Sunday, February 7, 2016

"माणसा"चा शोध


          कोणी मला माणुस शोधून देता का माणुस? हाडा मांसाच्या शरीराच्या आतला माणूस? मनात माणुसकी जीवंत असलेला माणुस? या सृष्टीला ज्याची खरच गरज आहे तो माणूस? माणसाच्या आतला माणूस?

          सृष्टि च्या निर्मात्याने अनेक प्राणी तयार केले. प्रत्येक प्राण्याला हाड, मांस, डोळे, हृदय हे सर्व अवयव दिले. पण विचार करण्याची शक्ति असलेला मन हा अवयव फक्त मनुष्य प्राण्याला च दिला. पण ज्या कारणा साठी मनुष्याला मन मिळालं आहे त्या कारणाकडे सर्वच दुर्लक्ष करत आहेत. मी इतरांपेक्षा वेगळा का आहे म्हणजे या सृष्टितील इतर प्राण्यांपेक्षा मलाच बुद्धी का? आहार, निद्रा, भय, मैथुन तर सर्वच प्राण्यांची गरज मग मला वेगळे अस्तित्व कशासाठी? ज्यावेळेस ह्या प्रश्नांची उत्तरे माणुस आपल्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न करेल त्यावेळी जाती आणि धर्म यांचा प्रत्येकाला च विसर पडेल आणि केवळ "मनुष्य हीच जात" आणि "माणुसकी हाच धर्म" माणसाच्या मनामध्ये शिल्लक असेल......

          कापूस कधीच टणक नसतो, दगड कधीच मऊ नसतो, अग्नी कधी थंड पाहिलाय का?, बर्फ गरम नसतोच, ऊस मला कधीच कडू लागला नाही, काही ही केल तरी कारले हे कडूच, झाड सावलीच देत, साप दंश आणि विंचू डंक च मारतो ते कधी प्रेम करत नाहीत. खरयं ना मित्रांनो ! मऊपणा हा कापसाचा गुणधर्म, कठोरता दगडाचा गुणधर्म. हे गुणधर्म त्यानी सोडले तर कापूस व दगडाच अस्तित्व च राहणार नाही. गोडपणा हा ऊसाचा आणि कडूपणा हा कारल्याचा गुणधर्म, हे गुणधर्म सोडले तर ऊस हा ऊस राहणार नाही आणि कारले हे कारले राहणार नाही. उष्णता हा अग्नीचा गुणधर्म आणि थंडपणा हा बर्फ़ाचा गुणधर्म. दंश करणे हा सापाचा गुणधर्म आणि डंख मारणे हा विचंवाचा गुणधर्म आहे. साप आणि विंचू यांच्याकडून प्रेमाची अपेक्षा न केलेली बरी ! हो ना? ते काहीही असो पण निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपाआपल्या गुणधर्माला घट्ट चिकटलेली आहे. काहीही झाले तरी आपला गुणधर्म सोडायला कोणीच तयार नसतं. मग माणसाचा मुलभूत गुणधर्म "माणुसकी” हा आहे. प्रत्येक वेळी माणुस त्याचा हा मुलभूत गुणधर्म का सोडतो. कधी दगडा सारखा वागतो, कधी कडू कारल्यासारख्या वागतो, अग्नीसारखा तापतो आणि साप,विंचू सारखा दंश करतो. निसर्गातील कोणताच प्राणी, फुल, झाड, पक्षी किंवा कोणतीही गोष्ट आपला मुलभूत गुणधर्म सोडायला तयार नसताना माणूसच का “माणुसकी” सोडून अन्य पशूप्राण्यांसारखा वागतोय? गोडपणा नसेल तर ऊसाला लोक ऊस न म्हणता कडबा म्हणतील मग माणुसकी सोडलेल्यांना "माणुस" म्हणावं का?

