Thursday, November 16, 2017

माझ्या मनात दाटलेलं मळभ……

          आकाशात दाटलेले काळे कुट्ट ढग आणि मनात दाटलेल्या दुखद भावना, मनाला सलणारे विचार अगदी सारखेच असतात, नाही का......? जस कधी कधी आकाशात मळभ दाटून येत... गर्द, काळभोर, अंधारमय... स्वतः निसर्गाचीच घुसमट झाल्यासारखं... तसच कधी कधी मन ही दाटून येत, एका काळ्या कुट्ट अंधाऱ्या खोलीत कोंडल्यासारखं...... त्या नभांची दाटी, तगमग, अगदी कासावीस करणारी असते...... आणि मनात एक वेगळीच घुसमट, अपयशाची सल, नकारात्मकतेची भावना, गृहीत धरल्याची, अपमानित झाल्याची भावना अगदी जीव नकोसा करून टाकणारी असते...... कधी कधी आकाशात एकापेक्षा एक गडद काळेभोर ढग दाटतात, तसच कधी कधी मनातही अनेक नकारात्मक विचारांचा काहूर माजतो... अगदी जीवच गेला तर सुटू यातून म्हणून हे जगणंच नकोसं वाटायला लावणारे चुकीचे विचार डोक्यात घर करू लागतात...... अशा वेळी वाटतं, का माणूस म्हणून जन्माला आलो आपण... माणूस म्हणून जन्माला येऊन वर विचार करायलाही का शिकलो असेल आपण...? आपण माणूसच नसतो तर या सलणाऱ्या भावना आणि विचार करणारं मनही नसलं असतं... मग किती सोप झाल असतं ना हे सगळं......? इतरांनी आपल्याशी वाईट वागण्याचा, आपल्याबद्दल वाईट विचार करण्याचा त्रासच झाला नसता... जगण्याच्या नैसर्गिक प्रेरणेने जगत गेलो असतो... फक्त स्वतःसाठीच... स्वतःपुरत...... आयुष्यात कधी तरी वेळी अवेळी दाटून येणारं हे मनातलं मळभ, मनातली घुसमट वाढवत जातं आणि डोक्यात नकारात्मक विचारांची शृंखला सुरु होते...... माझ्याही  डोक्यात अशा नकारात्मक विचारांची शृंखला एकदा का सुरु झाली कि हे “माझ्या मनात दाटलेलं मळभ” अगदी जीव नकोसा करून टाकत.

          माझ्या मनात असे प्रश्न घर करू लागले कि ते मी कागदावर उतरवून त्याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो. आज काल आपण न कळणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी लगेच गुगल ला विचारून मोकळे होतो. पण मनात उठणारे हे वादळ आपण गुगल ला विचारू शकत नाही. त्यासाठी मनातल्या तरंगांचा योग्य वापर करणं गरजेच असतं. पूर्वी माझं लिखाण सुद्धा एखाद्या कागदापुरतं च मर्यादित असायचं. किती तरी वेळा माझ्या लिखाणाची कागदं सगळी कचरापेटीतच गेली आहेत. मनात येईल तो विचार एखाद्या कागदावर उतरवायचो, एखादी गोष्ट मनाला पटली किंवा पटली नाही की लगेच कागदावर लिहून काढायचो आणि पुन्हा कचऱ्यात टाकायचो. पण कचऱ्यात गेलेला प्रत्येक कागद माझ्या मनात कायमचा उमटत जात होता. त्या कागदांवर दिवसभरातल्या घडलेल्या गोष्टींपेक्षा अशा मनात उठलेल्या तरंगांच प्रतिबिंब जास्त असायचं. मग हळू हळू त्या प्रश्नार्थक तरंगांना उत्तर शोधण्याची सवय लागली. मनात कसलही आणि कितीही मोठ विचारांचं मळभ दाटलं तरी त्याच उत्तर शोधण्याची जिज्ञासा मला माझ्या या लिखाणातून जागृत ठेवता आली. एखाद्या वेळी एखादी चुकीची विलोभनीय भावना आपल्या मनावर मात करते आणि मग आपण आपल्या बुद्धीच न ऐकता त्या भावनेच्या आहारी जाऊन ती जे सांगेन ती प्रत्येक गोष्ट करत सुटतो. कधी ती भावना रागाची असते तर कधी लालसेची... कधी मत्सराची तर कधी सुडाची... मन आणि बुद्धीच हे द्वंद्वयुद्ध मी सुद्धा बऱ्याच वेळा अनुभवलंय. असे अनेक द्वंद्व, माझ्या मनात दाटलेली अशी अनेक मळभं आणि मनातली वादळ माझ्या लिखाणाच्या सवयीने शांत करता आली आहेत. माझ्या मनात उठणाऱ्या या वादळाला शांत करण्याची ताकद माझ्या या लिखाणामध्येच आहे.

          असं हे ढगाळलेलं मळभ प्रत्येकाच्या मनात वेळी अवेळी कधी तरी दाटून येतच असतं. दुखद गोष्टींची आपल्या प्रत्येकाच्या मनाला ओढ का असते कोणास ठावूक...? सगळ्या गोष्टी अगदी छान सुरु असताना सुद्धा आपल्या मनाला दुख उकरून काढायची काय गरज असावी बरं...? कदाचित मनाला दुखाची जाणीव झाल्याशिवाय सुखाची किंमत कळत नसावी. सगळं अगदी छान सुरु असेल आणि आयुष्यात चढ उतारच नसतील तर जगण्यात मजा तरी काय...? आपल्या आयुष्यात सगळं सुखच असेल तर किती रुक्ष होऊन जाईल हा जीवन प्रवास. नाही का...? आकाशात दाटलेलं हे मळभ तितक्याच तीव्र ओढीने बरसायला सुरुवात करत. पावसाचे थेंब जसे जमिनीवर पडून मार्ग काढतातच तसे मनातले विचार कागदावर पडले कि मार्ग आपोआप सापडत जातो. आपल्या मनाला मळभ नको वाटतं पण हा बरसणारा पाऊस हवाहवासा वाटतो. जसं पाऊस बरसून ढग मोकळे होतात, तसं मनातले विचार बरसून मन ही मोकळं होत. मनातलं आणि आकाशातलं मळभ दूर होतं जातं आणि मग आकाशात एक सोनेरी किनार दिसू लागते. या विचाराने डोक्यात लख्ख प्रकाश पडला. ते मळभ, त्याची घुसमट, त्याची तगमग, तितक्याच तीव्र ओढीने बरसणारा तो पाऊस आणि त्या नंतर दिसणारी ती सोनेरी किनार...... हे सगळं जेव्हा आपण बघतो, अनुभवतो तेव्हाच आपल्या विचारांचं क्षितीज विस्तारतं जातं. ते मळभ आले म्हणून तर ही सोनेरी किनार पाहू शकलो आपण. खरतर ती दिसणारी सोनेरी किनार म्हणजे नकारात्मक विचाराकडून सकारात्मक विचाराकडे जाण्याचा मार्ग असतो. आपल्या प्रत्येकाला ही सोनेरी किनार दिसतेच फक्त मनात संयम असायला हवा.

         खरंच खूप सुंदर आहे हे जगणं. फक्त दुखातही सुखासारखा आनंद घ्यायला शिकलं पाहिजे. आयुष्याच्या प्रत्येक रंगात, प्रत्येक टप्प्यावर समरसून जगता आलं पाहिजे. आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद साजरा करता आला पाहिजे. या सुख दुःख मिश्रित आयुष्यात सुखासोबत दुःख सुद्धा पचवता आली पाहिजेत. ही दुःख क्षणिक असतात पण खूप काही शिकवून जातात, खूप काही देऊन जातात फक्त ते वेळेत ओळखता आलं पाहिजे. हीच दुःख माणसं वाचायला शिकवतात, हीच दुःख माणसं ओळखायला ही शिकवतात आणि हीच दुःख माणूस म्हणून माणसासारखं आयुष्य जगायला ही शिकवतात. आपण जर दुःख अनुभवलंच नाही आणि फक्त सोनेरी किनार असलेल्या मोकळ्या आकाशाची स्वप्न रंगवत बसलो तर जगण्यातला आनंद गमावून बसू. सोनेरी किनार तर प्रत्येकाला कधी न कधी दिसतच असते पण त्यासाठी आपल्या मनात सकारात्मक दृष्टीकोन हवा. समोर येईल त्या क्षणाला, समोर येईल त्या प्रसंगाला संयमाने आणि सबुरीने तोंड देण्याची अंगात कसब हवी. आपण अपमानित झालोय किंवा फसवले गेलोय याची जाणीव आपल्या मनाला होऊच दिली नाही तर त्या गोष्टीच वाईट तरी कशाला वाटेल. आणि कुठली अपेक्षाच नाही ठेवली तर अपेक्षा भंगाच दुखच जाणवणार नाही आणि यश अपयशाची सल मनात बोचणार नाही. आज मी माझ्या लिखाणाच्या सवयीमुळे “माझ्या मनात दाटलेलं मळभ” आनंदाने अनुभवू शकलो. माझ्या मनात मळभ दाटलं म्हणून तर मी पाहू शकलो ही सोनेरी किनार......


-    डॉ. संदीप सोमेश्वर टोंगळे.

Tuesday, August 15, 2017

"...... आणि याच साठी मिळवलं होत का हे स्वातंत्र्य?"

          आज स्वातंत्र्याची ७० वर्षे पूर्ण झाल्यानंतर एकदा मागे वळून बघावेसे नाही का वाटत......? ज्या भारत देशाचे स्वप्न आपण सर्वजण मिळून पाहत आलो आहोत तो आपला भारत देश हाच आहे का......? उत्तर नाही असेल तर, का नाहीये तो तसा......? कोण शोधणार याचे उत्तर......? काही तरी चुकल्यासारखं वाटतंय ना......?७० वर्षे झाली, उद्या ८० ही होतील आणि आपण आपल्या या प्रजासत्ताक राष्ट्राचे शतक सुद्धा साजरे करू, पण तुम्हाला वाटते का त्या वेळी काही बदललेले असेल? जर हे असेच चालत राहणार असेल तर मला तरी नाही वाटत काही बदलले असेल. कुठे तरी चुकतंय......? हो नक्कीच चुकतंय...... आपला काल आज आणि उद्या ह्या तिन्ही चा विचार करण्याची वेळ आली आहे. आणि हा विचार कुठल्या तरी एका पिढीला करावाच लागतो. मग तो आपणच का करू नये? "...... आणि याच साठी मिळवलं होत का हे स्वातंत्र्य?" याचा सारासार विचार आजच्या तरुणाईने करावा अशी वेळ आता नक्कीच आली आहे.

          कधी ही न मावळणाऱ्या जुलमी इंग्रजी सत्तेचा सूर्य अखेर १५ ऑगष्ट १९४७ ला मावळला होता. आणि तो मावळला होता तो प्रभावी स्वातंत्र्य लढ्यामुळे आणि धैर्याने लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांमुळेच. जगाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या स्वातंत्र्य संग्रामाचा शेवट झाला आणि आपला देश स्वतंत्र झाला. सर्व जगा समोर एक आदर्श असणारा आमचा हा स्वातंत्र्य लढा यशस्वी झाला. पण याच प्रभावी, तेजस्वी आणि प्रेरणादायी स्वातंत्र्य लढ्याचा उज्वल इतिहास दाखवणारे एक ही स्मारक आमच्या या देशात असू नये ह्या पेक्षा शरमेची दुसरी काय गोष्ट असेल. येणाऱ्या पिढीला दाखवण्याकरिता एक ही असे स्थळ किंवा स्मारक नाहीये जिथे आम्ही त्यांना दाखवू शकू कि हे बघा, ७० वर्षापूर्वी आपण इथे होतो, असा होता आपला देश, हे स्वप्न होते आणि आता बाहेर बघा आमचा हाच भारत...... हे पाहिल्यावर तरी कदाचित येणाऱ्या पिढीला काही तरी चुकत असल्याची जाणीव होईल आणि त्यांचे विचार बदलतील. "जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती थी बसेरा, ओ भारत देश था मेरा" असं आपल्या पुढच्या पिढीला सांगण्याची वेळ आज आली आहे. सोन्याची चिड़िया तर कुठे उडून गेली ते माहिती नाही पण आज लहान मुलांना दाखवायला त्यांची चिऊताई सुद्धा आकाशात शोधावी लागते.

          आपण स्वतंत्र झालो खरे, पण आपण खरोखरच प्रगल्भ झालो का......? भारतीय स्वातंत्र्यात मोलाची भूमिका बजाविणा-या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आणि देशभक्तांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलंय ते केवळ आणि केवळ उपभोगण्यासाठीच. पण कधी कधी अस वाटत मिळालेलं हे स्वातंत्र्य आपण उपभोगत नसून ओरबाडत आहोत. “स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार मुळीच नाही,” हेच कदाचित आपण सारे विसरत चाललो आहोत. प्रत्येक ठिकाणी,प्रत्येक क्षेत्रांत, चढाओढ आणि जीवघेणी स्पर्धा लागलीय. स्वतःच्या उत्कर्षापुढे, इतरांचा, समाजाचा आणि पर्यायाने देशाचा उत्कर्ष विचारात घ्यायलाही आज नेमका वेळ नाहीये या नव्या भारतीय तरुणाई कडे. सार्वजनिक ठिकाणी बिनधोकपणे थुंकणे, घाण करणे,सार्वजनिक मालमत्तेची अंधाधुंदपणे नासधूस करणे, भावना भडकविणाऱ्या लोकांची गुलामगिरी करणे, अप्रामाणिकपणा अंगी बाळगणे, इतरांशी खोटेपणाने वागणे, भ्रष्टाचार, लाच देणे घेणे यांना विरोध न करता प्रोत्साहन देणे, सिग्नल न पाळणे, अपघातग्रस्तांना मदत न करणे, कामावर वेळेवर न पोहोचता, काम संपायच्या आधीच लवकर निघणे, पैशाच्या तराजूत प्रत्येक गोष्टीची तुलना करून दुर्बलांवर रुबाब दाखविणे, सार्वजनिक जबाबदारीच्या नावाखाली फक्त आणि फक्त स्वतःचीच सोय करून घेणे आणि निसर्गाची आणि पर्यावरणाची हानी करणे, या आणि अशा अनेक गोष्टींचे अनिर्बंध स्वैराचार करण्यासाठीच मिळवलं होत का हे स्वातंत्र्य......?

          ‘जगणे आणि मरणे नेमके काय असते?,’ हे कळण्यासाठी एकदातरी भारतीय सैनिकाला जवळून अनुभवले पाहिजे, त्याला जाणून, समजून उमजून घेतले पाहिजे. अशा सैनिकांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांना देशसेवेनंतर झगडावे लागते. ‘या संघर्षापेक्षा सीमेवरची लढाई परवडली,’ असे या शूर जवानांना नक्कीच वाटत असावे. जो बळीराजा सा-या देशाला अन्न देतो, त्याच बळीराजाला खायला एकवेळचे अन्न मिळत नाही. जाहीर सभेमध्ये शेतक-यांच्या प्रश्नांवर गप्पा मारणा-या, बळीराजाच्या आत्महत्येवर अभ्यासपूर्ण भाषण ठोकणा-या, शिवाय वर सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगाची फळे चाखणा-या सुखवंतांना, या बळीराजाच्या घामाची फळे आणि अश्रूंची किंमत सहजासहजी कशी कळेल? शेतकरी,कष्टकरी, श्रमजीवी, कामगार, उपेक्षित आणि आर्थिक दुर्बल घटकांना जगण्याचे तरी स्वातंत्र्य आहे का......?

