Saturday, February 27, 2016

बळीराजा


          जगाचा पोशिंदा मानल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांवरच आता उपाशीपोटी राहण्याची वेळ आलीय. पण मला माझ्या शेतकरी मित्राला एवढच सांगायच आहे की परिस्थितीशी झगडण्यात धैर्य आहे. हे धैर्य तुम्ही दाखवण्याची हीच वेळ आहे. भ्याडासारखं मरणाला कवटाळू नका. ही वेळ नक्की निघून जाईल. स्वत:ला आणि कुटुंबाला धीर द्या.

आत्महत्या हा उपाय नाही रे

हे बळीराजा !!!!!!
दिवसा उन्हातान्हाचं घाम गाळुन
रात्रीही पिकांची चिंता तुला राही रे
जगाचा पोशिंदा म्हणतात तुला
तुझ्या धान्याची सर्वच जग वाट पाही रे
तुझ्यावर आलेल्या या संकटांना
आत्महत्या हा उपाय नाही रे
आत्महत्या हा उपाय नाही रे

हे ही वाईट दिवस निघून जातील
असं नेहमीच सांगते तुझी आई रे
तुझं धैर्य आहेत तुझी लेकरं बाळं
तू आज येशील अशीच वाट पाही रे
तुझ्या संसाराची तुलाच काळजी
मित्रा, आत्महत्या हा उपाय नाही रे
आत्महत्या हा उपाय नाही रे

आठव तुझ्या खंबीर बापाची हिम्मत
तुझ्यासाठी केली शरीराची लाही लाही रे
आठव तुझ्या बायकोचं आतोनात कष्ट
ती तुझ्यासाठीच कायम झुरत राही रे
तुझ्या भावनांना आम्ही समजू शकतो
पण आत्महत्या हा एकच उपाय नाही रे
आत्महत्या हा एकच उपाय नाही रे

या सुजलाम सुफलाम देशाचा राजा तू
अशा विध्वंसक निर्णयाची नकोस करू घाई रे
या जगाच्या कणाकणात हक्क तुझाच
तुझ्या जाण्याने रडल्या दिशा दाही रे
धीर दे स्वताला, तुझ्या कुटुंबाला
खरचं मित्रा, आत्महत्या हा उपाय नाही रे
आत्महत्या हा उपाय नाही रे

- डॉ संदीप टोंगळे

टिप- माझ्या कोणत्याही शेतकरी मित्राला माझी कसलीही मदत लागली तर 9561646178 या क्रमांकावर संपर्क करा. मी आणि आपला सर्व समाज तुमच्या मदतीस बांधील आहोत.

Thursday, February 25, 2016

हक्काचं "स्त्रीत्व"


          सृष्टीच्या निर्मात्याने ही सृष्टी निर्माण करताना सुंदर निसर्गासोबतच दोन सुंदर जीव पण तयार केले एक "स्त्री" आणि एक "पुरुष". स्त्री ला सृष्टी उत्पत्ती करणारी प्रजनन क्रिया दिली आणि पुरुषाला या प्रजनन क्रियेला पूरक अशी भूमिका दिली. निसर्ग निर्मितीच्या नियमानुसार च शारीरिक, मानसिक आणि भौतिक बदल या दोन जिवांमध्ये सृष्टी उत्पत्ती पासूनच आहेत. हे दोन भिन्न जीव, भिन्न लिंगी जरी असले तरी हे एकमेकास पूरक आहेत असं मला वाटतं. पण आजकाल जो स्त्री पुरुष समानतेचा विषय नेहमीच स्त्री-पुरुष वादातला कळीचा मुद्दा ठरतोय त्या विषयी मला आज बोलायचं आहे. स्त्रियांनी समानतेच्या मुद्दयावर आपली बाजू मांडताना आपल्या "हक्काचं स्त्रीत्व" गमावु नये एवढच माझं स्पष्ट मत आहे.

          जुना काळ सोडला तर आजची स्त्री ही पुरुषाच्या तुलनेत समान सक्षम आहे यात तिळमात्र शंका नाही. स्त्रिया पुरुषांपेक्षा बौधिक आणि शारीरिक क्षमतेने कमी असतात, या रडगाण्याला माझ्या मनात अजिबात स्थान नाही. आपल्या आजूबाजूला नुसतं बघितलं तरी हे आपोआप लक्षात येतच. त्यासाठी स्त्री-पुरुष समानता या पारंपारिक वादाचीही काही गरज उरलेली नाही. स्त्रियांच्या समानतेच्या लढय़ाला माझा पाठिंबाच राहीलं पण एक मात्र नक्की की समानता म्हणजे स्त्रियांनी पुरुष बनणं नव्हे. या दोघांमध्ये जसे शारीरिक फरक आहेत, तसे मानसिक आणि सामाजिक क्षमतांचेही फरक आहेत.(यात कोणाची कमी क्षमता किंवा कोणाची जास्त क्षमता हा मुद्दाच नाही). या फरकांचा विचार आणि सन्मान करणं म्हणजेच स्त्रीत्वाचा आदर केल्या सारखं आहे. स्त्रियांनी स्वत:च्या हक्कांबाबत जागरूक असणं, आग्रही असणं आणि प्रसंगी त्याकरता पुरुषी अहंकाराचा विरोध पत्करून लढे उभे करणं हेही स्वाभाविकच आहे. पण या लढयात स्त्रियांना पुरुष बनावंसं वाटतं, तेव्हाच मोठी चूक होते, हे मात्र नक्की. "स्त्रीत्व" हा स्त्री चा खरा दागिना आहे तोच जपला पाहिजे. निसर्ग नियमाच्या विरुद्ध जावून काहीही केलं तर ते विध्वंसकच ठरत. "स्त्रीत्व" हेच स्त्रियांच सुंदर अस्तित्व आहे त्यातच खुप सुंदर आयुष्य आहे. ते सोडून पुरुषी अस्तित्व का पाहिजे? आणि हा एवढा हट्ट का? स्त्री पुरुष समानता हा खरच खुप वादाचा विषय असेल समाजासाठी पण वाद होण्यासारखं ही काही नाही कारण स्त्री पुरुष समानता असं न मानता एकमेकांना पूरक अशी स्त्री पुरुष समरसता झाली पाहिजे अस माझं मत आहे. स्त्री पुरुष समानता असं समाजाने म्हणताना सुद्धा (समाजातील काही पुरुष नराधमांचा अपवाद वगळता) "स्त्री"चा उल्लेख आधी करणं म्हणजेच त्यांच्या "स्त्रीत्वा"चा आदर आहे हेही लक्षात घ्यायला पाहिजे.

          आमच्या सारख्या तरुण पिढीच्या मनात स्त्री पुरुष समानता हा वाद का येतो? नक्की खुपतेय तरी काय? पुरुषप्रधान संस्कृतीचा वारसा अजूनही आहे म्हणून हा विचार आपण करतोय, की आधुनिक युगात येणारे अनुभव खरोखरच दुःखदायक आहेत म्हणून आपल्या मनात असे विचार येतात? कॉलेजमध्ये असताना स्वतःचे विचार मांडणाऱ्या, मुलांच्या बरोबरीने सर्व ठिकाणी भाग घेणाऱ्या बिनधास्त मैत्रिणी सर्वांनाच आवडतात, पण लग्न झाल्यानंतर असे वागणारी बायको मात्र खटकते. संसारात पडल्यानंतर तिने ब-याच लक्ष्मणरेषाही पाळल्याच पाहिजेत, हा आग्रहच नाही तर अलिखित नियम आपोआप तयार होतो. आमची तरुण पिढी खरंच गोंधळलेल्या अवस्थेत आहे. नक्की काय योग्य किंवा अयोग्य हेच समजत नाही कारण सध्याची सामाजिक परिस्थिती त्याला कारणीभूत आहे असं मला वाटत. स्वतःच्या कर्तृत्वामुळे यशाचे शिखर गाठणाऱ्या अनेक स्त्रिया आजच्या समाजात दिसत आहेत, परंतु त्याचबरोबर शिक्षण आणि स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून व्यक्तीस्वातंत्र्याचा अट्टाहास करुन आपले संस्कार विसरून पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करणाऱ्या आणि आम्ही "आधुनिक" म्हणून वावरणाऱ्या काही स्त्रियाही समाजात आपण पाहत आहोत. खरं तर स्त्री आणि पुरुष यामध्ये कोण वरचढ, हा मुद्दाच व्यर्थ आहे. कारण दोघांच्याही भूमिका परस्परांना पूरक आहेत आणि या अशाच रहाव्या. निसर्गानेच स्त्री आणि पुरुष यांच्या शरीर आणि मनाची ठेवण वेगळी केलेली आहे. त्यामुळे प्रत्येक बाबतीत एकमेकांशी बरोबरी करणे हे मूर्खपणाचेच ठरते. स्त्री आणि पुरुषांची विचार करण्याची, मनातलं व्यक्त करण्याची, ताण स्वीकारण्याची, परिस्थितीला सामोरे जाण्याची पद्धत निसर्गतःच वेगळी असते. मग सर्वच गोष्टीत स्त्री-पुरुष समानता कशी शक्‍य आहे? स्त्री पुरुष समानता या वादात आपण न पड़ता स्त्री किंवा पुरुषाच स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामधील पुसट सीमारेषा ओळखण्याची कसब आमच्या तरुण पिढीने शिकली पाहिजे तरच हा वाद मिटेल असं मला वाटतं.

          स्त्री आणि पुरुष यांच्या नात्यात एक उत्तम सौंदर्य आहे आणि निष्कारण वाद करण्यापेक्षा ते सौंदर्य टिकवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा. जेव्हा ही जाणीव प्रत्येकात निर्माण होईल तेव्हाच स्त्री आणि पुरुष या नात्याला समृद्ध करता येईल. 'कॉकटेल’ नावाच्या एका सिनेमात स्वतंत्र, आधुनिक तरुणीची भूमिका करणारी दीपिका पदुकोन नायकाचं मन जिंकून घेण्यासाठी फुलके करायला शिकते. फुलके करता येणं म्हणजेच स्त्रीत्वाचं कर्तव्य आहे का? असा प्रश्न पडतो. प्रत्येक स्त्रीला स्वयंपाक आलाच पाहिजे, हेच का स्त्रीत्व? एवढचं असतं का प्रत्येक स्त्रीच कर्तव्य? स्त्री पुरुष समानता पाहिजे असेल तर तिला जे करायचं आहे, ते करण्यासाठी तिला मोकळीक असावी आणि मुख्य म्हणजे घराबाहेरची कामं करताना घर सांभाळण्यासाठी, मुलं वाढवण्यासाठी तिला पुरुषाचा सहभाग आणि इतर पूरक व्यवस्था मिळाव्यात. ही खरी समानता आहे, असं मला वाटतं. माझी बायको डॉक्टर आहे. आणि हो, तिला आजही 'भाकरी' बनवता येत नाही, पण म्हणून काही बिघडतं का? अजिबात नाही. उलट परवा मीच तिला म्हणालो की मलाच 'भात' तयार करायला शिकवं. मग मी 'भात' तयार केला म्हणजे माझ्या पुरुषत्वाला धक्का आहे का? मुळीच नाही. म्हणून म्हणतो की स्त्री पुरुष समानते पेक्षा स्त्री पुरुष समरसता पाहिजे.

