबी" वाटतो तिच्या शिवाय हे जग कसं पूर्ण होईल.

या महिला दिनानिमित्त प्रत्येकाने आपल्या ताटात "जिलेबी" (स्वीट डिश) आनंदाने, आग्रहाने आणि आवडीने घ्यावी.

सर्व महिलांना महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा

- डॉ संदीप टोंगळे

Wednesday, March 2, 2016

"जगाचा पोशिंदा"


          अन्न, वस्त्र आणि निवारा या आयुष्याच्या मुलभुत गरजा, या गरजा आपल्या बळीराजा शेतकरी शिवाय पूर्ण होऊच शकत नाहीत. धान्याशिवाय अन्न नाही, कापसाशिवाय वस्त्र नाही, लाकडाशिवाय निवारा नाही. आपलं सगळं आयुष्यच ज्या बळीराजावर अवलंबून आहे त्याच्या शिवाय पूर्णच होऊ शकत नाही तोच आज अपूर्ण आहे. "जगाचा पोशिंदा" मानल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांवरच आज उपाशीपोटी राहण्याची वेळ आलीय. आपला अन्नदाता शेतकरीच आज अन्न, वस्त्र, निवारा या मुलभुत गरजांना मुकतोय. महाग बियाणे, बेभरवशाचा पाऊस, आयुष्याशी खेळ खेळणारा बाजारभाव या गोष्टीने शेतकरी अगदी त्रस्त आहे. शेतीइतका बेभरवशाचा कोणताही व्यवसाय नसेल. जरा कुठे महागाई वाढली की, नोकरदारांचे पगार वाढतात. मात्र, पुन्हा त्यांचे पगार कमी झाल्याचे एकही उदाहरण नाही. पण शेतक-यांकडे माल नसतो तेव्हा धान्याचे भाव वाढलेले असतात. ते धान्य त्याच्याकडे आले की, ते थेट निम्म्यावर येतात. शेअर मार्केट पाच-दहा टक्क्यांनी कोसळले, तर त्याची लगेच बातमी होते. मात्र, धान्याचे भाव पंधरा दिवसात थेट अर्ध्यावर आले तरी कुणाला त्याची साधी चौकशी करावीशी वाटत नाही. अशा परिस्थितीत शेतकरी कसा जगणार? आणि तोच नाही जगला तर आपण कसे जगणार?

          स्वातंत्र्यानंतर उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी असं धोरण होत पण ते आता कुठे दिसत नाही. उलट शेतीलाच कनिष्ठ दर्जा मिळतोय. कष्ट करुन, उन्हातान्हात घाम गाळणाऱ्या या शेतकऱ्यांना कवडीमोलाचीही किंमत जर या देशात मिळत नसेल तर माझा देश सुजलाम सुफलाम म्हणण्याची आम्हाला लाज वाटली पाहिजे. 'काहीही बन पण शेतकरी नको बनू' असं म्हणणारी पीढी आपण तयार करतोय. आजचा तरुण या बिकट परिस्थिती मुळे शेतीकडे पाठ फिरवतोय. शेतीकडे आजची सुशिक्षित पीढी आकर्षित होत नाही. जगामध्ये एकमेव उत्पादन असे आहे, ज्याचा भाव तो उत्पादन करणारा (शेतकरी) ठरवत नाही, तर इतर लोक (व्यापारी, दलाल) ठरवतात. इतर उत्पादनात त्या मालाचा योग्य भाव ठरवून मार्केटमध्ये आणतात. पण शेतक-यांना मात्र त्याच्याच शेतमालाचा भाव ठरविण्याचा अधिकार नाही. शेतीबाबतचे हे धोरण बदलले पाहिजे. मुबलक वीज आणि पाणी पुरवठा, उत्कृष्ठ बी बियाणे, प्रत्येक पिकाला हमीभाव जर दिला तरच शेती व्यवसायाला पहिल्याप्रमाणे उत्तम दर्जा मिळेल.

