"मैत्री जिवाभावाची"


          माझ्या ब्लॉग चा खुप चांगला प्रतिसाद पाहून आनंद तर होतोयच पण एक भावना मनात येतीय की 'आपल्या मनातल्या चांगल्या विचारांचा खारीच्या वाट्या एवढा का होईना पण समाजासाठी उपयोग होतोय' हा विचार मनात सुखावून जातोय. तुमच्या सर्वांच्या या प्रतिसादाबद्दल खुप खुप आभार.

          आतापर्यंत चे ब्लॉग पाहून माझा एक मित्र मला म्हणाला की 'अरे तू मैत्री विषयी अजुन काही लिहीलं नाहीस, तुझा तर आवडता विषय आहे तो'. मी म्हणालो 'खरचं खुप आवडता विषय आहे. कोणाशीही केलेली मैत्री ही नेहमीच माझ्या खुप जिवाभावाची असते, मला खुप आवडेल या विषयी लिहायला' त्यावर तो म्हणाला 'तुझे मैत्री बद्दल चे विचार वाचण्यासाठी मी आतुर असेन'. मग ठरवलच की आपल्या मनातल्या मैत्रीबद्दल च्या भावना ब्लॉग वर मांडाव्या आणि म्हणून हा सगळा शब्दप्रपंच......

          मैत्री, मैत्री, मैत्री म्हणजे असतं तरी काय? मैत्री म्हणजे निरभ्र आभाळ, अथांग समुद्र, श्रावणसर, टिपूर चांदणं, परिजातकाचा सडा, मोगर्‍याचा दरवळ अशा अलंकारिक उपमा देवुन मैत्रीची व्याख्या मी एका साचात बांधून ठेवणार नाही. मैत्री ची व्याख्या अगदी सहज सोपी आहे. आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे मैत्री. एकमेकांच्या साथीने समृद्ध होत जाणं म्हणजे मैत्री. नाती, व्यवहार, हितसंबंध या पलिकडचं एक सुंदर विश्व म्हणजे मैत्री. मैत्रीचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे कर्ण आणि दुर्योधन. कर्ण म्हणजे मित्रासाठी त्याग करणारा, मित्रासाठी वाट्टेल ते करणारा निश्चयी माणूस, दुर्योधनासारख्या वाईटाच्या मार्गी लागूनही त्याला अखेरपर्यंत साथ देणारा सच्चा मित्र, त्याचा विश्वासघात न करणारा विश्वासू मित्र. मैत्रीच्या इतिहासात अजरामर होणारा असा हा कर्ण. मैत्री ची व्याख्या या पेक्षा वेगळी काय असू शकते.

          आजच्या तरुण पिढीच्या बेरोजगारीच्या युगात गरज आहे, ती समाजाने बेकार ठरवलेल्या हुशार, सुशिक्षित 'सुदाम्या'ला मैत्रीखातर त्याच्याजवळ पोहे जरी नसले तरीही त्याच्या एका 'कट चहा' वरूनच त्याची परिस्थिती जाणून घेऊन त्याला मदत करून समृद्ध करणार्‍या सख्या श्रीकृष्णाची......! असा 'सखा श्रीकृष्ण' मित्ररुपात भेटण्यासाठी आधी स्वतः सुदामा व्हावं लागतं व श्रीकृष्ण- सुदामासारखी अतूट मैत्री मनात असावी लागते तरच त्या मैत्रीच सुंदर विश्व अनुभवायला मिळत.

          प्रत्येक व्यक्तिला सर्वात जवळचा असा कोणी वाटत असेल तर तो म्हणजे त्याचा मित्र. मित्राशिवाय मनातल्या भावनांना दुसरं कोणी समजून घेईल का? जरी कोणी समजून घेतलं तरी त्या व्यक्तीला ही मित्रच व्हावं लागतं. ती व्यक्ति आपली आई असो, वडील असो, बायको असो, भाऊ, बहीण असो वा मुलगी असो यांना आपण आपल्या मनातल्या भावना तेव्हाच सांगू शकतो जेव्हा ते आपले मित्र होतात किंवा मित्राप्रमाणे वागतात. अशा भावना व्यक्त करायला आपल्याला मित्र असावा असं प्रत्येकाला वाटणं स्वाभाविक आहे. पण मैत्री करताना पहिल्यांदा स्वतःच एक मित्र व्हावं लागतं. कोण्या एका व्यक्तीशी मैत्री जुळविण्यासाठी गरज असते ती स्वत:वर विश्वास ठेवण्याची, जाती-पातीची बंधने झुगारण्याची, संशयाचे काळे पडदे बाजूला सारण्याची, विशाल हृदय, संवेदनशील मन जपण्याची, समोरच्या मित्राला व्यवस्थितपणे समजून घेण्याची. मैत्री व्हायला वेळ लागत नाही, पण खरी मैत्री व्हायला वेळ लागतो.