          सर्वच स्त्रिया एकमेकींशी फार तुलना करतात आणि एकमेकींना सतत टोमने मारत असतात, त्यातच खुप वेळ घालवतात आणि डोकं ही, हे काही योग्य नाही. दुसरीची जाडी, साडी, दागिने, नवरा, नोकरी - प्रत्येक गोष्टीवर त्यांची बारीक नजर असते. साधी साडी असो नाहीतर फिस्कटलेला एखादा पदार्थ, एकमेकींच्या चुका काढण्यात यांना फार रस असतो आणि वेळही. आधीच त्यांच्या वाटय़ाला इतकी मोठी लढाई असताना त्या एकमेकींशी इतक्या चढाओढीने वागून नवे ताण का निर्माण करतात हे खरंच उमगत नाही. आज स्वत:चे समाजात स्थान निर्माण करणा-या महिलाच एकमेकांचे पाय ओढताना, लढताना दिसून येतात. हे चुकीचे असून, ते बदलण्याची आवश्यकता आहे. काही स्त्रिया तर पुरुषांची बरोबरी करण्याच्या नादात स्वतःचे स्त्रीत्वच हरवुन बसल्या आहेत हे त्यांच्या लक्षातच येत नाही. 'आम्ही पुरुषापेक्षा कमी नाही', 'आम्ही आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालतो', 'पुरुषापेक्षा जास्त प्रगती केलीय', 'पुरुषापेक्षा आम्ही स्त्रियाच श्रेष्ठ' अशी तुलना करताना तुम्हीच पुरुषाचं (नसलेलं) महात्म्य सांगताय हे लक्षातच येत नाही. आणि अशी तुलना होऊ ही शकत नाही. दोघांचं अस्तित्वच एकमेकांच्या तुलनेत खुप वेगळं आहे आणि त्यामुळे 'स्त्री पुरुष समानता' या पारंपरिक भांडणातून बाहेर पडणं जरुरीचं आहे. स्त्री पुरुष या सुंदर नात्याला समृद्ध करण्याची गरज आहे. स्त्रियांनी आणि पुरुषांनीही समानतेचा आग्रह जरूर धरावा, पण स्त्रियांनी पुरुष बनण्याचा वेडा हट्ट करू नये आणि त्याच्या हक्काचं "स्त्रीत्व" गमावू नये.

- डॉ संदीप टोंगळे

Tuesday, February 23, 2016

"माझी कागदी होडी"


"ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो
भले छिन लो मुझसे मेरी जवानी
मगर मुझको लौटा दो बचपनका सावन
वो कागजकी कश्ती, वो बारिश का पानी"

          कितीही पैसा खर्च केला तरी आपलं बालपण आपण परत नाही आणु शकत. आणि त्याची ओढ ही मोठं झाल्यावरच कळते. ते पावसात मनसोक्त ओलं चिंब भिजणं, पाण्याच्या डबक्यात मुद्दाम उडी मारणं, चिखलात खेलणं, पावसात घरातली भांडी भरुन घेणं, पाऊस संपला आणि चिखल झाला की तो खुपसणी चा खेळ, पावसात, चिखलात क्रिकेट, फुटबॉल या सर्व गोष्टी खेड्यात राहणा-या प्रत्येकाच्या आयुष्यात आलेल्या असतातच. क्रिकेट एक टप्पाआऊट, सुरपारंब्या, सुरपाट्या, लगोरी, डबा ऐसपैस, भोवरा, गोट्या, विटी-दांडु, लंगडी, पकडा पकडी, शिवणापाणी, चोर शिपाई, माझ्या आईचे किंवा मामाचे पत्र हरवले, भेंड्या, पतंग, आंधळी कोशिंबीर, पत्ते-मुंगूस, ५-३-२, झब्बू, गोट्या, कोय-या, मेणबत्तीच्या उजेडांत हाताने आकृती काढणे, सारीपाट, आट्यापाट्या, सापशिडी, नवा व्यापार, संगीत खुर्ची, छापा काटा असं किती किती प्रकारे त्या बालपणीचा आनंद घेतला असेल आपण सर्वांनीच. खरचं "रम्य ते बालपण आणि दिव्य त्या आठवणी". ते बालपण परत नाही येऊ शकत पण त्या आठवणींची जी भलीमोठी प्रॉपर्टी आहे आपल्या सर्वांकड़े ती आपण जपून ठेवली पाहिजे. आणि कधीतरी बाहेर काढून त्यात मनमुराद रमलं पाहिजे. अधून मधून का होईना पण मोठेपणी हे बालपण अनुभवलं तरच आयुष्यात मज्जा आहे. या आठवणींची पेटी कधी कधी उघडून बघितली तर लहानपण अगदी डोळ्यासमोर उभं राहतं. याच आठवणीतली एक आठवण म्हणजे "माझी कागदी होडी". या दुनियादारीच्या प्रपंचात कुठे तरी हरवली आहे? तीच शोधण्याचा प्रयत्न करतोय या लेखामधुन......

          मला "माझी कागदी होडी" शोधण्याच्या लागलेल्या हुक्कीचं कारण म्हणजे लहान मुलांच्या शाळेतील वार्षिक स्नेह संम्मेलन. हो मागे एकदा माझ्या मुलीच्या शाळेत वार्षिक स्नेह संम्मेलनाच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. त्या सर्व चिमुकल्यांनी एवढा सुंदर कार्यक्रम सादर केला की एकक्षण मी हरवूनच गेलो. त्या कार्यक्रमात स्त्रीभ्रूण हत्या, पाणी प्रश्न, शेतकरी आत्महत्या, वृक्ष तोड अशा अनेक विषयावर खुप सुंदर प्रकाश टाकला गेला. ती लहान चिमुकली मूलं ज्वलंत सामाजिक प्रश्न इतक्या सुंदर रित्या मांडत होती की असं वाटलं की या लहान मुलांना सामाजिक जाण आहे पण आपल्याला का नाही? हीच लहान मूलं देशाचं भवितव्य आहेत याचा अभिमान वाटतोय. या लहान मुलांच्या सामाजिक जाणीवेच्या पाठीमागे त्यांचे पालक, शिक्षक किंवा आपण सर्व जणच आहोत पण हीच सामाजिक जाणीव आपण जोपासतो का? आज लहान मुलांना जे आपण शिकवतो त्याची स्वतः किती प्रमाणात अंमलबजावणी करतो? त्या लहान मुलांकडे कागदाची होडी आहे तीच त्यांची आणि त्यांच्या विचारांची श्रीमंती. पण आपली कागदाची होडी कुठे हरवली आहे तीच आपल्या विचारांची श्रीमंती (सामाजिक जाणीव) आपण गमावून बसलोय का? या मुलांसारखं आपणही बालपणात खुप चांगल्या गोष्टी शिकलोय मग त्या आता कुठे हरवल्या? सामाजिक जाणीव फक्त लहान वयापुरतीच मर्यादित आहे का? मोठेपणी काय होत या सामाजिक जाणीवेच? लहानपणात हरवलेली ही "कागदी होडी" नंतर कोणीही शोधण्याचा प्रयत्न करत नाही. प्रत्येक जण स्वतःच्या प्रापंचिक भावविश्वात एवढा रमलेला आहे की आपलं काहीतरी हरवलं आहे याचं सुद्धा भान नाही राहील.

          खरचं मित्रहो, आपल्याला आपले सामाजिक भान पुन्हा चाचपण्याची वेळ आली आहे. कितीतरी वेळा आपण निव्वळ system वर टिका करून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतो. उदाः सार्वजनिक स्वच्छता. सध्या पिण्याच्या पाण्यासाठी बाटली चा सर्रास वापर होतोय. पण पाणी पिऊन झालं की ती मोकळी पाण्याची बाटली आपण कुठेही फेकुन देतो, ती गटारीत पड़ते आणि पावसाळ्यात गटारी बंद पडल्या की नालेसफाई च्या नावाने प्रशासनावर टिका करतो. त्यापेक्षा ती पाण्याची बाटली crush करुन व्यवस्थीत कचरापेटीत टाकली तर प्रश्नच नाही का मिटणार......? अशीच छोटी छोटी किती तरी उदाहरण आहेत की ज्यात आपण आपली सामाजिक जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतो. लहान वयात जे शिकतो, शिकवतो ते मोठे पणी विसरून जातो. या अशा सांस्कृतिक कार्यक्रमातुन लहान मुलांना दिलेला सामाजिक जाणीवेचा "बाळकडू" खरचं कौतुकास्पद आहे पण तो मोठेपणी जिभेला (मनाला) अधिकच कडू का लागतो? याचाही विचार करण्याची वेळ आली आहे.

देणा-याने देत जावे; घेणा-याने घेत जावे !
घेता घेता एक दिवस; देणा-याचे हात घ्यावे !

          समाजाला निस्वार्थी भावनेने, सढळ हाताने मदत करणारीही खुप मंडळी आहेत की जी लोकं 'ज्या समाजाने आपल्याला भरपूर दिलयं त्या समाजाच आपणही खुप काही देणं लागतो' ही जाणीव ठेवून समाज बांधिलकी जपतात. पण देणा-यांच्या हातांपेक्षा घेणा-यांच्या हातांची संख्या कितीतरी पटीने जास्त आहे मग ही आर्थिक विषमतेची दरी कशी पार होणार? म्हणूनच आपण सर्वांनीच आपली हरवलेली "कागदी होडी" शोधली पाहिजे, सामाजिक जाणीव ठेवून वागायला पाहिजे. मला वाटत जसं आपण या लहान मुलांना हे सामाजिक जाणीवेच बाळकडू देतोय तसचं आता आमच्या सारख्या तरुण पिढीलाही या सामाजिक बांधिलकीची जाणीव करून द्यायची गरज आहे. या तरुणाई च्या नसानसात जर समाजाबद्दलची जाण भिणली तर दिव्य समाज निर्मितीला वेळ लागणार नाही. माझ्या लहानपणीच्या आठवणीतल्या पेटीतली हरवलेली "माझी कागदी होडी" मला सापडली आहे, आणि मी ती आयुष्यभर जपेलच आणि सर्वांना ती शोधून देण्यासाठी मनापासून प्रयत्न करेल.

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Friday, February 19, 2016

"राजे" तुम्ही पुन्हा जन्म घ्या          आज तब्बल साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा "छत्रपती शिवाजी महाराज" हे तीन शब्द उच्चारले की लगेच अंगावर रोमांच उभे राहतात, रक्त सळसळते, मनात एक आगळा वेगळा जोश तयार होतो, मराठी साम्राज्याचा जोश, हिंदवी स्वराज्याचा जोश, भारत देशाचा जोश. हा जोश प्रत्येकाच्या मनात वर्षानुवर्षेच नाही तर युगानुयुगे राहीलं यात तीळ मात्र शंकाच नाही. "छत्रपती शिवाजी महाराज की जय" असं म्हणुन तयार होणारा जोश अगदी त्या व्यक्तीच्या शरीरातल्या अनुरेणु पर्यंत पोहोचतो, अंगातली मरगळच निघून जाते. आदर्श पुत्र, आदर्श योद्धा, आदर्श राज्यकर्ता म्हणून खुप नावलौकिक तर झालच पण आदर्श व्यक्ती म्हणून आजही "छत्रपती शिवाजी महाराजांच" नाव घेतलं जात आणि घेतलं जाईल. पण हा आदर्श आपण जपतोय का? आज प्रत्येकाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज आहेत पण तनात, कणाकणात आणि आपल्या कामात शिवाजी महाराजांचा आदर्श आहे का? जसा "छत्रपती शिवाजी महाराजांनी" हिंदवी स्वराज्याचा हट्ट धरला होता आपल्या प्रजेसाठी तसा हट्ट आज आपल्या मनात आहे का? आजच्या आपल्या या समाजाच्या, देशाच्या बिकट परिस्थितीकडे पाहून असं वाटतं खरच "राजे तुम्ही पुन्हा जन्म घ्या".

          संपुर्ण विश्वातच अतुलनीय, अद्वितीय, अलौकीक, साहसी, पराक्रमी, सफल आणि आदर्श असा दुसरा शिवाजी राजा सापडणं अगदीच अशक्य आहे. शिवाजी महाराजांनी सरदार आणि किल्लेदारांच्या अन्याय,अत्याचारातून जनतेची सुटका केली, आणि उत्तम, शिस्तबद्ध शासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले. शिवरायांनी वतनदारी पध्दती बंद करून सैनिकांना, अधिकार्‍यांना पगार सुरु केले. शेतकर्‍यांचं शोषण करणारी जमीनदारी पध्दत बंद करुन शेतकर्‍यांचा फायदा असणारी रयतवारी पध्दत सुरु केली. जर एखाद्या भागातुन सैन्य जात असेल तर ते शेतांच्या लांबून न्यावे कारण शेतांच्या मधुन नेल्यास शेतातल्या पिकांची नासाडी होईल व तसे झाल्यास शेतकर्‍याने जगायचे कसे असा विचार महाराजांचा होता. आपल्या काळाच्या भरपुर पुढे पाहण्याची महाराजांची दुरदृष्टी आणि प्रजेची निष्ठावंत काळजी हे महाराजांच्या यशाचे खुप मोठे रहस्य आहे असं मला वाटतं.