          मग या अशा परिस्थितीत देशसेवा नक्की कोणती करायची?कशी करायची? कुणी करायची? कधी करायची? हाच संभ्रम, या सुजाण भारतीय तरुणाईच्या मनात निर्माण होतो. रोज आपण आपल्या आयुष्यात साधे साधे नियम पाळून, सार्वजनिक संकेत पाळूनही देशसेवा करू शकतो ना......, हेच वेळेवर आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. घराघरांतून चालणारे टी.व्ही., केबलचे मुक्त प्रक्षेपण, मोबाईल, कॉम्प्युटरचा वाढता दुरुपयोग, दहीहंडी,गणेशोत्सव, नवरात्र, होळी, आपले लग्न समारंभ तसेच, एकूणच सर्व सणांचे आणि परंपरांचे सार्वजनिकरित्या बदलत चाललेले विचित्र रूप पाहता, आपल्या भावी पिढीसमोर आपण याच स्वैराचाराचे उदाहरण तर नाही ना घालून देत आहोत, हा अंतर्मुख करणारा विचार डोक्यात आल्याशिवाय रहात नाही. म्हणून वेळीच या स्वैराचाराला रोखून, स्वातंत्र्याची पताका अभिमानाने पुढच्या पीढीच्या हाती सोपवायची असेल, तर स्वतःमध्येच छोटे छोटे बदल घडवत ही देशसेवा करता येऊ शकते हे आमच्या सारख्या तरुण पिढीने समजुन घेण्याची गरज आहे.

          आज आपला देश ज्या वेगाने प्रगती करतोय त्याच्या दुप्पट वेगाने विविध समस्यांनी वेढला जातोय. प्रश्न पडतो की खरच आपण स्वतंत्र आहोत का? ब्रिटिश राजवटीतून आपण कधीच मुक्त झालो पण महागाई, दहशतवाद, भ्रष्टाचार, स्वैराचार यात मात्र आपण अडकून बसलोय आणि यातून दिवसेंदिवस बाहेर पडणं कठीण होत चाललयं. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी परदेशियांशी लढणं कठीण च होत पण आज स्वकियांशी लढण त्यापेक्षा जास्त कठीण होत चाललय. आपल्या देशाला महान आणि तडफदार नेते,राजकारण्यांचा इतिहास आहे. पण खेद याचा वाटतो की, या इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा झालीच नाही. आज आपल्या देशात भ्रष्टाचार एवढा बोकाळला आहे की आणखी काही दिवसांनी तो एक शिष्टाचार होतो की काय अशी भिती निर्माण झाली आहे. आर्थिक महासत्तेची स्वप्न बघणार्‍या भारतात दारिद्रय रेषेखालील जनेतेला अन्न, वस्त्र, निवारा या जीवनाश्यक गोष्टीची आजही भ्रांत आहे. आपल्या तिरंग्यातील तीन रंग शांतता, सामर्थ्य, सुबत्ता यांचे प्रतिक आहेत. भगवा सामर्थ्याचं, पाढंरा शांततेचं आणि हिरवा सुबत्तेचं. आज आपला तिरंगा दिमाखात फडकत असताना ते पाहताना मनात आलं की खरचं भारतात शांती आहे का? महासत्ता बनण्याचे सामर्थ्य आहे का? अन्नदाता शेतकर्‍यांच्या आत्महत्या होणार्‍या कृषीप्रधान भारतात सुबत्ता आहे का? जोडून आलेल्या सुट्टी मुळे आजचा हा स्वातंत्र्य दिन भारतीय तरुणाईसाठी फक्त आणि फक्त हॉलिडे सारखा वाटत आहे.

           ७० वर्ष झाली पण खरच आपण स्वतंत्र झालो आहोत का?असा प्रश्न पडतोय. राजे- रजवाडे गेले आणि आता घराणेशाहीतले आमदार-खासदार आणि मंत्री आले, त्यांना जस वाटत तसा आमच्या देशाचा रथ ते आज चालवत आहेत आणि आम्ही मस्त आरामात या रथामध्ये बसलो आहोत. सर्वांना वाटतंय आमचा हा रथ फार जोरात पळतोय. पण मित्रांनो या रथाची चाके खोलवर रुतली गेली आहेत. गेली कित्येक वर्षे आपण एकाच जागेवर अडकून पडलोय. रथ चालवणारे आपली लगाम सोडायला तयार नाहीयेत आणि आमच्या सारखे बसलेले आपआपली सीट सोडायला तयार नाहीयेत! काही बिचारे लोक आहेत जे आपलं सर्वस्व विसरून, आपली मिळालेली जागा सोडून हा रुतलेला रथ पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत, पण अशा वेळी बहुसंख्य समाज आपआपल्या सीट वरून फ़क़्त त्यांच्याकडे बघण्याचा कार्यक्रम करत बसला आहे. कसा पुढे जाणार मग हा आपल्या देशाचा रथ? कोणाला कसली चिंता नाहीये. 'आपलीच गाडी,आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी'एवढाच विचार करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. एवढा मोठा पसारा असलेला हा भारत देशाचा रथ पुढे ढकलायला बळ कमी पडतंय. अशावेळी थोडी तरी जाण असलेल्या आपल्या तरुणाईने आता आपल्या जागेवरून उठण्याची वेळ आली आहे.

          "साला सारा सिस्टीम ही खराब है" असं म्हणून म्हणून ७० वर्षे ओलांडली. काय बदल घडला? काहीच नाही...... उलट परिस्थती अजून बिकट होत चालली आहे, बिघडत चालली आहे. का घडले असेल असे? कारण अडकुन बसलेल्या या रथातली आपआपली जागा कोणी सोडायला तयार नाही. आपण खरच काही केलं ही नाही आणि करणाऱ्या एखाद्याला कधी साथ ही दिली नाही. केवळ एक प्रेक्षक बनून राहिलोय आणि आपल्याच या देशाचा तमाशा आपल्याच डोळ्यानी बघत आलोय. ज्या व्यवस्थेला आपण रोज शिव्या देतो, ज्या व्यवस्थेला आपण निव्वळ दोष देत राहतो,त्याच व्यवस्थेचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपण आहोत याचा कुठेतरी विसर पडत चाललाय. आपण आपल्यात बदल घडवायला तयारच नाही आहोत. आपणच गेली ७० वर्षे बदललो नाहीत तर व्यवस्था तरी कशी बदलेल? ज्या व्यवस्थेचा सर्वात महत्वाचा भाग जर अपंग झाला असेल ती व्यवस्था तरी कसं काम करेल. सध्याच्याच व्यवस्थेमध्ये राहून सुद्धा खूप काही घडवता येऊ शकते पण या वेळी फक्त बघण्यापेक्षा काही तरी कृती करूया. आता त्यासाठी प्रत्येकाने गांधी किंवा भगतसिंग बनण्याची गरज नाहीये, ते तसे होता ही येत नसते. गांधी आणि भगतसिंग हे आपल्यासारख्या हजारो-लाखो लोकांतूनच घडत असतात. आपण स्वतःला घडवूया आपोआप आपल्यातूनच उद्या गांधी,भगतसिंग सारखे लोक जन्माला येतील. ते येतील तेव्हा येतील, पण सध्या मला स्वतःला घडवणे तर माझ्या हातामध्ये आहे आणि ते मी करणारच......!

          स्वातंत्र्य दिनाच्या ह्या दिवशी मी प्रतिज्ञा करतो की, मी जी प्रतिज्ञा माझ्या शाळेची १० वर्षे रोज नुसती म्हणत राहिलो आज पासून ती प्रतिज्ञा प्रत्यक्षात साकार करण्यासाठी मनापासून प्रयत्न करेल. तुम्ही ही नक्की करा.

७१ व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व देश बांधवांना खूप खूप शुभेच्छा!

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Tuesday, July 18, 2017

माझा प्रवास शून्याकडे......


          एक छोटीशी मुंगी तिच्या आकारापेक्षा हजारो-लाखोपटीने मोठं असलेलं वारूळ तयार करण्याचं स्वप्न पहाते आणि अपार कष्ट करून असंख्य, अगणित अडचणींना सामोरे जात जिद्दीने ते अस्तित्वात आणते. सुरुवातीलाच जिथे वारुळ तयार करायचं आहे त्याखालची जमीन समांतर नसते. तिथूनच त्या इवल्याश्या मुंगीचा संघर्ष सुरू होतो. त्या मुंगीला ती जमीन आधी समांतर करावी लागते. अनेक अडथळ्यांचा सामना करत, आयुष्यातील चढ, उतार सहन करत ती मुंगी ती वारुळाची जागा समांतर करते. हीच समांतर जमीन म्हणजे अपूर्णतेकडून शून्याकडे प्रवास आहे. म्हणूनच शून्याला जास्त महत्व आहे. आणि याच शून्य समांतर जमिनीवरच ती मुंगी तिच्या स्वप्नातलं वारूळ बांधण्यासाठी पुन्हा नवा संघर्ष करते. आणि तीचं ते स्वप्न सत्यात उतरवते. तिचा हा प्रवास अपूर्णते कडून शून्याकडे आणि पुन्हा शून्याकडून स्वप्नाकडे जाणारा असा सुंदर प्रवास आहे.

          मला वाटतं प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील प्रगतीचा प्रवास ही असाच असतो. स्वप्न पाहणं, ते पूर्ण व्हावं म्हणून तशी अनुकूल समांतर परिस्थिती निर्माण करण्यासाठी संघर्ष करणं आणि तशी परिस्थिती निर्माण झाल्यावर स्वप्नाच्या दिशेने पुन्हा संघर्षमय वाटचाल करणं, मला वाटतं कुठल्याही प्रगत माणसाची यशोगाथा या पेक्षा वेगळी नसावी. फरक फक्त कमी जास्त संघर्षाचा असतो, तो ही प्रत्येकाच्या आयुष्यात असणाऱ्या वर्तमान परिस्थितीमुळे, सभोतालच्या वातावरणामुळे आणि मानसिकतेमुळे...... पण या सर्व प्रवासात शून्य समांतर परिस्थितीला खूप महत्व आहे. अपूर्णत्वाकडून शून्याकडे जाणारा प्रवासच खूप खडतर आहे. पण यात स्वत:च्या अपूर्णत्वाची जाणीव असणं ही तितकंच महत्वाचं...... अपूर्णाची पूर्णावस्था आधी शून्याच्याकडेच घेऊन जाते नंतर स्वप्नांसाठी संघर्ष सुरू होतो. माझ्या ही आयुष्यात "माझा प्रवास शून्याकडे"च सुरू आहे......

          आयुष्याच्या या सुंदर मांडणीत संघर्षमयी यशोगाथा लिहिण्याचं सामर्थ्य आणि संधी प्रत्येकाला मिळतेच पण काहींचा प्रवास या शून्याच्या आधीच अडकून बसतो ते स्वतःच अपूर्णत्व ओळखू शकत नाहीत आणि काही जण शून्याच पूर्णत्व ओळखून पुढे जातात, ध्येयाची दिशा ठरवतात आणि यशस्वी होतात. "मी करू शकतो" हा सकारात्मक विचार आणि "आणि हे मीच करू शकतो" हा आत्मविश्वास माणसाला ध्येयापर्यंत पोहोचायला बळ देतो. पण खरी कसरत असते ती शून्यपर्यंतच्या प्रवासाची...... सर्वात आधी स्वतःच्या अपूर्णत्वाला ओळखणं खूप महत्त्वाचं असतं. वेगळ्या आवेशात, फाजील आत्मविश्वासात माणूस अडकून राहिला की तो स्वतःला ओळखू शकत नाही. स्वतःच स्वतःला ओळखण्याची कसब आधी शिकली पाहिजे. ती समजून घेऊन त्या दिशेनं वाटचाल केली पाहिजे.

          प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या, संकटं, अडचणी तर येतातच पण येणाऱ्या समस्या, संकट आणि अडचणीच्या क्षणांना अनुभवाच्या शिदोरीत बांधून, ती जपून ठेवण्याची कला सुद्धा आपण जोपासली पाहिजे. जर आयुष्यात कधी आपल्या समोर एखादी मोठी समस्या उभी राहिली तर समोर असलेल्या आपल्या समस्येच्या बाजूला दुसऱ्या माणसाच्या मोठ्या समस्येची रेषा जर आपण आखली तर आपली समस्या ही समस्याच नसून आपल्याला मिळालेली सुवर्णसंधी आहे असा आत्मविश्वास तयार होऊ लागतो. आलेल्या संधीला ओळखणं आणि एखाद्या समस्येला सुद्धा संधीच रूप देणं हीच खरी शून्याकडे यशस्वी वाटचाल आहे. स्वतःची स्वतःशी असलेली ओळख हीच आपल्याला प्रगतीचा मार्ग दाखवते. अशी स्वतःची ओळख झाली की शून्याकडे जाणारा धूसर मार्ग स्पष्ट दिसू लागतो.

          माझ्या आयुष्यात आलेल्या समस्यांना संधी समजून अनुभवाच्या शिदोरीत बांधण्याची कला तर मी शिकलो पण ते पेलवण्याचं सामर्थ्य अजून सुद्धा पूर्णतः माझ्या मध्ये नाही हेही मी समजून घेतोय, स्वतःच अपूर्णत्व मी आता कुठे नीट ओळखू लागलोय. माझ्यात असलेलं हे अपूर्णत्व पूर्ण करण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतोच. वाचन, लिखाण, थोरामोठ्यांची भाषणे, वैचारिक गप्पा यातून मिळेल तेवढं सामर्थ्य, जिद्द मिळविण्यासाठी मी निरंतर धडपडत असतो. माझी ही धडपड मला अपूर्णत्वाकडून शून्याकडे घेऊन चाललीय. सामर्थ्य मिळविण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नात जर मी कमी पडलो तर शून्याकडे जाणारा हा माझा प्रवास नक्कीच खडतर असेल याची ही मला पूर्ण जाणीव आहे. प्रामाणिक प्रयत्न करत राहून सकारात्मकपणे ध्येयाकडे जाणारी वाटचाल नक्कीच फलदायी ठरते यात शंका नाही.

          मनुष्य प्राण्याला नकारात्मक तुलना करण्याची खूप सवय लागली आहे. मी तर म्हणतो की तो शापच आहे. हीच तुलना अधोगतीकडे घेऊन जातेय हे लक्षातच येत नाही. पृथ्वीतलावर येणारा प्रत्येक माणूस वेगळा आहे त्याच वेगळं असं विशेष अस्तित्व आहे. आपण दुसऱ्याच्या व्यक्तिमत्वावर भाळतो आणि तसंच बनण्याच्या आग्रही प्रयत्नात स्वतःच्या सुंदर अस्तित्वाला हरवून बसतो. त्यामुळे आधी आपण स्वतःला ओळखायला शिकलं पाहिजे. आपल्या आत असणाऱ्या सुप्त गुणांची पारख, आत्मविश्वासाची ओळख आणि अपूर्णत्वाची जाणीव माणसाला पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग दाखवत असते. माझ्या आयुष्यात आलेल्या सर्व चांगल्या वाईट क्षणांना मी अनुभवाच्या शिदोरीत बांधून ठेवत, समस्येला संधी समजून, माझं हरवलेलं सामर्थ्य मिळविण्यासाठी "माझा प्रवास शून्याकडे......" प्रयत्नपूर्वक सुरूच राहिल.

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Friday, June 16, 2017

"माझं अस्तित्व"


          कधी कधी गर्द आभाळ भरून येतं, विजा चमकतात, सोसाट्याचा बेभान वारा सुटतो आणि पावसाचे चार थेंब जमिनीवर पडले की लगेच मातीचा एक अगदी गोड सुगंध दरवळू लागतो. तो सुगंध अंगात एक रोमांच, एक वेगळा उत्साह निर्माण करतो. पण एवढे ढग भरून येऊन ही कधी कधी पाऊस न पडताच ते गर्द ढग तसेच निघून जातात. न बरसताच ते ढग दृष्टी आड होतात. माझं ही काही दिवस झाले असंच होत होतं. डोक्यात विचार येत होते आणि न बरसताच निघून जात होते. डोक्यात वीज चमकल्यासारखं विचारांचा कडकडाट व्हायचा पण कागदावर उतरवायची उर्मीच अंगात येत नव्हती. मग ते डोक्यात चमकलेले विचार कित्येक वेळा न बरसताच निघून गेलेले आहेत. डोक्यात आलेले विचार कागदावर उतरवले की मोकळं वाटतं, एक निराळा आनंद, तृप्ती असते मनात त्यावेळी. जसं पावसाची एखादी सर जोरदार बरसून गेली की वातावरण किती फ्रेश होत तसच डोक्यातले विचार कागदावर बरसले की मन अगदी प्रसन्न होऊन जातं. आकाशातल्या ढगांना योग्य उब मिळाली की ते मनसोक्त बरसूनच जातात. तसंच डोक्यातल्या विचारांना योग्य वाट मिळाली की ते बरसतातच पण कधी कधी तशी मनस्थिती, वेळ आणि वातावरण जुळून यावं लागतं. एकदा हे जुळून आलं की विचारांची डोक्यात आलेली उर्मी कागदावर उतरवायला वेळ लागत नाही. माझ्या विचारांचे ही काही दिवस झाले त्या न कोसळणाऱ्या ढगांसारखेच हाल आहेत. आम्ही दोघेही कधी कधी सुकेच आणि कधी कधी बरसून ओले......

          पण आज मात्र तो सगळं भान हरपून मनसोक्त बरसतोय. जमिनीवर कोसळून रस्त्याने सुसाट धावतोय, नाचतोय, बागडतोय, पानांवर, फुलांवर, झाडांवर थेंब बनून स्वतःच एक वेगळं अस्तित्व निर्माण करतोय. स्वतःच्या अस्तित्वाचा ठसा निसर्गावर उमटवून त्या निसर्गाच रंग रूप च बदलून टाकलंय. काल परवापर्यंत माझ्या घरासमोरच पिंपळाच झाड अगदी सुकलं होतं, पण आज मात्र ते स्वतःच खर हिरवं मनमोहक रूप जगाला दाखवतय. निराशेनं गळून पडलेली त्याची पानं पुन्हा नव्या उत्साहाने उमलत आहेत. या पावसाची लोभसवाणी जादू पाहून मग मीही मनाशी ठरवलं की आपण ही आज मनसोक्त, मनमुराद, बेभान होऊन बरसायचं, मनाच्या आत कुठेतरी कोपऱ्यात मंद वाजणारी तार असते, तिला हलकच छेडून कान थोडावेळ बंद करून जे डोक्यात विचारांचे सूर तयार होतील ते कागदावर अलगद उतरवायचे. पावसाचा थेंब जमिनीवर पडला की कसा सुगंध दरवळतो तसा डोक्यातला विचार शब्दांच्या रूपाने कागदावर उमटला की एक वेगळाच सुगंध आसमंतात दरवळायला सुरुवात होते, अगदी हृदयापर्यंत जाऊन भिडतो. तसंच मला माझ्या मनात येणारे विचार शब्दांवाटे सजवायचे आहेत आणि दरवळणाऱ्या मनमोहक सुगंधासारखे प्रत्येकाच्या हृदयात रुजवायचे आहेत.

          खरंच काल पर्यंत तो कुठेच नव्हता, पण आज मात्र सगळीकडे तोच तो आहे. काल पर्यंत त्याचं अस्तित्व कुठेच नव्हतं पण आज मात्र त्याने स्वतःच या सुंदर सृष्टीचं अस्तित्व बदललंय. काल माझंही काही अस्तित्व नव्हतं, आज सुद्धा ते अगदी नावापुरतच आहे. पण माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसावर मला माझं अस्तित्व कोरायचंय. माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणाला मला सजवायचंय. माझं सुंदर अस्तित्व मला तयार करायचंय. तळपत्या सूर्याला पाहून पाहून जमीनीला भेगा पडतात पण ती पावसाची वाट पाहणे काही सोडत नसते. वाहणारे ढग हजारो मैलांच्या प्रवासाचा विचार करून मध्येच कधी थकत नाहीत. खळखळाट करत वाहणारी नदी कधीच कसल्याही अडथळ्याला घाबरत नाही. अडचणी आणि आव्हानाशिवाय जगण्याला काहीच मजा नाही. आव्हानाचा सामना करण्यात जी मजा आहे ती ऐशोआरामात मुळीच नाही. कितीतरी आव्हानाचा सामना करून हा पाऊस आज बरसतोय आणि अडचणींवर मात करून निसर्गाच अस्तित्वच बदलून टाकतोय. तसं मी ही माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाचा सामना करत जगण्याची मजा घेतोय आणि सुगंध दरवळणारं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. त्या मनमोहक पावसाने जसं सुष्टीचं अस्तित्व निर्माण केलं तसं "माझं अस्तित्व" निर्माण करायचं असेल तर येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करण्याशिवाय पर्याय नाही.

- डॉ. संदीप सोमेश्वर टोंगळे.

Saturday, June 10, 2017

क्षण


          उष्णतेमुळे तनामनाची लाही-लाही झाली असताना थंड वाऱ्याची एखादी झुळूक क्षणभर सुखद गारवा देऊन जाते ना, तसेच काहीसे हे 'क्षण'असतात आपल्या आयुष्यातले...... हळुवार कधीतरी, कुठूनतरी गुपचूप संधी साधून येतात अन् तना मनात एक वेगळाच उत्साह निर्माण करून जातात. आपल्या मनात असलेल्या अपेक्षांची क्षणभर का होईना पण पूर्तता झाली असं वाटू लागत आणि आपलं मन सुखावून जात आणि मनासोबत आपणही भान विसरून बेभान होऊन जातो त्या क्षणात...... त्याच क्षणी लगेच आपण आनंदाच्या परमोच्च शिखरावर ताठ मानेने,अभिमामाने विराजमान होतो, बेधुंद होतो, बेभान होतो अगदी...... पण हे सगळं क्षणभर असतं, हो क्षणभरच असतं सगळ...... वाऱ्याची झुळूक तेवढ्यापुरतीच असते ना......? पुन्हा ती कधी, कुठून, कशी येईल सांगता येत नाही पण तोपर्यंत असंच, असंच चालत राहायचं. असंच निरंतर आयुष्य जगत रहायच, त्या क्षणभर येणाऱ्या सुखद गारव्यासाठी..... पण आपलं हे मनं ऐकत नाही, तयार होत नाही त्या क्षणभर सुखासाठी...... आपल हे मन हट्ट करू लागत. जे हवं ते कायम स्वरूपी, क्षणभरासाठी नकोच...... इथूनच मग सुरु होते आपल्या मनाच्या वेदनांची कथा......

          फक्त सुखाचा हट्ट करताना सुख दुख मिश्रित क्षणांच्या गाठोड्यालाच आयुष्य म्हणतात हे आपण विसरून जातो. सुखाचा हट्ट नेहमी वेदनाच देऊन जातो हे आपल्या लक्षातच येत नाही. मृगजळाप्रमाणे सुखाचा पाठलाग करत असताना झालेल्या वेदनेची जखम, जखमेचा व्रण आणि त्या  व्रणाची सल ही कायम मनात सलतच राहते. त्यातल्या काही जखमा ह्या वेदना विरहित असतात. त्या कधी आपलं व्रण सोडून देतात ते कळून येत नाही. पण काही जखमांतून आयुष्यभर रक्त ओघळत जात. त्या कधीच भरून येत नाहीत. कधी कधी रक्त ओघळलं तरी त्याची जाणं होत नाही. काही वेदना कळून न येणाऱ्या असतात. त्याच काही वाटत नाही. पण काही भरून न येणाऱ्या असतात. त्याचा असह्य त्रास होत राहतो आयुष्यभर...... पण माणूस सुखाचा हट्ट काही सोडत नाही. सुखाचा पाठलाग सुरूच असतो निरंतर...... वेदना मिळतात पण प्रत्येकवेळी मनाला भरारी घ्यावीच लागते नवीन सुखद क्षण शोधण्यासाठी......

          प्रचंड रहदारीच्या ऐन रस्त्यावर किंवा तुडुंब माणसाच्या गर्दीत जीव कासावीस होऊन जातो. त्या दुखद क्षणात कितीसा वेळ काढतो आपण,त्यातून मोकळी वाट मिळतेच ना......? किंवा काढावीही लागते. मोकळी वाट मिळाली कि तेव्हा कुठे मोकळा श्वास घेता येतो, तो क्षण सुखदच असतो ना......? तसेच काहीसे हे प्रत्येक क्षण जगावे लागतात आयुष्यात. या सुख दुःख मिश्रित क्षणांच्या गाठोड्यालाच आयुष्य म्हणतात. म्हणून येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत रहावा कारण गेलेला क्षण परत येत नाही. आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक दुखाच्या क्षणात सकारात्मकतेने सुख शोधण आणि त्याचा मनसोक्त आनंद घेण हेच खर आयुष्य आहे. कधी कधी अनिवार्यच असलेल्या दुखाच्या वेदना सहन करून त्यातून प्रयत्नपूर्वक बाहेर पडून मोकळा श्वास घेण्यात खर परमोच्च सुख आहे. आपण जर या सुख दुख मिश्रित आयुष्याकडे सकारात्मकपणे पाहिलं तर येणारी प्रत्येक झुळूक नक्कीच सुखद गारवा देऊन जाईल आणि सुखाचा हट्ट न करता मन सुखद क्षणाचा शोध घेत राहील.

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Sunday, June 4, 2017

माझी लाडकी लेक


काल पाण्यात पोहत असताना......
माझ्या खांद्यावर बसलेली माझी मुलगी
जेव्हा खांद्यावर माझ्या उभी राहिली

आणि मला म्हणू लागली
बघा पप्पा तुमच्या पेक्षा मी मोठी झाली

मी म्हणालो, "बाळा या सुंदर गैरसमजात रहा,
पण माझा हात पकडूनच हे सुंदर जग पहा".

ज्या दिवशी हा हात सुटून जाईल
बाळा तुझं हे सुंदर स्वप्न तुटून जाईल

ही दुनिया वास्तवात तुझ्या स्वप्ना एवढी रंगीत नाही
पण तुझ्या साठी हा बाप रंगवून टाकेल दिशा दाही

माझ्या खांद्यावर बसून तू गगनाला स्पर्श करण्याचं स्वप्न पाही
बघ तुझ्या पाया खाली आता जमीन नाही

मी तर बाप आहे तुझा, खूप खुश होईल
ज्या दिवशी तू खरंच माझ्यापेक्षा मोठी होशील

पण बाळा खांद्यावर नाही......
जेव्हा तू जमिनी वर उभी राहशील

हा बाप तुला सगळं देऊन जाईल
आणि कोणाच्यातरी खांद्यावर बसून हे जग सोडून जाईल.

- डॉ. संदीप सोमेश्वर टोंगळे.

Saturday, May 27, 2017

मी शोधलेला "चोर"


          आपली मानसिकता कुठल्या दिशेने चाललीय कळत नाहीये. सरकारी मालमत्तेची तोडफोड, नुकसान किंवा चोरी, असली प्रकरण तर रोजची होत चालली आहेत. आपल्याच घरात कोणी चोरी करत का......? आपल्याच घरातल्या वस्तूच कोणी नुकसान किंवा तोडफोड करत का......? नाही ना......? मग त्या तेजस एक्सप्रेस मध्ये जी मालमत्ता आहे ती कोणाची होती......? आपलीच ना......? आपल्याच घरात चोरी करायची तोडफोड करायची आणि पुन्हा त्याची भरपाई आम्ही टॅक्स मधून करायची. हे विचित्र कालचक्र असंच सुरू राहणार आहे का? नुकसान कोणाचं होतंय? आपलंच होतंय ना......? आम्ही रेग्युलर इनकम टॅक्स भरतो, प्रोफेशनल टॅक्स भरतो आणि विविध कर न चुकता भरतो आणि त्यातूनच सरकारी यंत्रणा आपल्यासाठी चालते. त्याच टॅक्स मधून सरकार आपल्या साठी सोयी सुविधा उपलब्ध करते आणि आपण आपल्याच मालमत्तेची तोडफोड करून आपलंच नुकसान करून घेतो. हे सगळं का......आणि कशासाठी......? त्या तेजस एक्सप्रेस मध्ये चोरी म्हणजे माझ्या घरात चोरी झाली असा त्याचा अर्थ घ्यायला आपण कधी शिकणार आहोत......?

          परवा मी माझ्या "खेळ मनाचे" ब्लॉग मधील एक लेख fb आणि व्हाट्सअप्प वर पोस्ट केला होता, "कला" जीवन जगण्याची. तो लेख मी पोस्ट केल्यावर बऱ्याच जणांनी दुसऱ्या ग्रुप वर फॉरवर्ड केला, काहींनी स्वतःच्या fb वॉल वर टाकला, काहींनी विचारून share देखील केला. व्हाट्सअप्प वर तो फिरत फिरत पुन्हा माझ्या व्हाट्सअप्प च्या एका ग्रुप वर आला. मला खरंच खूप छान वाटलं. आपले विचार लोकांना पटतात ते share करतात हीच एका प्रामाणिक लेखकाची कमाई असते. खूप सार्थक झाल्यासारखं वाटलं. नंतर मग मी त्या व्हाट्सअप्प ग्रुप वर फिरत फिरत आलेला माझाच ब्लॉग खाली scroll करून पाहिला तर मला पहिल्यांदा धक्काच बसला. लेखाच्या शेवटी मी माझं नाव "डॉ. संदीप सोमेश्वर टोंगळे" असं नेहमी लिहितो. थोडक्यात ती माझी signature असते, की हा लेख माझा आहे हे सांगण्यासाठी. पण त्या लेखाच्या खाली वेगळंच नाव होतं. (अर्थातच ओळखीचं होतं म्हणून जास्त धक्का बसला) आणि नावाच्या खाली "MD" लिहिलं होतं. ते पाहिल्यावर पहिल्यांदा मला खूप वाईट वाटलं. "एक चोर" आपल्या लेखाची चोरी करतोय हे काही काळ सहन झालं नाही.

