Thursday, August 18, 2016

मनं गुंफणारा "धागा"


          खरंच काय विलक्षण ताकत आहे ना या "राखी"च्या धाग्यात! भावा-बहिणीच्या नात्याला अगदी घट्ट बांधून ठेवतो हा "धागा". हा नुसताच सुताचा दोरा नसतो तर ते एक शील, स्नेह आणि पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे पुरुषार्थाचे पवित्र बंधन आहे. ह्या एवढयाशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावा मिळतो आणि मन अगदी प्रफुल्लीत होऊन जातं. राखी बांधण्याचा अर्थ आपण त्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वत:ला वाहून घेऊन तिच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो. स्त्री कितीही मोठी, मिळवती झाली तरी तिच्या रक्षणाची जबाबदारी तिच्या भावावरच आहे हेच ती यातून त्याला सुचवत असते. यात तिचा दुबळेपणा नसून भावाच्या कर्तृत्वावरचा विश्वास दिसून येतो. रक्षाबंधन या सणाला बहिण भावाच्या हातावर राखी बांधते व भाऊ तिला प्रेमाची भेटवस्तू देतो. एवढेच नाही तर तिच्या संरक्षणासाठी खंबीर आहे याची ग्वाहीही देतो. पण ज्यांना भाऊ, बहीण, आई, वडील किंवा नातेवाईक कोणीच नाही त्यांना या नात्याचा अर्थ लागेल तरी कसा?

          आई-वडील नाहीत, नातेवाइक सांभाळत नाहीत, कोणाला आई, वडिलांनी जन्मताच सोडून दिलेले. कोणाचे आई, वडील वारल्यानंतर नातेवाइकांनी झिडकारलेले अशा अवस्थेत अगदी लहानवयातच कपाळावर अनाथपणाचा शिक्का बसलेला. अशी अवस्था असल्यामुळे नात्यांचा जिव्हाळा तर दूरच; परंतु नाते म्हणजे काय, याची ओळखही नाही. आई-बाप नसल्यामुळे संस्काराचा अभाव. नाते म्हणजे काय, हे कळण्यापूर्वीच अनाथाश्रमात दाखल झाल्यामुळे नात्यांतील ओलावा, प्रेम, आपुलकी या शब्दांशी कोणताही संबंध नसलेली अनाथ मुले आहेत. बहिणीला भाऊ नाही किंवा भावाला बहीण नाही आणि आपली संस्कृती सांगायला आई वडील नाहीत मग सणवार, संस्कृतीशी ओळख असणार कशी? अशा "उम्मीद फौंडेशन, कुर्डुवाडी मधील अनाथांना नात्यांच्या धाग्यामध्ये जोडण्याचे काम "रक्षाबंधन'चे औचित्य साधून आम्ही रोटरी क्लब मार्फत केले. त्या अनाथ बहिणी कडून राखी बांधून घेताना, तिच्याशी पवित्र नातं जोडताना जो आनंद झाला तो खूप मोठा आनंद आहे. त्या सर्व बहिणींना आम्ही म्हणालो कि "आता तुम्ही अनाथ नाहीत, तर रोटरी क्लब हा भावासारखा तुमच्या पाठीशी खंबीर उभा राहील". त्यामुळे अशा भाऊ आणि बहिणींच्या प्रेमातील पवित्र "धागा" जोडला गेला आणि मुलांमध्ये नात्यांची जाणीव निर्माण झाली, त्यांच्यातील नकारात्मक मानसिकता नाहीशी झाली, समाजाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला. म्हणूनच मी म्हणतो मन गुंफणारा हा "धागा" खरोखरचं अनमोल आहे.

          "रक्षाबंधन" हा भावा-बहिणींच्या प्रेमाचा दिवस. राखीच्या एका धाग्याने दोघांतील नाते आणखी घट्ट होत असते. अनाथाश्रमात राहणाऱ्या अशा शेकडो भावांना एक बहीण मिळावी, बहिणींना एक भाऊ मिळावा, प्रत्येकाला बहीण-भावाचे प्रेम कळावे, पोरकेपणाची भावना दूर व्हावी, नात्यातील गोडव्याने संस्कार व्हावेत यासाठी रक्षाबंधनादिवशी सर्व अनाथाश्रमात हा उपक्रम राबवला गेला पाहिजे. नशिबाने अनाथ बनवले असले तरी सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या असंख्य भावा-बहिणींकडून अनाथ भावांचे हात एका धाग्याने बळकट होतील. तर अनाथ बहिणींना रक्षणकर्ते भाऊ असल्याची जाणीव होईल. त्यामुळे राखीचा हा एक "धागा" केवळ सण किंवा औचित्य न राहता इथून पुढे प्रत्येक रक्षाबंधानाला अनाथांसाठी नात्यांच्या बंधनात जोडणारा एक मोलाचा "धागा" व्हावा असं मला वाटतं.

          भावा-बहिणीचं हे पवित्र नातं असतं च किती सुंदर. कधी भांडण कधी रुसवा, फुगवा, कधी ओरडणं कधी समजावणं, कधी मारणं कधी प्रेम करणं, कधी दुर्लक्ष तर कधी काळजी कधी लपवाछपवी, कधी उगीउगी रडणं तर कधी खदखदून हसणं या प्रत्येक गोष्टीत हे नातं ठळक दिसतच. याचं ताईचं लग्न होऊन तिला निरोप देण्याचा क्षण येतो, तेव्हा तिचा भाऊ पाहुण्यांच्या पाहुणचारात मग्न असतो. ताई विरहाच्या दुःखाने ढसाढसा रडत असताना भावाला लहानपण आठवत आणि तोही अश्रूभरल्या डोळ्यांनी बहिणीला भेटतो. त्यांच्या डोळ्यातला थेंब न थेंब त्यांच्या लहानपणातील आठवणींचा उजाळा असतो. खरंच भाऊ व बहिणीचे नाते अगदी रेशमी धाग्यासारखे नाजूक असते म्हणून ते व्यवस्थित जपले पाहिजे. आपल्या देशात प्रेम, आपुलकी अजुनही कायम असल्याने मनं गुंफणारा हा नाजूक "धागा" कायम अतुटच राहील.

माझ्या सर्व बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा

- डॉ. संदीप सोमेश्वर टोंगळे.