          "छत्रपती शिवाजी महाराज" हे एक अष्टपैलू व्यक्तीमत्व होतं. ते इंजिनियर, डॉक्टर, वकील, उद्योजक, कलाकार(नट), उत्तम योद्धा होते. आजच्या प्रगत इंजिनियरना सुद्धा जमणार नाही अशा तब्बल 307 किल्ल्यांची रचना त्यांनी त्या काळी केली. (आपण आज त्यांच्या स्मारकासाठी जागा शोधतोय.) समाजाला लागलेल्या विविध मानसिक रोगांचा त्यांनी त्यांच्या कुशल बुद्धिमत्तेचा वापर करुन नायनाट केला. शिवाजी महाराज हे न्यायप्रिय होते. कोणावरही अन्याय न होता सर्वांच भलं करणारे उत्तम वकील होते. आदर्श राज्य उभारणीसाठी काय आवश्यक आहे याबाबत महाराजांचा खोलवर विचार होता. व्यापार आणि उद्योग राज्यासाठी खुप महत्वाचा आहे हे महाराज जाणुन होते. ते चाणाक्ष उद्योजक ही होते. आग्र्याहून स्वताची सुटका करून घेताना उत्तम अभिनय करुन शत्रुच्या डोळ्यात धुळ टाकली. शिस्तबद्ध लष्कर, उत्तम प्रशासकीय यंत्रणा, भूगोल रचना अभ्यास, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. असे ते आदर्श अष्टपैलू राजे होते.

          तर अशा "छत्रपती शिवाजी महाराजांच्या" महाराष्ट्रात आपण जन्माला आलो हे आपण आपले भाग्यच मानले पाहीजे. पण आज फक्त एवढ्यावरच थांबुन उपयोग होणार नाही. त्यांचा हा आदर्श पुढे सुरु ठेवला पाहिजे. फक्त मनातल्या भावना, फक्त जयजयकार, फक्त मिरवणुका एवढच पुरेसं नाही. "छत्रपती शिवाजी महाराजांना" अपेक्षित असलेले गुण आपण आपल्यात अंगिकारण्याचा यशस्वी प्रयत्न केला पाहीजे. आपला समाज, आपला देश यांच्या भल्यासाठी आपण झटलं पाहीजे. आपली शिवभक्ती, देशभक्ती फक्त भावना भडकवल्यावरच जागी होता कामा नये. प्रत्येक कणाला, प्रत्येक मनाला, प्रत्येक क्षणाला ही शिवभक्ती आणि देशभक्ती जागृतच राहिली पाहिजे. शिवभक्ती, देशभक्ती आपल्या रक्ताचा भागच बनली तर भ्रष्टाचार आपोआपच थांबेल आणि नितीमुल्येही आपोआपच जपली जातील. "छत्रपती शिवाजी महाराजांच्या" अंगात,नसानसात असलेली जिद्द, चिकाटी, उत्साह जर आपण आपापल्या क्षेत्रात,आपल्या व्यवसायात दाखवु शकलो तर सर्व क्षेत्रात आपला समाज पुढे जाईल. आणि हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशाला महासत्ता बनवता येईल. यासाठी आपल्या प्रत्येकाच्या मनात राजांचा तत्वांनी जन्म घेतला पाहिजे. म्हणून आता "राजे तुम्ही आमच्या प्रत्येकाच्या मनात जन्म घ्या".

तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खुप खुप शुभेच्छा

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे

Wednesday, February 17, 2016

"गोष्ट एका पैशाची"


          "मैं ग्राहक को ...... रूपये अदा करने का वचन देता हूँ" असं प्रत्येक नोटे वर लिहिलेलं असतं. ती नोट 5 रूपये, 10 रूपये, 500 किंवा 1000 रूपये ची असो हे वाक्य प्रत्येक नोटे वर लिहिलेलं असतच. याचा अर्थ ती नोट म्हणजे पैसे नसतातच, ते एक वचन असतं, पैसे देण्याचं वचन. (बघितल्या का खिशातल्या सगळ्या नोटा तपासून, आहे ना हे वाक्य). म्हणजे प्रत्यक्षात पैसे दिलेले किंवा घेतलेले नसतात. मग आपण सगळेच कशाच्या मागे लागलोय, पैशाच्या की वचनाच्या? समजा पैश्याच्या मागे लागलोय तर मग कुठे आहेत पैसे, ही तर सगळी वचनं गोळा करून ठेवली आपण. प्रत्यक्षात पैसे कुठे आहेत हे? नाही ना? पडला ना प्रश्न? (ठेवा आता नोटा खिशात). या सर्व नोटा म्हणजे पैसे नाहीत ही आपली currency आहे, 'रुपया' ही आपली currency आहे. हीच currency प्रत्येक व्यवहाराचे सक्षम साधन आहे. पण हा विषय मांडण्यासाठी खुप खोलात जावं लागेल. Illuminati, petro dollar, gold dollar, World bank, RBI हे सर्वच विषय खुप खोलात जावून मांडावे लागतील.(आणि तेवढा मी ज्ञानाने सक्षम ही नाही, आणि जेव्हा होईल तेव्हा नक्की लिहीलच.)

          मित्रांनो माझा आजचा विषय हा नाही. मला एवढच म्हणायचय की आपण सर्वच ज्या गोष्टीच्या मागे लागलोय म्हणजे पैशाच्या, हा पैसा मिळविणे एवढाच उद्देश आहे का आपल्या आयुष्याचा? पैसा इतका महत्वाचा आहे का? की त्यापुढे आपण माणुसकी विसरत चाललोय, माणुसकीसाठी दिलेली 'वचनं' विसरत चाललोय. (माणसाने माणूस म्हणून जगण्याचं दिलेल वचन). सगळी सुख, समाधान, आनंद पैशावरच अवलंबून असतात का? पैसा हेच संपत्तीचे किंवा श्रीमंतीचे मोजमाप आहे का? मान्य आहे की या कलयुगात पैशाशिवाय काही होत नाही, प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो पण पैसा हेच सर्वस्व आहे का? पैशाला इतकं अवाजवी महत्व देणं योग्य आहे का?

          पैशाने गादी विकत घेता येईल, पण शांत झोप नाही, पैशाने घर विकत घेऊ शकतो पण घरातलं घरपण नाही, पैशाने घड्याळ विकत घेऊ शकतो पण गेलेली वेळ नाही, पैशाने पद विकत घेता येईल पण आदर नाही, पैशाने पुस्तके विकत घेऊ शकतो पण ज्ञान नाही, पैशाने माणुसकीचं वचन विकत घेऊ शकतो पण खरी माणुसकी नाही. पैसा हेच सर्वस्व नाही. पैसा जरुर कमवता येईल पण त्यासाठी आपण माणुसकी गमवायला नको. पैशाची पूजा जरूर करू पण पैशाचे गुलाम नको बनायला. हे लक्षात ठेवू की माणसासाठी पैसा आहे, पैशासाठी माणूस नाही. पैसा हे एक सुखी राहण्याचं साधन असू शकत पण फक्त पैसाच सुख देतो हे मला अजिबात मान्य नाही. कारण गडगंज मालमत्ता असलेल्या व्यक्तीला जर अपत्यच नसेल तर या पैशात कसलं सुख आहे.पायी चालताना, सायकल हवी वाटते, सायकल चालवताना गाडी, गाडी चालवताना कार हवी वाटते. आपल्या गरजा वाढत जातील तसं आपण हे सर्व पैशाने विकतही घेऊ शकतो, पण मग हेच सुख आहे का? पैशाने घेतलेल्या या materialistic गोष्टी तुम्हाला क्षणभर आनंद अवश्य देतील पण सुख आणि समाधान या गोष्टीत नसतं.

जोडोनिया धन उत्तम वेव्हारे। उदास विचारे वेच करी।।१।।
उत्तमची गती तो एक पावेल। उत्तम भोगील जीवरवाणी।।२।।

          खूप खूप पैसा मिळविणे हेही काही पाप नाही. टाटा, मित्तल, बिल गेट्स या व्यक्तींनी खुप पैसे मिळविले, पण ते समाजासाठी खर्चही केले. संत तुकारामांना या श्लोकातुन हेच सांगायचे आहे की चांगल्या मार्गानी पैसे मिळवा व ते चांगल्या कामासाठी सढळ हाताने खर्च करा. तुकाराम महाराजांकडे खानदानी सावकारी होती. दुष्काळासारख्या वाईट परिस्थितीत त्यांनी लोकांना खुप मदत केली. दुष्काळात त्यांनी लोकांचे हाल पाहिले. ‘अन्न अन्न’ करत मरणारे जीव पाहिले. त्यांनी त्या लोकांची सर्व कर्जखाती, गहाणखाती नदीत बुडवुन टाकली. अति कंजूसपणा करुन पैसा साठवून ठेवून करायच काय? भांड्यात साठवून ठेवलेलं कितीही चांगल दही असलं तरी ते कालांतराने खराब होतच त्याचा योग्य वेळी वापर झाला तर फलदायी ठरत, तसचं पैसा साठवून ठेवण्यापेक्षा उपयोगात आणला तर फायदा होतोच. आपल्या कमाईतला काही हिस्सा समाजकार्यासाठी खर्च करणे म्हणजे सफल जीवन असं मी मानतो.

          पैशाने च सुख मिळते, सुखी राहण्यासाठी पैसाच पाहिजे असं जर गृहीत धरलं तर मग BMW सारख्या luxurious गाड्यातल्या प्रवासात जो आनंद आहे तो बैलगाडीत मोकळ्या हवेत, निसर्गाशी गप्पा मारत मिळू शकत नाही का? आणि जर रडायचं असेल तर ते मर्सिडीज च्या स्टेअरिंग वर डोकं ठेऊन रडावं, रस्त्यावर कुठेतरी कोपऱ्यात किंवा आपल्या घरातल्या फाटक्या उशीवर डोकं ठेऊन रडण्यात काय फायदा? हो ना? सुख पैशात नाही आपल्या आनंदात आहे. काही जण म्हणतात पैशाने पैसा जोडत श्रीमंत होता येत पण मला वाटत, माणसाने माणूस जोडत गेलं तर अधिक श्रीमंत होता येतं, समाजाला उपयोगी असं काम करता येतं आणि हीच श्रीमंती खुप मौल्यवान असते. अशी नोटे वरची वचनं संभाळत बसण्यापेक्षा असं एक माणुसकीच वचन पाळू की ज्यातून दिव्यसमाज निर्माण करता येईल.

टिप - काहीना ब्लॉग ला reply द्यायचा आहे आणि ब्लॉगवर reply देता येत नसेल तर माझ्या मो नं 9561646178 whatsapp वर आपला अभिप्राय कळवला तरी चालेल. काही suggestions द्यायचे असतील तरी चालतील. आपला प्रत्येक सल्ला माझ्यासाठी पैशापेक्षा नक्कीच जास्त मौल्यवान असेल.

- डॉ संदीप टोंगळे
Contact no. 9561646178

Sunday, February 14, 2016

"या जगण्यावर शतदा प्रेम करावे"


          आज काल "प्रेम" म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येते एक प्रेयसी, एक प्रियकर आणि त्यांची प्रेमकहानी. याशिवाय प्रेम नसतचं का? दोन्ही भिन्न लिंगी व्यक्तींनी एकमेकांवर केलेलं प्रेम म्हणजे प्रेम, बस्स हेच असतं का प्रेम? दोघांची मन एकमेकांत खुप गुंतणं (या valentine day पुरतीच का होई ना) हेच असतं का प्रेम? बरं मग हे प्रेम असतं तरी काय? प्रेमाची काही व्याख्या असते का? प्रेमाच्या काही अटी किंवा नियम वगैरे असतात का?

          मित्रांनो, मला वाटतं प्रेम ही मनातली एक अत्यंत सुंदर भावना आहे. ते सर्व प्राणिमात्रांसाठी एक वरदान च आहे. प्रेमाची व्याख्या किंवा नियम असं काही नसतं. (व्याख्येत बसवायला प्रेम म्हणजे काय पायथागोरसचा सिद्धांत आहे......? की न्यूटनचा नियम......?) या सृष्टीत जशी हवा ही सर्वत्र पसरलेली आहे जी आपण श्वासाद्वारे घेतो तसचं हे प्रेम ही सर्वत्र पसरलं आहे, ते आपण मनाच्या उत्तम हालचाली द्वारे घेतलं पाहिजे. हवेनी जशी सृष्टी व्यापली आहे तसं प्रेम हे सारं जीवन व्यापून टाकणारी अद्वितीय भावना आहे. प्रेम या भावनेचा सर्वच सृष्टीने योग्य वापर केला तर हे सर्व जगच बदलून जाईल, अगदी प्रेममय होईल.