          एक कप चहाला आम्ही १५-२० रुपये मोजायला तयार असतो पण एक कोथींबीरची जुडी १० रुपयाला झाली तर कासाविस होतो. शेती, शेतकरी आणि शेतमाल याकडे असं जर दुर्लक्ष होत राहील आणि असाच जर कनिष्ठ दर्जा मिळत राहिला तर भविष्यात शेतीच उरणार नाही. मग खाणार काय? मोटारी का सॉफ्टवेअर, रसायने का वीज? का हे साखर कारखाने? आजचा ऊस उत्पादक शेतकरी हा पारंपारिक शेतीसाठी एक समस्या बनत चालला आहे. १६ ते १८ महिने लागवड, इतर हंगामी पिकांकडे दुर्लक्ष, पारंपारिक शेतीचा अभाव, पाण्याचा अतिरिक्त वापर (पाणी मुबलक आहे म्हणुन किंवा कोण विचारतो म्हणुन...) या गोष्टींमुळे शेत जमीनीचा कसं कमी होत चालला आहे. या कडे लोकांच लक्षच नाही. शेतक-यांची अनुकरणाची प्रव्रुत्ती सुद्धा शेतीला घातक ठरत आहे. कांद्याचा भाव वाढतो आहे असे दिसले रे दिसले कि जो तो कांदेच लावणार. मग एवढे उत्पादन होते कि मागणी पेक्षा पुरवठाच एवढा वाढतो कि शेतक-यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. ज्या कांद्याला काही महिन्यांपुर्वी सोन्याचा भाव मिळवत होता तोच कांदा अक्षरश: फेकुन द्यावा लागतो. शेतक-यांनी आता फक्त ऊसाच उत्पन्न घेऊन मुबलक पैशाला बळी न पडता पारंपारिक शेती कडे लक्ष दिलं पाहिजे. आलटून पालटून पीकं घेवुन शेतीचा कस वाढवला पाहिजे.

*(मला स्वत:ला शेतीतलं फार काही कळत नाही, हे अनुभव मी माझ्याकडे येणा-या गरीब शेतकरी पेशेंट्स कडून घेतले आहेत. कारण श्रीमंत शेतकरी तर फक्त ऊसच लावतो त्यामुळे तो काय अनुभव सांगणार.)*

          आम्ही लहान असताना नेहमी शेतात जायचो. आमच्या आजोबांनी एवढी सुंदर शेती फुलवली होती जणू नंदनवन च...... (त्यामुळे तेव्हा शेतात सारखं जाऊ वाटायचं) द्राक्ष, दाळींब, लिंबु, केळी, नारळ, बोरं, आंबे, चिंचा, उंबर असे किती तरी प्रकार खायला मिळायचे (आज पाहायला सुद्धा मिळत नाहीत.) शेतात जाणं म्हणजे जणू आमच्या साठी एक पर्वणीच असायची. आता आमच्या मुलांना आम्ही अशी शेती फक्त दाखवू तरी शकू का? किती सुंदर दिवस असायचे ते. आजचा शेतकरी पारंपारिक शेती विसरत चाललाय. त्यामुळे आमच्या सारख्या तरुण पिढीचा शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलत चाललाय. शेती या विषयाबद्दल नकारात्मक भावना निर्माण होतेय. शेती करण्याची पद्धत बदलली पाहिजे (बदल म्हणजे नुसता ऊस च लावणे नव्हे). झीरो बजेट नैसर्गिक शेती सारख्या पद्धतीकडे लोकांचा कल वाढला पाहिजे. शेतीमालाच्या भाव आकारणीच्या पद्धतीत कालानुरूप बदल केला पाहिजे. तरच शेती कडे बघण्याचा दृष्टिकोण सकारात्मक होईल. सर्वच शेतक-यांचे शेतीविषयी योग्य प्रबोधन झाले पाहिजे. त्यांना अनुदानं, निधी, सबसीडी, कर्जमाफी, विजबील माफी याची सवय न लावता त्यांचा आत्माभिमान, स्वाभिमान वाढवला पाहिजे, त्यांना जागरूक शेतकरी बनवलं पाहिजे. तरच शेतीचा आणि पर्यायाने तरुण पिढीचा सर्वांगीण विकास साधता येईल. माझ्या मते ज्या दिवशी एका सामान्य गरीब शेतक-याचा साखर कारखाना उभा होईल, शेतकरी स्वत: शेतमालाचा भाव ठरवेल आणि कोणत्याही दलालाविना बाजारपेठेत स्वत:च उत्पादन स्वत: घेऊन जाईल त्यादिवशी शेतीला चांगले दिवस आले असं म्हणता येईल. आणि ख-या अर्थानं त्याच दिवशी माझा बळीराजा "जगाचा पोशिंदा" होईल.

*(हा लेख मी जेव्हा पाहिल्यांदा लिहिला, पूर्ण ही झाला, खुप सुंदर मांडणी ही झाली होती आता मी हा लेख पोस्ट करणारच होतो पण चुकुन माझ्याकडून delete झाला, इतकं वाईट वाटलं, एक क्षण मला काही कळेनाच, खुप खुप अस्वस्थ झालो, बैचेन झालो. आपार कष्टाने पिक उभं करून ते पिक पावसाविना वाया गेल्यावर आपला बळीराजा शेतकरी या पेक्षा कितीतरी वाईट मानसिक स्थितीतुन जात असेल याची जाणीव झाली.)*

- डॉ संदीप टोंगळे

Saturday, February 27, 2016

बळीराजा


          जगाचा पोशिंदा मानल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांवरच आता उपाशीपोटी राहण्याची वेळ आलीय. पण मला माझ्या शेतकरी मित्राला एवढच सांगायच आहे की परिस्थितीशी झगडण्यात धैर्य आहे. हे धैर्य तुम्ही दाखवण्याची हीच वेळ आहे. भ्याडासारखं मरणाला कवटाळू नका. ही वेळ नक्की निघून जाईल. स्वत:ला आणि कुटुंबाला धीर द्या.

