Friday, February 19, 2016

"राजे" तुम्ही पुन्हा जन्म घ्या          आज तब्बल साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा "छत्रपती शिवाजी महाराज" हे तीन शब्द उच्चारले की लगेच अंगावर रोमांच उभे राहतात, रक्त सळसळते, मनात एक आगळा वेगळा जोश तयार होतो, मराठी साम्राज्याचा जोश, हिंदवी स्वराज्याचा जोश, भारत देशाचा जोश. हा जोश प्रत्येकाच्या मनात वर्षानुवर्षेच नाही तर युगानुयुगे राहीलं यात तीळ मात्र शंकाच नाही. "छत्रपती शिवाजी महाराज की जय" असं म्हणुन तयार होणारा जोश अगदी त्या व्यक्तीच्या शरीरातल्या अनुरेणु पर्यंत पोहोचतो, अंगातली मरगळच निघून जाते. आदर्श पुत्र, आदर्श योद्धा, आदर्श राज्यकर्ता म्हणून खुप नावलौकिक तर झालच पण आदर्श व्यक्ती म्हणून आजही "छत्रपती शिवाजी महाराजांच" नाव घेतलं जात आणि घेतलं जाईल. पण हा आदर्श आपण जपतोय का? आज प्रत्येकाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज आहेत पण तनात, कणाकणात आणि आपल्या कामात शिवाजी महाराजांचा आदर्श आहे का? जसा "छत्रपती शिवाजी महाराजांनी" हिंदवी स्वराज्याचा हट्ट धरला होता आपल्या प्रजेसाठी तसा हट्ट आज आपल्या मनात आहे का? आजच्या आपल्या या समाजाच्या, देशाच्या बिकट परिस्थितीकडे पाहून असं वाटतं खरच "राजे तुम्ही पुन्हा जन्म घ्या".

          संपुर्ण विश्वातच अतुलनीय, अद्वितीय, अलौकीक, साहसी, पराक्रमी, सफल आणि आदर्श असा दुसरा शिवाजी राजा सापडणं अगदीच अशक्य आहे. शिवाजी महाराजांनी सरदार आणि किल्लेदारांच्या अन्याय,अत्याचारातून जनतेची सुटका केली, आणि उत्तम, शिस्तबद्ध शासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले. शिवरायांनी वतनदारी पध्दती बंद करून सैनिकांना, अधिकार्‍यांना पगार सुरु केले. शेतकर्‍यांचं शोषण करणारी जमीनदारी पध्दत बंद करुन शेतकर्‍यांचा फायदा असणारी रयतवारी पध्दत सुरु केली. जर एखाद्या भागातुन सैन्य जात असेल तर ते शेतांच्या लांबून न्यावे कारण शेतांच्या मधुन नेल्यास शेतातल्या पिकांची नासाडी होईल व तसे झाल्यास शेतकर्‍याने जगायचे कसे असा विचार महाराजांचा होता. आपल्या काळाच्या भरपुर पुढे पाहण्याची महाराजांची दुरदृष्टी आणि प्रजेची निष्ठावंत काळजी हे महाराजांच्या यशाचे खुप मोठे रहस्य आहे असं मला वाटतं.

          "छत्रपती शिवाजी महाराज" हे एक अष्टपैलू व्यक्तीमत्व होतं. ते इंजिनियर, डॉक्टर, वकील, उद्योजक, कलाकार(नट), उत्तम योद्धा होते. आजच्या प्रगत इंजिनियरना सुद्धा जमणार नाही अशा तब्बल 307 किल्ल्यांची रचना त्यांनी त्या काळी केली. (आपण आज त्यांच्या स्मारकासाठी जागा शोधतोय.) समाजाला लागलेल्या विविध मानसिक रोगांचा त्यांनी त्यांच्या कुशल बुद्धिमत्तेचा वापर करुन नायनाट केला. शिवाजी महाराज हे न्यायप्रिय होते. कोणावरही अन्याय न होता सर्वांच भलं करणारे उत्तम वकील होते. आदर्श राज्य उभारणीसाठी काय आवश्यक आहे याबाबत महाराजांचा खोलवर विचार होता. व्यापार आणि उद्योग राज्यासाठी खुप महत्वाचा आहे हे महाराज जाणुन होते. ते चाणाक्ष उद्योजक ही होते. आग्र्याहून स्वताची सुटका करून घेताना उत्तम अभिनय करुन शत्रुच्या डोळ्यात धुळ टाकली. शिस्तबद्ध लष्कर, उत्तम प्रशासकीय यंत्रणा, भूगोल रचना अभ्यास, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. असे ते आदर्श अष्टपैलू राजे होते.

          तर अशा "छत्रपती शिवाजी महाराजांच्या" महाराष्ट्रात आपण जन्माला आलो हे आपण आपले भाग्यच मानले पाहीजे. पण आज फक्त एवढ्यावरच थांबुन उपयोग होणार नाही. त्यांचा हा आदर्श पुढे सुरु ठेवला पाहिजे. फक्त मनातल्या भावना, फक्त जयजयकार, फक्त मिरवणुका एवढच पुरेसं नाही. "छत्रपती शिवाजी महाराजांना" अपेक्षित असलेले गुण आपण आपल्यात अंगिकारण्याचा यशस्वी प्रयत्न केला पाहीजे. आपला समाज, आपला देश यांच्या भल्यासाठी आपण झटलं पाहीजे. आपली शिवभक्ती, देशभक्ती फक्त भावना भडकवल्यावरच जागी होता कामा नये. प्रत्येक कणाला, प्रत्येक मनाला, प्रत्येक क्षणाला ही शिवभक्ती आणि देशभक्ती जागृतच राहिली पाहिजे. शिवभक्ती, देशभक्ती आपल्या रक्ताचा भागच बनली तर भ्रष्टाचार आपोआपच थांबेल आणि नितीमुल्येही आपोआपच जपली जातील. "छत्रपती शिवाजी महाराजांच्या" अंगात,नसानसात असलेली जिद्द, चिकाटी, उत्साह जर आपण आपापल्या क्षेत्रात,आपल्या व्यवसायात दाखवु शकलो तर सर्व क्षेत्रात आपला समाज पुढे जाईल. आणि हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशाला महासत्ता बनवता येईल. यासाठी आपल्या प्रत्येकाच्या मनात राजांचा तत्वांनी जन्म घेतला पाहिजे. म्हणून आता "राजे तुम्ही आमच्या प्रत्येकाच्या मनात जन्म घ्या".

तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खुप खुप शुभेच्छा

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे