Thursday, February 25, 2016

हक्काचं "स्त्रीत्व"


          सृष्टीच्या निर्मात्याने ही सृष्टी निर्माण करताना सुंदर निसर्गासोबतच दोन सुंदर जीव पण तयार केले एक "स्त्री" आणि एक "पुरुष". स्त्री ला सृष्टी उत्पत्ती करणारी प्रजनन क्रिया दिली आणि पुरुषाला या प्रजनन क्रियेला पूरक अशी भूमिका दिली. निसर्ग निर्मितीच्या नियमानुसार च शारीरिक, मानसिक आणि भौतिक बदल या दोन जिवांमध्ये सृष्टी उत्पत्ती पासूनच आहेत. हे दोन भिन्न जीव, भिन्न लिंगी जरी असले तरी हे एकमेकास पूरक आहेत असं मला वाटतं. पण आजकाल जो स्त्री पुरुष समानतेचा विषय नेहमीच स्त्री-पुरुष वादातला कळीचा मुद्दा ठरतोय त्या विषयी मला आज बोलायचं आहे. स्त्रियांनी समानतेच्या मुद्दयावर आपली बाजू मांडताना आपल्या "हक्काचं स्त्रीत्व" गमावु नये एवढच माझं स्पष्ट मत आहे.

          जुना काळ सोडला तर आजची स्त्री ही पुरुषाच्या तुलनेत समान सक्षम आहे यात तिळमात्र शंका नाही. स्त्रिया पुरुषांपेक्षा बौधिक आणि शारीरिक क्षमतेने कमी असतात, या रडगाण्याला माझ्या मनात अजिबात स्थान नाही. आपल्या आजूबाजूला नुसतं बघितलं तरी हे आपोआप लक्षात येतच. त्यासाठी स्त्री-पुरुष समानता या पारंपारिक वादाचीही काही गरज उरलेली नाही. स्त्रियांच्या समानतेच्या लढय़ाला माझा पाठिंबाच राहीलं पण एक मात्र नक्की की समानता म्हणजे स्त्रियांनी पुरुष बनणं नव्हे. या दोघांमध्ये जसे शारीरिक फरक आहेत, तसे मानसिक आणि सामाजिक क्षमतांचेही फरक आहेत.(यात कोणाची कमी क्षमता किंवा कोणाची जास्त क्षमता हा मुद्दाच नाही). या फरकांचा विचार आणि सन्मान करणं म्हणजेच स्त्रीत्वाचा आदर केल्या सारखं आहे. स्त्रियांनी स्वत:च्या हक्कांबाबत जागरूक असणं, आग्रही असणं आणि प्रसंगी त्याकरता पुरुषी अहंकाराचा विरोध पत्करून लढे उभे करणं हेही स्वाभाविकच आहे. पण या लढयात स्त्रियांना पुरुष बनावंसं वाटतं, तेव्हाच मोठी चूक होते, हे मात्र नक्की. "स्त्रीत्व" हा स्त्री चा खरा दागिना आहे तोच जपला पाहिजे. निसर्ग नियमाच्या विरुद्ध जावून काहीही केलं तर ते विध्वंसकच ठरत. "स्त्रीत्व" हेच स्त्रियांच सुंदर अस्तित्व आहे त्यातच खुप सुंदर आयुष्य आहे. ते सोडून पुरुषी अस्तित्व का पाहिजे? आणि हा एवढा हट्ट का? स्त्री पुरुष समानता हा खरच खुप वादाचा विषय असेल समाजासाठी पण वाद होण्यासारखं ही काही नाही कारण स्त्री पुरुष समानता असं न मानता एकमेकांना पूरक अशी स्त्री पुरुष समरसता झाली पाहिजे अस माझं मत आहे. स्त्री पुरुष समानता असं समाजाने म्हणताना सुद्धा (समाजातील काही पुरुष नराधमांचा अपवाद वगळता) "स्त्री"चा उल्लेख आधी करणं म्हणजेच त्यांच्या "स्त्रीत्वा"चा आदर आहे हेही लक्षात घ्यायला पाहिजे.

          आमच्या सारख्या तरुण पिढीच्या मनात स्त्री पुरुष समानता हा वाद का येतो? नक्की खुपतेय तरी काय? पुरुषप्रधान संस्कृतीचा वारसा अजूनही आहे म्हणून हा विचार आपण करतोय, की आधुनिक युगात येणारे अनुभव खरोखरच दुःखदायक आहेत म्हणून आपल्या मनात असे विचार येतात? कॉलेजमध्ये असताना स्वतःचे विचार मांडणाऱ्या, मुलांच्या बरोबरीने सर्व ठिकाणी भाग घेणाऱ्या बिनधास्त मैत्रिणी सर्वांनाच आवडतात, पण लग्न झाल्यानंतर असे वागणारी बायको मात्र खटकते. संसारात पडल्यानंतर तिने ब-याच लक्ष्मणरेषाही पाळल्याच पाहिजेत, हा आग्रहच नाही तर अलिखित नियम आपोआप तयार होतो. आमची तरुण पिढी खरंच गोंधळलेल्या अवस्थेत आहे. नक्की काय योग्य किंवा अयोग्य हेच समजत नाही कारण सध्याची सामाजिक परिस्थिती त्याला कारणीभूत आहे असं मला वाटत. स्वतःच्या कर्तृत्वामुळे यशाचे शिखर गाठणाऱ्या अनेक स्त्रिया आजच्या समाजात दिसत आहेत, परंतु त्याचबरोबर शिक्षण आणि स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून व्यक्तीस्वातंत्र्याचा अट्टाहास करुन आपले संस्कार विसरून पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करणाऱ्या आणि आम्ही "आधुनिक" म्हणून वावरणाऱ्या काही स्त्रियाही समाजात आपण पाहत आहोत. खरं तर स्त्री आणि पुरुष यामध्ये कोण वरचढ, हा मुद्दाच व्यर्थ आहे. कारण दोघांच्याही भूमिका परस्परांना पूरक आहेत आणि या अशाच रहाव्या. निसर्गानेच स्त्री आणि पुरुष यांच्या शरीर आणि मनाची ठेवण वेगळी केलेली आहे. त्यामुळे प्रत्येक बाबतीत एकमेकांशी बरोबरी करणे हे मूर्खपणाचेच ठरते. स्त्री आणि पुरुषांची विचार करण्याची, मनातलं व्यक्त करण्याची, ताण स्वीकारण्याची, परिस्थितीला सामोरे जाण्याची पद्धत निसर्गतःच वेगळी असते. मग सर्वच गोष्टीत स्त्री-पुरुष समानता कशी शक्‍य आहे? स्त्री पुरुष समानता या वादात आपण न पड़ता स्त्री किंवा पुरुषाच स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामधील पुसट सीमारेषा ओळखण्याची कसब आमच्या तरुण पिढीने शिकली पाहिजे तरच हा वाद मिटेल असं मला वाटतं.

