Tuesday, October 25, 2016

"कला" जीवन जगण्याची


          तब्बल दीड एक महिन्यानंतर माझ्या "खेळ मनाचे" ब्लॉगवर एक विषय लिहायला घेतला आणि माझा शब्दसंग्रह, वाचन एवढंच काय डोक्यातले विचार सुद्धा अनोळखी असल्यासारखे माझ्याशी वागू लागले. रोजच्या कामाचा ताणतणाव, रोटरीच्या सामाजिक कार्यातुन अनुभवलेल्या भावनिक गोष्टींचा कल्लोळ, खांद्यावरच्या वाढत चाललेल्या जबाबदाऱ्या आणि डोळ्यातली महत्वाकांक्षी स्वप्नं या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ घालता घालता मी कधी कधी स्वतःला विसरुन जातो आणि देहभान विसरुन छाती फुटेस्तोवर नुसता पळत सुटतो. माणसाच्या गरजा त्या किती असतात, पण आपण त्याचच जास्त दडपण घेतो. अन्न, वस्त्र आणि निवारा या साध्यासुध्या गरजाचं रुपांतर मग 3 BHK फ्लॅट, ब्रँडेड कपडे खरेदी, फिरायला एक कार, आठवड्यातून एकदा हॉटेलींग आणि वर्षातून कमीत कमी दोन वेळा कुठेतरी ट्रिप एवढ्या मोठ्या लिस्ट मध्ये होतं. स्वप्न उराशी बाळगणं, ते पुर्ण करण्यासाठी धडपडणं, जिद्दीने मेहनत करून ते पुर्ण ही करणं यात एक आनंद असतो हे मला माहित आहे. पण माणुस या सुंदर आयुष्याचा आनंद मिळविण्यासाठी पैसा कमावतो की आनंद गमावण्यासाठी? हे मला अजूनही न उमगलेलं कोडं आहे. आयुष्यात सुखः आणि आनंद मिळवायचा असेल तर ते उपभोगायला ही शिकलं पाहिजे पण ते उपभोगण्यासाठी समाधानी वृत्ती हवी. माणूस आपले स्वतःचे सगळे हट्ट पुरवतो पण समाधानी वृत्तीनं जगण्याचा हट्ट करायला विसरत चाललाय, माणूस जीवन जगण्याची "कला"च विसरत चाललाय.

          मागे एकदा काय झालं, संध्याकाळी माझ्या consulting मधील खिडकीच्या ग्रीलमध्ये एक कबुतर शिरलं आणि त्याचा पाय अडकल्यामुळे ते तिथेच अडकून राहिलं. त्याला निघता येईना आणि तिथून उडुनही जाता येईना. पंखांची फडफड, चोची आपटणं, कर्कश्‍श ओरडणं सगळं करून झालं. मी ही त्याचा अडकलेला पाय काढण्याचा प्रयत्न केला पण पिंजऱ्यात अडकवून ठेवतील या भीतीमुळे त्याने मला तेही करू दिलं नाही. मग मी त्याला थोडं खाद्य म्हणून ज्वारीचे दाणे वाटीत ठेवून घरी निघून आलो. रात्र झाली, काहीच उपाय सापडत नाहीये असं लक्षात आल्यावर ते ही थकून झोपी गेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तोच झगडा. या वेळेस मात्र कालच्या पेक्षा जास्त आकांत मांडला होता त्याने. मी स्तब्ध होऊन फक्त त्याची धडपड बघत राहिलो आणि अचानक एका क्षणी त्याला एक बारीक वाट सापडली. जरासं खरचटलं, पंखही दुखावले... पण बाहेर पडलच ते कबुतर. त्या चुकून अंगावर पडलेल्या पिंजऱ्यातून... शक्‍य तितका सगळा जीवाचा आकांत करून बाहेर पडलं... बाहेर पडल्या पडल्या आकाशात सुंदर गिरकी घेऊन आनंद साजरा केला, या सुंदर निसर्गाचा, त्याला मिळालेल्या आयुष्याचा... त्याच्या अंगात उडण्याची "कला" आहे, त्याचा मनसोक्त आनंद घेत, समाधानी होऊन उडत उडत ते दृष्टी आड झालं. मी तिथेच त्यांच्याकडे बघत स्तब्ध... माझ्या चार भिंतींच्या consulting मध्ये... उगाचच पिंजऱ्यात अडकल्या सारखा... मोकळा श्वास घेण्याचा प्रयत्न करत... मनात विचार आला आपणही जीवन जगण्याची "कला" मनसोक्त अनुभवली तर......

          जन्म आणि मृत्यू च्या मधला काळ म्हणजे हे सुंदर आयुष्य. आपल्या या आयुष्यातला प्रत्येक क्षण अनमोल आहे, तो मनसोक्त जगता आला पाहिजे. टोचणाऱ्या, बोचणाऱ्या क्षणिक भावनिक गोष्टींचा लगेच विसर पडून वर्तमान क्षणातला आनंद उपभोगता आला पाहिजे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षडरिपू पासून परावृत्त होऊन निर्मळ आणि स्वच्छंदी जीवन जगण्याची "कला" अवलंबता आली पाहिजे. पिंजऱ्यातल्या कबुतरापेक्षा अमर्यादित आसमंतात मनसोक्त उडणाऱ्या कबुतरा सारखं आयुष्य जगता आलं पाहिजे. तरच या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद घेता येईल. मी तर पक्क ठरवलं आहे की आयुष्य कसं जगायचं. या सुंदर निसर्गाचा, या सुंदर आयुष्याचा आनंद घेत, आकाशात झेप घेत समोर येईल त्या क्षणाला सकारात्मक दृष्टीने पहातच आयुष्य जगायचं.

साध्या सरळ रस्त्यापेक्षा मला वळणावळणाचे रस्ते फार आवडतात, त्यांना सहज, सोपेपणा कधीच माहीत नसतो.

उंच उंच अशोक किंवा निलगिरी पेक्षा मला आवडतो तो सगळीकडे उभा आडवा पसरलेला वड, त्याला मर्यादा नसतात.

एका सरळ रेषेतच जाणाऱ्या सुर्यकिरणांपेक्षा मला आवडतो तो वारा, मन वाटेल तिकडे सैरा वैरा पळणारा, त्यात मनसोक्तपणा असतो.

सरळ पडणाऱ्या पावसाच्या थेंबापेक्षा जागा मिळेन तिथे वळणारी, डोंगरावरुन खळखळत वाहणारी नदीच मला जास्त वेड लावते. समोर येणाऱ्या कसल्याही अडथळ्याची तिला तमा नसते.

माझं आयुष्यही मला असंच जगायचंय, अगदी बेभान होऊन, ते जसं नेईल तस मला त्याच्याबरोबर जायचंय, अगदी मोकाट, सैराट, सुसाट, बेधुंद होऊन...... जीवन जगण्याची "कला" जोपासत, पूर्ण आकाशच काबीज करू पाहणाऱ्या त्या कबुतरा सारखं......

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.