          पण नेहमीच्या सवयी प्रमाणे लगेच थोडा सकारात्मक विचार केला की त्या व्यक्ती ने चोरी केली पण माझं काही गेलं का? खरंच माझं काही नुकसान झालं का? मुळीच नाही. आणि त्याने चोरी करून स्वतःच नाव टाकून का असेना पण माझे विचार त्याला आवडले, पटले म्हणूनच त्याने share केले. पद्धत चुकीची जरी असली तर आपला उद्देश सफल झाल्याचं सकारात्मक समाधान मला मिळालं. एखाद्या सरकारी मालमत्तेची चोरी करण्यापेक्षा अशी चांगल्या विचारांची चोरी करणं कधीही फलदायीच. खरंच या वैचारिक चोराच्या चोरीतुन खूप काही शिकायला मिळालं. अशा वैचारिक चोरांनी असेच विचार चोरून जर चांगल्या विचारांचा प्रसार केला आणि ते विचार आमलात आणले तर सरकारी मालमत्तेच्या चोऱ्या नक्कीच थांबतील. कधी कधी अजिबात जीवनावश्यक नसणाऱ्या गोष्टींसाठी सुद्धा आपण कमालीचे आग्रही, हट्टी असतो. पण आपल्याला आवश्यक सुखसोयींची आपण अशी तोडफोड, चोरी करणं किती चुकीचं आहे. आपल्या मानसिकतेतला हा विरोधाभासच खूप घातक आहे. त्यात बदल व्हायला हवा. मी शोधलेला हा आगळावेगळा वैचारिक "चोर"च हा सकारात्मक बदल घडवू शकतो.

टीप - त्या माझ्या चोर मित्राला एक विनंती आहे, फक्त विचार चोरू नकोस ते आमलात आणायला पण शिक. त्याला माझा हा लेख पण चोरायचा असेल तर बिनधास्त चोर पण खालचं नाव edit करताना वरच लेखातलं माझं नाव edit करायला विसरू नको नाहीतर उगीच तुझी चोरी पकडली जायची. आणि माझ्या समाजोपयोगी विचारांच्या प्रसारातला असलेला तुझा खारीचा वाटा वाया जायचा.

- डॉ. संदीप सोमेश्वर टोंगळे.

Friday, April 21, 2017

“A” for आयुर्वेद


          रात्रीचे पावणे दोन वाजलेले, सव्वा एक वाजता आलेला एक पेशंट पाहून घरी आल्यावर नुकताच डोळा लागला होता. रात्रीच्या निरव शांततेत जोरात वाजलेल्या फोनच्या रिंग मुळे मला पुन्हा जाग आली. “बाळाला लय भयंकर ताप आलाय लवकर खाली या”, हे बाळाच्या नातेवाईकाचं वाक्य जसच्या तसं मला ऐकवणाऱ्या माझ्या स्टाफ ला “हो आलोच” असं म्हणून मी लगेच खाली धाव घेतली. बाळाला नीट तपासल्यावर लक्षात आलं कि त्याला न्युमोनिया चा ताप आहे. त्याच्या वडिलाला विचारलं “बाळाला ताप कधीपासून येतोय”. ते म्हणाले “चार-पाच दिवस झाले असतील” त्यांचं असं सहज उत्तर ऐकल्यावर माझ्या लक्षात आलं कि हे बाळ नक्कीच किमान एक आठवडा झालं आजारी असेल. “अहो बाळाला न्युमोनिया झालाय एडमिट करावं लागेल......” माझं हे बोलण मध्येच थांबवून बाळाचे वडील म्हणाले “तुम्ही फक्त आता ताप कमी करायचं औषध दया, आम्ही उद्या सकाळी-सकाळी लवकर जाऊन बालरोगतज्ज्ञाकडे बाळाला एडमिट करतो”. कपाळावर कायमचं अदृश्य प्रश्नचिन्ह असलेला मी, पडलेले काही प्रश्न निमुटपणे गिळून त्या बाळाला व्यवस्थित उपचार देऊन पहाटे चार वाजता घरी येऊन झोपलो. डोळ्यात झोप आणि डोक्यात प्रश्न...... मला वाटत हा रात्रीचा प्रसंग प्रत्येक BAMS डॉक्टरच्या आयुष्यात किमान एकदा तरी येऊन गेला असेलच. आणि या प्रासंगिक लघुपटाचा उत्तरार्धही काय असतो, हे सर्व BAMS डॉक्टरांना माहिती आहेच. झोप “अर्धवट” आणि उपचार ही “अर्धवटच”...... पण डोक्यातले प्रश्न मात्र “पूर्ण” ताकतीनिशी डोळ्यातली “अर्धवट” झोप घालविण्याचा प्रयत्न करत होते. माझं नेमकं चुकलं तरी काय......? मी दिलेला सल्ला चुकला कि माझं निदान करणं चुकलं? कि चार चार दिवस बाळाचा ताप घेऊन घरी बसणाऱ्या त्या पेशंटला रात्री येऊन उपचार देणच चुकलं? कि आलेला राग निमुटपणे गिळण चुकलं? कि माझं BAMS असणच चुकलं? या आणि अशा अनेक प्रश्नांचं वादळ डोक्यात घेऊन कसाबसा झोपलो खरा पण प्रश्नांचं वादळ डोक्यात निरंतर सुरूच होत. “A for Apple, B for Ball, C for Cat, D for Dog” सकाळी सकाळी माझ्या मुलीच्या या नर्सरीतल्या पाठाच्या आवाजाने मला जाग आली.  आणि डोक्यात पुन्हा तेच विचार सुरु झाले. “A” for आयुर्वेद, “B” for BAMS, “C” for चूर्ण, “D” for डॉक्टर...... आणि BAMS ला प्रवेश घेतल्यानंतरचा माझा आयुर्वेदातल्या नर्सरीचा पाठ आठवला......

हिताहितं सुखं दु:खमायुस्तस्य हिताहितम्।
मानं च तच्च यत्रोक्तमायुर्वेद: स उच्यते॥ - चरक संहिता १/४०

          हाच तो पहिला संस्कृत श्लोक, जो मी असाच माझ्या मुलीसारखा पाठ करण्याचा प्रयत्न केलेला होता. मुळात संस्कृत श्लोकामध्येच वर्णन केलेली आयुर्वेद चिकित्सा पद्धती वाचताना सुरुवातीला फारच गम्मत वाटायची. असं वाटायचं आपण इथे डॉक्टर व्हायला आलोय कि संस्कृत साहित्याचा अभ्यास करायला आलोय. पण हळूहळू या श्लोकांचे अर्थ समजत गेले आणि आयुर्वेदाच्या आरोग्य खजिन्याचं एक एक पान उलघडत गेलं. आपल्या आयुष्यातील हितकारक, अहितकारक, सुखकारक, दु:खकारक, व्याधीकारक गोष्टींचा ऊहापोह आयुर्वेदात अतिप्राचीन काळापासून केला गेला आहे. A State of complete physical, mental and social well being and not merely the absence of disease or infirmity. ही आरोग्याची व्याख्या जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) १९४६ साली सांगितली पण हीच आरोग्याची व्याख्या आयुर्वेदाने हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलेली आहे.

स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम । आतुरस्य विकार प्रशमणम् ॥

          आधुनिक आयुर्विज्ञान आणि आयुर्वेद यात असलेलं हे साधर्म्य नंतर च्या अभ्यासक्रमात दिसत गेलं. आणि त्यात आवड हि निर्माण होत गेली पण नंतरच्या काळात वैद्यकीय सेवा करताना रुग्णांचा कल आणि आधुनिकतेची ओढ यामुळे आधुनिक आयुर्विज्ञानाकडे कल वाढत गेला. आणि Allopathy Practice करण्याची जिज्ञासा निर्माण झाली. आयुर्वेद शिकत असताना आमच्या अभ्यासक्रमात आधुनिक आयुर्विज्ञानाचा (Allopathy) बराचसा भाग असायचा. वाचत असताना हे लक्षात यायचं कि आधुनिक शास्त्र म्हणून जे आज लिहून ठेवलंय तेच संस्कृत भाषेत हजारो वर्षापूर्वी आयुर्वेदात लिहून ठेवलं गेलं आहे. तरी पण आज आयुर्वेदाला दुय्यम दर्जा का मिळतोय याच कुठेतरी चिंतन करण्याची वेळ आली आहे असं मला वाटतं. हे शास्त्र खूप जूनं आणि संस्कृत भाषेत आहे, म्हणून निव्वळ या कारणाने जर मागे पडत असेल तर यात सुधारणेची आणि संशोधनाची गरज आहे. सुधारणा आणि संशोधन न करता फक्त हेटाळणी जर होत राहिली तर भविष्यात आपण या सुंदर वैद्यक शास्त्राला मुकणार हे नक्की. कोणत्याही रुग्णाला उपचार करताना तो बरा होणे आणि नंतर त्याचं स्वास्थ्य अबाधित राहणे महत्वाचे असते. त्यात तो कुठल्या वैद्यकशास्त्रामुळे बरा झाला हा वाद घालण्यात काही अर्थ नसतो. वेगवेगळ्या वैद्यक शास्त्रांचं महात्म्य सांगत बसण्यापेक्षा या सर्व वैद्यकशास्त्रांचा योग्य समन्वय होणं हे रुग्णांसाठी अधिक फायद्याचं ठरेल असं माझ मत आहे. शेवटी रुग्ण हाच कोणत्याही वैद्यकशास्त्राचा केंद्रबिंदू असतो. आणि तो पूर्ण बरा होणं हेच कोणत्याही वैद्यकशास्त्राचं मूळ ध्येय असतं. असं असताना एखाद्या वैद्यकशास्त्राला निष्कारण दुय्यम स्थान देवून आपण नेमकं साध्य तरी काय करतोय हेही लक्षात घेतलं पाहिजे. खरंच, BAMS डॉक्टरांचं आयुष्य असंच समस्यांची उत्तर शोधण्यात वाया जाणार आहे का? समाजात BAMS डॉक्टरांना असा दुय्यम दर्जा का मिळतोय? याचा कुठेतरी स्वतः सर्व BAMS डॉक्टरांनी, रुग्णांनी आणि समाजानी विचार करण्याची वेळ आज आली आहे.

          आपल्याचं देशाचं अतिप्राचीन असलेलं हे वैद्यकशास्त्र आज राजाश्रयासाठी झुंझतय हे पाहताना वाईट वाटत. आयुर्वेदाची ही अवस्था होण्यात बराच मोठा वाटा BAMS डॉक्टरांचाच आहे हेही मी ठाम पणे सांगतो. कारण आम्ही शिकलेल्या आयुर्वेदाला आम्हीच कायम दुय्यम दर्जा देत राहिलो आहे. आज BAMS डॉक्टरांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन पाहता यात बऱ्याच प्रमाणात चूक आमचीच आहे हे लक्षात येतं. आमच्या पैकी किती डॉक्टर हे रुग्णांना आयुर्वेदीक उपचार घेण्याचा सल्ला देतात? खूप कमी डॉक्टर्स आज शुद्ध आयुर्वेदिक practice करतात. मी असं मुळीच म्हणणार नाही कि आम्ही सर्व BAMS डॉक्टरांनी फक्त आयुर्वेदिक practice च केली पाहिजे. पण किमान आम्ही जे शिकलोय किंवा ज्या शास्त्रामुळे आम्ही घडलोय त्या वैद्यक शास्त्राची अशी अवस्था होऊ नये यासाठी आम्ही प्रत्येकाने प्रयत्न केलाच पाहिजे. आमच्या BAMS च्या अभ्यासक्रमात Modern Allopathy Medicine चा बराचसा भाग आहे. त्यामुळे कोणी कोणती Practice करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपल्या आयुर्वेदाच्या राजाश्रयासाठी आम्ही प्रत्येक BAMS डॉक्टरांनी खारीचा वाटा उचललाच पाहिजे. आपल्या आयुर्वेदाला श्रेष्ठ स्थान आपण सर्वांनी मिळून दिलंच पाहिजे. ज्या आयुर्वेदामुळे आपले सर्व महापुरुष निरोगी आयुष्य जगू शकले, ज्या आयुर्वेदामुळे आपले पूर्वज आजारांच्या विचित्र विळख्यात कधीच अडकले नाहीत, ज्या आयुर्वेदाने आपल्या सर्वांनाच सुंदर निरोगी आयुष्य जगण्याचा मूलमंत्र दिला त्या आयुर्वेदाला आज आपली गरज आहे. प्रत्येक BAMS डॉक्टरांनी आपण करत असलेल्या practice चा आणि आयुर्वेदाचा समन्वय साधून रुग्णांना उपचार दिले तर नक्कीच बदल घडेल.

          आज BAMS डॉक्टरांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रोज नवीन समस्या समोर उभी असते. कधी हॉस्पिटल नोंदणी, कधी Bio Medical Waste, कधी GR, कधी बातम्या, कधी रुग्णांची तक्रार, कधी कोणी म्हणत हे तुम्हाला allowed च  नाही, कधी कोणी म्हणत delivery सुद्धा allowed नाही, या आणि अशा कित्येक समस्यांना रोज सामोरे जाताना practice करण खरंच अवघड होत चाललं आहे. हॉस्पिटल नोंदणी, Bio Medical Waste ते नियमानुसार योग्य च आहे आणि ते प्रत्येक BAMS डॉक्टर काटेकोर पणे करतात सुद्धा. पण बाकी समस्यांना तोंड देताना BAMS डॉक्टरांची निष्कारण होणारी गळचेपी आश्चर्यकारक वाटते. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र हा विषय आम्हाला आमच्या अभ्यास क्रमात शिकवला जातो. आयुर्वेदिक संहितेत सुद्धा प्रसवक्रियेचे वर्णन आहे. मग असं असताना BAMS डॉक्टरांना Delivery करता येते का? हा प्रश्न उभा करण्याची गरजच काय? प्रसव क्रिया हा काही कोणत्या एकट्या वैद्यकीय शास्त्राचा विषय नाही. ती एक नैसर्गिक क्रिया आहे आणि ती जगातल्या कोणत्याही डॉक्टरने केली तरी त्यात काही चुकीच असूच शकत नाही. फक्त अत्यावश्यक स्थिती मध्ये तारतम्य बाळगून योग्य निर्णय घेऊन योग्य उपचार रुग्णांना मिळणे ही सुद्धा सर्वच डॉक्टरांची नैतिक जबाबदारीच आहे. समजा एखाद्या रुग्णाला Allopathy उपचारच योग्य असेल तर किंवा एखाद्या रुग्णाचा आजार हा आयुर्वेदिक किंवा Homoeopathy या उपचार पद्धतीनेच बरा होणार असेल तर त्या त्या डॉक्टरांनी समन्वय साधून त्या त्या रुग्णांना योग्य उपचार मिळवून देण ही सुद्धा त्यांची नैतिक जबाबदारी आहेच. आजारात विचित्ररित्या गुरफटलेल्या आणि स्वतःच आरोग्य गमावून बसलेल्या रुग्णांना योग्य सल्ला देऊन त्याचं आरोग्य पुनर्स्थापित करणं हेचं प्रत्येक डॉक्टरांचं कर्तव्य आहे. शेवटी रुग्ण बरा होणे हेच महत्वाचे असते.