          खरी मैत्री म्हणजे एक रोपटं. वर दिसतं त्याच्या दुप्पट जमिनीत रुजलेलं, ज्याचा गाभा शोधणं म्हणजे केवळ अशक्य गोष्ट. “पाणी रे पाणी तेरा रंग कैसा” हे कधी कुणी सांगू शकेल का? तसचं मैत्रीच आहे. ती कशी असते, कधी होते कोणासोबत व का होते? हे कोणालाच कधीच कळत नाही. पण जेव्हा मैत्री होते तेव्हा मात्र आपण वेगळेच कोणीतरी होऊन स्वच्छंदी पाखराप्रमाणे आकाशात तरंगत असतो. मैत्रीमध्ये रंगीत धुंदी असते. यामध्ये वय, वेळ, समाज, जात पात कशाचच बंधन रहात नाही. मित्र म्हणजे कोण असतं असं म्हणण्यापेक्षा मित्र कोण नसतो हे विचारायला पाहिजे. मित्र म्हणजे आई, वडिल, पत्नी, भाऊ, बहिण, शेजारी व शत्रुही असतो कारण एक सच्चा मित्र या सगळ्या भुमिका पार पाडतो. तुम्ही म्हणाल की मित्र शत्रु कसा असू शकेल?, जर आपला मित्र चुकत असेल तर खरा मित्र हा प्रसंगी त्याचा विरोध करुन परिणामी शत्रु बनुन आपल्या मित्राच्या हिताचे रक्षण करतो. मित्र म्हणजे जणू एक परिस असतो जो आपल्या स्पर्शाने मित्रामधले दोष बाजुला सारून त्याच्यात स्वत:च्या गुणांची भर घालतो व मित्राचं जीवन उजळून काढतो.

          मैत्रीतलं बोलणं कसं वेगळच असतं. आपुलकीच, आपलेपणाच, हक्काच. या बोलण्यातली भाषाच निराळी असते. जशी मातृभाषा, पितृभाषा, बोलीभाषा, राष्ट्रभाषा वेगळी असते तशी ही एक मैत्रीची भाषा वेगळी असते. खुप जवळचे मित्र बोलू लागले की शेजारचा आपसुक च विचारतो की 'तुम्ही एकमेकांचे जवळचे मित्र दिसताय', ते त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीमूळे कोणाच्याही लगेच लक्षात येतच. अशी मैत्रीची भाषा या मित्रांना अजुनच जवळ आणते. अशी मैत्री ही कुठे शाळेत शिकवली जात नाही पण शाळेत असताना झालेली मैत्री ही खुप काही शिकवून जाते. आणि अशीच मैत्री आयुष्यभर टिकते ज्या पासून आपण काही तरी चांगलं शिकतो आणि शिकवतो.

          आज माझे लहानपणी पासून आता पर्यंत चे सर्व वयोगटातील खुप चांगले मित्र आहेत पण मी शाळेत असताना जो आमचा मित्रांचा ग्रुप होता त्यात खुप निस्वार्थी मैत्री होती, एकमेकांबद्दल खुप प्रेम, आस्था होती. शाळेत असताना शाळा संपली की आम्ही सर्व मित्र contribution करून भेळ, वड़ापाव घेऊन आमच्या गावातल्या स्टेशनरोड वरील कोणत्याही शेतात जावून मस्त गप्पा मारत बसायचो. भेळ खाणे हा उद्देश नसायचा पण त्या गप्पामध्ये आम्ही एवढे रमायचो की किती वेळ झालाय हे पण लक्षात येत नसायचं. एकमेकांची चेष्टामस्करी, सुख दुःख, अडचणी त्या भेळेच्या प्रत्येक घासासोबत वाटुन घ्यायचो. तो आनंद काही वेगळाच होता. प्रत्येक मित्र त्या गप्पामध्ये रमायचा, अगदी गुंतून जायचा. आणि विशेष म्हणजे तेव्हा फोन नव्हते. नाहीतर आता सगळे फोन मध्येच गुंतलेले असतात. (खरच आमचं नशीब, मनाची एकाग्रता वाढवणारे यंत्र म्हणजे फोन नव्हते तेव्हा, नाहीतर अशी मैत्री कधीच अनुभवायला मिळाली नसती. आजकाल या फोन मूळे मैत्रीतल्या गप्पागोष्टी कुठे तरी हरवून गेल्यात) त्या भेळ आणि वडापाव ला एक वेगळीच आपुलकीची चव होती. मला त्या भेळेचा आनंद पुन्हा घ्यायचा आहे. मला तो क्षण अजुन एकदा तरी अनुभवायचा आहे. त्या भेळे चा प्रत्येक घास अजुन चवीने खायचा आहे. कदाचित तीच पहिली चव लागणार नाही जिभेला पण त्याच "जिवाभावाच्या मैत्री"चा आनंद पुन्हा एकदा तरी घ्यायचा आहे, पुन्हा एकदा तरी घ्यायचा आहे......

          The greatest gift of life is friendship, and I have received it.

- डॉ संदीप टोंगळे

Comments

Popular Posts