माझ्या मनात दाटलेलं मळभ……

          आकाशात दाटलेले काळे कुट्ट ढग आणि मनात दाटलेल्या दुखद भावना, मनाला सलणारे विचार अगदी सारखेच असतात, नाही का......? जस कधी कधी आकाशात मळभ दाटून येत... गर्द, काळभोर, अंधारमय... स्वतः निसर्गाचीच घुसमट झाल्यासारखं... तसच कधी कधी मन ही दाटून येत, एका काळ्या कुट्ट अंधाऱ्या खोलीत कोंडल्यासारखं...... त्या नभांची दाटी, तगमग, अगदी कासावीस करणारी असते...... आणि मनात एक वेगळीच घुसमट, अपयशाची सल, नकारात्मकतेची भावना, गृहीत धरल्याची, अपमानित झाल्याची भावना अगदी जीव नकोसा करून टाकणारी असते...... कधी कधी आकाशात एकापेक्षा एक गडद काळेभोर ढग दाटतात, तसच कधी कधी मनातही अनेक नकारात्मक विचारांचा काहूर माजतो... अगदी जीवच गेला तर सुटू यातून म्हणून हे जगणंच नकोसं वाटायला लावणारे चुकीचे विचार डोक्यात घर करू लागतात...... अशा वेळी वाटतं, का माणूस म्हणून जन्माला आलो आपण... माणूस म्हणून जन्माला येऊन वर विचार करायलाही का शिकलो असेल आपण...? आपण माणूसच नसतो तर या सलणाऱ्या भावना आणि विचार करणारं मनही नसलं असतं... मग किती सोप झाल असतं ना हे सगळं......? इतरांनी आपल्याशी वाईट वागण्याचा, आपल्याबद्दल वाईट विचार करण्याचा त्रासच झाला नसता... जगण्याच्या नैसर्गिक प्रेरणेने जगत गेलो असतो... फक्त स्वतःसाठीच... स्वतःपुरत...... आयुष्यात कधी तरी वेळी अवेळी दाटून येणारं हे मनातलं मळभ, मनातली घुसमट वाढवत जातं आणि डोक्यात नकारात्मक विचारांची शृंखला सुरु होते...... माझ्याही  डोक्यात अशा नकारात्मक विचारांची शृंखला एकदा का सुरु झाली कि हे “माझ्या मनात दाटलेलं मळभ” अगदी जीव नकोसा करून टाकत.

          माझ्या मनात असे प्रश्न घर करू लागले कि ते मी कागदावर उतरवून त्याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो. आज काल आपण न कळणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी लगेच गुगल ला विचारून मोकळे होतो. पण मनात उठणारे हे वादळ आपण गुगल ला विचारू शकत नाही. त्यासाठी मनातल्या तरंगांचा योग्य वापर करणं गरजेच असतं. पूर्वी माझं लिखाण सुद्धा एखाद्या कागदापुरतं च मर्यादित असायचं. किती तरी वेळा माझ्या लिखाणाची कागदं सगळी कचरापेटीतच गेली आहेत. मनात येईल तो विचार एखाद्या कागदावर उतरवायचो, एखादी गोष्ट मनाला पटली किंवा पटली नाही की लगेच कागदावर लिहून काढायचो आणि पुन्हा कचऱ्यात टाकायचो. पण कचऱ्यात गेलेला प्रत्येक कागद माझ्या मनात कायमचा उमटत जात होता. त्या कागदांवर दिवसभरातल्या घडलेल्या गोष्टींपेक्षा अशा मनात उठलेल्या तरंगांच प्रतिबिंब जास्त असायचं. मग हळू हळू त्या प्रश्नार्थक तरंगांना उत्तर शोधण्याची सवय लागली. मनात कसलही आणि कितीही मोठ विचारांचं मळभ दाटलं तरी त्याच उत्तर शोधण्याची जिज्ञासा मला माझ्या या लिखाणातून जागृत ठेवता आली. एखाद्या वेळी एखादी चुकीची विलोभनीय भावना आपल्या मनावर मात करते आणि मग आपण आपल्या बुद्धीच न ऐकता त्या भावनेच्या आहारी जाऊन ती जे सांगेन ती प्रत्येक गोष्ट करत सुटतो. कधी ती भावना रागाची असते तर कधी लालसेची... कधी मत्सराची तर कधी सुडाची... मन आणि बुद्धीच हे द्वंद्वयुद्ध मी सुद्धा बऱ्याच वेळा अनुभवलंय. असे अनेक द्वंद्व, माझ्या मनात दाटलेली अशी अनेक मळभं आणि मनातली वादळ माझ्या लिखाणाच्या सवयीने शांत करता आली आहेत. माझ्या मनात उठणाऱ्या या वादळाला शांत करण्याची ताकद माझ्या या लिखाणामध्येच आहे.