आत्महत्या हा उपाय नाही रे

हे बळीराजा !!!!!!
दिवसा उन्हातान्हाचं घाम गाळुन
रात्रीही पिकांची चिंता तुला राही रे
जगाचा पोशिंदा म्हणतात तुला
तुझ्या धान्याची सर्वच जग वाट पाही रे
तुझ्यावर आलेल्या या संकटांना
आत्महत्या हा उपाय नाही रे
आत्महत्या हा उपाय नाही रे

हे ही वाईट दिवस निघून जातील
असं नेहमीच सांगते तुझी आई रे
तुझं धैर्य आहेत तुझी लेकरं बाळं
तू आज येशील अशीच वाट पाही रे
तुझ्या संसाराची तुलाच काळजी
मित्रा, आत्महत्या हा उपाय नाही रे
आत्महत्या हा उपाय नाही रे

आठव तुझ्या खंबीर बापाची हिम्मत
तुझ्यासाठी केली शरीराची लाही लाही रे
आठव तुझ्या बायकोचं आतोनात कष्ट
ती तुझ्यासाठीच कायम झुरत राही रे
तुझ्या भावनांना आम्ही समजू शकतो
पण आत्महत्या हा एकच उपाय नाही रे
आत्महत्या हा एकच उपाय नाही रे

या सुजलाम सुफलाम देशाचा राजा तू
अशा विध्वंसक निर्णयाची नकोस करू घाई रे
या जगाच्या कणाकणात हक्क तुझाच
तुझ्या जाण्याने रडल्या दिशा दाही रे
धीर दे स्वताला, तुझ्या कुटुंबाला
खरचं मित्रा, आत्महत्या हा उपाय नाही रे
आत्महत्या हा उपाय नाही रे

- डॉ संदीप टोंगळे

टिप- माझ्या कोणत्याही शेतकरी मित्राला माझी कसलीही मदत लागली तर 9561646178 या क्रमांकावर संपर्क करा. मी आणि आपला सर्व समाज तुमच्या मदतीस बांधील आहोत.

Thursday, February 25, 2016

हक्काचं "स्त्रीत्व"


          सृष्टीच्या निर्मात्याने ही सृष्टी निर्माण करताना सुंदर निसर्गासोबतच दोन सुंदर जीव पण तयार केले एक "स्त्री" आणि एक "पुरुष". स्त्री ला सृष्टी उत्पत्ती करणारी प्रजनन क्रिया दिली आणि पुरुषाला या प्रजनन क्रियेला पूरक अशी भूमिका दिली. निसर्ग निर्मितीच्या नियमानुसार च शारीरिक, मानसिक आणि भौतिक बदल या दोन जिवांमध्ये सृष्टी उत्पत्ती पासूनच आहेत. हे दोन भिन्न जीव, भिन्न लिंगी जरी असले तरी हे एकमेकास पूरक आहेत असं मला वाटतं. पण आजकाल जो स्त्री पुरुष समानतेचा विषय नेहमीच स्त्री-पुरुष वादातला कळीचा मुद्दा ठरतोय त्या विषयी मला आज बोलायचं आहे. स्त्रियांनी समानतेच्या मुद्दयावर आपली बाजू मांडताना आपल्या "हक्काचं स्त्रीत्व" गमावु नये एवढच माझं स्पष्ट मत आहे.