          एकदा एका CME (Continous Medical Education) मध्ये lecture देताना एका तज्ञ डॉक्टरांनी एक गोष्ट सांगितली होती ती अशी कि, या सृष्टीवर सर्वात प्रथम “अमिबा” हा bacteria आला त्यानंतर हळू हळू कालांतराने मानवाची निर्मिती झाली. मानव हा बुद्धीजीवी प्राणी असल्याने त्याने bacteria वर मात करायला सुरुवात केली. Bacteria ने सुद्धा त्यांचीच मुळ सृष्टी असल्याने मानवावर प्रतिहल्ला सुरु केला आणि त्यामुळे मानवाला वेगवेगळे आजार होऊ लागले. हे bacteria आणि मानवाचे टिकून राहण्याचे (servive करण्याचे) युद्ध आजतागायत सुरूच आहे. Bacteria नवनवीन रूपाने आपल्यावर हल्ला करतात आणि नवनवीन आजार जडवतात आणि मानव डॉक्टरांच्या रूपाने नवनवीन शोध लावून त्या bacteria वर मात करून तो आजार घालविण्याचा प्रयत्न करतात. हे युद्ध गेली कित्येक वर्ष झाले निरंतर सुरूच आहे. मग मानवासमोर आरोग्याच्या इतक्या समस्या असताना आपण आपआपल्यात युद्ध करण्यात काय अर्थ आहे. कोणत्याही वैद्यक शास्त्राचं श्रेष्ठत्व सांगत बसण्यापेक्षा योग्य समन्वय साधून रुग्णांना निरोगी ठेवणं हे अधिक महत्वाचं नाही का? एखादा रुग्ण Allopathy, Homoeopathy किंवा आयुर्वेद यापैकी कोणत्याही उपचाराने बरा होत असेल तर त्या त्या डॉक्टरांनी समन्वय साधण्यात काय हरकत आहे. रुग्ण पूर्ण पणे बरा होणं हेच कोणत्याही वैद्यकशास्त्राच्या डॉक्टरांच ध्येय असतं. मला माहितीय हा समन्वय होणं खूप अवघड गोष्ट आहे पण यातल्या त्रुटी लक्षात घेऊन त्यावर तोडगा काढून प्रयत्न करायला काय हरकत आहे.

          आज रुग्णांचा Allopathy औषधांकडे कल जास्त आहे. त्यामुळे प्रत्येक BAMS किंवा BHMS डॉक्टर पुढे जावून Allopathy Practice करण्यासाठी intership मध्ये बरीच मेहनत घेतात, रात्रंदिवस हॉस्पिटलच्या casuality मध्येच काढतात. एवढं करून सुद्धा allopathy मध्ये master असलेल्या डॉक्टरांएवढं Knowledge आम्ही नाही मिळवू शकत हे सत्यच आहे. पण आम्ही मिळवलेल्या कौशल्यामुळे अत्यावश्यक प्राथमिक उपचार देऊन रुग्णांचे प्राण आम्ही नक्की वाचवू शकतो हे ही तितकच सत्य आहे. आज खेड्यात practice करायला कोणी तयार नाही. यातला अजुन गमतीचा भाग म्हणजे खेड्यात राहणाऱ्या डॉक्टरला कोणी मुलगी द्यायला पण तयार नाही. असं असताना सुद्धा BAMS किंवा BHMS डॉक्टर्स मिळविलेल्या कौशल्याचा वापर करून खेड्यात राहून खेड्यातील रुग्णांना योग्य सेवा देण्याचं काम करतात, त्यांची गैरसोय दूर करतात. तरी सुद्धा BAMS, BHMS डॉक्टरांना दुय्यम दर्जा देणं हे चूकीच आहे. जगातल्या कोणत्याही डॉक्टरांना आपला रुग्ण बरा व्हावा असचं वाटत असतं आणि त्यासाठी ते अतोनात प्रयत्न ही करत असतात. BAMS डॉक्टर्स सुद्धा त्यांच्या कडे आलेला रुग्ण बरा होण्यासाठीच प्रामाणिक प्रयत्न करत असतात. पण खरंतर जसं काही आजारात Allopathy उपचारा शिवाय पर्याय नसतो तसंच काही आजारात आयुर्वेद किंवा Homoeopathy उपचारा शिवायही पर्याय नसतो. त्याठिकाणी MBBS, BAMS किंवा BHMS डॉक्टरांनी त्या त्या रुग्णांना योग्य उपचार पद्धतीचा सल्ला देणं गरजेच आहे. तरच आयुर्वेद आणि Homoeopathy चा दर्जा वाढेल असं मला वाटत. आज रुग्णांचा प्रत्येक आजारासाठी Allopathy कडे असणारा कल पाहता BAMS आणि BHMS डॉक्टरांनी आयुर्वेद आणि Homoeopathy चा दर्जा वाढवून रुग्णांना योग्य दिशा देण्याचं काम केलं पाहिजे. तरच आजची ही परिस्थिती बदलेल. आणि आपल्या “A” for आयुर्वेदाला आणि पर्यायाने BAMS डॉक्टरांना उत्तम दर्जा आणि राजाश्रय मिळेल.


टीप – या लेखामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी क्षमा मागतो. माझंच मत योग्य आहे असं मी अजिबात म्हणत नाही. मला जे जे वाटल ते ते मी लिहीलं आहे. काही गोष्टी चुकल्या सुद्धा असतील. तरी पण कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व.

-    डॉ. संदीप सोमेश्वर टोंगळे.


Friday, April 7, 2017

सांग रे माणसा, मी वागू तरी कसा?


ऊन तापलय,
सूर्य राग व्यक्त करतो आहे,
तरी पण माझ्यामुळे,
सावलीत तू लपतो आहे,
ही चूक तुझीच,
पण सहन मी करतो आहे,
तू केलेली वृक्षतोड,
हफ्त्याहफ्त्याने भरतो आहे.

तरी पण मला संपविण्याचा,
घेतला आहेस तू वसा,
सांग रे माणसा, मी वागू तरी कसा?

तुझाच हट्ट,
इथे इमारतच हवी,
तिथे रस्ता
आणि तिथे घरच बांधावी,
तूच नेता,
तूच डॉक्टर, इंजिनीयर भावी,
माझं अस्तित्व,
फक्त राहिलंय गावी.

माझी झाड, फुल, पानं,
रडू लागलीत ढसाढसा,
सांग रे माणसा, मी वागू तरी कसा?

झाडे लावली,
पण माझी जमीन पाण्यावाचून मरते आहे,
या परिणामांचे,
तुम्हीच सारे कर्ते करविते आहे,
आजची कथा,
तीच उद्याची व्यथा ठरते आहे,
माझी नदी,
तुझ्याच पापाचं व्याज भरते आहे.

तुझ्या या वागण्यामुळे,
मी जगतोय कसा बसा,
सांग रे माणसा, मी वागू तरी कसा?

तुझंच विश्व,
त्यात रममाण झालास तू,
माझ्या सान्निध्याचा,
सुंदर क्षण विसरून गेलास तू,
मला (निसर्गाला) सोडून,
माझं अस्तित्व मोडून पुढे गेलास तू,
या वैज्ञानिक जगात,
खरंच प्रगत झालास तू?

मला वाचवा, मला वाचवा असं म्हणून,
आता बसलाय माझा घसा,
सांग रे माणसा, मी वागू तरी कसा?

अतिवृष्टी, अनावृष्टी, वादळ, भूकंप,
या रूपाने मीच तुझ्यावर रागावतो आहे,
निसर्गाचा कोप,
असं म्हणून तू चुकीची समजूत करून घेतो आहे,
तू मला,
आजकाल परक्या सारखं वागवतो आहे,
माझी तहान,
तुझ्यासाठी मी थेंबाथेंबाने भागवतो आहे.

विसरलास तू आपला ससा (सर्व प्राणी),
कापूस पिंजून ठेवलाय जसा,
सांग रे माणसा, मी वागू तरी कसा?

मी ठरवलंय,
आता शिकवायचाय तुला धडा,
भरलाय आता,
तुझ्या पापाचा घडा,
असं ठरवतो नेहमी,
पण वाटत माझाच भाग तू,
तुझ्याशी कसला रे लढा,
कधी तरी शिकशीलच की,
तू या निसर्गाचा धडा, या निसर्गाचा धडा.

कधी न कधी तुझ्या मनात,
माझ्या सुंदर अस्तित्वाचा उमटवीनच मी ठसा,
सांग रे माणसा, मी वागू तरी कसा?
सांग रे माणसा, मी वागू तरी कसा?

- डॉ. संदीप सोमेश्वर टोंगळे.

Monday, March 27, 2017

हरवलेला "डॉक्टर काका"


          मागे एकदा मी एका बँकेचा account opening form भरत होतो. तो फॉर्म भरता भरता एक कॉलम आला त्यात मला माझा व्यवसाय लिहायचा होता. मी क्षणभर विचार केला आणि "डॉक्टर" असं लिहिलं. आता तुम्हाला वाटतं असेल 'यात विचार करून लिहिण्यासारखं काय आहे......? डॉक्टर आहे म्हणल्यावर लगेच डॉक्टरच लिहून टाकायचं, दवाखाना चालवणारा डॉक्टर हा व्यवसायच आहे ना.......?' पण मी क्षणभर जो विचार केला त्यात मला वाटलं की डॉक्टर हा व्यवसाय नसून सेवा आहे आणि सेवा हा कॉलम इथे कुठे दिसत नाही. म्हणून मग मी त्या कॉलम मध्ये डॉक्टर लिहून "व्यवसाय" हा शब्द खोडुन त्याठिकाणी "सेवा" असं लिहिलं आणि फॉर्म जमा केला. पण नेहमीप्रमाणे माझ्या डोक्यात वेगवेगळ्या विचारांची चक्र सुरु झाली. कधी काळी रुग्ण हे डॉक्टरला जवळजवळ देवासारखे मानत असायचे. तेव्हा "फॅमिली डॉक्टर" ही संकल्पना होती आणि हा फॅमिली डॉक्टर फक्त कुटुंबाचा डॉक्टरच नसायचा तर वडीलधा-या आजोबांचा मित्र, समवयस्कांचा सल्लागार आणि लहान चिमुकल्यांचा "डॉक्टर काका" सुद्धा असायचा. डॉक्टरची फी त्या काळातही दिली जायची. पण ते नाते दुकानदार आणि ग्राहक असे मुळीच नव्हते. त्या नात्यात एकमेकांबद्दल खरेपणा आणि जिव्हाळा होता. आज प्रत्येक क्षेत्राचे व्यावसायिकरण होत चाललंय, पण वाईट याचं वाटतं की त्यात "डॉक्टरकी" सुद्धा मागे नाही. आज "डॉक्टरकी" कडे एक व्यवसाय म्हणूनच खूप जण पाहतात. आज डॉक्टर आणि रुग्ण यांच्या सुंदर नात्यातला खरेपणा आणि जिव्हाळा यांचा बळी देऊन आपण हे व्यावसायिकरण का करतोय? हा प्रश्न पडतोय. डॉक्टर आणि रुग्ण यांचे नाते अगदी कायद्याने दुकानदार आणि ग्राहकाचे करून आपण या नात्यातला ओलावाच नष्ट केला आहे का? डॉक्टरांना अमानुष मारहाण करणं चुकीचंच आहे पण अशी मनःस्थिती आणि परिस्थिती का निर्माण होतेय हे ही जाणून घेतलं पाहिजे ना......? खरंच "डॉक्टरकी" हा व्यवसाय आहे की सेवा? याचा कुठेतरी आज विचार करण्याची वेळ आली आहे. समाजाला आरोग्यासोबत नितीमूल्याचे धडे देणारा, लहान मुलांना कडू औषधांसोबत चॉकलेट देणारा "डॉक्टर काका" आज कुठेतरी हरवला आहे, त्यालाच शोधण्यासाठी हा लेख प्रपंच......

          आजच्या या विचित्र स्पर्धात्मक युगात आपण नको त्या गोष्टीची स्पर्धा करू लागलोय, आधी मार्क मिळविण्यासाठी स्पर्धा आणि आता पैसे कमविण्यासाठीची स्पर्धा. ही स्पर्धा अगदी जोमाने सुरु आहे. पण "डॉक्टरकी" हा वैद्यकीय "व्यवसाय" म्हणून या स्पर्धेत भरडला जातोय याचं खरंच वाईट वाटतं. "डॉक्टरकी" हा व्यवसाय नाही सेवाच आहे असं मी ठासून सांगतोय खरं पण अनेकांच्या मनात वाटतं असेल की मग आम्ही डॉक्टरांनी नुसती सेवा केली तर आमचा उदरनिर्वाह कसा होणार? आणि कुटुंब तरी कसं चालणार? डॉ. प्रकाश बाबा आमटे, डॉ. नरेंद्र दाभोळकर अशी कितीतरी नाव आज आपण आदराने घेतो. त्यांचीही कुटुंब व्यवस्थित चालली आहेतच की, आणि उदरनिर्वाहात तरी कुठे कमी आहे. उलट आम्हीच सर्व डॉक्टर कमी पडतोय आमच्या मानसिकतेत...... हो खरंच आमच्या मानसिकतेत बदल हवा आहे. खरंतर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासूनच मानसिकता बदलू लागते. वैद्यकीय प्रवेशापासूनच जो पैशाचा हिशोब सुरु होतो तो कधी नंतर संपताना दिसतच नाही. मग पुढे जाऊन निष्कारण पैसे कमवायच्या स्पर्धेत त्या हिशोबाच्या पाठीमागे मृगजळाचा शोध घेत प्रत्येक डॉक्टर धावतो. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून शिक्षण पूर्ण होई पर्यंत तिथे सेवाभाव, समाज बांधिलकी कोणी शिकवत नाही, त्यामुळे मानसिकता नंतर वेगळ्या दिशेने बदलत जाते, त्या मृगजळाचा शोध घेत...... अति पैशे कमविण्याच्या अतिहव्यासापोटी मेडिक्लेम कंपन्यांना फुगवून बिले देणे, खोटे मेडिक्लेम तयार करणे, खोटी कागदपत्रे बनवून देणे, स्त्रीभ्रूणहत्येसारखं पाप करून अनैतिक मार्गानी पैसा मिळवणे, स्त्रीगर्भाची हत्या करून ते खाण्यासाठी कुत्रे पाळणे किंवा ती अर्भके पुरणे या आणि अशा कितीतरी वाईट गोष्टींच्या दिशेने काही डॉक्टरांची मानसिकता बदलत चाललीय आणि समाजातली विश्वासार्हता गमावून डॉक्टर-रुग्ण संबंधात शेवटी बाधा येऊ लागलीय आणि याच कारणामुळे आजकाल डॉक्टरांवरील विश्वास कमी होऊन सामाजिक उद्रेक होताना दिसतोय. त्यात रुग्ण आणि डॉक्टर दोघेही होरपळले जात आहेत.