          फार पूर्वी पासूनच माणसाच्या मनात प्रेम ही भावना हळुहळु वृद्धींगत होत गेलीय. गुहांमध्ये राहणार्‍या आदिमानवी नर-मादीचं पुढे जाऊन शेती करणार्‍या कुटुंबप्रेमी माणसांमध्ये रूपांतर झालं. माणसानं लग्न प्रकिया निर्माण केली. एक नवरा, एक बायको असं नातं गेल्या शेकडो वर्षात रुजू लागलं. माणूस संस्कारित होत गेला आणि त्याची 'प्रेमाची कथा'च बदलत गेली. आजकाल प्रेम म्हणजे एक स्टाइल झालीय. जो तो आपल्या सोयी नुसार प्रेमाची व्याख्या बदलत चाललाय. प्रत्येकाच्या मनात प्रेम म्हणजे एक अजब रसायन होत चाललयं. पण प्रेम हे असं नसतच हे कोण सांगू शकेल का या आमच्या तरुण पिढीला?

          आपल्या लहानश्या वासराला जेव्हा गाय मायेनी चाटते ते प्रेम असते. घाबरलेल्या आपल्या बाळाला जेव्हा आई प्रेमाने कवटाळते ते प्रेम असते. आणि, आपण जेव्हा आपल्या आई बाबांच्या प्रेमाने पाया पडतो आणि ते मायेची मिठ्ठी मारतात ते प्रेम असते...... प्रेम हे वेगळ असं काही नसतच. ती  मनातली अकल्पनीय, अवर्णनीय अशी एक सुंदर भावना आहे. प्रेम हे कशावर ही होऊ शकतं. वस्तु, वास्तु, व्यक्ती, पक्षी, प्राणी, निसर्ग, वेळ, ठिकाण, पुस्तक आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावर आपण प्रेम करु शकतो. प्रेम या सुंदर भावनेला एका गोष्टीपुरतं मर्यादित न ठेवता या सुंदर सृष्टीवर च प्रेम करायला शिकलं पाहिजे. मंगेश पाडगावकर यांनी सांगितल्या प्रमाणे 'या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे'. खरच ते आपल्याला या आयुष्यावर प्रेम करायला शिकवून गेले.

          प्रेमाची भावना प्रत्येकात असते. अगदी प्राणीमात्रात सुद्धा. मी तर म्हणेन की प्राणी करतात तेच प्रेम सर्वात श्रेष्ठ असतं. अपेक्षा, मोह, इर्षा असं काही नसतं प्राण्यांच्या प्रेमात. उलट मानवी प्रेमात आता खुप विकृति आलीय. प्रेम साध्य नाही झालं की समोरच्या व्यक्तीचं नुकसान करुन त्रास देणं हे कुठलं प्रेम? मुलींच्या चेह-यावर acid फेकणं, आत्महत्या करणं, मानसिक त्रास देणं यात प्रेम कुठेच दिसत नाही. खरचं प्रेम ही एक खुप सुंदर गोष्ट आहे पण स्वत:च आणि दुसर्‍याचं 'आयुष्य' त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. जगण्यापेक्षा प्रेम अधिक महत्त्वाचं असूच शकत नाही. कितीही प्रेमात आकंठ बुडाला आणि पुढे प्रेमभंग झाला तरी, या प्रेमभंगातून बाहेर पडता येतं. पुन्हा नव्या उमेदीनं जगता येतं. अशा प्रेमाव्यतिरिक्त ही जीवनात खूप काही करण्यासारखं आहे. आयुष्यात अशी खुप क्षेत्र आहेत जी तुमच्या devotion ची वाट पहात आहेत. तुमच्या मनातल्या प्रेमाची ही ताकत त्या कामात टाका. तुमच्या व्यवसायावर, तुमच्या ध्येयावर प्रेम करा. ते काम फुलून येईल. आपलं मन सरसरून उठेल, तरारून उठेल. मनात आगळा वेगळा जोश निर्माण होईल.

          कधी कधी आपण आपल्या अंगावर थोडी जरी माती पडली तरी ती आपण पटकन झटकुन टाकतो. आपल्याला तिची कीळस वाटते. पण कधी विचार केलाय का की आपल्या मनाला लागलेली धूळ कशी साफ करणार आपण? आपण सर्वच आपल्या बाह्य स्वरुपावर खुप प्रेम करतो पण कधी आपल्या मनावर प्रेम केलयं का? दुनियादारीच्या नादात आपण स्वत:वरच प्रेम करायला विसरत चाललोय. Don't forget to love yourself. या आपल्या सुंदर "आयुष्यावर च प्रेम" करायला शिकलं पाहिजे.
         
ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन
जब प्यार करे कोई, तो देखे केवल मन

- डॉ संदीप टोंगळे

Thursday, February 11, 2016

"मी" नटसम्राट


          या लेखाच्या शीर्षकावरून असं वाटेल की "मी" स्वतःला "नटसम्राट" म्हणतोय. पण तसं अजिबात नाही. तो "मी" हा नटसम्राटाच्या मनातल्या स्वभिमानाचा "मी" आहे. हो बरोबर ओळखलतं...... कालच पाहिला हा सिनेमा. नाटकावर आधारित असला तरी हा सिनेमा नाटकी अजिबातच वाटत नाही. आजच्या समाजातील, कुटुंबातील वास्तवचित्रच खुप सुंदररित्या मांडल गेलं आहे. तीस-चाळीस वर्षे रंगभूमी गाजवलेला एक अतिशय स्वाभिमानी निवृत्त कलाकार, "नटसम्राट" अशीच त्याची ख्याती. तो शरिराने निवृत्त झाला असला तरी मनाने तो नाटकातच रमलेला असतो कायमचा. "मी" नटसम्राट, "माझी" रंगभूमी, "माझं" नाटक या स्वभिमानातच तो जगतो. त्याच्या स्वच्छंदी आणि बेफिकीर वागण्यामुळे सभोवतालच्या लोकांवर आणि स्वतःच्या मुलाबाळांवर विपरीत परिणाम होऊ लागतो. जे होतं ते सारं मुलामुलींच्या नावे केलेलं असतं. चाळीस वर्षे रंगभूमीवर असंख्य मानसन्मान भोगलेला हा नटसम्राट शरीराने आणि मनाने थकून जातो आणि सुरु होते त्याच्या आयुष्याची एक असह्य फरफट...... पण त्यात देखील त्याचा "मी" नटसम्राट हा स्वाभिमान सुटलेला नसतो आणि त्याचे नाटक ही मनातून गेलेले नसते.

          मला वाटतं की, कोणत्याही गोष्टीशी "मी" ला संलग्न न करता त्या गोष्टीविषयी तितकीच आत्मीयता वाटणे शक्य आहे का, जितकी "मी" संलग्न झाल्यावर वाटते? नटसम्राटाच्या बाबतीत तेच दाखवलं आहे, त्याने वठवलेल्या प्रत्येक पात्राशी, प्रत्येक नाटकाशी, त्याच्या "नटसम्राट" या पदाशी तो इतका संलग्न राहतो, इतका चिटकुन राहतो की इतर वेगळ्या गोष्टींचा तो विचारच करत नाही. नटसम्राटाच्या पत्नी चे दोन असे संवाद आहेत जे संपूर्ण कथेचा सार सांगतात. "तुम्ही नाटक बंद नाही केलं, ते घरी आणलतं" आणि "तुम्ही माफी मागितलेलं, कोणासमोर हात जोडलेलं मला आवडतं नाही". हे दोन असे संवाद आहेत ज्यात त्याची नाटकाबद्दलची संलग्नता आणि स्वाभिमानी "मी" या दोन्ही गोष्टी स्पष्ट दिसतात. त्याची पत्नीच त्याचा स्वाभिमान कायम जागा ठेवते. यात प्रत्येकाचा स्वाभिमान आणि समज-गैरसमज यातून निर्माण झालेला नात्यातील ताण-तणाव अतिशय सुंदर रेखाटला आहे.

          माणुस या पृथ्वीतलावर गेली हजारो वर्षे अस्तित्वात आहे. तो वैज्ञानिक दृष्ट्या अत्यंत प्रगतशील ही आहे. पण तरीही तो आजतागायत या नातेसंबंधातील समस्यांचे उत्तर शोधू शकलेला नाही. दोन व्यक्तींमधील नात्यात एवढा संघर्ष, एवढा तणाव का निर्माण होतो? एक माणुस दुसऱ्या माणसाबरोबर शांततेत व सामंजस्याने का जगू शकत नाही? शुल्लक गैरसमजामुळे नाते का दुरावतात? या आणि अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरे शोधण्यात आजपर्यंत तरी माणसाला अपयश च आलं आहे. खरच काय असेल कारण कोणत्याही नात्यातल्या इतक्या तणावाच? ज्या तणावामुळे काहींची आयुष्य च उद्ध्वस्त होतात. असं काय होत नेमकं की माणूस इतक्या टोकाच्या निर्णयाला पोहोचतो?

          एक प्रसंग सांगतो...... माझ्याकडे एक 70 वर्षाच्या आजी आल्या त्यांना मी तपासलं तर त्यांना खुप ताप होता मग त्यांना विचारलं की, 'अहो आजी सोबत कोणी आहे का खुप ताप आहे तुम्हाला?' त्यांनी जे उत्तर दिलं ते ऐकून मी चक्रावूनच गेलो. आजी म्हणाल्या, 'म्या एकटीच राहती बाबा, दोन्ही पोरं इंजिनियर हायती पण संभाळत नायती, मालक वारुन 5 वरिस झालं, पेंशन मिळती त्यावरच कसबसं जगती'. माझ्याकडे येणा-या प्रत्येक वयोवृद्ध बाई किंवा माणसापैकी 50% लोक हे एकटेच राहतात. का होत असेल असं? नात्यात इतकी दरी निर्माण का होते? हवेहवेशे वाटणारे नाते अचानक नकोसे का वाटु लागतात? नेमकं होत तरी काय?

          मला वाटतं की, आपण "मी" शी इतके चिटकलेलो असतो की आपल्याला आपल्या "मी" शिवाय बाकी गोष्टी शुल्लक वाटतात. दुस-याविषयी विचार करताना आपला "मी" आड येतोच. समजा मी ज्याप्रमाणे दुसऱ्या व्यक्तीसंबंधी माझ्या मनात एक image बनवलेली असते, तसचं त्या दुसऱ्या व्यक्तीने देखील माझ्यासंबंधी एक image बनवलेली असतेच. त्यामुळे आमच्या दोघांतील नातं हे आम्ही एकमेकांबद्दल बनवलेल्या images वर अवलंबून असतं. म्हणजेच आमच्या दोघांत जे नात असतं ते आमच्या मनातील images तयार करतात. आणि या images चांगल्या किंवा वाईट कसल्याही असू शकतात. आपल्या मनातला मीपणा आपल्या नात्यातील परिस्थिती ठरवतो. आपण आपल्याच गोष्टींना, विचारांना जास्त महत्त्व दिलं की नातं नाजुक होतच, नातेसंबधात अडचणी येतातच.

          एक उदाहरण सांगतो पहा पटतयं का? एखाद्या खुर्चीकडे बोट दाखवून ‘ही एक खुर्ची आहे’ असं मी म्हणतो, तेव्हा इतर अनेक खुर्च्यापैकी ती पण एक खुर्ची असते. परंतु जेव्हा ही ‘माझी’ खुर्ची आहे असं मी म्हणतो तेव्हा लगेचच त्या खुर्चीला एक विशेष स्थान प्राप्त होते. ही ‘माझी’ खुर्ची आहे, ती नीट ठेवली पाहिजे, दुसऱ्या कोणी त्यावर बसता कामा नये, असे अनेक विचार माझ्या मनात तयार होतात. जेव्हा त्या खुर्चीला आदरपूर्वक वागवले जाते तेव्हा मी तो माझा सन्मान समजतो व जेव्हा तिला लाथ मारली जाते तेव्हा ती मला मारलेली लाथ असते. अशा प्रकारे ही माझी खुर्ची आहे, असं म्हणून मी त्या खुर्चीशी एकरूप झालेलो असतो, किंबहुना मी ती खुर्चीच बनतो. हे विशेष स्थान त्या वस्तुमुळे नसून त्या वस्तूशी झालेल्या माझ्या संलग्नतेमुळे असते. म्हणजेच वस्तू मोठी नसते तर ‘मी’ मोठा असतो व तोच सर्व गोष्टींचे स्थान ठरवत असतो. आपले रोजचे जीवन जगताना वस्तू किंवा व्यक्तिशी ‘मी’चे या प्रकारे एकरूप होणे योग्य नाही. याच "मी" मुळे नाती टिकवताना अडचणी येतात.