          जुना काळ सोडला तर आजची स्त्री ही पुरुषाच्या तुलनेत समान सक्षम आहे यात तिळमात्र शंका नाही. स्त्रिया पुरुषांपेक्षा बौधिक आणि शारीरिक क्षमतेने कमी असतात, या रडगाण्याला माझ्या मनात अजिबात स्थान नाही. आपल्या आजूबाजूला नुसतं बघितलं तरी हे आपोआप लक्षात येतच. त्यासाठी स्त्री-पुरुष समानता या पारंपारिक वादाचीही काही गरज उरलेली नाही. स्त्रियांच्या समानतेच्या लढय़ाला माझा पाठिंबाच राहीलं पण एक मात्र नक्की की समानता म्हणजे स्त्रियांनी पुरुष बनणं नव्हे. या दोघांमध्ये जसे शारीरिक फरक आहेत, तसे मानसिक आणि सामाजिक क्षमतांचेही फरक आहेत.(यात कोणाची कमी क्षमता किंवा कोणाची जास्त क्षमता हा मुद्दाच नाही). या फरकांचा विचार आणि सन्मान करणं म्हणजेच स्त्रीत्वाचा आदर केल्या सारखं आहे. स्त्रियांनी स्वत:च्या हक्कांबाबत जागरूक असणं, आग्रही असणं आणि प्रसंगी त्याकरता पुरुषी अहंकाराचा विरोध पत्करून लढे उभे करणं हेही स्वाभाविकच आहे. पण या लढयात स्त्रियांना पुरुष बनावंसं वाटतं, तेव्हाच मोठी चूक होते, हे मात्र नक्की. "स्त्रीत्व" हा स्त्री चा खरा दागिना आहे तोच जपला पाहिजे. निसर्ग नियमाच्या विरुद्ध जावून काहीही केलं तर ते विध्वंसकच ठरत. "स्त्रीत्व" हेच स्त्रियांच सुंदर अस्तित्व आहे त्यातच खुप सुंदर आयुष्य आहे. ते सोडून पुरुषी अस्तित्व का पाहिजे? आणि हा एवढा हट्ट का? स्त्री पुरुष समानता हा खरच खुप वादाचा विषय असेल समाजासाठी पण वाद होण्यासारखं ही काही नाही कारण स्त्री पुरुष समानता असं न मानता एकमेकांना पूरक अशी स्त्री पुरुष समरसता झाली पाहिजे अस माझं मत आहे. स्त्री पुरुष समानता असं समाजाने म्हणताना सुद्धा (समाजातील काही पुरुष नराधमांचा अपवाद वगळता) "स्त्री"चा उल्लेख आधी करणं म्हणजेच त्यांच्या "स्त्रीत्वा"चा आदर आहे हेही लक्षात घ्यायला पाहिजे.

          आमच्या सारख्या तरुण पिढीच्या मनात स्त्री पुरुष समानता हा वाद का येतो? नक्की खुपतेय तरी काय? पुरुषप्रधान संस्कृतीचा वारसा अजूनही आहे म्हणून हा विचार आपण करतोय, की आधुनिक युगात येणारे अनुभव खरोखरच दुःखदायक आहेत म्हणून आपल्या मनात असे विचार येतात? कॉलेजमध्ये असताना स्वतःचे विचार मांडणाऱ्या, मुलांच्या बरोबरीने सर्व ठिकाणी भाग घेणाऱ्या बिनधास्त मैत्रिणी सर्वांनाच आवडतात, पण लग्न झाल्यानंतर असे वागणारी बायको मात्र खटकते. संसारात पडल्यानंतर तिने ब-याच लक्ष्मणरेषाही पाळल्याच पाहिजेत, हा आग्रहच नाही तर अलिखित नियम आपोआप तयार होतो. आमची तरुण पिढी खरंच गोंधळलेल्या अवस्थेत आहे. नक्की काय योग्य किंवा अयोग्य हेच समजत नाही कारण सध्याची सामाजिक परिस्थिती त्याला कारणीभूत आहे असं मला वाटत. स्वतःच्या कर्तृत्वामुळे यशाचे शिखर गाठणाऱ्या अनेक स्त्रिया आजच्या समाजात दिसत आहेत, परंतु त्याचबरोबर शिक्षण आणि स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून व्यक्तीस्वातंत्र्याचा अट्टाहास करुन आपले संस्कार विसरून पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करणाऱ्या आणि आम्ही "आधुनिक" म्हणून वावरणाऱ्या काही स्त्रियाही समाजात आपण पाहत आहोत. खरं तर स्त्री आणि पुरुष यामध्ये कोण वरचढ, हा मुद्दाच व्यर्थ आहे. कारण दोघांच्याही भूमिका परस्परांना पूरक आहेत आणि या अशाच रहाव्या. निसर्गानेच स्त्री आणि पुरुष यांच्या शरीर आणि मनाची ठेवण वेगळी केलेली आहे. त्यामुळे प्रत्येक बाबतीत एकमेकांशी बरोबरी करणे हे मूर्खपणाचेच ठरते. स्त्री आणि पुरुषांची विचार करण्याची, मनातलं व्यक्त करण्याची, ताण स्वीकारण्याची, परिस्थितीला सामोरे जाण्याची पद्धत निसर्गतःच वेगळी असते. मग सर्वच गोष्टीत स्त्री-पुरुष समानता कशी शक्‍य आहे? स्त्री पुरुष समानता या वादात आपण न पड़ता स्त्री किंवा पुरुषाच स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामधील पुसट सीमारेषा ओळखण्याची कसब आमच्या तरुण पिढीने शिकली पाहिजे तरच हा वाद मिटेल असं मला वाटतं.

