"मी" नटसम्राट


          या लेखाच्या शीर्षकावरून असं वाटेल की "मी" स्वतःला "नटसम्राट" म्हणतोय. पण तसं अजिबात नाही. तो "मी" हा नटसम्राटाच्या मनातल्या स्वभिमानाचा "मी" आहे. हो बरोबर ओळखलतं...... कालच पाहिला हा सिनेमा. नाटकावर आधारित असला तरी हा सिनेमा नाटकी अजिबातच वाटत नाही. आजच्या समाजातील, कुटुंबातील वास्तवचित्रच खुप सुंदररित्या मांडल गेलं आहे. तीस-चाळीस वर्षे रंगभूमी गाजवलेला एक अतिशय स्वाभिमानी निवृत्त कलाकार, "नटसम्राट" अशीच त्याची ख्याती. तो शरिराने निवृत्त झाला असला तरी मनाने तो नाटकातच रमलेला असतो कायमचा. "मी" नटसम्राट, "माझी" रंगभूमी, "माझं" नाटक या स्वभिमानातच तो जगतो. त्याच्या स्वच्छंदी आणि बेफिकीर वागण्यामुळे सभोवतालच्या लोकांवर आणि स्वतःच्या मुलाबाळांवर विपरीत परिणाम होऊ लागतो. जे होतं ते सारं मुलामुलींच्या नावे केलेलं असतं. चाळीस वर्षे रंगभूमीवर असंख्य मानसन्मान भोगलेला हा नटसम्राट शरीराने आणि मनाने थकून जातो आणि सुरु होते त्याच्या आयुष्याची एक असह्य फरफट...... पण त्यात देखील त्याचा "मी" नटसम्राट हा स्वाभिमान सुटलेला नसतो आणि त्याचे नाटक ही मनातून गेलेले नसते.

          मला वाटतं की, कोणत्याही गोष्टीशी "मी" ला संलग्न न करता त्या गोष्टीविषयी तितकीच आत्मीयता वाटणे शक्य आहे का, जितकी "मी" संलग्न झाल्यावर वाटते? नटसम्राटाच्या बाबतीत तेच दाखवलं आहे, त्याने वठवलेल्या प्रत्येक पात्राशी, प्रत्येक नाटकाशी, त्याच्या "नटसम्राट" या पदाशी तो इतका संलग्न राहतो, इतका चिटकुन राहतो की इतर वेगळ्या गोष्टींचा तो विचारच करत नाही. नटसम्राटाच्या पत्नी चे दोन असे संवाद आहेत जे संपूर्ण कथेचा सार सांगतात. "तुम्ही नाटक बंद नाही केलं, ते घरी आणलतं" आणि "तुम्ही माफी मागितलेलं, कोणासमोर हात जोडलेलं मला आवडतं नाही". हे दोन असे संवाद आहेत ज्यात त्याची नाटकाबद्दलची संलग्नता आणि स्वाभिमानी "मी" या दोन्ही गोष्टी स्पष्ट दिसतात. त्याची पत्नीच त्याचा स्वाभिमान कायम जागा ठेवते. यात प्रत्येकाचा स्वाभिमान आणि समज-गैरसमज यातून निर्माण झालेला नात्यातील ताण-तणाव अतिशय सुंदर रेखाटला आहे.

          माणुस या पृथ्वीतलावर गेली हजारो वर्षे अस्तित्वात आहे. तो वैज्ञानिक दृष्ट्या अत्यंत प्रगतशील ही आहे. पण तरीही तो आजतागायत या नातेसंबंधातील समस्यांचे उत्तर शोधू शकलेला नाही. दोन व्यक्तींमधील नात्यात एवढा संघर्ष, एवढा तणाव का निर्माण होतो? एक माणुस दुसऱ्या माणसाबरोबर शांततेत व सामंजस्याने का जगू शकत नाही? शुल्लक गैरसमजामुळे नाते का दुरावतात? या आणि अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरे शोधण्यात आजपर्यंत तरी माणसाला अपयश च आलं आहे. खरच काय असेल कारण कोणत्याही नात्यातल्या इतक्या तणावाच? ज्या तणावामुळे काहींची आयुष्य च उद्ध्वस्त होतात. असं काय होत नेमकं की माणूस इतक्या टोकाच्या निर्णयाला पोहोचतो?