          एखाद्या गोष्टीत आपला "मी" इतकाही गुंतून जावू नये की ती गोष्ट आपल्या नात्यांना, व्यवहाराला, आयुष्याला घातक ठरू शकेल. "नटसम्राट" या सिनेमात "मी" च्या अस्तित्वाविषयी, अस्मितेविषयी, स्वाभिमानाविषयी अगदी सहज रित्या खुप काही सांगितले आहे. आपण आपल्या आयुष्याचे सम्राट असतोच पण यात 'मीच सम्राट' असं मनात आलं की आयुष्याला वेगळं स्वरुप प्राप्त होतं. मी म्हणतोय तेच योग्य, मी करतोय तेच बरोबर असं जर म्हणत गेलो तर नात्यात अडचणी येतातच. आपला निर्णय, आपले विचार, आपले आचार हे सर्वसमावेशकच पाहिजेत. आपल्या सर्वांनाच आपल्या आयुष्याचा "नटसम्राट" होता येतच पण आपल्या या "मी" मध्ये फक्त स्वत:पुरता विचार न करता सर्व कुटुंबाचा, नातेवाईकांचा व समाजाचाही समावेश असावा.

- डॉ संदीप टोंगळे

Monday, February 8, 2016

"मनातलं लिखाण"


          "हो मीच लिहितो" हेच उत्तर गेले 15 दिवस झालं मी माझ्या प्रत्येक ब्लॉग वाचकांच्या प्रश्नांना देतोय. "हे तुम्ही लिहिताय सगळं?" हाच तो प्रश्न. पण हाच प्रश्न माझ्यासाठी खुप मोठी compliment वाटते मला. कारण वाचक माझ्या लिखाणावर सहमत आहेत आणि त्यांना ते नक्की आवडत आहे हाच सकारात्मक विचार या प्रश्नातुन उमगतोय मला. फक्त त्यांना एवढं वाटतय की अशी लिखाणाची कला अचानक संदीप मध्ये कुठून आली? एवढं कसकाय लिहु शकतो हा? असे विचार कुठून येतात डोक्यात? आणि एवढा वेळ मिळतोच कसा? हे सर्व प्रश्न माझे नातेवाईक, मित्र, आप्त आणि वाचक यांच्या सर्वांच्या मनात आहेत आणि याच सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मी हा लेख लिहायला ठरवलं आणि सुरुवातच केली.

          मित्रांनो, मी काही हाडाचा लेखक नाही पण मनातलं कागदावर उतरवणं हा माझा लहानपणी पासून चा छंद. मी इयत्ता सातवीत असताना माझ्या चुलत बहिनी च लग्न झालं तेव्हा मी खुप रडलो होतो कारण माझ्या लहान मनाला ते दृश सहन च झालं नाही की आपली ताई आपल्याला सोडून जातेय. ते ही कायमची दुस-याच्या घरी, नाशिक ला. ती पण खुप रडली होती. ती गेल्यावर एक पंधरा दिवसानी मी तिला पत्र लिहीलं होत. माझ्या आयुष्यातलं मी लिहिलेलं पहिलच पत्र आणि तिथेच झाली माझ्या "मनातलं लिखाण" लिहिण्याची सुरुवात.

          त्यानंतर मी खुप वेळा खुप काही लिहीलं पण प्रत्येक वेळी फाडून टाकलं. (फक्त एक कागद अजुनपर्यंत फाडला नाही तो म्हणजे लग्न जमल्यावर माझ्या बायको ला कविते सकट लिहिलेलं पहिलं पत्र) किती तरी वेळा माझ्या लिखाणाची कागदं सगळी कच-यातच गेलेली आहेत. मनात असेल ते लिहायचो, एखादी गोष्ट मनाला पटली किंवा पटली नाही की लगेच कागदावर लिहून पुन्हा कच-यात टाकायचो. पण कच-यात गेलेला प्रत्येक कागद माझ्या मनात कायमचा उमटत जात होता. हे सर्व असच होत गेलं वयाच्या तिशी पर्यंत. मी, माझं मन, मनातील विचार, माझं लिखाण माझ्या पुरतच मर्यादित होत. पण इतकं लिहून झाल्यावर मनात कुठेतरी विचार आला की या मनातल्या विचारांचा आपण काहीच उपयोग करत नाही. चांगले विचार समाजापुढे मांडून योग्य समाजबांधणीत खारीचा वाटा उचलायला काय हरकत आहे. म्हणून नंतर एखादा subject घेऊन लेख लिहायला सुरुवात केली. पुस्तक वाचन, ब्लॉग वाचन, लेख वाचन करून करून लेख लिखाणाची खुप आवड निर्माण झाली. मग ते लेख whatsapp वर टाकत गेलो आणि आता ब्लॉग सुरु केला. तर असा झाला माझ्या पहिल्या पत्रापासून, लेख लिखाण ते ब्लॉग पर्यंत चा प्रवास......

          Writing is my love. If you love something, you find a lot of time. I write for two hours a day, usually starting at midnight; at times, I start at 11. - A Great Late A. P. J. Abdul Kalam. आपल्या मनातल्या विचारांना मूर्त रूप द्यायचं असेल, तर आपण त्यांना कागदावर उतरवतो. मनातल्या विचारांचा गोंधळ कागदावर उतरवला की ब-यापैकी कमी होऊन जातो. आणि प्रश्नांची उत्तरे ही आपोआप मिळत जातात. मनातला ताण तणाव दूर व्हायला मदत होते. आपण मित्राजवळ आपली सुख दुःख व्यक्त केल्यावर जो मोकळेपणा वाटतो तसा मनातलं कागदावर उतरवल्यावर सुद्धा वाटतो.

          वाचना-याला कुठे ना कुठे आपण यात आहोत ही जाणीव होणे हीच लिखाणाची कला आहे. मी लिहितो ते तुमच्या माझ्या मनातलंच असतं फक्त मी त्याला कागदावर उतरवून मूर्त स्वरुप देतोय एवढच. मनातल्या प्रश्नांची उत्तर, ती कागदावर उतरवत गेलं की आपोआप मिळत जातात. मी काय खुप अनुभवी किंवा खुप मोठा लेखक वगैरे नाही पण माझ्या मनाला जे जे वाटत, जे जे मनात विचार येतात ते ते मी लिहित राहतो आणि लिहित राहील. खरं तर लिहिण्याचे खूप फायदे होतात. आजच्या जीवनशैलीतला ताणतणाव कमी करण्याचं महत्त्वाचं काम लिखाणातून होऊ शकतं. प्रत्येकाने किमान आपली दैनंदिनी एका डायरीत लिहायची सवय जरी लावली तरी बराचसा तणाव कमी व्हायला मदत होईल.

          वाचनाने ज्ञान वाढतं, लोकांसमोर बिनधास्त बोलल्याने माणूस हजरजबाबी होतो, मात्र लिहिण्याने माणसाचा विचार नेटका तसंच काटेकोर होतो. आपण जे लिहितोय तसच आपण पण वागलं पाहिजे असा एक मनात नियम च तयार होतो. आपल्याच लिखाणातुन विचारांची प्रगल्भता वाढली की वागण्यातला बदल आपोआपच जाणवू लागतो. आपल्या पैकी कोणीच 100% perfect नसतच आपल्या मनातल्या चांगल्या विचारांची देवाण घेवाण च आपल्याला perfect बनवू शकते. आणि एकदा का लिखाणाची आवड निर्माण झाली की कितीही व्यस्त असलो तरी आपण वेळ काढून लिखाण करतोच.

          कविता, लेख लिहिणे हा माझा छंद आहे, कोणाच्या भावना अथवा मन दुखवायचा माझा हेतू अजिबात नसतो. आणि कोणाला उपदेश किंवा सल्ले देण्या इतका मी मोठा ही नाही. जे चांगल मनात येईल ते मी लिहित असतो. जर कोणाला काही पटत नसेल किंवा चुकीच वाटत असेल तर तुम्ही मला बिनधास्त सांगू शकता. माझ्या या लिखाण कलेतुन किंवा वैयक्तिक विचार धारेतुन समाजासाठी जे करता येईल ते करायला मी स्वताला बांधील समजतो.

          Either write something worth reading or do something worth writing.

- डॉ संदीप टोंगळे 

Sunday, February 7, 2016

"माणसा"चा शोध


          कोणी मला माणुस शोधून देता का माणुस? हाडा मांसाच्या शरीराच्या आतला माणूस? मनात माणुसकी जीवंत असलेला माणुस? या सृष्टीला ज्याची खरच गरज आहे तो माणूस? माणसाच्या आतला माणूस?

          सृष्टि च्या निर्मात्याने अनेक प्राणी तयार केले. प्रत्येक प्राण्याला हाड, मांस, डोळे, हृदय हे सर्व अवयव दिले. पण विचार करण्याची शक्ति असलेला मन हा अवयव फक्त मनुष्य प्राण्याला च दिला. पण ज्या कारणा साठी मनुष्याला मन मिळालं आहे त्या कारणाकडे सर्वच दुर्लक्ष करत आहेत. मी इतरांपेक्षा वेगळा का आहे म्हणजे या सृष्टितील इतर प्राण्यांपेक्षा मलाच बुद्धी का? आहार, निद्रा, भय, मैथुन तर सर्वच प्राण्यांची गरज मग मला वेगळे अस्तित्व कशासाठी? ज्यावेळेस ह्या प्रश्नांची उत्तरे माणुस आपल्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न करेल त्यावेळी जाती आणि धर्म यांचा प्रत्येकाला च विसर पडेल आणि केवळ "मनुष्य हीच जात" आणि "माणुसकी हाच धर्म" माणसाच्या मनामध्ये शिल्लक असेल......

          कापूस कधीच टणक नसतो, दगड कधीच मऊ नसतो, अग्नी कधी थंड पाहिलाय का?, बर्फ गरम नसतोच, ऊस मला कधीच कडू लागला नाही, काही ही केल तरी कारले हे कडूच, झाड सावलीच देत, साप दंश आणि विंचू डंक च मारतो ते कधी प्रेम करत नाहीत. खरयं ना मित्रांनो ! मऊपणा हा कापसाचा गुणधर्म, कठोरता दगडाचा गुणधर्म. हे गुणधर्म त्यानी सोडले तर कापूस व दगडाच अस्तित्व च राहणार नाही. गोडपणा हा ऊसाचा आणि कडूपणा हा कारल्याचा गुणधर्म, हे गुणधर्म सोडले तर ऊस हा ऊस राहणार नाही आणि कारले हे कारले राहणार नाही. उष्णता हा अग्नीचा गुणधर्म आणि थंडपणा हा बर्फ़ाचा गुणधर्म. दंश करणे हा सापाचा गुणधर्म आणि डंख मारणे हा विचंवाचा गुणधर्म आहे. साप आणि विंचू यांच्याकडून प्रेमाची अपेक्षा न केलेली बरी ! हो ना? ते काहीही असो पण निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपाआपल्या गुणधर्माला घट्ट चिकटलेली आहे. काहीही झाले तरी आपला गुणधर्म सोडायला कोणीच तयार नसतं. मग माणसाचा मुलभूत गुणधर्म "माणुसकी” हा आहे. प्रत्येक वेळी माणुस त्याचा हा मुलभूत गुणधर्म का सोडतो. कधी दगडा सारखा वागतो, कधी कडू कारल्यासारख्या वागतो, अग्नीसारखा तापतो आणि साप,विंचू सारखा दंश करतो. निसर्गातील कोणताच प्राणी, फुल, झाड, पक्षी किंवा कोणतीही गोष्ट आपला मुलभूत गुणधर्म सोडायला तयार नसताना माणूसच का “माणुसकी” सोडून अन्य पशूप्राण्यांसारखा वागतोय? गोडपणा नसेल तर ऊसाला लोक ऊस न म्हणता कडबा म्हणतील मग माणुसकी सोडलेल्यांना "माणुस" म्हणावं का?