          स्त्री आणि पुरुष यांच्या नात्यात एक उत्तम सौंदर्य आहे आणि निष्कारण वाद करण्यापेक्षा ते सौंदर्य टिकवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा. जेव्हा ही जाणीव प्रत्येकात निर्माण होईल तेव्हाच स्त्री आणि पुरुष या नात्याला समृद्ध करता येईल. 'कॉकटेल’ नावाच्या एका सिनेमात स्वतंत्र, आधुनिक तरुणीची भूमिका करणारी दीपिका पदुकोन नायकाचं मन जिंकून घेण्यासाठी फुलके करायला शिकते. फुलके करता येणं म्हणजेच स्त्रीत्वाचं कर्तव्य आहे का? असा प्रश्न पडतो. प्रत्येक स्त्रीला स्वयंपाक आलाच पाहिजे, हेच का स्त्रीत्व? एवढचं असतं का प्रत्येक स्त्रीच कर्तव्य? स्त्री पुरुष समानता पाहिजे असेल तर तिला जे करायचं आहे, ते करण्यासाठी तिला मोकळीक असावी आणि मुख्य म्हणजे घराबाहेरची कामं करताना घर सांभाळण्यासाठी, मुलं वाढवण्यासाठी तिला पुरुषाचा सहभाग आणि इतर पूरक व्यवस्था मिळाव्यात. ही खरी समानता आहे, असं मला वाटतं. माझी बायको डॉक्टर आहे. आणि हो, तिला आजही 'भाकरी' बनवता येत नाही, पण म्हणून काही बिघडतं का? अजिबात नाही. उलट परवा मीच तिला म्हणालो की मलाच 'भात' तयार करायला शिकवं. मग मी 'भात' तयार केला म्हणजे माझ्या पुरुषत्वाला धक्का आहे का? मुळीच नाही. म्हणून म्हणतो की स्त्री पुरुष समानते पेक्षा स्त्री पुरुष समरसता पाहिजे.

          सर्वच स्त्रिया एकमेकींशी फार तुलना करतात आणि एकमेकींना सतत टोमने मारत असतात, त्यातच खुप वेळ घालवतात आणि डोकं ही, हे काही योग्य नाही. दुसरीची जाडी, साडी, दागिने, नवरा, नोकरी - प्रत्येक गोष्टीवर त्यांची बारीक नजर असते. साधी साडी असो नाहीतर फिस्कटलेला एखादा पदार्थ, एकमेकींच्या चुका काढण्यात यांना फार रस असतो आणि वेळही. आधीच त्यांच्या वाटय़ाला इतकी मोठी लढाई असताना त्या एकमेकींशी इतक्या चढाओढीने वागून नवे ताण का निर्माण करतात हे खरंच उमगत नाही. आज स्वत:चे समाजात स्थान निर्माण करणा-या महिलाच एकमेकांचे पाय ओढताना, लढताना दिसून येतात. हे चुकीचे असून, ते बदलण्याची आवश्यकता आहे. काही स्त्रिया तर पुरुषांची बरोबरी करण्याच्या नादात स्वतःचे स्त्रीत्वच हरवुन बसल्या आहेत हे त्यांच्या लक्षातच येत नाही. 'आम्ही पुरुषापेक्षा कमी नाही', 'आम्ही आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालतो', 'पुरुषापेक्षा जास्त प्रगती केलीय', 'पुरुषापेक्षा आम्ही स्त्रियाच श्रेष्ठ' अशी तुलना करताना तुम्हीच पुरुषाचं (नसलेलं) महात्म्य सांगताय हे लक्षातच येत नाही. आणि अशी तुलना होऊ ही शकत नाही. दोघांचं अस्तित्वच एकमेकांच्या तुलनेत खुप वेगळं आहे आणि त्यामुळे 'स्त्री पुरुष समानता' या पारंपरिक भांडणातून बाहेर पडणं जरुरीचं आहे. स्त्री पुरुष या सुंदर नात्याला समृद्ध करण्याची गरज आहे. स्त्रियांनी आणि पुरुषांनीही समानतेचा आग्रह जरूर धरावा, पण स्त्रियांनी पुरुष बनण्याचा वेडा हट्ट करू नये आणि त्याच्या हक्काचं "स्त्रीत्व" गमावू नये.