          डॉक्टर-रुग्ण संबंध तणावपूर्ण होण्यात खरंतर दोन्ही बाजू कारणीभूत आहेत. एकीकडे डॉक्टरकी च व्यावसायिकरण आणि दुसरीकडे रुग्णाच्या नातेवाईकांचा गरज नसलेला अतिभावनिक उद्रेक. 'टाळी एका हाताने कधीच वाजत नसते.' रुग्ण आणि डॉक्टर यांच्या संवादात, व्यवहारात पारदर्शकता असायलाच हवी. रुग्णांनी डॉक्टरांना आपल्या आजाराविषयी, केलेल्या तपासण्याविषयी, घेतलेल्या दुसऱ्या डॉक्टरच्या सल्ल्याविषयी प्रामाणिक पणे सांगणं गरजेचं आहे आणि तितक्याच आत्मीयतेने डॉक्टरनी सुद्धा रुग्णाला आश्वस्थ करणं गरजेचं आहे. संवादात आणि व्यवहारात अशी पारदर्शकता आली तर अविश्वास आणि उद्रेकाला जागाच राहणार नाही. पारदर्शकता जशी डॉक्टरांकडून अपेक्षित आहे तशी रुग्णांकडून पण आहे. रुग्णाच्या अज्ञानाचा डॉक्टरांनी गैरफायदा घेऊ नये आणि रुग्णांनीही डॉक्टरांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये. रुग्ण आणि डॉक्टर यांच्या नात्यामध्ये तारतम्य, समजूतदारपणा, आस्था, सबुरी, विश्वास आणि माणुसकीची गरज आहे. आपला भारतीय समाज अतिशय भावना प्रधान आहे. आपल्या देशात कोणत्याही व्यक्तीला किंवा कोणत्याही विषयाला एकतर डोक्यावर घेऊन नाचतात किंवा पायदळी तुडवून नामोहरम करतात. अधे मधे काही नसतं, चांगला असो किंवा वाईट असो उद्रेक नेहमी टोकाचाच असतो. त्यामुळे एकेकाळी नोबेल सर्विस मानली जाणारी वैद्यकीय सेवाच आज व्यावसायिकरणाच्या विचित्र मायाजाळात अडकल्यामुळे आरोपीच्या पिंजऱ्यात उभी आहे. आपण सर्वजणच कोणत्याही विषयाकडे शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून कधीच पहात नाही, नेहमीच कोणत्याही गोष्टीसाठी भावनांचा आधार घेऊन मूल्यमापन करून निर्णय घेण्याची घाई करतो. शास्त्रीय दृष्टिकोनाचा अभाव आणि निर्णयाची भावनिक घाई यामुळे हा उद्रेक होतोय आणि या झालेल्या उद्रेकात आपण सर्व समाज घटकच बळी पडतोय हे कोणाच्याच लक्षात का येत नसेल याचंच आश्चर्य वाटतं.

          जगातल्या कोणत्याही डॉक्टरला आपला रुग्ण बरा होऊ नये असे कधीच वाटत नसते, किंबहुना रुग्णाच्या उपचारात औषधांचा अपेक्षित परिणाम दिसला नाही तर आम्ही डॉक्टरसुद्धा रुग्णाच्या नातेवाईकांइतकेच अस्वस्थ असतो, पण ते आम्ही कोणालाच सांगू शकत नाही, ही खरी वस्तुस्थिती आहे. वैद्यकीय महाविद्यालयात आम्ही शिकलेले वैद्यकशास्त्र सामान्य माणसाला कळेल अशा बोलीभाषेत कसे सांगावे, हे सुद्धा आम्हाला कोणी शिकवत नाही, ते आम्हाला रुग्णांच्या अनुभवातून अवगत होत जात. संभाषणकला अवगत करणे, ऐकून घेण्याची कसब शिकणे, संयम वाढवणे, रुग्णाच्या सहवेदना जाणून घेणे, रुग्णाने सांगितलेल्या माहितीतून कशाला महत्त्व द्यायचे याची बौद्धिक चाळणी लावणे या गोष्टी अनुभवातूनच आत्मसात कराव्या लागतात. या आम्हाला कोणी शिकवत नाही. खरंतर आमच्या कडे येणारे रुग्णच कळत नकळत आम्हाला या गोष्टी शिकायला मोलाची मदत करतात. रुग्ण आणि डॉक्टर यांच्या नात्यातल्या जिव्हाळ्यामुळे बऱ्याच गोष्टी आम्हा डॉक्टरांना शिकता येतात आणि त्याचा फायदा बाकी रुग्णांना ही होतो ही या नात्यातली जमेची बाजू आहे. कधी कधी डॉक्टरांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि अतिरिक्त ताणतणावामुळे रुग्णांना डॉक्टरच्या रागाला ही सामोरे जावे लागते आणि कधी कधी रुग्णांचा संयम सुटला की त्याचा फटका डॉक्टरलाही बसतो. इथे दोन्ही बाजूने एकमेकांची मानसिकता समजून घेण्याची गरज आहे. कारण अशावेळी उद्रेक झाला की मग स्फोट होतो. डॉक्टर व रुग्ण यांच्या नात्यातला जिव्हाळा तसाच जपायचा असेल तर त्यांच्यातला सुसंवाद फार महत्त्वाचा आहे. रुग्णाचं दृश्य शरीर व अदृश्य मन या दोन्हींचा विचार करून सुयोग्य संवाद व स्वच्छ व्यवहाराद्वारे डॉक्टरांनी रुग्णाला आश्वस्थ करणं गरजेचं आहे. आणि रुग्णांनीही प्रामाणिकपणे आपल्या आजाराविषयी माहीती सांगून आणि संयम ठेवून समजून घेणे गरजेचे आहे. प्रत्येक डॉक्टरांना प्रत्येक वेळी हे जमेलच असंही नाही पण त्या दृष्टीने आपण प्रामाणिक प्रयत्न मात्र नक्की करू शकतो. चला तर आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूयात आपल्या आतला हरवलेला तो "डॉक्टर काका" शोधण्याचा.......

- डॉ. संदीप सोमेश्वर टोंगळे.

Thursday, March 23, 2017

"भारतीय"


          आपला देश स्वातंत्र्य झाला आणि तेव्हाच आपल्या या देशाचे सर्व नागरिक “भारतीय” या नावाखाली स्वतंत्र झाले. त्यानंतर या सार्वभौम राष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आणि समुदायाच्या भल्यासाठी भारतीय संविधानाने सात मुलभूत अधिकार देशाच्या प्रत्येक नागरिकाला प्रदान केले. “अभिव्यक्ती स्वातंत्र्य” हा त्या सात मुलभूत अधिकारांपैकी एक अधिकार. हा लोकशाही मुल्यांवर आधारित मुलभूत मानवी अधिकार आहे. स्वतःच्या मनातील विचार, संवेदना आणि भावना व्यक्त करता येण्याचं स्वातंत्र्य म्हणजेच “अभिव्यक्ती स्वातंत्र्य”. आणि हे आपल्या संविधानाने प्रत्येक “भारतीय” नागरिकाला बहाल केलं आहे. संवेदना आणि भावना व्यक्त करण्याची प्रेरणा तर प्रत्येक सजीवाला जन्मतःच मिळालेली नैसर्गिक देणगी आहे. पण बुद्धी कौशल्य असलेल्या मानवाला विचार व्यक्त करण्याचं, आपल मत मांडण्याचं स्वातंत्र्य आपल्या संविधानाने “भारतीय” या नावाखाली प्रत्येक नागरिकाला प्रदान केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात या सार्वभौम राष्ट्राची राज्यघटना लिहिली गेली. त्या द्वारे भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित केलं गेलं. ज्या देशात अनेक जाती, धर्म, पंथाचे लोक आणि विविध संस्कृत्यांचे समूह एकत्र येवून गुण्यागोविंदाने नांदतील अशा भव्य भारतीय देशाची कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिताना नक्कीच केली असेल. तेव्हाच्या सर्व भारतीयांनी एका सुराज्याची कल्पना करत देशाच्या सर्वांगीण विकासाचं ध्येय बाळगलं असेल. पण आजची परिस्थिती त्या ध्येयाला अनुरूप आहे का......? आपण सर्व “भारतीय” गुण्यागोविंदाने राहतो का......? सामाजिक सलोखा जपतोय का......? स्वातंत्र्य मिळवून आपण मुलभूत अधिकार आणि हक्क मिळवले खरे, पण देशाप्रती असलेल्या कर्तव्यापासून आपण लांब का पळतोय......? संविधानाने दिलेल्या मुलभूत अधिकारांची, हक्कांची आठवण आपल्याला वेळोवेळी (अवेळी) होते पण मुलभूत कर्तव्यांची जाणीव आपण योग्य वेळी आली की का विसरून जातो......?

          मित्रांनो, माझ्या नेहमीच्या सवयी प्रमाणे माझ्या डोक्यात अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ उठले. आणि कुठलेही मोहोळ उठले, की अंगावर (मनावर) डंक मारणाऱ्या माश्यांपासून पळ काढून प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या सोयीनुसार सुखरूप सुटत असतो. तशी काहीशी माझी ही अवस्था झाली होती. पण मी विचार केला, की डोक्याला या सतावणाऱ्या प्रश्नांची सवय लागलीच मुळी कशासाठी......? खरतरं या आणि अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीच हा लेख प्रपंच (ब्लॉग) सुरु केला आहे आणि तो ही आपल्याला “भारतीय” म्हणून मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळेच...... मग या प्रश्नांपासून (डंक मारणाऱ्या माश्यांपासून) आपण पळ का काढायचा......? त्यांच्याशी सामना केला तर आणि तरच उत्तरं मिळतील. हो ना......? त्या माशा तर डंक मारणारच त्यांचं ते कर्तव्यच आहे. पण आपण सारे “भारतीय” मात्र आपली कर्तव्य विसरत चाललोय. “भारतीय” म्हणून नागरिकाचं कर्तव्य, माणूस म्हणून माणुसकीचं कर्तव्य, लोकशाहीचा राजा म्हणून मतदानाचं कर्तव्य...... खरंच आपण आपली ही सगळी कर्तव्य विसरत चाललोय. मानवी मुलभूत हक्कासाठी आपण रस्त्यावर उतरतो, आंदोलन करतो, मोर्चे काढतो, सत्याग्रह करतो, उपोषण करतो, पण कधी आपण आपल्या कर्तव्यासाठी रस्त्यावर उतरलोय का? कर्तव्यात कमी पडलो म्हणून उपोषण केलंय का? आंदोलन, मोर्चे, सत्याग्रह, उपोषण फक्त हक्कासाठी...... आणि कर्तव्यासाठी......? काहीच नाही...... आपल्या स्वतःच्या घरात आपण आपल्या हक्कासाठी भांडतो, आपल्याला पाहिजे ते मिळावे म्हणून अडून बसतो, वादविवाद करतो पण त्याच सोबत आपण आपली घरातली सगळी कर्तव्य, जबाबदाऱ्या अगदी चोख पार पाडत असतो. घरातल्या हक्कासाठी जेवढा हट्ट करतो तेवढयाच अट्टाहासाने आपण घरातली कर्तव्य पण पार पाडतोच, मग तसचं जर आपण आपल्या देशाच्या बाबतीत विचार केला आणि घराप्रमाणेच देशासाठीची सगळी कर्तव्ये पार पडली तर घटनाकारांना, स्वातंत्र्यवीरांना तीच खरी श्रद्धांजली असेल आणि तेव्हाच आपण स्वतःला “भारतीय” म्हणवून घ्यायला लायक असू.

          आज आपल्या देशातली आणि आपल्या सभोतालची परिस्थिती जर पाहिली तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क दाखवताना आपण स्वतःला “भारतीय” म्हणवून देशाप्रती जबाबदारीची भावना (Sense of Responsibility) मनात न ठेवता कितीतरी बेताल वक्तव्य करतोय हे लक्षात येऊन जात. मी कोणावर टीका करत नाहीये आणि टीका करण्या इतका मी मोठा पण नाहीये. पण आज जर आपल्या देशावरच चुकीची टीका होऊ लागली असेल तर माझ्यासारखे “भारतीय” शांत तरी कसे राहू शकतील...... अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आपापल्या सोयीनुसार देशाविरुद्धची वक्तव्य करून आपण नेमकं काय साधण्याचा प्रयत्न करतोय हेच लक्षात येत नाही? आपण आपल्या घरात सुद्धा अशीच बेताल वक्तव्य करतो का? नाही ना? अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे आपण आपले विचार, आपलं मत मांडू शकतो हे जरी खर असलं तरी आपलं मत मांडताना जबाबदारीची भावना असायला हवी. आपल्या देशाच्या लोकतांत्रिक प्रमुखांबद्दल आपण आपलं परखड मत मांडू शकतो तेही या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळेच. पण देशाबद्दलचा स्वाभिमान आणि जबाबदारीची भावना मनात जर ठेवली तर अशी वक्तव्य आपण नक्कीच करणार नाही. आज काल आपल्या मानसिकतेवर संशयाचं भूत बसलंय. पंतप्रधानापासून सामान्य जनतेपर्यंत सर्वांवर संशय घेतला जातोय आणि विशेष म्हणजे त्यातून भारतीय लष्कर सुद्धा वाचलेलं नाही. आता तर सर्वात मोठी लोकशाही नियंत्रित करत असलेल्या भारतीय निवडणूक आयोगावरच संशय घेतला गेला. आपल्या सद्सदविवेकबुद्धीचा वापर करून आपण नेमकं कोणावर, कशावर आणि का संशय घेतोय याचा विचार करायला सुद्धा आपण तयार नाही. पण आता हे आपल्या मनातलं काळाने जन्माला घातलेलं संशयाचं भूत कुठल्याच बाटलीत बंद करता येत नाही, अशी आपली सर्वांचीच गोची झालीय. त्यामुळे फार गंभीर गोष्टी आपल्या डोळ्यासमोर घडून सुद्धा त्याच गांभीर्य जाणवत नाही. सभोवताली गर्द काळोख असला तरी थोडा वेळ एकटक बघत राहिल्यावर त्या अंधारातल्या गोष्टी सुद्धा स्पष्ट दिसू लागतात. पण आपल्या कडे तेवढा सुद्धा वेळ नसतो आणि लगेच संशय घेवून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली चुकीचं वक्तव्य करून आपण मोकळे होतो.