          एकदा एका राजाला विहिरीवर उघडयावर स्नान करण्याची लहर येते. मग तो त्याच्या एका सेवकाला विहिरीवर माणसे किती आहेत हे पाहून यायला सांगतो. सेवक जेव्हा विहिरीवर जातो तेव्हा त्याला विहीरीवर अंघोळ करणा-यांची खूप गर्दी दिसते. तो दूर जाऊन एके ठिकाणी उभा राहतो आणि पाहत बसतो. विहिरीत स्नानासाठी येत असलेला प्रत्येक जण रस्त्यात असलेल्या एका दगडाला ठेच लागून जात होता. विहिरीवर झालेली गर्दी पाहून तहानेने व्याकुळ झालेला एक भिकारी कितीतरी क्षणांपासून तिथेच उभा असतो. तितक्‍यात एक व्यक्‍ती घाईघाईने विहिरीवर स्नान करायला येतो. त्याला ही त्या दगडाची ठेच लागते पण ती व्यक्ती मार्गातील दगड हाताने उपटून दुरवर फेकून देतो. मग त्या भिका-याकडे वळतो. बादलीने विहिरीतील पाणी काढून ते पाणी त्या तहानलेल्या भिका-याला पाजतो. तो सेवक राजाकडे जातो आणि लगेच राजाला सांगतो की विहिरीवर केवळ एकच माणूस आहे. राजा खूश होतो आणि स्नान करायला अडचणं नाही म्हणून तो लगबगीने विहिरीकडे जातो. पाहातो तर काय विहिरीवर गर्दीच गर्दी दिसते. सेवक खोटा बोलला म्हणून राजा फार चिडतो. सेवकाला बेदम मारतो. मारणे झाल्यावर राजा सेवकाला विचारतो. तू खोटं का बोललास? सेवक म्हणतो आपण मला किती माणसं आहेत, हे पाहून यायला सांगीतलं होतं. परंतु मला त्या गर्दीत केवळ एकच माणूस दिसला. त्याने त्याच्याठिकाणी माणूसकी होती म्हणून मार्गातला दगड उपटून फेकला. इतर सारे स्नान करण्यात मग्न होते. त्यांना तहानेने व्याकुळ झालेला भिकारी दिसला नाही की रस्त्यातला दगड दिसला नाही. परंतु या माणसाने त्या भिका-याला विहिरीचे यथेच्छ पाणी पाजले. त्याची तहान भागविली. असं म्हणतातच राजाला खूप दुःख होते. माणूस म्हणून जन्माला आलो तरी माणूस म्हणून जगणेच बहुतेकांना जमत नाही. माणसाने माणुसकीच सोडली तर कसं त्याला माणूस म्हणायचं?

          आपण तंत्रज्ञानात अग्रेसर आहोत. माणसाने खुप प्रगती केलीय. चंद्र, मंगळ अशा ग्रहांवर शोध सुरु आहेत पण आपला शेजारी कोण आहे हेच माणूस विसरलाय...... आज काल मोबाइल फोन 3G, 4G speed ने चालतात पण माणुसकी चा speed 2G वरच अडकलाय आणि त्याच network पण कुठेच भेटत नाहीये. माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर, माणूसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणुस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात ही माणुसकी ची व्याख्या च माणूस विसरत चाललाय. गेले ते दिवस अंगणातले दाणे पक्षांची वाट पहायचे, माणुसकीच्या भिंतीत प्रेमाचा ओलावा असायचा, थरथरणाऱ्या वृद्ध हातांना कोवळ्या जीवांचा आधार वाटायचा. आता मात्र चित्र सगळं पलटून गेलयं माणसांच्या गर्दीत फक्त चेहरेच उरले नितीमत्ता, माणुसकी आणि आपूलकी नामशेष झालीय.

          आमटे कुटुंब, सिंधुताई सपकाळ अशी अनेक उदाहरणं पाहीली की वाटत माणुसकी अजुन शिल्लक आहे पण एवढी माणुसकी पुरेशी आहे का? ही लोक समाजासाठी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावतात. पिढ्यान पिढ्या समाजासाठी अर्पण करतात. यांच्या तुलनेत आपण किती माणुसकी जपतोय. आपण सर्वजण च सरासरी महीन्याला 1gb data वापरतो पण थोड़ीशी माणुसकी वापरायची विसरत चाललोय. नुसत्या मेणबत्त्या जाळून आपली माणुसकी पूर्ण होत नाही, तर माणुसकीचा हात पुढे करून समाजाला प्रबलता आणली पाहिजे, सामाजिक नितीमत्ता सुधारली पाहिजे. बदल हवा, बदल हवा असं नुसतं म्हणून उपयोग नाही. नुसती अंगावरची कपडे बदलली म्हणजे आपण आधुनिक झालो असा भ्रम काढून टाका, विचार बदला, विकृती बदला आणि सामाजिक संवेदनांची जाणीव असू द्या. कारण तुम्ही एक माणूस आहात आणि माणूस माणसाला जरी मारत असला तरी माणसाने माणसाला अजुन खाद्य म्हणुन वापरलेलं नाही. त्यामुळे बरीच माणुसकी अजुन शिल्लक आहे याचा वापर करायला शिकुयात. सुरुवात स्वतापासून करूयात. चला तर मग आपल्या आतला माणूस शोधायला शिकुयात......

- डॉ संदीप टोंगळे

Friday, February 5, 2016

"मैत्री जिवाभावाची"


          माझ्या ब्लॉग चा खुप चांगला प्रतिसाद पाहून आनंद तर होतोयच पण एक भावना मनात येतीय की 'आपल्या मनातल्या चांगल्या विचारांचा खारीच्या वाट्या एवढा का होईना पण समाजासाठी उपयोग होतोय' हा विचार मनात सुखावून जातोय. तुमच्या सर्वांच्या या प्रतिसादाबद्दल खुप खुप आभार.

          आतापर्यंत चे ब्लॉग पाहून माझा एक मित्र मला म्हणाला की 'अरे तू मैत्री विषयी अजुन काही लिहीलं नाहीस, तुझा तर आवडता विषय आहे तो'. मी म्हणालो 'खरचं खुप आवडता विषय आहे. कोणाशीही केलेली मैत्री ही नेहमीच माझ्या खुप जिवाभावाची असते, मला खुप आवडेल या विषयी लिहायला' त्यावर तो म्हणाला 'तुझे मैत्री बद्दल चे विचार वाचण्यासाठी मी आतुर असेन'. मग ठरवलच की आपल्या मनातल्या मैत्रीबद्दल च्या भावना ब्लॉग वर मांडाव्या आणि म्हणून हा सगळा शब्दप्रपंच......

          मैत्री, मैत्री, मैत्री म्हणजे असतं तरी काय? मैत्री म्हणजे निरभ्र आभाळ, अथांग समुद्र, श्रावणसर, टिपूर चांदणं, परिजातकाचा सडा, मोगर्‍याचा दरवळ अशा अलंकारिक उपमा देवुन मैत्रीची व्याख्या मी एका साचात बांधून ठेवणार नाही. मैत्री ची व्याख्या अगदी सहज सोपी आहे. आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे मैत्री. एकमेकांच्या साथीने समृद्ध होत जाणं म्हणजे मैत्री. नाती, व्यवहार, हितसंबंध या पलिकडचं एक सुंदर विश्व म्हणजे मैत्री. मैत्रीचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे कर्ण आणि दुर्योधन. कर्ण म्हणजे मित्रासाठी त्याग करणारा, मित्रासाठी वाट्टेल ते करणारा निश्चयी माणूस, दुर्योधनासारख्या वाईटाच्या मार्गी लागूनही त्याला अखेरपर्यंत साथ देणारा सच्चा मित्र, त्याचा विश्वासघात न करणारा विश्वासू मित्र. मैत्रीच्या इतिहासात अजरामर होणारा असा हा कर्ण. मैत्री ची व्याख्या या पेक्षा वेगळी काय असू शकते.

          आजच्या तरुण पिढीच्या बेरोजगारीच्या युगात गरज आहे, ती समाजाने बेकार ठरवलेल्या हुशार, सुशिक्षित 'सुदाम्या'ला मैत्रीखातर त्याच्याजवळ पोहे जरी नसले तरीही त्याच्या एका 'कट चहा' वरूनच त्याची परिस्थिती जाणून घेऊन त्याला मदत करून समृद्ध करणार्‍या सख्या श्रीकृष्णाची......! असा 'सखा श्रीकृष्ण' मित्ररुपात भेटण्यासाठी आधी स्वतः सुदामा व्हावं लागतं व श्रीकृष्ण- सुदामासारखी अतूट मैत्री मनात असावी लागते तरच त्या मैत्रीच सुंदर विश्व अनुभवायला मिळत.

          प्रत्येक व्यक्तिला सर्वात जवळचा असा कोणी वाटत असेल तर तो म्हणजे त्याचा मित्र. मित्राशिवाय मनातल्या भावनांना दुसरं कोणी समजून घेईल का? जरी कोणी समजून घेतलं तरी त्या व्यक्तीला ही मित्रच व्हावं लागतं. ती व्यक्ति आपली आई असो, वडील असो, बायको असो, भाऊ, बहीण असो वा मुलगी असो यांना आपण आपल्या मनातल्या भावना तेव्हाच सांगू शकतो जेव्हा ते आपले मित्र होतात किंवा मित्राप्रमाणे वागतात. अशा भावना व्यक्त करायला आपल्याला मित्र असावा असं प्रत्येकाला वाटणं स्वाभाविक आहे. पण मैत्री करताना पहिल्यांदा स्वतःच एक मित्र व्हावं लागतं. कोण्या एका व्यक्तीशी मैत्री जुळविण्यासाठी गरज असते ती स्वत:वर विश्वास ठेवण्याची, जाती-पातीची बंधने झुगारण्याची, संशयाचे काळे पडदे बाजूला सारण्याची, विशाल हृदय, संवेदनशील मन जपण्याची, समोरच्या मित्राला व्यवस्थितपणे समजून घेण्याची. मैत्री व्हायला वेळ लागत नाही, पण खरी मैत्री व्हायला वेळ लागतो.

          खरी मैत्री म्हणजे एक रोपटं. वर दिसतं त्याच्या दुप्पट जमिनीत रुजलेलं, ज्याचा गाभा शोधणं म्हणजे केवळ अशक्य गोष्ट. “पाणी रे पाणी तेरा रंग कैसा” हे कधी कुणी सांगू शकेल का? तसचं मैत्रीच आहे. ती कशी असते, कधी होते कोणासोबत व का होते? हे कोणालाच कधीच कळत नाही. पण जेव्हा मैत्री होते तेव्हा मात्र आपण वेगळेच कोणीतरी होऊन स्वच्छंदी पाखराप्रमाणे आकाशात तरंगत असतो. मैत्रीमध्ये रंगीत धुंदी असते. यामध्ये वय, वेळ, समाज, जात पात कशाचच बंधन रहात नाही. मित्र म्हणजे कोण असतं असं म्हणण्यापेक्षा मित्र कोण नसतो हे विचारायला पाहिजे. मित्र म्हणजे आई, वडिल, पत्नी, भाऊ, बहिण, शेजारी व शत्रुही असतो कारण एक सच्चा मित्र या सगळ्या भुमिका पार पाडतो. तुम्ही म्हणाल की मित्र शत्रु कसा असू शकेल?, जर आपला मित्र चुकत असेल तर खरा मित्र हा प्रसंगी त्याचा विरोध करुन परिणामी शत्रु बनुन आपल्या मित्राच्या हिताचे रक्षण करतो. मित्र म्हणजे जणू एक परिस असतो जो आपल्या स्पर्शाने मित्रामधले दोष बाजुला सारून त्याच्यात स्वत:च्या गुणांची भर घालतो व मित्राचं जीवन उजळून काढतो.

          मैत्रीतलं बोलणं कसं वेगळच असतं. आपुलकीच, आपलेपणाच, हक्काच. या बोलण्यातली भाषाच निराळी असते. जशी मातृभाषा, पितृभाषा, बोलीभाषा, राष्ट्रभाषा वेगळी असते तशी ही एक मैत्रीची भाषा वेगळी असते. खुप जवळचे मित्र बोलू लागले की शेजारचा आपसुक च विचारतो की 'तुम्ही एकमेकांचे जवळचे मित्र दिसताय', ते त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीमूळे कोणाच्याही लगेच लक्षात येतच. अशी मैत्रीची भाषा या मित्रांना अजुनच जवळ आणते. अशी मैत्री ही कुठे शाळेत शिकवली जात नाही पण शाळेत असताना झालेली मैत्री ही खुप काही शिकवून जाते. आणि अशीच मैत्री आयुष्यभर टिकते ज्या पासून आपण काही तरी चांगलं शिकतो आणि शिकवतो.

          आज माझे लहानपणी पासून आता पर्यंत चे सर्व वयोगटातील खुप चांगले मित्र आहेत पण मी शाळेत असताना जो आमचा मित्रांचा ग्रुप होता त्यात खुप निस्वार्थी मैत्री होती, एकमेकांबद्दल खुप प्रेम, आस्था होती. शाळेत असताना शाळा संपली की आम्ही सर्व मित्र contribution करून भेळ, वड़ापाव घेऊन आमच्या गावातल्या स्टेशनरोड वरील कोणत्याही शेतात जावून मस्त गप्पा मारत बसायचो. भेळ खाणे हा उद्देश नसायचा पण त्या गप्पामध्ये आम्ही एवढे रमायचो की किती वेळ झालाय हे पण लक्षात येत नसायचं. एकमेकांची चेष्टामस्करी, सुख दुःख, अडचणी त्या भेळेच्या प्रत्येक घासासोबत वाटुन घ्यायचो. तो आनंद काही वेगळाच होता. प्रत्येक मित्र त्या गप्पामध्ये रमायचा, अगदी गुंतून जायचा. आणि विशेष म्हणजे तेव्हा फोन नव्हते. नाहीतर आता सगळे फोन मध्येच गुंतलेले असतात. (खरच आमचं नशीब, मनाची एकाग्रता वाढवणारे यंत्र म्हणजे फोन नव्हते तेव्हा, नाहीतर अशी मैत्री कधीच अनुभवायला मिळाली नसती. आजकाल या फोन मूळे मैत्रीतल्या गप्पागोष्टी कुठे तरी हरवून गेल्यात) त्या भेळ आणि वडापाव ला एक वेगळीच आपुलकीची चव होती. मला त्या भेळेचा आनंद पुन्हा घ्यायचा आहे. मला तो क्षण अजुन एकदा तरी अनुभवायचा आहे. त्या भेळे चा प्रत्येक घास अजुन चवीने खायचा आहे. कदाचित तीच पहिली चव लागणार नाही जिभेला पण त्याच "जिवाभावाच्या मैत्री"चा आनंद पुन्हा एकदा तरी घ्यायचा आहे, पुन्हा एकदा तरी घ्यायचा आहे......

          The greatest gift of life is friendship, and I have received it.

- डॉ संदीप टोंगळे

Thursday, February 4, 2016

"कहानी अपेक्षांची"


          आयुष्याच्या या मायानगरीत आपण सर्वजणच अपेक्षांच भल मोठं ओझं घेऊनच जगण्याची वाटचाल करतोय. आई, वडिल, बायको, मुलं, मित्र, समाज या सर्वांना आपल्या कडून खुप अपेक्षा असतात आणि आपल्याला ही या सर्व व्यक्तींकडून अपेक्षा असतातच. आपल्याला इतरांकडून जशी अपेक्षा असते तशी इतरांनाही आपल्याकडून असणं साहजिक आहे. पण प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण होणं शक्य नसतं. अपेक्षा ठेवण्यात काहीच चुक नाही पण त्या गृहीत धरणं हीच मोठी चुक आहे अस माझं मत आहे, कारण मनात गृहीत धरलेली अपेक्षा पूर्ण नाही झाली की मन नाराज होतं. त्यापेक्षा कुठलीच अपेक्षा न करता मिळालेली एखादी गोष्ट Surprise Gift सारखी वाटते. या Surprise Gift चा हा वेगळा आनंद निरपेक्षपणे आपण सर्वांनी अनुभवला पाहिजे. पण आपण या आनंदाला मुकतोय असं वाटत, कारण आपण या अपेक्षा नेहमी गृहीत धरून च चालतो.

          मग या अपेक्षा स्वतःबद्दल असोत, दुसऱ्याबद्दल असोत, कौटुंबिक असोत, राजकीय असोत वा सामाजिक असोत, या अपेक्षा आपल्यामनावर कधी हलका तर कधी जड तणाव निर्माण करतातच, पण त्याहीपेक्षा आपल्या आतच असलेल्या आनंदाच कारण बाहेरच्या गोष्टीत शोधण्याच्या नादात स्वतःचा विकासच खुंटवून टाकतात. “त्यांन असं वागायला नकोच होतं”, “तो हल्ली मला विचारतच नाही”, “आईकडून ही अपेक्षा नव्हती”, “बाबांचा स्वभाव पहिल्यासारखा राहिला नाही”, “केलेले उपकार धाकटा भाऊ किंवा थोरला भाऊ विसरला”, “सहकारी कसले? छुपे शत्रूच निघाले ते”, “शेवटी त्याने केसानं गळा कापलाच ना”,“कानामागून आली आणि तिखट झाली” या आणि अशा अनेक पद्धतीच्या बोलण्यामागे आपल्या मनातील समोरच्या व्यक्ती बद्दलच्या अपेक्षाच कारणीभूत असतात. आणि या अपेक्षांची उभारणी निसरड्या मानवी स्वभावावरच झालेली असते. त्यामुळेच अपेक्षाभंगाचा खूपच त्रास होतो.

          मग असा ही एक प्रश्न डोक्यात येतो कि अपेक्षा कुणाकडूनच बाळगू नयेत का? एखाद्यासाठी आपण झिजलो तर ती व्यक्ती थोडीतरी कृतज्ञ असायला हवी ही अपेक्षा फार मोठी आहे का? मित्रानं मैत्रीला जागण्याची अपेक्षा योग्य नाही का? महागडया आंब्याच्या पेटीत आंबे गोडच हवेत ही अपेक्षा न्यायाला धरून नाही का? या आणि अशा प्रकारच्या बऱ्याच अपेक्षांचे प्रश्‍न नक्कीच “एवढी अपेक्षा तर असतेच कि” याच उत्तरावर येवून थांबतात. एखादं बी पेरलं तर रोप यावं, ही अपेक्षा पेरणीच्या कृतीतच अपेक्षित असते. जेव्हा अशी अपेक्षा पूर्ण होते, तेव्हा हा प्रवास सोपाच वाटतो. पण खरी गंमत तर अशी आहे कि, सर्वच अपेक्षा प्रत्येकवेळी अपेक्षेइतक्‍याच पूर्ण करणे, हेच तर खरं त्या निसर्ग निर्मात्याला मंजूरच नाही. त्याला अधूनमधून अपेक्षाभंगाचे हादरे देत आपले हे जीवननाट्य आणखीनच खुलवत ठेवायच आहे. आपल्या आयुष्यातला संघर्ष, अस्वस्थता निरंतर जागृत ठेवून हे जग आणि हे जीवन गतिमान ठेवणे हीच तर काळाची कोणालाही न गवसलेली सृजनशीलता आहे. लहानमुलांच्या रंगीत चित्र असलेल्या परिकथा सुखरूप शेवटपर्यंत पोहोचतात, तसं आपलं आयुष्य कधीच नसत, हे अगदी आपण प्रत्येकानेच समजून आणि उमजून घ्यायला हवं. आयुष्यातली ही अनपेक्षितता प्रत्येकाने ओळखली, तर अपेक्षाभंग तुलनेने कमी होतील आणि जेवढे होतील त्यासाठी आपले मन नेहमी सज्ज असेल.

          आपल्या डोक्यातलं अपेक्षांचं ओझ बाजूला ठेवलं की नात्यातला निरपेक्ष आनंदाचा एक सुंदर अनुभव घेता येतो. आणि नकळतच यश आणि अपयश याच्या आपल्या मनातील संकल्पनाही बदलू लागतात आणि स्वतःच्या सीमा ओळखण्यात वा त्या वाढवण्यात आपण कमी पडलो, या जाणिवेनं स्वतःला सोडून निष्कारण दुसऱ्याला दोष देण्यातली ऊर्जा आपोआपच वाचते. त्या वाचलेल्या ऊर्जेचा उपयोग शांत डोक्याने आत्मचिंतन करून योग्य निष्कर्ष काढण्यात घालवला तर निरपेक्ष आयुष्याचा छान आनंद घेता येईल. एखादं काचेच भांड कसं असतं तशा या अपेक्षा असतात. जेवढं गच्च पकडाल तेवढ ते भांड तुटण्याची जास्त शक्यता असते. अशा अपेक्षा बाळगुन स्वत:ला दुखवण्यापेक्षा, अपेक्षा न ठेवता जे समोर येईल ते बोनस समजुन आयुष्य जगायला शिकलं पाहिजे. अति श्रीमंताच्या घरातल्या बाईला त्या सर्व सुख सोयी कमीच वाटतात कारण तिच्या अपेक्षा खुप असतात म्हणून ती नेहमी दुखीच राहते आणि साधारण किंवा गरीब घरातल्या बाईला जे मिळेल त्यात समाधान मानून सुखी आयुष्य जगण्याची सवयच लागलेली असते कारण तिच्या अपेक्षा कमी असतात.

          तुम्हाला मिळणारी प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी तुम्हाला पाहिजे तशीच मिळु शकत नाही. त्यात आत्मचिंतन करून केलेली तडजोड महत्वाची असते. प्रत्येक वेळी तुमच्या आनंदाच कारण हे तुमच्या मनातल्या कमी अपेक्षा हेच असू शकत. तुमचं सुख तुमच्या मनातल्या गोष्टीवर अवलंबून असतं. लोकांकडून अपेक्षा करण्यापेक्षा त्याना दोष देण्यापेक्षा स्वताकडून दुस-यांसाठी जास्त अपेक्षा करायला शिकलं पाहिजे तरच आयुष्यात आपण सुखी होऊ शकतो. "The beauty of life does not depend on how happy you are; but on how happy others can be because of you." असं म्हणतात ना की कुठलीही अपेक्षा न करता जो देतो त्याचे हात सदैव भरलेलेच राहतात आणि जो कुठलीही अपेक्षा न करता कार्य करत राहतो तो नेहमी आनंदी राहतो. अगदी खरं आहे. पण आनंदाचा किनारा देणाऱ्या नावेला कधी कधी अपेक्षाभंगाचाही किनारा लाभू शकतो ना... त्यामुळे मनात त्याचीही तयारी ठेवून आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे. एकदा समुद्रातला प्रवास स्वीकारला की, फक्त निळंभोर आकाश, छान लाटा, मंद गार वारा आणि मधूनच डॉल्फिनच उसळण,एवढच गृहीत धरून निघायच नसतं. अनपेक्षित वादळ, भयानक चमकणाऱ्या विजा, अचानक येणारा पाऊस, वाऱ्याच्या बदलत्या दिशा हे सगळ गृहीत धरूनच प्रवास सुखकर जातो. जीवनप्रवासात सुद्धा हीच इच्छाशक्ती अपेक्षित आहे.

          "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।" या श्रीमद भगवत गीतेतल्या ओळी निरपेक्ष जीवनाचा खरा अर्थ सांगतात. निरंतर कर्म करत रहा फळाची अपेक्षा करू नका. तुम्ही जे पेराल तेच उगवेल. तुम्ही कसलीही अपेक्षा न करता चांगल काम केलं की आपोआप चांगल फळ मिळतच. पण कसली तरी अपेक्षा मनात ठेवून केलेलं काम हे प्रामाणिकपणे केलं जात नाही. त्यामुळे अपेक्षा न ठेवता जगायला शिकलं पाहिजे. अति अपेक्षा हेच सर्व दुखांच मुळ कारण आहे या पासून दूर राहून आपलं आयुष्य सुखी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. येणाऱ्या प्रत्येक सुखाचा आनंद घेत, अनपेक्षित येणाऱ्या दुःखाशीही संवाद साधण्याची तयारी ठेवली पाहिजे. हीच तयारी खरं तर जीवनाची साधना आहे असं मला वाटत. प्रत्येक वेळी समोरचा माणूस किंवा प्रसंग आपल्याला पाहिजे तसाच असेल, अशा हट्टाचे ओझे फेकून दिले पाहिजे. अपेक्षाभंग होतच असतात, त्याचं एखादं कॅलेंडर किंवा घडयाळ नसतं. ते कुठेही, कधीही होऊ शकतात, पण या वास्तवाला जाणून घेवुन आयुष्याचा आनंद घेणे हीच खरी भिंत नसलेल्या शाळेतली आयुष्याची शिकवणी आहे.