- डॉ संदीप टोंगळे

Tuesday, February 23, 2016

"माझी कागदी होडी"


"ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो
भले छिन लो मुझसे मेरी जवानी
मगर मुझको लौटा दो बचपनका सावन
वो कागजकी कश्ती, वो बारिश का पानी"

          कितीही पैसा खर्च केला तरी आपलं बालपण आपण परत नाही आणु शकत. आणि त्याची ओढ ही मोठं झाल्यावरच कळते. ते पावसात मनसोक्त ओलं चिंब भिजणं, पाण्याच्या डबक्यात मुद्दाम उडी मारणं, चिखलात खेलणं, पावसात घरातली भांडी भरुन घेणं, पाऊस संपला आणि चिखल झाला की तो खुपसणी चा खेळ, पावसात, चिखलात क्रिकेट, फुटबॉल या सर्व गोष्टी खेड्यात राहणा-या प्रत्येकाच्या आयुष्यात आलेल्या असतातच. क्रिकेट एक टप्पाआऊट, सुरपारंब्या, सुरपाट्या, लगोरी, डबा ऐसपैस, भोवरा, गोट्या, विटी-दांडु, लंगडी, पकडा पकडी, शिवणापाणी, चोर शिपाई, माझ्या आईचे किंवा मामाचे पत्र हरवले, भेंड्या, पतंग, आंधळी कोशिंबीर, पत्ते-मुंगूस, ५-३-२, झब्बू, गोट्या, कोय-या, मेणबत्तीच्या उजेडांत हाताने आकृती काढणे, सारीपाट, आट्यापाट्या, सापशिडी, नवा व्यापार, संगीत खुर्ची, छापा काटा असं किती किती प्रकारे त्या बालपणीचा आनंद घेतला असेल आपण सर्वांनीच. खरचं "रम्य ते बालपण आणि दिव्य त्या आठवणी". ते बालपण परत नाही येऊ शकत पण त्या आठवणींची जी भलीमोठी प्रॉपर्टी आहे आपल्या सर्वांकड़े ती आपण जपून ठेवली पाहिजे. आणि कधीतरी बाहेर काढून त्यात मनमुराद रमलं पाहिजे. अधून मधून का होईना पण मोठेपणी हे बालपण अनुभवलं तरच आयुष्यात मज्जा आहे. या आठवणींची पेटी कधी कधी उघडून बघितली तर लहानपण अगदी डोळ्यासमोर उभं राहतं. याच आठवणीतली एक आठवण म्हणजे "माझी कागदी होडी". या दुनियादारीच्या प्रपंचात कुठे तरी हरवली आहे? तीच शोधण्याचा प्रयत्न करतोय या लेखामधुन......

          मला "माझी कागदी होडी" शोधण्याच्या लागलेल्या हुक्कीचं कारण म्हणजे लहान मुलांच्या शाळेतील वार्षिक स्नेह संम्मेलन. हो मागे एकदा माझ्या मुलीच्या शाळेत वार्षिक स्नेह संम्मेलनाच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. त्या सर्व चिमुकल्यांनी एवढा सुंदर कार्यक्रम सादर केला की एकक्षण मी हरवूनच गेलो. त्या कार्यक्रमात स्त्रीभ्रूण हत्या, पाणी प्रश्न, शेतकरी आत्महत्या, वृक्ष तोड अशा अनेक विषयावर खुप सुंदर प्रकाश टाकला गेला. ती लहान चिमुकली मूलं ज्वलंत सामाजिक प्रश्न इतक्या सुंदर रित्या मांडत होती की असं वाटलं की या लहान मुलांना सामाजिक जाण आहे पण आपल्याला का नाही? हीच लहान मूलं देशाचं भवितव्य आहेत याचा अभिमान वाटतोय. या लहान मुलांच्या सामाजिक जाणीवेच्या पाठीमागे त्यांचे पालक, शिक्षक किंवा आपण सर्व जणच आहोत पण हीच सामाजिक जाणीव आपण जोपासतो का? आज लहान मुलांना जे आपण शिकवतो त्याची स्वतः किती प्रमाणात अंमलबजावणी करतो? त्या लहान मुलांकडे कागदाची होडी आहे तीच त्यांची आणि त्यांच्या विचारांची श्रीमंती. पण आपली कागदाची होडी कुठे हरवली आहे तीच आपल्या विचारांची श्रीमंती (सामाजिक जाणीव) आपण गमावून बसलोय का? या मुलांसारखं आपणही बालपणात खुप चांगल्या गोष्टी शिकलोय मग त्या आता कुठे हरवल्या? सामाजिक जाणीव फक्त लहान वयापुरतीच मर्यादित आहे का? मोठेपणी काय होत या सामाजिक जाणीवेच? लहानपणात हरवलेली ही "कागदी होडी" नंतर कोणीही शोधण्याचा प्रयत्न करत नाही. प्रत्येक जण स्वतःच्या प्रापंचिक भावविश्वात एवढा रमलेला आहे की आपलं काहीतरी हरवलं आहे याचं सुद्धा भान नाही राहील.