          आपल्या देशातली सहिष्णुता ही असहिष्णुतेच्या हातात हात घालूनच चालत आहे. पण फरक इतकाच आहे कि देशातली सर्वसामान्य जनता, ज्यांना शांततेत जगायचं आहे ते सतत सहिष्णुता दाखवतात आणि ज्यांना मानवी समूह-गटातटात आपलं वर्चस्व दाखवून सत्तेसाठी राजकारण करायचं आहे ते कायम असहिष्णू वर्तन करतात. रस्त्यावर भाजी विकायला बसणाऱ्या एक गरीब माणसाला या तुमच्या असहिष्णुतेशी काही देणं घेणं नसतं पण दहा-दहा अंगरक्षक घेवून सतत परदेश वाऱ्या करणाऱ्या लोकांना आपल्या देशात असहिष्णुता जाणवते आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ज्यांची बेताल वक्तव्य जगप्रसिध्द आहेत त्यांना या देशातल्या असहिष्णुतेचा त्रास होतो याच खरंच नवल वाटत. आपण आज महासत्तेच्या जवळ आहोत पण आपली मानसिकताच बदलत नसेल तर त्या महासत्ता होण्याचा काय उपयोग...... आजकाल तर आपली मानसिकता फक्त स्थानिक सत्तेच्या राजकारणात केंद्रित झालीय. जी काही अस्मिता, स्वाभिमान आहे ते सगळ फक्त स्थानिक राजकारणासाठी वापरलं जात पण देशाची अस्मिता, देशाचा स्वाभिमान यात मात्र आपणच “भारतीय” म्हणून कमी पडतो हे नक्की. त्यासाठी आपला विवेक जागा झाला पाहिजे. कोणतही राजकारण असो, हा आपल्यासाठी क्षणिक विषय असतो म्हणून आपण सदसदविवेकबुद्धीचा वापर करून देशाची अस्मिता कायम जपली पाहिजे. अलीकडे राजकारणात जनतेसाठी पारदर्शकतेचा दावा केला जातो पण सगळीच गुपितं उघडी झालेली कुठल्याही सत्तेला नको असतात. जनता खूप शहाणी व्हावी आणि तिला सगळं कळावं असं जगातल्या कुठल्याही सत्तेला, सत्ताधाऱ्याला किंवा विरोधकाला सुद्धा वाटत नसतं. विरोधक सत्ताधाऱ्यांची गुपित सांगून जनतेला सत्य सांगितल्याचा दावा करतात पण ते सुद्धा त्यांना पुढे सोयीचं ठरेल इतपतच सत्य सांगत असतात. त्यामुळे मला एवढच म्हणायचं आहे की कोणाच्या सहिष्णू किंवा असहिष्णू (अ)पारदर्शक वक्तव्याबद्दल वाईट वाटून घेण्यापेक्षा आपण सर्व “भारतीय” जनतेने आपला विवेक जागा ठेवुन सतर्क राहणं गरजेचं आहे.

          एक जुनी रूपक कथा आहे, शंकर भगवान आणि शेतकऱ्या बद्दलची. मला ती येथे सांगावीशी वाटतेय, एकदा पृथ्वीवर खूप अनाचार माजतो त्यामुळे शंकर भगवान संतप्त होतात. त्यावेळी प्रथाच असायची की शंकराने शंख वाजविला तरच पाऊस पडायचा. पण या वेळी शंकर भगवान ठरवतात की, जोपर्यंत ही दुष्ट दुनिया सुधारणार नाही तोपर्यंत मी शंख वाजवणार नाही आणि शंख वाजवला नाही तर पाऊस पडणार नाही. मग शंकर भगवान शंख वाजवीत नाहीत मग त्यावर्षी पाऊस पडत नाही. पुढच्यावर्षी ही तसंच होतं आणि अशी वर्षामागून वर्ष जातात पण शंकर भगवान चा शंख काही वाजत नाही. पृथ्वीवर दुष्काळ पडतो, जमीन अगदी दगडासारखी टणक होते. पृथ्वीवर हाहाकार माजतो, लोक प्रायश्चित्त करू लागतात. पण शंकर भगवान ला कसलीही दया येत नाही. एकदा शंकर पार्वती विमानातून जात असताना खाली एका शेतकऱ्याला बघतात. तो शेतकरी भर दुपारी आपल्या शेतात नांगरणी करत असतो. त्याच उघडबंब शरीर घामाने ओलचिंब झालेलं असतं. मात्र तो स्वतःच्याच विश्वात रममाण होऊन नांगर चालवत असतो. जणू काही कालपरवाच पाऊस पडून गेलाय. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते. शंकर भगवान विमानातून उतरून त्याच्या जवळ जातात आणि म्हणतात ‘काय हा मूर्खपणा आहे? कशाला त्रास करू घेतोस? नुसत्या घामाच्या पाण्यावर शेती होत नसते आणि पावसाचं स्वप्न पण बघू नकोस.’ तो शेतकरी एकदाच शंकर भगवान कडे बघतो आणि नांगर चालवणं सुरुच ठेवत म्हणतो, ‘तुमचं बरोबर आहे, पण नांगारण्याची कला विसरू नये म्हणून मी शेत नांगरत आहे. नांगर चालवायचंच विसरलो तर नुसता पाऊस पडून तरी काय उपयोग? नुसती फायद्याची शेती मी करत नाही आणि मेहनतीतून आनंद पण मिळतोच ना......?’ त्याच्या या उत्तराने शंकर भगवान हडबडतात आणि विचार करू लागतात, अरेच्या...! मला पण शंख वाजवून बरीच वर्ष झाली, मी शंख वाजवायची कला विसरून तर नाही ना गेलो...? मागचा पुढचा विचार न करता ते झोळीतून शंख काढतात आणि जोरजोरात फुंकू लागतात. शंखाच्या ध्वनीने ढगांचा गडगडात सुरु होतो आणि मुसळधार पाऊस पडू लागतो. त्या अलोट पाण्याचं स्वागत करायला त्या शेतकऱ्याच्या घामाचे बिंदू आधीच हजर असतात.

          या रूपक कथेत शंकर भगवान यांचा राग, अहंकार आणि त्यांचा निर्दयी निश्चय हे असहिष्णुतेचं एक उदाहरणच आहे असं मला वाटतं. पण त्या शेतकऱ्याने दाखवलेला विवेक हा खरंच मेहनतीचे सार सांगून जातो. हा शेतकरी म्हणजे आपणच आहोत. आपण विचारांची भूमी नांगरत ठेवावी आणि नेहमी सत्याचं पीक घ्यावं. ज्यामुळे आपला विवेक जागा राहील आणि एकदा का आपला विवेक जागा राहीला की देशाबद्दलची अस्मिता पण कायम मनात राहील. आपल्या सर्वांच्याच घरात मोठ्यांचा आदर, सन्मान करायला शिकवलं जातं, आपल्या सर्वांच्याच घरात अडीअडचणी, समस्या असतात त्यावर घरातले सर्व सदस्य एकत्र येऊन तोडगा काढतात, आपल्या सर्वांच्याच घरात भांडणे मतभेद होतात पण त्यावर शांतपणे तोडगा काढला जातो, आपल्या सर्वांच्याच घरात हक्कासोबत जबाबदारीची भावना आणि विवेक जपला जातो मग हे सगळं आपल्या देशासाठी का नाही करायचं......? आपलं घर आपल्याला प्रिय असतं, आणि ते आयुष्यभर राहील याची आपण काळजी घेतो मग देशाबद्दल पण असा विचार केला तर...... मला माहितीय आपल्या घरासारखं एवढ्या मोठ्या देशाचा विचार करणं, आपण प्रत्येकाने त्या सर्व गोष्टी आमलात आणणं खूप कठीण आहे पण अशक्य नक्कीच नाही. आपण हक्काच्या मुद्द्यावर लगेच एकत्र येतो, सर्वांचे विचार ही लगेच जुळतात मग कर्तव्यासाठी आपण नक्कीच एकत्र येऊ शकतो. फक्त आपल्या सद्सदविवेकबुद्धीला जराशी चालना मिळाली की आपल्या मनातली घराबद्दल असणारी अस्मिता नक्कीच देशाबद्दल वाटू लागेल. माझं बोलणं अनेकांना नक्कीच अतिशयोक्तीचं वाटतं असेल पण मला वाटतं आपल्यासाठी, आपल्या देशासाठी ही अतिशयोक्ती करायला काय हरकत आहे. जसं सत्तर वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी झगडलो तसं आज आपला विवेक जागा करून देशाची अस्मिता जपण्यासाठी आपण सर्व "भारतीय" मिळून झगडु. आपल्या सर्वांचं राज्य वेगळं, आपलं गावं वेगळं, आपलं घर वेगळं, आपला धर्म-जाती वेगळ्या, आपली विचारसरणी, संस्कृती वेगळी आहे, पण हे सगळं जरी वेगळं असलं तरी आपण सर्व "भारतीय" म्हणून एकच आहोत आणि एकच राहू.

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Monday, February 27, 2017

"मराठी"


जन्म घेतला ज्या मातीत
ती आयुष्याची सुरुवात मराठी......

बोललो शब्द पहिला
ती बोबडी बात मराठी......

चाललो पकडून हात
ती लाभली साथ मराठी......

चांदोमामा च्या सोबतीत गेली
ती चांदणी रात मराठी......

गुणगुणलो जे पहिले गीत
ते सुरेल गात मराठी.......

गुरुजनांनी शिकवला पाठ
तो पहिला पाठ मराठी......

आई वडिलांनी दाखवलेली
ती माणुसकीची वाट मराठी......

आयुष्याच्या सुंदर वळणावर
ती अंगावर चढवलेली कात मराठी......

विसरून साऱ्या जाती पाती
ती लक्षात ठेवली जात मराठी......
ती लक्षात ठेवली जात मराठी......

आपल्या सर्वांना मराठी भाषा दिनाच्या मराठीमय शुभेच्छा

- डॉ. संदीप सोमेश्वर टोंगळे.

Tuesday, February 14, 2017

“मी एक कार्यकर्ता”


          होय... “मी एक कार्यकर्ता” आहे... गेले कित्येक दिवस, कित्येक महिने, कित्येक वर्षे झाली मी त्याचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय. दिवस रात्र एक करून त्याच्या म्हणण्याप्रमाणे राबतोय. तो म्हणेल त्या वेळी, तो म्हणेल त्या क्षणी दिलेलं काम पूर्ण करतोय. त्याने माझ्या सगळ्या वेळा ठरवून ठेवल्यात... त्याच्यात इतकी समयतत्परता आहे कि तो कोणासाठीच थांबत नाही. माझ्या प्रत्येक तासाचा, प्रत्येक मिनिटाचा, प्रत्येक सेकंदाचा हिशोब त्याच्या जवळ असतो. आज या संपूर्ण विश्वावर सुद्धा त्याचीच सत्ता आहे. राजा असो, रंक असो, अति उत्साही असो, आळशी असो, मोठा अधिकारी असो किंवा सेवक असो तो कोणासाठीच, कधीच थांबत नाही. तो अगदी ठामपणे आपलं काम निरंतर करत राहतो. मोदी, पवार, गांधी, ठाकरे आणि आणखी असे खूप जण हे सुद्धा त्याचेच कार्यकर्ते आहेत. आश्चर्य वाटलं ना...? इतकचं काय तर तुम्ही सुद्धा त्याचेच कार्यकर्ते आहात. हो... खरच... खरच म्हणतोय मी आपण सर्वच त्याचे कार्यकर्ते आहोत...... ते आहे “घड्याळं”. (हे १० वाजून १० मिनिटाला बंद पडलेलं आणि आपली वेळ चुकवणारं घड्याळं नाही, तर हे आपल्या आयुष्यातली योग्य वेळ सांगणारं घड्याळ आहे.) हो हेच घडयाळ आपलं सर्व काही ठरवते. पण आपण मात्र त्याच्या प्रमाणे काहीच ठरवत नाही. कोणाचा तरी कार्यकर्ता म्हणून राहण्यापेक्षा या घड्याळाचा कार्यकर्ता बनुन, आपल्यातल्या क्षमतेचा वापर करून निरंतर काम करत राहीलं तर निश्चितच यश आपल्या प्रत्येकाला मिळू शकतं. विराट क्षमतेचा अमृत कलश आपल्या प्रत्येकाकडे असतो पण त्या कलशाचं झाकण उघडायलाही अनेकांकडे वेळ नाहीये. या क्षमतेचा योग्य उपयोग करून आणि घड्याळाचा कार्यकर्ता बनुन जर आपण आपलं चांगलं काम करत राहिलं तर नक्कीच एक उत्तम आणि यशस्वी आयुष्य आपण जगू शकतो.

          पण याच घड्याळाची वेळ निघून चाललीय हे सांगणारी टिकटिक ऐकताना सुद्धा आपल्या पैकी अनेकजण बेसावध असतात. काही जणांकडे यासाठी वेळच नसतो. आपल्या कडे असणाऱ्या क्षमतेचा योग्य उपयोग करून आयुष्य फुलवायला ही अनेकांकडे वेळ नाही. आपल्यापैकीच खूप जणांचं आयुष्य असंच दोन बोटांच्या फटीतून वाळूसारखं निसटून चाललंय. पण हे असं आयुष्य निसटून जात असताना आपण या घड्याळाची वेळ सांगणारी टिकटिक ऐकतोय का, हे ही सावधपणे जाणून घेतल पाहिजे. आपण “यशाचं लोणी” मिळेल या प्रयत्नात असताना नेमकं “ताक”च घुसळतोय कि फक्त पाणी हे तरी नीट बघितलं पाहिजे ना...? आपल्या आत असणाऱ्या क्षमतांचा योग्य दिशेने वापर नाही केला तर कष्टाला फळ मिळेल तरी कसं...? एका छोट्याशा बी मध्ये सुद्धा मोठा वटवृक्ष तयार करण्याची सुप्त क्षमता असते. पण ते योग्य पद्धतीने जमीनीत पेरलं गेलं तरच कालांतराने वटवृक्ष तयार होईल हे ही वेळेवर समजून आणि उमजून घेता आलं पाहिजे. सर्वांसाठीच वेळ नेहमीच निघून जात असते आणि परत येत ही असते. पण वेळीच येणारी योग्य वेळ ज्याला योग्य वेळेवर जाणवते आणि त्याचा योग्य वापर जो करतो तोच यशस्वी होऊ शकतो. या आयुष्याला नव्या आशेची आणि यशाची किनार देणारी आपल्यात असणारी सुप्त कर्तृत्व क्षमता, या घड्याळाचा वेग, त्याच निरंतर पुढे जाणं आणि कधीतरी ते आपल्या पुरतच थांबणार आहे हे सगळं जाणून घेऊनच आपण आपल्या आयुष्यात पावलं उचलली पाहिजेत, तरच जगण्यात एक वेगळी मजा आहे.