          असं हे ढगाळलेलं मळभ प्रत्येकाच्या मनात वेळी अवेळी कधी तरी दाटून येतच असतं. दुखद गोष्टींची आपल्या प्रत्येकाच्या मनाला ओढ का असते कोणास ठावूक...? सगळ्या गोष्टी अगदी छान सुरु असताना सुद्धा आपल्या मनाला दुख उकरून काढायची काय गरज असावी बरं...? कदाचित मनाला दुखाची जाणीव झाल्याशिवाय सुखाची किंमत कळत नसावी. सगळं अगदी छान सुरु असेल आणि आयुष्यात चढ उतारच नसतील तर जगण्यात मजा तरी काय...? आपल्या आयुष्यात सगळं सुखच असेल तर किती रुक्ष होऊन जाईल हा जीवन प्रवास. नाही का...? आकाशात दाटलेलं हे मळभ तितक्याच तीव्र ओढीने बरसायला सुरुवात करत. पावसाचे थेंब जसे जमिनीवर पडून मार्ग काढतातच तसे मनातले विचार कागदावर पडले कि मार्ग आपोआप सापडत जातो. आपल्या मनाला मळभ नको वाटतं पण हा बरसणारा पाऊस हवाहवासा वाटतो. जसं पाऊस बरसून ढग मोकळे होतात, तसं मनातले विचार बरसून मन ही मोकळं होत. मनातलं आणि आकाशातलं मळभ दूर होतं जातं आणि मग आकाशात एक सोनेरी किनार दिसू लागते. या विचाराने डोक्यात लख्ख प्रकाश पडला. ते मळभ, त्याची घुसमट, त्याची तगमग, तितक्याच तीव्र ओढीने बरसणारा तो पाऊस आणि त्या नंतर दिसणारी ती सोनेरी किनार...... हे सगळं जेव्हा आपण बघतो, अनुभवतो तेव्हाच आपल्या विचारांचं क्षितीज विस्तारतं जातं. ते मळभ आले म्हणून तर ही सोनेरी किनार पाहू शकलो आपण. खरतर ती दिसणारी सोनेरी किनार म्हणजे नकारात्मक विचाराकडून सकारात्मक विचाराकडे जाण्याचा मार्ग असतो. आपल्या प्रत्येकाला ही सोनेरी किनार दिसतेच फक्त मनात संयम असायला हवा.

         खरंच खूप सुंदर आहे हे जगणं. फक्त दुखातही सुखासारखा आनंद घ्यायला शिकलं पाहिजे. आयुष्याच्या प्रत्येक रंगात, प्रत्येक टप्प्यावर समरसून जगता आलं पाहिजे. आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद साजरा करता आला पाहिजे. या सुख दुःख मिश्रित आयुष्यात सुखासोबत दुःख सुद्धा पचवता आली पाहिजेत. ही दुःख क्षणिक असतात पण खूप काही शिकवून जातात, खूप काही देऊन जातात फक्त ते वेळेत ओळखता आलं पाहिजे. हीच दुःख माणसं वाचायला शिकवतात, हीच दुःख माणसं ओळखायला ही शिकवतात आणि हीच दुःख माणूस म्हणून माणसासारखं आयुष्य जगायला ही शिकवतात. आपण जर दुःख अनुभवलंच नाही आणि फक्त सोनेरी किनार असलेल्या मोकळ्या आकाशाची स्वप्न रंगवत बसलो तर जगण्यातला आनंद गमावून बसू. सोनेरी किनार तर प्रत्येकाला कधी न कधी दिसतच असते पण त्यासाठी आपल्या मनात सकारात्मक दृष्टीकोन हवा. समोर येईल त्या क्षणाला, समोर येईल त्या प्रसंगाला संयमाने आणि सबुरीने तोंड देण्याची अंगात कसब हवी. आपण अपमानित झालोय किंवा फसवले गेलोय याची जाणीव आपल्या मनाला होऊच दिली नाही तर त्या गोष्टीच वाईट तरी कशाला वाटेल. आणि कुठली अपेक्षाच नाही ठेवली तर अपेक्षा भंगाच दुखच जाणवणार नाही आणि यश अपयशाची सल मनात बोचणार नाही. आज मी माझ्या लिखाणाच्या सवयीमुळे “माझ्या मनात दाटलेलं मळभ” आनंदाने अनुभवू शकलो. माझ्या मनात मळभ दाटलं म्हणून तर मी पाहू शकलो ही सोनेरी किनार......


-    डॉ. संदीप सोमेश्वर टोंगळे.

Comments

Popular Posts