          खरचं मित्रहो, आपल्याला आपले सामाजिक भान पुन्हा चाचपण्याची वेळ आली आहे. कितीतरी वेळा आपण निव्वळ system वर टिका करून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतो. उदाः सार्वजनिक स्वच्छता. सध्या पिण्याच्या पाण्यासाठी बाटली चा सर्रास वापर होतोय. पण पाणी पिऊन झालं की ती मोकळी पाण्याची बाटली आपण कुठेही फेकुन देतो, ती गटारीत पड़ते आणि पावसाळ्यात गटारी बंद पडल्या की नालेसफाई च्या नावाने प्रशासनावर टिका करतो. त्यापेक्षा ती पाण्याची बाटली crush करुन व्यवस्थीत कचरापेटीत टाकली तर प्रश्नच नाही का मिटणार......? अशीच छोटी छोटी किती तरी उदाहरण आहेत की ज्यात आपण आपली सामाजिक जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतो. लहान वयात जे शिकतो, शिकवतो ते मोठे पणी विसरून जातो. या अशा सांस्कृतिक कार्यक्रमातुन लहान मुलांना दिलेला सामाजिक जाणीवेचा "बाळकडू" खरचं कौतुकास्पद आहे पण तो मोठेपणी जिभेला (मनाला) अधिकच कडू का लागतो? याचाही विचार करण्याची वेळ आली आहे.

देणा-याने देत जावे; घेणा-याने घेत जावे !
घेता घेता एक दिवस; देणा-याचे हात घ्यावे !

          समाजाला निस्वार्थी भावनेने, सढळ हाताने मदत करणारीही खुप मंडळी आहेत की जी लोकं 'ज्या समाजाने आपल्याला भरपूर दिलयं त्या समाजाच आपणही खुप काही देणं लागतो' ही जाणीव ठेवून समाज बांधिलकी जपतात. पण देणा-यांच्या हातांपेक्षा घेणा-यांच्या हातांची संख्या कितीतरी पटीने जास्त आहे मग ही आर्थिक विषमतेची दरी कशी पार होणार? म्हणूनच आपण सर्वांनीच आपली हरवलेली "कागदी होडी" शोधली पाहिजे, सामाजिक जाणीव ठेवून वागायला पाहिजे. मला वाटत जसं आपण या लहान मुलांना हे सामाजिक जाणीवेच बाळकडू देतोय तसचं आता आमच्या सारख्या तरुण पिढीलाही या सामाजिक बांधिलकीची जाणीव करून द्यायची गरज आहे. या तरुणाई च्या नसानसात जर समाजाबद्दलची जाण भिणली तर दिव्य समाज निर्मितीला वेळ लागणार नाही. माझ्या लहानपणीच्या आठवणीतल्या पेटीतली हरवलेली "माझी कागदी होडी" मला सापडली आहे, आणि मी ती आयुष्यभर जपेलच आणि सर्वांना ती शोधून देण्यासाठी मनापासून प्रयत्न करेल.

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Friday, February 19, 2016

"राजे" तुम्ही पुन्हा जन्म घ्या



          आज तब्बल साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा "छत्रपती शिवाजी महाराज" हे तीन शब्द उच्चारले की लगेच अंगावर रोमांच उभे राहतात, रक्त सळसळते, मनात एक आगळा वेगळा जोश तयार होतो, मराठी साम्राज्याचा जोश, हिंदवी स्वराज्याचा जोश, भारत देशाचा जोश. हा जोश प्रत्येकाच्या मनात वर्षानुवर्षेच नाही तर युगानुयुगे राहीलं यात तीळ मात्र शंकाच नाही. "छत्रपती शिवाजी महाराज की जय" असं म्हणुन तयार होणारा जोश अगदी त्या व्यक्तीच्या शरीरातल्या अनुरेणु पर्यंत पोहोचतो, अंगातली मरगळच निघून जाते. आदर्श पुत्र, आदर्श योद्धा, आदर्श राज्यकर्ता म्हणून खुप नावलौकिक तर झालच पण आदर्श व्यक्ती म्हणून आजही "छत्रपती शिवाजी महाराजांच" नाव घेतलं जात आणि घेतलं जाईल. पण हा आदर्श आपण जपतोय का? आज प्रत्येकाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज आहेत पण तनात, कणाकणात आणि आपल्या कामात शिवाजी महाराजांचा आदर्श आहे का? जसा "छत्रपती शिवाजी महाराजांनी" हिंदवी स्वराज्याचा हट्ट धरला होता आपल्या प्रजेसाठी तसा हट्ट आज आपल्या मनात आहे का? आजच्या आपल्या या समाजाच्या, देशाच्या बिकट परिस्थितीकडे पाहून असं वाटतं खरच "राजे तुम्ही पुन्हा जन्म घ्या".

