"आयुष्य"

आयुष्य थोडंच आहे
मनसोक्त जगून घ्यावं,
कधी तरी दुःख सुद्धा
थोडसं मागून घ्यावं...
कधी तरी मनाला
अलगद लागून घ्यावं,
स्वतःला अंतर्मनाच्या
आरशात कधी तरी बघून घ्यावं...
आयुष्य हे मागे बघत समजून घ्यावं
आणि पुढे बघत जगून घ्यावं......

ते सुंदर बालपण संपलं
आता तारुण्य वाटत मस्त,
उद्या म्हातारपण येईल
संपेल आयुष्याची गोष्ट...
म्हणून या छोट्याश्या आयुष्यात
नेहमी मनसोक्त हसून घ्यावं
कधी तरी दुसऱ्याला हसवावं,
कधी तरी या हळव्या मनाला
नकळत थोडंस फसवावं...
आयुष्य हे मागे बघत समजून घ्यावं
आणि पुढे बघत जगून घ्यावं......

दिवस कालचा संपला
आता नको उद्याची चिंता,
आजचा हा क्षण फक्त माझा
नको येणाऱ्या काळाची चिंता...
याच जाणाऱ्या क्षणाच्या उबेत
आयुष्य आपलं लपवावं,
जीवन जगण्याचं हे रहस्य
मनाच्या कागदावर टिपवावं...
आयुष्य हे मागे बघत समजून घ्यावं
आणि पुढे बघत जगून घ्यावं......

आपल्या प्रत्येकाच्या मनात
नेहमी सुखांचीच असते आस,
तरीही मनात येणाऱ्या तरंगांना
दुःखाचाच होतो आभास...
हा भाबडेपणा सोडून
येणाऱ्या सुखाचा आनंद घेत जगावं,
अनपेक्षित येणाऱ्या दुःखाशीही
संवाद साधत आयुष्याकडे बघावं...
आयुष्य हे मागे बघत समजून घ्यावं
आणि पुढे बघत जगून घ्यावं......

- डॉ संदिप सोमेश्वर टोंगळे.

Comments

Popular Posts