          एकदा एका राजाला विहिरीवर उघडयावर स्नान करण्याची लहर येते. मग तो त्याच्या एका सेवकाला विहिरीवर माणसे किती आहेत हे पाहून यायला सांगतो. सेवक जेव्हा विहिरीवर जातो तेव्हा त्याला विहीरीवर अंघोळ करणा-यांची खूप गर्दी दिसते. तो दूर जाऊन एके ठिकाणी उभा राहतो आणि पाहत बसतो. विहिरीत स्नानासाठी येत असलेला प्रत्येक जण रस्त्यात असलेल्या एका दगडाला ठेच लागून जात होता. विहिरीवर झालेली गर्दी पाहून तहानेने व्याकुळ झालेला एक भिकारी कितीतरी क्षणांपासून तिथेच उभा असतो. तितक्‍यात एक व्यक्‍ती घाईघाईने विहिरीवर स्नान करायला येतो. त्याला ही त्या दगडाची ठेच लागते पण ती व्यक्ती मार्गातील दगड हाताने उपटून दुरवर फेकून देतो. मग त्या भिका-याकडे वळतो. बादलीने विहिरीतील पाणी काढून ते पाणी त्या तहानलेल्या भिका-याला पाजतो. तो सेवक राजाकडे जातो आणि लगेच राजाला सांगतो की विहिरीवर केवळ एकच माणूस आहे. राजा खूश होतो आणि स्नान करायला अडचणं नाही म्हणून तो लगबगीने विहिरीकडे जातो. पाहातो तर काय विहिरीवर गर्दीच गर्दी दिसते. सेवक खोटा बोलला म्हणून राजा फार चिडतो. सेवकाला बेदम मारतो. मारणे झाल्यावर राजा सेवकाला विचारतो. तू खोटं का बोललास? सेवक म्हणतो आपण मला किती माणसं आहेत, हे पाहून यायला सांगीतलं होतं. परंतु मला त्या गर्दीत केवळ एकच माणूस दिसला. त्याने त्याच्याठिकाणी माणूसकी होती म्हणून मार्गातला दगड उपटून फेकला. इतर सारे स्नान करण्यात मग्न होते. त्यांना तहानेने व्याकुळ झालेला भिकारी दिसला नाही की रस्त्यातला दगड दिसला नाही. परंतु या माणसाने त्या भिका-याला विहिरीचे यथेच्छ पाणी पाजले. त्याची तहान भागविली. असं म्हणतातच राजाला खूप दुःख होते. माणूस म्हणून जन्माला आलो तरी माणूस म्हणून जगणेच बहुतेकांना जमत नाही. माणसाने माणुसकीच सोडली तर कसं त्याला माणूस म्हणायचं?

          आपण तंत्रज्ञानात अग्रेसर आहोत. माणसाने खुप प्रगती केलीय. चंद्र, मंगळ अशा ग्रहांवर शोध सुरु आहेत पण आपला शेजारी कोण आहे हेच माणूस विसरलाय...... आज काल मोबाइल फोन 3G, 4G speed ने चालतात पण माणुसकी चा speed 2G वरच अडकलाय आणि त्याच network पण कुठेच भेटत नाहीये. माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर, माणूसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणुस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात ही माणुसकी ची व्याख्या च माणूस विसरत चाललाय. गेले ते दिवस अंगणातले दाणे पक्षांची वाट पहायचे, माणुसकीच्या भिंतीत प्रेमाचा ओलावा असायचा, थरथरणाऱ्या वृद्ध हातांना कोवळ्या जीवांचा आधार वाटायचा. आता मात्र चित्र सगळं पलटून गेलयं माणसांच्या गर्दीत फक्त चेहरेच उरले नितीमत्ता, माणुसकी आणि आपूलकी नामशेष झालीय.

          आमटे कुटुंब, सिंधुताई सपकाळ अशी अनेक उदाहरणं पाहीली की वाटत माणुसकी अजुन शिल्लक आहे पण एवढी माणुसकी पुरेशी आहे का? ही लोक समाजासाठी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावतात. पिढ्यान पिढ्या समाजासाठी अर्पण करतात. यांच्या तुलनेत आपण किती माणुसकी जपतोय. आपण सर्वजण च सरासरी महीन्याला 1gb data वापरतो पण थोड़ीशी माणुसकी वापरायची विसरत चाललोय. नुसत्या मेणबत्त्या जाळून आपली माणुसकी पूर्ण होत नाही, तर माणुसकीचा हात पुढे करून समाजाला प्रबलता आणली पाहिजे, सामाजिक नितीमत्ता सुधारली पाहिजे. बदल हवा, बदल हवा असं नुसतं म्हणून उपयोग नाही. नुसती अंगावरची कपडे बदलली म्हणजे आपण आधुनिक झालो असा भ्रम काढून टाका, विचार बदला, विकृती बदला आणि सामाजिक संवेदनांची जाणीव असू द्या. कारण तुम्ही एक माणूस आहात आणि माणूस माणसाला जरी मारत असला तरी माणसाने माणसाला अजुन खाद्य म्हणुन वापरलेलं नाही. त्यामुळे बरीच माणुसकी अजुन शिल्लक आहे याचा वापर करायला शिकुयात. सुरुवात स्वतापासून करूयात. चला तर मग आपल्या आतला माणूस शोधायला शिकुयात......

- डॉ संदीप टोंगळे