          संपुर्ण विश्वातच अतुलनीय, अद्वितीय, अलौकीक, साहसी, पराक्रमी, सफल आणि आदर्श असा दुसरा शिवाजी राजा सापडणं अगदीच अशक्य आहे. शिवाजी महाराजांनी सरदार आणि किल्लेदारांच्या अन्याय,अत्याचारातून जनतेची सुटका केली, आणि उत्तम, शिस्तबद्ध शासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले. शिवरायांनी वतनदारी पध्दती बंद करून सैनिकांना, अधिकार्‍यांना पगार सुरु केले. शेतकर्‍यांचं शोषण करणारी जमीनदारी पध्दत बंद करुन शेतकर्‍यांचा फायदा असणारी रयतवारी पध्दत सुरु केली. जर एखाद्या भागातुन सैन्य जात असेल तर ते शेतांच्या लांबून न्यावे कारण शेतांच्या मधुन नेल्यास शेतातल्या पिकांची नासाडी होईल व तसे झाल्यास शेतकर्‍याने जगायचे कसे असा विचार महाराजांचा होता. आपल्या काळाच्या भरपुर पुढे पाहण्याची महाराजांची दुरदृष्टी आणि प्रजेची निष्ठावंत काळजी हे महाराजांच्या यशाचे खुप मोठे रहस्य आहे असं मला वाटतं.

          "छत्रपती शिवाजी महाराज" हे एक अष्टपैलू व्यक्तीमत्व होतं. ते इंजिनियर, डॉक्टर, वकील, उद्योजक, कलाकार(नट), उत्तम योद्धा होते. आजच्या प्रगत इंजिनियरना सुद्धा जमणार नाही अशा तब्बल 307 किल्ल्यांची रचना त्यांनी त्या काळी केली. (आपण आज त्यांच्या स्मारकासाठी जागा शोधतोय.) समाजाला लागलेल्या विविध मानसिक रोगांचा त्यांनी त्यांच्या कुशल बुद्धिमत्तेचा वापर करुन नायनाट केला. शिवाजी महाराज हे न्यायप्रिय होते. कोणावरही अन्याय न होता सर्वांच भलं करणारे उत्तम वकील होते. आदर्श राज्य उभारणीसाठी काय आवश्यक आहे याबाबत महाराजांचा खोलवर विचार होता. व्यापार आणि उद्योग राज्यासाठी खुप महत्वाचा आहे हे महाराज जाणुन होते. ते चाणाक्ष उद्योजक ही होते. आग्र्याहून स्वताची सुटका करून घेताना उत्तम अभिनय करुन शत्रुच्या डोळ्यात धुळ टाकली. शिस्तबद्ध लष्कर, उत्तम प्रशासकीय यंत्रणा, भूगोल रचना अभ्यास, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. असे ते आदर्श अष्टपैलू राजे होते.

          तर अशा "छत्रपती शिवाजी महाराजांच्या" महाराष्ट्रात आपण जन्माला आलो हे आपण आपले भाग्यच मानले पाहीजे. पण आज फक्त एवढ्यावरच थांबुन उपयोग होणार नाही. त्यांचा हा आदर्श पुढे सुरु ठेवला पाहिजे. फक्त मनातल्या भावना, फक्त जयजयकार, फक्त मिरवणुका एवढच पुरेसं नाही. "छत्रपती शिवाजी महाराजांना" अपेक्षित असलेले गुण आपण आपल्यात अंगिकारण्याचा यशस्वी प्रयत्न केला पाहीजे. आपला समाज, आपला देश यांच्या भल्यासाठी आपण झटलं पाहीजे. आपली शिवभक्ती, देशभक्ती फक्त भावना भडकवल्यावरच जागी होता कामा नये. प्रत्येक कणाला, प्रत्येक मनाला, प्रत्येक क्षणाला ही शिवभक्ती आणि देशभक्ती जागृतच राहिली पाहिजे. शिवभक्ती, देशभक्ती आपल्या रक्ताचा भागच बनली तर भ्रष्टाचार आपोआपच थांबेल आणि नितीमुल्येही आपोआपच जपली जातील. "छत्रपती शिवाजी महाराजांच्या" अंगात,नसानसात असलेली जिद्द, चिकाटी, उत्साह जर आपण आपापल्या क्षेत्रात,आपल्या व्यवसायात दाखवु शकलो तर सर्व क्षेत्रात आपला समाज पुढे जाईल. आणि हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशाला महासत्ता बनवता येईल. यासाठी आपल्या प्रत्येकाच्या मनात राजांचा तत्वांनी जन्म घेतला पाहिजे. म्हणून आता "राजे तुम्ही आमच्या प्रत्येकाच्या मनात जन्म घ्या".

तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खुप खुप शुभेच्छा

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे