Thursday, February 4, 2016

"कहानी अपेक्षांची"


          आयुष्याच्या या मायानगरीत आपण सर्वजणच अपेक्षांच भल मोठं ओझं घेऊनच जगण्याची वाटचाल करतोय. आई, वडिल, बायको, मुलं, मित्र, समाज या सर्वांना आपल्या कडून खुप अपेक्षा असतात आणि आपल्याला ही या सर्व व्यक्तींकडून अपेक्षा असतातच. आपल्याला इतरांकडून जशी अपेक्षा असते तशी इतरांनाही आपल्याकडून असणं साहजिक आहे. पण प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण होणं शक्य नसतं. अपेक्षा ठेवण्यात काहीच चुक नाही पण त्या गृहीत धरणं हीच मोठी चुक आहे अस माझं मत आहे, कारण मनात गृहीत धरलेली अपेक्षा पूर्ण नाही झाली की मन नाराज होतं. त्यापेक्षा कुठलीच अपेक्षा न करता मिळालेली एखादी गोष्ट Surprise Gift सारखी वाटते. या Surprise Gift चा हा वेगळा आनंद निरपेक्षपणे आपण सर्वांनी अनुभवला पाहिजे. पण आपण या आनंदाला मुकतोय असं वाटत, कारण आपण या अपेक्षा नेहमी गृहीत धरून च चालतो.

          मग या अपेक्षा स्वतःबद्दल असोत, दुसऱ्याबद्दल असोत, कौटुंबिक असोत, राजकीय असोत वा सामाजिक असोत, या अपेक्षा आपल्यामनावर कधी हलका तर कधी जड तणाव निर्माण करतातच, पण त्याहीपेक्षा आपल्या आतच असलेल्या आनंदाच कारण बाहेरच्या गोष्टीत शोधण्याच्या नादात स्वतःचा विकासच खुंटवून टाकतात. “त्यांन असं वागायला नकोच होतं”, “तो हल्ली मला विचारतच नाही”, “आईकडून ही अपेक्षा नव्हती”, “बाबांचा स्वभाव पहिल्यासारखा राहिला नाही”, “केलेले उपकार धाकटा भाऊ किंवा थोरला भाऊ विसरला”, “सहकारी कसले? छुपे शत्रूच निघाले ते”, “शेवटी त्याने केसानं गळा कापलाच ना”,“कानामागून आली आणि तिखट झाली” या आणि अशा अनेक पद्धतीच्या बोलण्यामागे आपल्या मनातील समोरच्या व्यक्ती बद्दलच्या अपेक्षाच कारणीभूत असतात. आणि या अपेक्षांची उभारणी निसरड्या मानवी स्वभावावरच झालेली असते. त्यामुळेच अपेक्षाभंगाचा खूपच त्रास होतो.

          मग असा ही एक प्रश्न डोक्यात येतो कि अपेक्षा कुणाकडूनच बाळगू नयेत का? एखाद्यासाठी आपण झिजलो तर ती व्यक्ती थोडीतरी कृतज्ञ असायला हवी ही अपेक्षा फार मोठी आहे का? मित्रानं मैत्रीला जागण्याची अपेक्षा योग्य नाही का? महागडया आंब्याच्या पेटीत आंबे गोडच हवेत ही अपेक्षा न्यायाला धरून नाही का? या आणि अशा प्रकारच्या बऱ्याच अपेक्षांचे प्रश्‍न नक्कीच “एवढी अपेक्षा तर असतेच कि” याच उत्तरावर येवून थांबतात. एखादं बी पेरलं तर रोप यावं, ही अपेक्षा पेरणीच्या कृतीतच अपेक्षित असते. जेव्हा अशी अपेक्षा पूर्ण होते, तेव्हा हा प्रवास सोपाच वाटतो. पण खरी गंमत तर अशी आहे कि, सर्वच अपेक्षा प्रत्येकवेळी अपेक्षेइतक्‍याच पूर्ण करणे, हेच तर खरं त्या निसर्ग निर्मात्याला मंजूरच नाही. त्याला अधूनमधून अपेक्षाभंगाचे हादरे देत आपले हे जीवननाट्य आणखीनच खुलवत ठेवायच आहे. आपल्या आयुष्यातला संघर्ष, अस्वस्थता निरंतर जागृत ठेवून हे जग आणि हे जीवन गतिमान ठेवणे हीच तर काळाची कोणालाही न गवसलेली सृजनशीलता आहे. लहानमुलांच्या रंगीत चित्र असलेल्या परिकथा सुखरूप शेवटपर्यंत पोहोचतात, तसं आपलं आयुष्य कधीच नसत, हे अगदी आपण प्रत्येकानेच समजून आणि उमजून घ्यायला हवं. आयुष्यातली ही अनपेक्षितता प्रत्येकाने ओळखली, तर अपेक्षाभंग तुलनेने कमी होतील आणि जेवढे होतील त्यासाठी आपले मन नेहमी सज्ज असेल.

          आपल्या डोक्यातलं अपेक्षांचं ओझ बाजूला ठेवलं की नात्यातला निरपेक्ष आनंदाचा एक सुंदर अनुभव घेता येतो. आणि नकळतच यश आणि अपयश याच्या आपल्या मनातील संकल्पनाही बदलू लागतात आणि स्वतःच्या सीमा ओळखण्यात वा त्या वाढवण्यात आपण कमी पडलो, या जाणिवेनं स्वतःला सोडून निष्कारण दुसऱ्याला दोष देण्यातली ऊर्जा आपोआपच वाचते. त्या वाचलेल्या ऊर्जेचा उपयोग शांत डोक्याने आत्मचिंतन करून योग्य निष्कर्ष काढण्यात घालवला तर निरपेक्ष आयुष्याचा छान आनंद घेता येईल. एखादं काचेच भांड कसं असतं तशा या अपेक्षा असतात. जेवढं गच्च पकडाल तेवढ ते भांड तुटण्याची जास्त शक्यता असते. अशा अपेक्षा बाळगुन स्वत:ला दुखवण्यापेक्षा, अपेक्षा न ठेवता जे समोर येईल ते बोनस समजुन आयुष्य जगायला शिकलं पाहिजे. अति श्रीमंताच्या घरातल्या बाईला त्या सर्व सुख सोयी कमीच वाटतात कारण तिच्या अपेक्षा खुप असतात म्हणून ती नेहमी दुखीच राहते आणि साधारण किंवा गरीब घरातल्या बाईला जे मिळेल त्यात समाधान मानून सुखी आयुष्य जगण्याची सवयच लागलेली असते कारण तिच्या अपेक्षा कमी असतात.

          तुम्हाला मिळणारी प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी तुम्हाला पाहिजे तशीच मिळु शकत नाही. त्यात आत्मचिंतन करून केलेली तडजोड महत्वाची असते. प्रत्येक वेळी तुमच्या आनंदाच कारण हे तुमच्या मनातल्या कमी अपेक्षा हेच असू शकत. तुमचं सुख तुमच्या मनातल्या गोष्टीवर अवलंबून असतं. लोकांकडून अपेक्षा करण्यापेक्षा त्याना दोष देण्यापेक्षा स्वताकडून दुस-यांसाठी जास्त अपेक्षा करायला शिकलं पाहिजे तरच आयुष्यात आपण सुखी होऊ शकतो. "The beauty of life does not depend on how happy you are; but on how happy others can be because of you." असं म्हणतात ना की कुठलीही अपेक्षा न करता जो देतो त्याचे हात सदैव भरलेलेच राहतात आणि जो कुठलीही अपेक्षा न करता कार्य करत राहतो तो नेहमी आनंदी राहतो. अगदी खरं आहे. पण आनंदाचा किनारा देणाऱ्या नावेला कधी कधी अपेक्षाभंगाचाही किनारा लाभू शकतो ना... त्यामुळे मनात त्याचीही तयारी ठेवून आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे. एकदा समुद्रातला प्रवास स्वीकारला की, फक्त निळंभोर आकाश, छान लाटा, मंद गार वारा आणि मधूनच डॉल्फिनच उसळण,एवढच गृहीत धरून निघायच नसतं. अनपेक्षित वादळ, भयानक चमकणाऱ्या विजा, अचानक येणारा पाऊस, वाऱ्याच्या बदलत्या दिशा हे सगळ गृहीत धरूनच प्रवास सुखकर जातो. जीवनप्रवासात सुद्धा हीच इच्छाशक्ती अपेक्षित आहे.

          "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।" या श्रीमद भगवत गीतेतल्या ओळी निरपेक्ष जीवनाचा खरा अर्थ सांगतात. निरंतर कर्म करत रहा फळाची अपेक्षा करू नका. तुम्ही जे पेराल तेच उगवेल. तुम्ही कसलीही अपेक्षा न करता चांगल काम केलं की आपोआप चांगल फळ मिळतच. पण कसली तरी अपेक्षा मनात ठेवून केलेलं काम हे प्रामाणिकपणे केलं जात नाही. त्यामुळे अपेक्षा न ठेवता जगायला शिकलं पाहिजे. अति अपेक्षा हेच सर्व दुखांच मुळ कारण आहे या पासून दूर राहून आपलं आयुष्य सुखी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. येणाऱ्या प्रत्येक सुखाचा आनंद घेत, अनपेक्षित येणाऱ्या दुःखाशीही संवाद साधण्याची तयारी ठेवली पाहिजे. हीच तयारी खरं तर जीवनाची साधना आहे असं मला वाटत. प्रत्येक वेळी समोरचा माणूस किंवा प्रसंग आपल्याला पाहिजे तसाच असेल, अशा हट्टाचे ओझे फेकून दिले पाहिजे. अपेक्षाभंग होतच असतात, त्याचं एखादं कॅलेंडर किंवा घडयाळ नसतं. ते कुठेही, कधीही होऊ शकतात, पण या वास्तवाला जाणून घेवुन आयुष्याचा आनंद घेणे हीच खरी भिंत नसलेल्या शाळेतली आयुष्याची शिकवणी आहे.

          My expectations were reduced to zero when I was 29. Everything since then has been a bonus.

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.