          One who takes time Seriously, Time takes them Seriously. या जगात आपण जमीन, पाणी, सूर्यप्रकाश आणि वेळ या गोष्टी निर्माण करू शकत नाही. म्हणून आलेली वेळ लक्षात घेवून त्याचा कटाक्षाने वापर करायला शिकलं पाहिजे. काही लोकं म्हणतात कि “मला श्वास घ्यायला ही वेळ नाही”. त्यांच्याकडे वेळ नाही म्हणजे त्यांना त्यांच्याकडे वेळेच अजिबात नियोजन नाही अस म्हणायचं असतं बहुतेक. कारण या जगात फक्त थडग्यात पडलेला मृतदेह जर सोडला तर बाकी प्रत्येकाला वेळ असतोच असं माझं मत आहे. कारण जिवंत माणसाने वेळेचं योग्य नियोजन केलं तर चांगल्या गोष्टीसाठी वेळ नक्कीच मिळू शकतो. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात वेळेच्या नियोजनाला खूप महत्व असलं पाहिजे. जी लोकं वेळेचं योग्य नियोजन करतात तीच लोक त्यांच्या आयुष्यात यशस्वी होतात. आणि यशस्वी होणे म्हणजे नुसते पैसे कमविणे नसते. आज काही लोकं फक्त पैशालाच खूप महत्व देतात. खरतरं आपल्या आयुष्यात पैशापेक्षा वेळेला जास्त महत्व असलं पाहिजे. कारण गेलेले पैसे परत मिळवता येतीलही, पण गेलेली वेळ परत कधीच मिळत नसते. वेळेचा योग्य उपयोग करून पैसे मिळवता येतात, पण पैशाचा उपयोग करून वेळ परत कधीच मिळवता येत नाही. म्हणून मला वाटत आपल्याकडे असणारी योग्य वेळ आणि कर्तुत्व क्षमता जाणून घेऊन योग्य पद्धतीने घेतलेले कष्ट, योग्य दिशेनं जगण्याचा प्रयत्न आणि घड्याळातल्या प्रत्येक वेळेत, प्रत्येक क्षणात लपलेल्या वटवृक्षाच्या बियांचं श्रेष्ठत्व कळण्याची समज हाच खरंतर यशस्वी जीवनाचा मूलमंत्र आहे. पण असं जीवन या घड्याळाचा एकनिष्ठ कार्यकर्ता बनुनच मिळू शकतं. मी या घड्याळाचा कार्यकर्ता बनण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही ही कराल का.....?

- डॉ. संदीप सोमेश्वर टोंगळे.

Monday, February 13, 2017

"बरे वाटले" - कहाणी "इंदोर" ट्रिप ची


पहाटे चा प्रवास
अन रंगणाऱ्या गप्पा
गंमत जम्मत करत
आला नाष्ट्याचा टप्पा
यातल्या विचारांची मेजवानी, खरे वाटले
आपल्याशी सहवास, खूप "बरे वाटले".

चेष्टा मस्करी करत,
पुढचा प्रवास तर भनाट च झाला
डब्बा पार्टीतला एक एक घास,
खरंच मनाला लागून गेला.
किती ते प्रेम, किती तो जिव्हाळा, खरे वाटले
आपल्याशी सहवास, खूप खूप "बरे वाटले".

उज्जैन दर्शन आणि
कालभैरव ची गम्मत,
हे सगळं पहात पहात,
वाढू लागली ट्रिपची रंगत
उज्जैनच्या पाहुण्यांच्या भावना, खरे वाटले
आपल्याशी सहवास, खूप "बरे वाटले".

इंदोर चे सुंदर रस्ते,
आणि conference ची सुंदरता
खाण्याची, विचारांची मेजवानी,
वक्त्यांनी दाखवलेला माणुसकीचा रस्ता
या सर्व वक्त्यांचे विचार खरे वाटले,
आपल्याशी सहवास, खूप "बरे वाटले".

फक्त घेण्याचा मानस,
आणि देण्याची दानत
यातला फरक पक्का बसला
आमच्या सर्वांच्या मनात
आमच्या चुकीच्या विचारांचे कागद टराटरा फाटले,
आपल्याशी सहवास, खूप खूप "बरे वाटले".

आपल्यातला हा जिव्हाळा,
निरंतर असाच रहावा
या ट्रिप ने शिकवलं,
जीवनाचा आस्वाद एकमेका संगे घ्यावा
डोक्यातले चांगले विचार एकमेकास वाटले,
आपल्याशी सहवास, खरंच खूप "बरे वाटले".

धन्यवाद!

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Sunday, January 29, 2017

“आयुष्य १०० दिवसाचं”          अगदी तिशीतला, सांसारिक भावविश्वात गुंतलेला, आर्थिक अडचणीमुळे सतत चिंतेत राहणारा हा तरुण, आज मात्र “तो” खूपच खुश होता. त्याने केलेल्या अविरत कष्टाचं फळ त्याला पदोन्नती आणि पगारवाढ या स्वरुपात मिळालं होतं. आपण आयुष्याची सगळी गणितं अगदी अचूक सोडवली या विचारात तो घरी निघाला. जाताना बायकोसाठी नवीन घडयाळ, आई साठी साडी, मुलांसाठी खाऊ असं बरच काही घेऊन गाडीला किक मारून तो निघाला. जग जिंकल्याचा आनंद आणि घरी लवकर पोहोचून आनंदाची बातमी सांगण्याची ओढ त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. त्याच्या कष्टाचं आज चीज झाल होतं, हा आनंद त्याच्या नसानसात भिनला होता. घरी लवकर पोहोचुन हा आनंद घरच्यांसोबत साजरा करू अस मनातल्या मनात ठरवून गाडीचा स्पीड त्याने आणखीच वाढवला...... पण समोरून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्याच्या आयुष्याची सगळी स्वप्न, जिद्द, भावना, आनंद सगळं सगळं संपवलं. बायकोला घेतलेले नवीन घडयाळ रस्त्यावर पडून फुटून बंदच पडलं, आईची साडी त्याच्याच रक्ताने माखली गेली, मुलांसाठी घेतलेल्या खाऊचा चिखल झाला, लाल चिखल..... सगळा आनंद, सगळी स्वप्न सगळ्या वस्तू अशा क्षणार्धात विखुरल्या गेल्या, चेंदामेंदा झाल्या. नियतीच्या या आघाताने त्याच आयुष्यच संपवलं होतं. असा कितीसं आयुष्य जगला होता तो. निवृत्ती नंतरच्या सुंदर आयुष्याची स्वप्न पाहणारा हा तरुण आज या जगात नव्हता. खरच हे आपलं आयुष्य किती अनिश्चित झालय ना......!

          रोजच्या तणावपूर्ण, चिंताग्रस्त आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अगदी तरुण वयात हृदयविकाराचे झटके, अकस्मात होणारे वाहनांचे अपघात आणि खूप कमी वयात गंभीर आजार उद्भवत आहेत. अशा अकस्मात घडणाऱ्या घटनांमुळे माणसाचं सरासरी आयुष्यमानच कमी होत चाललंय. पण मला वाटत आपण जर तणावमुक्त आयुष्य जगलो तर आपण यातल्या बऱ्याचश्या गोष्टी टाळू शकतो. गोलमाल या हिंदी चित्रपटात एक गाण आहे “अपना हर दिन ऐसे जिओ, जैसे कि आखरी हो, जिओ तो इस पल ऐसे जिओ, जैसे कि आखरी हो”. आपला हा दिवस, हा क्षण शेवटचाच आहे असं गृहीत धरून जर आपण येणारा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण जगला तर हे जग किती सुंदर दिसू लागेल ना......! पण खरतर माणसांच्या स्वभावातील वेगवेगळ्या पैलूमुळे, समोर येणाऱ्या निरनिराळ्या क्षणांमुळे प्रत्येक दिवस असा तणावमुक्त जगणं शक्य नसतं. काही कारणामुळे कधीकधी काही गोष्टीसाठी मानसिक तणाव येतोच त्यामुळे प्रत्येक दिवस तणावमुक्त जगणे हे तसं पाहिलं तर प्रत्यक्षात कठीणच आहे. झी मराठी वर सध्या एक मालिका सुरु आहे “१०० डेज” नावाची. त्यात अजय ठाकूर या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका इतकी सकारात्मक आणि सुंदर रेखाटली आहे कि माणसाच आदर्श जीवन कसं असावं हे त्यातून नक्कीच कळतं. आदर्श मुलगा, आदर्श अधिकारी, आदर्श सहकारी, आदर्श प्रियकर, आदर्श मित्र, आदर्श शेजारी आणि एक आदर्श नागरिक म्हणून त्याचं जे जीवन तो जगतो ते खूप प्रशंसनीय वाटतं. पण शेवटी ते काल्पनिक पात्रच आहे. मालिकेच नाव “१०० डेज” आहे पण खरचं आपण आपलं आयुष्य १०० दिवसच उरलंय अस समजून जर एक आदर्श जीवन जगू लागलो तर कितीतरी समस्यांची उत्तर सहज मिळतील ना......! आणि त्यातून आयुष्यातला अतिरिक्त ताणतणाव नक्कीच कमी होऊ शकेल. म्हणून मला वाटत आयुष्य १०० वर्षाचं न समजता आपलं “आयुष्य १०० दिवसाचं”च आहे असं समजून जर आपण वागलो तर आयुष्य आणखी सुंदर वाटेल.

          आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्ये कडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून जर पाहिलं आणि त्यातून काही शिकण्याचा प्रयत्न केला तर हे तणावयुक्त आयुष्य सहज सुंदर होऊन जाईल. मी माझ्या मनातलं लिखाण ब्लॉग, फेसबुक, whatsapp वर पोस्ट करायला सुरु केल्यापासून बऱ्याच चांगल्या प्रतिक्रिया आल्या आणि काही खूप वाईट ही प्रतिक्रिया आल्या. डॉक्टरकी करायची सोडून कशाला असल लिहित बसतोय हा? सगळ्याला का पाठवत बसतो? काय उपयोग या लिखाणाचा? यातून काय फायदा होणार आहे का? तुझ्या उक्तीत आणि कृतीत साम्य आहे का? मित्रांनो, खरंतर नकारात्मक गोष्टींचा विचार करू नये पण केलेल्या वाईट टीकेबद्दल सकारात्मक पाहण्याची मला सवय लागलीय. पहिली सकारात्मक गोष्ट म्हणजे माझ्या लिखाणाला चांगली असो वाईट प्रतिक्रिया तर मिळाली ना... दुसरी सकारात्मक गोष्ट म्हणजे कोणीतरी माझ्या लिखाणाचा किमान विचार तरी करतय ना... आणि मी हे लिखाण डॉक्टरकी सोडून अजिबात करत नाही तर मी डॉक्टर आहे म्हणून करतोय. कारण डॉक्टरांनी त्यांच्या रुग्णाच्या शारीरिक आरोग्या सोबतच मानसिक आरोग्य ही चांगलं रहाव या साठी प्रयत्न करणं यात वावग काय आहे......? त्यासाठी माझ्या मनात येणारे चांगले विचार शब्दरूपात मांडून मी एक प्रकारे डॉक्टरकीतला उपचार च करतोय ना... आणि डॉक्टर या नात्याने ते माझं कर्तव्यच आहे, कोणाला आवडो न आवडो. शक्यतो कडू औषध रुग्णाला आवडतच नसत. हो ना......? मी माझं लिखाण करताना जे चांगल सुचेल ते लिहितो पण मी अगदी तसंच वागतो असं मी म्हणत नाही. पण अशा लिखाणामुळे एखाद्या चांगल्या विचाराशी आपण बांधले जातो हे नक्की. आणि त्यामुळे एखाद्यावेळी नकळत कृतीत चूक झाली तर ती स्वतः समजून घेण्याचा समजूतदारपणा आणि आपली चूक लक्षात घेऊन माफी मागण्याचा चांगुलपणाही याच लिखाणामुळे निर्माण होतोय हे ही तितकच खरं आहे असं मला वाटतं. हे सर्व सांगण्यामागच कारण एकच कि मी या सर्व टिके नंतर खूप निराश आणि नकारात्मक झालो होतो. पण माझा मित्र अजित थोरबोले याच्याशी बोलल्यानंतर आयुष्याबद्दलची खरी सकारात्मकता कळली. मी माझं आयुष्य १०० दिवसच उरलय असं समजून या नकारात्मक टीकांचा अशाप्रकारे सकारात्मक विचार करू लागलो म्हणून माझा मनावरचा ताण कमी झाला. आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे असच सकारात्मक पाहिलं तर नक्कीच या सुंदर आयुष्याचा मनसोक्त आनंद घेता येईल.

          आपलं ही आयुष्य त्या तरुणासारखच अनिश्चित आहे. पण जेवढही आयुष्य आपल्याला मिळणार आहे ते अगदी आनंदात, उत्साहात घालवता आलं पाहिजे. एक खूणगाठच बांधून ठेवली पाहिजे कि एक न एक दिवस सगळे सोडून जाणारच आहेत, कोणीही आपल्या सोबत आयुष्याच्या सोबतीला आलं नाही आणि कधी येणारही नाही. क्षणीक नाराजी बाजूला ठेवून आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत घालवलेला प्रत्येक क्षण आनंदात कसा जाईल असाच प्रयत्न केला पाहिजे. आपल्या सर्वांचा प्रवास वेगवेगळ्या वाटेवर सुरु असतो त्यामुळे आपण कोणाला थांबवू शकत नाही. आपण फक्त एवढं करू शकतो कि एक असा वृक्ष बनू शकतो कि आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक वाटसरू ज्या वृक्षाखाली काही क्षण विश्रांती घेऊन, मरगळ झटकून पुढच्या प्रवासाला निघू शकेल. दुसऱ्या व्यक्ती कडून चांगलं वागण्याची अपेक्षा आपण ठेवत असू तर आधी आपणही तसं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण अपेक्षा ठेवत असेल तर अपेक्षा भंग झाल्यावर तो सोसायची तयारी ही ठेवली पाहिजे. त्यामुळे अचानक अपेक्षा भंग झाला तर त्रास कमी होतो. आणि कोणाची अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपल्या जवळच्या माणसाची तरी अपेक्षा लक्षात घेऊन पूर्ण करायला शिकलं पाहिजे त्यात वेगळाच आनंद असतो. जगायचं तर सर्वांनाच आहे आणि स्वतःसाठी तर जगलंच पाहिजे पण स्वतःसाठी जगत जगत कोणासाठी तरी जगण किती आनंद देणारं असत ते अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही. आयुष्याच गणित कधीच चुकत नसतं, चुकतो तो चिन्हांचा वापर करणं. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ही चिन्हे योग्य पद्धतीने वापरली कि उत्तर मनासारखी येतातच. आयुष्यात कोणाशी बेरीज करायची, कोणाला कधी वजा करायच, कधी कोणाशी गुणाकार करायचा आणि भागाकार करताना स्वतः व्यतिरिक्त किती लोकांना सोबत घ्यायचे हे समजले कि उत्तर आपोआप मनासारखी येतात. आयुष्याच्या या काटेरी वाटेवर चालताना कधीतरी फुले विखुरली जातातच. अपयशांची मालिका संपून कधीतरी यश मिळतच. पण कधी कधी अपेक्षांचं ओझ बाजूला ठेवून निरपेक्षतेचा आनंद ही घेतला पाहिजे. शेवटी आयुष्य म्हणजे तरी काय असत, आवड आणि निवड यांची घातलेली उत्तम सांगड म्हणजेच खर सुंदर आयुष्य आहे. मी माझं “आयुष्य १०० दिवसाचं”च आहे असं समजून प्रत्येक क्षणाला सकारात्मकरित्या जगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हीही कराल का.....?

- डॉ. संदीप सोमेश्वर टोंगळे.