          My expectations were reduced to zero when I was 29. Everything since then has been a bonus.

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Monday, February 1, 2016

मनस्वी यशोगाथा
          उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत,
          क्षुरासन्न धारा निशिता दुरत्यद्दुर्गम पथ:
          तत् कवयो वदन्ति ॥अध्याय १४॥कथा उपनिषद॥

    "Arise, awake, and stop not till the goal is reached."

          स्वामी विवेकानंदांनी नेहमीच त्यांच्या शिकवणीत उपयोगात आणलेला कथा उपनिषदातील हा श्लोक म्हणजे माणसाच्या मनाला प्रेरणादायी ठरणारा, दिशा देणारा विचार आहे. या परिवर्तनवादी विचाराला आजच्या स्पर्धात्मक युगात समजून घेण्याची गरज आहे. नुसतं डोळे झाकून यशाच्या मागे लागण्यापेक्षा यश काय आहे, ते कसं मिळवता येईल याचा पुरेपुर विचार करून त्याचा सतत पाठपुरावा केला तर यश नक्की मिळतेच. यश हे नेहमीच कष्ट,कौशल्य व प्रयत्नांना चिकटलेले असते. त्यासाठी स्वत:वर विश्‍वासही असायला हवा. कष्ट, कौशल्य, प्रयत्न आणि आत्मविश्‍वास ही अजिंक्य सैन्य आहेत. ध्येयाने झपाटलेली माणसे या अजिंक्य सैन्याचा योग्य वापर करून यशाचा पाठपुरावा करत असतात. ध्येयवादी माणसे अपयशाला खचून गुडघ्यात मान घालून कधीच जगत नसतात, तर उद्याचा दिवस माझा आहे, या विश्वासावर ते यशा चा पाठलाग करतात, पराभवावर मात करतात आणि यशस्वी होतात.

         यशामागे परिश्रम आहेत, प्रचंड असा आत्मविश्वास आहे. आणि कौशल्य आणि प्रयत्न यांची जोड आहे. "बिल गेट्स" च्या बाबतीत त्याच्या शिक्षकांनी सांगितले होते की, हा मुलगा यशस्वी होणार नाही; परंतु याच बिल गेट्सने संगणकामध्ये क्रांती घडवून आणून अब्जावधी रुपये कमावले. "कर्नल सँडल्स" हा उत्कृष्ट स्वयंपाकी होता. आपल्या 65व्या वाढदिवशी त्याने मित्रांसाठी कोंबडीचे जेवण केले. मित्राने खुश होऊन त्यास एखादे हॉटेल काढ असा सल्ला दिला. याच कर्नल सँडल्सने 299 ठिकाणी नकार पचवला. 300 व्या ठिकाणी त्यास चिकन बनवण्याचे काम मिळाले. ते काम मिळताच अडीच वर्षात आज सँडल्सने KFC हॉटेल्स च्या 86 देशांत 13,000 शाखा तयार केल्या आहेत. त्याची रोजची कमाई 27 लाख डॉलर्स आहे. "सुनीता पंडेर" नावाची युवती 30 वेगवेगळ्या प्रकारची विमाने चालवायला शिकली. पॅराशूटमधून जंपिंग केले. नासाच्या परीक्षेत नापास झाली; पण तिने जीव दिला नाही. ज्या माणसाला कष्टाची सवय लागलेली असते, अशी माणसे कधीच अयशस्वी होत नाहीत. "जेसिका कॉक्स" नावाच्या मुलीला दोन्ही हात नव्हते; परंतु ती निराश झाली नाही. तिने आपल्या वडिलांजवळ विमान चालवण्याचा हट्ट धरला आणि विशेष म्हणजे ती पायाने विमान चालवते. स्वप्न पाहणे हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. स्वप्न वास्तवात आणणे हे तुमचे कर्तव्य आहे. जबरदस्त आत्मविश्वासामुळे अपंग माणसेही जीवनात यशस्वी होतात. मग आपण का नाही होऊ शकत हा आत्मविश्वास च तुमचे आयुष्य बदलू शकतो.

          यश मिळवायच्या शर्यतीत आज काल आपण तुलनेच्या मायाजाळात खुप अडकून पडलोय. स्वत:ची इतरांशी तुलना करतोय. त्यापेक्षा "पूर्वीचा स्वत: आणि आजचा स्वत:" यात तुलना केली तर आपली प्रगती, आत्मविश्वास, गुण, दोष किती वाढलेत हे लक्षात येईल. एखाद्यातले चांगले गुण शोधून ते गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रेरणेचे आणि कौतुकाचे दोन शब्द सुद्धा एखाद्याच्या जीवनात अभूतपूर्व बदल घडवू शकतात. नेहमी प्रेरणादायी बोललं पाहिजे. प्रत्येक संधीचा पुरेपुर उपयोग केला पाहिजे. प्रत्येकाच्या आयुष्यात एकवेळ तरी अशी येते, की तो प्रवासाला निघताना स्टॅंडवर किंवा स्टेशनवर पोहोचतो अन्‌ एक किंवा दोन मिनिटांसाठी गाडी चुकते. चूक बसची किंवा ट्रेनची नसते. ती पकडण्यासाठी आपण एक-दोन मिनिटे उशिरा पोहोचतो. अशाच रीतीने एखादेवेळी आलेली संधीदेखील आपण गमावतो. दोष संधीचा नसतो. आपल्या नियोजनाचा, प्रयत्नांचा असतो. संधी गेली की आपण असे म्हणून स्वताचे समाधान करुन घेतो की थोडक्यात गेली, आजारी होतो, समस्या होती. फक्त थडग्यातील दफन केलेल्या व स्वर्गवासी झालेल्या माणसांनाच समस्या नसतात, बाकी प्रत्येकालाच समस्या असतात. अडचणी, अडथळे सर्वांनाच येतात, पण ते पार करण्याची ताकद आपण स्वत:हून निर्माण केली पाहिजे. नाउमेद, निराश, हताश होऊन चालणार नाही. कारण यांच्याशी सामना करणारी माणसंच यशस्वी होतात. जगातील सर्वच यशस्वी, श्रीमंत माणसं कधी ना कधी, बऱ्याच वेळा अपयशाच्या मार्गातून गेलेली असतात. अपयशातूनच अनुभव मिळतो. अनुभवातून आत्मविश्‍वास निर्माण होतो. आत्मविश्‍वासातून जोम व ताकद मिळते. हाच जोम व ताकद आपल्याला पुढे घेऊन जाते, अपयशच आपल्याला जोमाने पुढे जाण्याची प्रेरणा देते. अंगात नवीन बळ देते, विश्‍वास देते, नम्र बनवते आणि परिस्थितीवर मात करण्याची कला व कौशल्य मिळवून देते. म्हणून अपयशाच्या भीतीने येणाऱ्या परिस्थितीचे बळी पडण्यापेक्षा तिच्यावर मात करून यश व समृद्धी मिळवा. आणि अशा समस्येतुन आणि अपयशातुन मार्ग काढतच श्रेष्ठ विजेते तयार होतात.

          यशस्वी लोक हे काही अवाढव्य अचाट गोष्टी करीत नाहीत, तर ते साध्या साध्या गोष्टी वैशिष्टपूर्ण आणि सकारात्मक दृष्टीने व्यवस्थित करतात. ते कसे हे पटवून देण्यासाठी एक उदाहरण सांगतो. एकदा एक बूट विक्री करणारी कंपनी विक्रेता म्हणून एका तरुणाला कामासाठी घेते. कंपनी त्या तरुण विक्रेत्याला बूट विकण्यासाठी आफ्रिकेतील एका बेटावर पाठवते. हा तरुण बूट विक्रेता त्या भागात जातो व पहिल्या दिवशी रिसर्च करायचा म्हणून तो त्या बेटातील एका भागाला फेरी मारून येतो. पण पहिल्याच दिवशी तो निराश होतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा असेच तो त्या बेटावरील आणखी एका भागात रिसर्च करायचा म्हणून आणखी एक फेरी मारून येतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी तो अधिक निराश होतो. तिसऱ्या दिवशी पुन्हा असेच घडते व तो पूर्णपणे निराश होऊन कंपनीला फोन करतो व सांगतो की इथे बूट विकणे शक्य नाही. सर्व माल परत घेऊन जा कारण इथे कोणीच बूट घालत नाही. कंपनीला हे उत्तर मिळता क्षणी ते त्याला कामावरून तात्काळ काढून टाकतात व दुसऱ्या एका तरुण विक्रेत्याला त्याच बेटावर बूट विक्री करण्यासाठी पाठवतात. हा नवीन तरुण विक्रेता पहिल्या दिवशी रिसर्च करायचा म्हणून तो त्या बेटातील एका भागाला फेरी मारून येतो. तो पहिल्याच दिवशी खूप आनंदी व खुश होतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा असेच तो त्या बेटावरील आणखी एक भागात रिसर्च करायचा म्हणून आणखी एक फेरी मारून येतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी तो अधिक आनंदी व खुश होतो. तिसऱ्या दिवशी पुन्हा असेच घडते व तो पूर्णपणे आनंदी, उत्साही व खुश होऊन कंपनीला फोन करतो व सांगतो की इथे सर्वांना बूट विकणे शक्य आहे. आपल्याकडे आहे तितका सर्व माल इथे पाठवून द्या, कारण इथे कोणीच बूट घालत नाही. परिस्थिती तीच, बेट तेच, त्या बेटा वरची बूट न घालणारी माणसे ही तीच… मग त्या दोन तरुण विक्रेत्यांच्या दोन वेगवेगळ्या प्रतिक्रिया का आल्या? एकाला वाटले काहीच शक्य नाही, कोणी बूट घेणार नाही. दुसऱ्याला वाटले सर्व शक्य आहे, सर्वजण बूट विकत घेऊ शकतात. एकाची होती नकारात्मक प्रवृत्ती व दुसऱ्याची होती सकारात्मक प्रवृत्ती. आपली ही सकारात्मक प्रवृत्तीच आपले यश ठरवत असते.त्यामुळे नेहमी कोणत्याही गोष्टीत सकारात्मक विचार करायला शिकलं पाहिजे.

          "लोग क्या कहते है, ओ मत सुनो, अपने दिल की सुनो, दिल की" हा 3 idiots सिनेमा मधला dialouge खोलवर विचार करायला लावणारा आहे. आपल्याला ज्या गोष्टीत रस आहे आवड आहे तीच गोष्ट आपण मनापासून करतो ते करण्यात एक वेगळा आनंद असतो. आणि तेच ध्येय आपलं असलं पाहिजे तरच प्रामाणिकपणे आपण काम करून यश मिळवु शकतो. एक निश्चित ध्येय ठरवून ते ध्येय एका मोठ्या कागदावर लिहून ते भिंतीवर समोर दिसेल असे लावले तर ते तुम्हाला रोज तुमच्या ध्येयाची आठवण करून देईल. मग तुमचे विचार व कृती आपोआप त्याच दिशेने वाटचाल करेल. फुलपाखरांना फक्त चौदा दिवसाचं आयुष्य मिळतं, पण तेवढंही आयुष्य ते आनंदानं बागडत वावरतं घालवतात. म्हणून छोट्या अपयशानं खचून जाऊ नका. धीर सोडू नका. प्रयत्न सोडू नका. त्यासाठी अपयशाची भीती न बाळगता ध्येय निश्‍चित केलं पाहिजे आणि ते पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठलाग केला पाहिजे. तुमचं ध्येय कोणतंही असो, पण ते निश्‍चित हवं, स्पष्ट हवं, ठराविक कालावधीत पूर्ण होणारं हवं, आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला ते आवडणार हवं.

In order to succeed, you must first believe that you can.
In order to succeed, your desire for success should be greater than your fear of failure.
In order to succeed, you must need to find something to hold on to, something to motivate you, something to inspire you.

- डॉ संदीप टोंगळे