          एक प्रसंग सांगतो...... माझ्याकडे एक 70 वर्षाच्या आजी आल्या त्यांना मी तपासलं तर त्यांना खुप ताप होता मग त्यांना विचारलं की, 'अहो आजी सोबत कोणी आहे का खुप ताप आहे तुम्हाला?' त्यांनी जे उत्तर दिलं ते ऐकून मी चक्रावूनच गेलो. आजी म्हणाल्या, 'म्या एकटीच राहती बाबा, दोन्ही पोरं इंजिनियर हायती पण संभाळत नायती, मालक वारुन 5 वरिस झालं, पेंशन मिळती त्यावरच कसबसं जगती'. माझ्याकडे येणा-या प्रत्येक वयोवृद्ध बाई किंवा माणसापैकी 50% लोक हे एकटेच राहतात. का होत असेल असं? नात्यात इतकी दरी निर्माण का होते? हवेहवेशे वाटणारे नाते अचानक नकोसे का वाटु लागतात? नेमकं होत तरी काय?

          मला वाटतं की, आपण "मी" शी इतके चिटकलेलो असतो की आपल्याला आपल्या "मी" शिवाय बाकी गोष्टी शुल्लक वाटतात. दुस-याविषयी विचार करताना आपला "मी" आड येतोच. समजा मी ज्याप्रमाणे दुसऱ्या व्यक्तीसंबंधी माझ्या मनात एक image बनवलेली असते, तसचं त्या दुसऱ्या व्यक्तीने देखील माझ्यासंबंधी एक image बनवलेली असतेच. त्यामुळे आमच्या दोघांतील नातं हे आम्ही एकमेकांबद्दल बनवलेल्या images वर अवलंबून असतं. म्हणजेच आमच्या दोघांत जे नात असतं ते आमच्या मनातील images तयार करतात. आणि या images चांगल्या किंवा वाईट कसल्याही असू शकतात. आपल्या मनातला मीपणा आपल्या नात्यातील परिस्थिती ठरवतो. आपण आपल्याच गोष्टींना, विचारांना जास्त महत्त्व दिलं की नातं नाजुक होतच, नातेसंबधात अडचणी येतातच.

          एक उदाहरण सांगतो पहा पटतयं का? एखाद्या खुर्चीकडे बोट दाखवून ‘ही एक खुर्ची आहे’ असं मी म्हणतो, तेव्हा इतर अनेक खुर्च्यापैकी ती पण एक खुर्ची असते. परंतु जेव्हा ही ‘माझी’ खुर्ची आहे असं मी म्हणतो तेव्हा लगेचच त्या खुर्चीला एक विशेष स्थान प्राप्त होते. ही ‘माझी’ खुर्ची आहे, ती नीट ठेवली पाहिजे, दुसऱ्या कोणी त्यावर बसता कामा नये, असे अनेक विचार माझ्या मनात तयार होतात. जेव्हा त्या खुर्चीला आदरपूर्वक वागवले जाते तेव्हा मी तो माझा सन्मान समजतो व जेव्हा तिला लाथ मारली जाते तेव्हा ती मला मारलेली लाथ असते. अशा प्रकारे ही माझी खुर्ची आहे, असं म्हणून मी त्या खुर्चीशी एकरूप झालेलो असतो, किंबहुना मी ती खुर्चीच बनतो. हे विशेष स्थान त्या वस्तुमुळे नसून त्या वस्तूशी झालेल्या माझ्या संलग्नतेमुळे असते. म्हणजेच वस्तू मोठी नसते तर ‘मी’ मोठा असतो व तोच सर्व गोष्टींचे स्थान ठरवत असतो. आपले रोजचे जीवन जगताना वस्तू किंवा व्यक्तिशी ‘मी’चे या प्रकारे एकरूप होणे योग्य नाही. याच "मी" मुळे नाती टिकवताना अडचणी येतात.

          एखाद्या गोष्टीत आपला "मी" इतकाही गुंतून जावू नये की ती गोष्ट आपल्या नात्यांना, व्यवहाराला, आयुष्याला घातक ठरू शकेल. "नटसम्राट" या सिनेमात "मी" च्या अस्तित्वाविषयी, अस्मितेविषयी, स्वाभिमानाविषयी अगदी सहज रित्या खुप काही सांगितले आहे. आपण आपल्या आयुष्याचे सम्राट असतोच पण यात 'मीच सम्राट' असं मनात आलं की आयुष्याला वेगळं स्वरुप प्राप्त होतं. मी म्हणतोय तेच योग्य, मी करतोय तेच बरोबर असं जर म्हणत गेलो तर नात्यात अडचणी येतातच. आपला निर्णय, आपले विचार, आपले आचार हे सर्वसमावेशकच पाहिजेत. आपल्या सर्वांनाच आपल्या आयुष्याचा "नटसम्राट" होता येतच पण आपल्या या "मी" मध्ये फक्त स्वत:पुरता विचार न करता सर्व कुटुंबाचा, नातेवाईकांचा व समाजाचाही समावेश असावा.

- डॉ संदीप टोंगळे

Comments

Popular Posts