          स्त्री आणि पुरुष यांच्या नात्यात एक उत्तम सौंदर्य आहे आणि निष्कारण वाद करण्यापेक्षा ते सौंदर्य टिकवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा. जेव्हा ही जाणीव प्रत्येकात निर्माण होईल तेव्हाच स्त्री आणि पुरुष या नात्याला समृद्ध करता येईल. 'कॉकटेल’ नावाच्या एका सिनेमात स्वतंत्र, आधुनिक तरुणीची भूमिका करणारी दीपिका पदुकोन नायकाचं मन जिंकून घेण्यासाठी फुलके करायला शिकते. फुलके करता येणं म्हणजेच स्त्रीत्वाचं कर्तव्य आहे का? असा प्रश्न पडतो. प्रत्येक स्त्रीला स्वयंपाक आलाच पाहिजे, हेच का स्त्रीत्व? एवढचं असतं का प्रत्येक स्त्रीच कर्तव्य? स्त्री पुरुष समानता पाहिजे असेल तर तिला जे करायचं आहे, ते करण्यासाठी तिला मोकळीक असावी आणि मुख्य म्हणजे घराबाहेरची कामं करताना घर सांभाळण्यासाठी, मुलं वाढवण्यासाठी तिला पुरुषाचा सहभाग आणि इतर पूरक व्यवस्था मिळाव्यात. ही खरी समानता आहे, असं मला वाटतं. माझी बायको डॉक्टर आहे. आणि हो, तिला आजही 'भाकरी' बनवता येत नाही, पण म्हणून काही बिघडतं का? अजिबात नाही. उलट परवा मीच तिला म्हणालो की मलाच 'भात' तयार करायला शिकवं. मग मी 'भात' तयार केला म्हणजे माझ्या पुरुषत्वाला धक्का आहे का? मुळीच नाही. म्हणून म्हणतो की स्त्री पुरुष समानते पेक्षा स्त्री पुरुष समरसता पाहिजे.

          सर्वच स्त्रिया एकमेकींशी फार तुलना करतात आणि एकमेकींना सतत टोमने मारत असतात, त्यातच खुप वेळ घालवतात आणि डोकं ही, हे काही योग्य नाही. दुसरीची जाडी, साडी, दागिने, नवरा, नोकरी - प्रत्येक गोष्टीवर त्यांची बारीक नजर असते. साधी साडी असो नाहीतर फिस्कटलेला एखादा पदार्थ, एकमेकींच्या चुका काढण्यात यांना फार रस असतो आणि वेळही. आधीच त्यांच्या वाटय़ाला इतकी मोठी लढाई असताना त्या एकमेकींशी इतक्या चढाओढीने वागून नवे ताण का निर्माण करतात हे खरंच उमगत नाही. आज स्वत:चे समाजात स्थान निर्माण करणा-या महिलाच एकमेकांचे पाय ओढताना, लढताना दिसून येतात. हे चुकीचे असून, ते बदलण्याची आवश्यकता आहे. काही स्त्रिया तर पुरुषांची बरोबरी करण्याच्या नादात स्वतःचे स्त्रीत्वच हरवुन बसल्या आहेत हे त्यांच्या लक्षातच येत नाही. 'आम्ही पुरुषापेक्षा कमी नाही', 'आम्ही आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालतो', 'पुरुषापेक्षा जास्त प्रगती केलीय', 'पुरुषापेक्षा आम्ही स्त्रियाच श्रेष्ठ' अशी तुलना करताना तुम्हीच पुरुषाचं (नसलेलं) महात्म्य सांगताय हे लक्षातच येत नाही. आणि अशी तुलना होऊ ही शकत नाही. दोघांचं अस्तित्वच एकमेकांच्या तुलनेत खुप वेगळं आहे आणि त्यामुळे 'स्त्री पुरुष समानता' या पारंपरिक भांडणातून बाहेर पडणं जरुरीचं आहे. स्त्री पुरुष या सुंदर नात्याला समृद्ध करण्याची गरज आहे. स्त्रियांनी आणि पुरुषांनीही समानतेचा आग्रह जरूर धरावा, पण स्त्रियांनी पुरुष बनण्याचा वेडा हट्ट करू नये आणि त्याच्या हक्काचं "स्त्रीत्व" गमावू नये.

- डॉ संदीप टोंगळे