Tuesday, June 7, 2016

"गावं माझं वेगळं"


आदरणीय "दादा",

                    सप्रेम नमस्कार विनंती विशेष. क्षमा असावी, कारण "दादा" हे एकेरी नाव जरी वाटतं असलं तरी त्यामागे आदरच आहे हे समजून घ्यावं. गेली कित्येक वर्ष "एकच वादा, ...... दादा" असं म्हणत म्हणत आता प्रत्येक घरोघरी एकतरी "दादा" तयार झालायं, खरं तर भारतीय लोकशाहीसाठी, राजकारणासाठी ही चांगलीच गोष्ट आहे पण हे सर्व "दादा" आपल्या देशाच्या, गावाच्या विकासासाठी केलेला "वादा" विसरत चाललेत हे ही लक्षात घेतलं पाहिजे. पण आज खरी गरज आहे या सर्व "दादा" नी एकत्र येऊन स्वतःच्या गावाचा आणि पर्यायाने देशाचा विकास करण्याची. राजकारण हा लोकशाही चा अविभाज्य घटक आहे तो त्यापद्धतीने झालाच पाहिजे पण हे राजकारण असं नकोय कि ज्याने गावाचा विकास खुंटला जाईल. माझ्यासारख्या अराजकीय व्यक्तीने राजकारणाबद्दल बोलू नये असं खूप जणांचं मत असेल ही पण खरं तर लोकशाहीत, राजकारणात किंवा गावाच्या विकासात राजकीय लोकांइतकीच अराजकीय लोकांची भूमिका महत्वाची असते असं मला तरी वाटतं. आपल्या गावाविषयीच्या आपुलकीमुळे "गावं माझं वेगळं" असं प्रत्येकाच्याच मनात असतं. पण हे माझं गावं अजून वेगळं कसं करता येईल यासाठी हा पत्र प्रपंच......

                    "दादा", पण हे गाव म्हणजे असतं तरी नेमकं काय? आडव्या उभ्या गल्लीने उभी असलेली घरे म्हणजे गाव? मोठमोठ्या इमारती, झोपड्या, घरे आणि रस्त्यावरील वाहनांची गर्दी म्हणजे गाव? वस्ती वस्तीने राहणारा मानवी समूह म्हणजे गाव? छे छे! नाही ओ. मग काय असते ओ गाव? तर शांतता, सलोख्यानं आणि माणुसकी जपून एकत्र नांदणारा सुसंकृत समाज म्हणजे गाव. राजकीय स्पर्धा बाजूला ठेवून सर्व स्तरातल्या माणसांच्या विकासासाठी झटणारी ध्येयवेडी माणसं म्हणजे गाव......! सर्वांनाच आपल्या गावाबद्दल नितांत प्रेम असते. किंबहुना इतर ठिकाणापेक्षा आपले गावच जास्त आवडत असते. पण आज प्रकर्षाने हे विचार पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे कि माझे गाव खरेच आदर्श गाव आहे का? ज्या चांगल्या विकासाभिमुख सुविधा आहेत त्या माझ्या गावात आहेत का? स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षात काय विकास झाला माझ्या गावाचा? इतर गावांच्या  तुलनेत का मागे राहिले माझे गाव? आणि या सर्वाला जबाबदार कोण? आमच्या सारखी जागरूक नसलेली निष्क्रिय जनता कि सुस्त झालेले प्रशासन कि घराणेशाही च्या नावाखाली सत्तेचा सारीपाट नुसताच खेळवत राहिलेले कातडी बचाऊ राजकारणी? कोण, कोण आहे जबाबदार? कधी केलाय आपण विचार? काय केल आपण सर्वांनी आपल्या गावाच्या विकासासाठी? किती जागरूक आहोत आपण सर्व आपल्या हक्कासाठी? या सर्व गोष्टींचा विचार करण्याची वेळ आज आली आहे हे मात्र नक्की.

                    गावाचा विकास ही काही रातोरात होणारी गोष्ट नाही. विकास ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. केवळ भौतिक सोयी केल्या म्हणजे विकास झाला असे नाही तर लोकांच्या दृष्टिकोनात बदल होणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. पूर्वीच्या काळी जी समाजव्यवस्था होती, ती खूप चांगली होती. त्या वेळी लोकांच्या गरजा कमी होत्या. एकमेकांबद्दल प्रेम, माणुसकी आणि सहकार्याची भावना होती त्यामुळे गावं गुण्यागोविंदाने नांदायची. परंतु नंतरच्या तांत्रिक आणि भौतिक सुधारणांच्या काळात माणूस माणसाला पारखा झाला, पैशाला जास्त महत्त्व आले, व्यक्तिगत विकासाकडे जास्त लक्ष पुरवले गेले आणि त्यानंतर समाज, समूह, गाव या गोष्टींना दुय्यम महत्त्व येत गेले. त्यातूनच पूर्वी आदर्श असणारी समाज व्यवस्था पूर्णतः ढासळली आणि पुन्हा गावांच्या विकासासाठी नव्याने प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली. अर्थात यामागे काही दुष्काळ, अतिवृष्टी यांसारखी नैसर्गिक कारणेही आहेत, असे असले तरी संकटांच्या काळात एकमेकांना सांभाळून घेण्याची प्रवृत्ती गावाच्या उभारणीस नेहमीच हातभार लावत असते, म्हणूनच गावाच्या विकासासाठी लोकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असतो. लोक सहभागातून विकासकामे करायला प्रशासकांना ही सोप जातं. पण "दादा", कसा होतो गावाचा विकास? काय कराव लागत त्यासाठी? काय योजना असतात सरकारच्या ज्या आजपर्यंत आपण राबवू शकलो नाही? तथाकथित सुसंकृत, श्रीमंत आणि उच्चशिक्षितांचे गाव म्हणुन गणल्या गेलेल्या गावात याबाबतची जागरूकता अजून म्हणावी तितकी झाली नाही याचीच खंत वाटते. गावाने आपल्यासाठी काय केले म्हणण्यापेक्षा आपण गावासाठी काय केले, काय करतोय आणि काय करू शकतो असा विचार करणाऱ्या माणसांची आज गावाला खरी गरज आहे, किंबहुना त्याहून जास्त कृतीतून दाखवून देणाऱ्या माणसांची !!

                    "दादा" माझ्या गावाला अकलूज, बारामती किंवा कॅलिफोर्निया सारखं तयार करा असं मी अजिबात म्हणणार नाही. पण परिसरातल्या गावांना ही हेवा वाटावा, त्यांना असं वाटलं पाहिजे कि त्यांचं गाव पण माझ्या गावासारखं व्हायला हवं असा आदर्श गाव तयार करू. हा निश्चय आपण केला पाहिजे. कसे असते आदर्श गाव? तर, जिथे गरीब श्रीमंत, उच्च-नीच असले जातीभेद गाडून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झगडणारी जिंदादिल माणसे असतात, ते आदर्श गाव !! रस्ते, पाणी, वीज यासारख्या मुलभूत सुविधा प्रत्येकापर्यंत पुरेशा आणि मुबलक प्रमाणात पोहोचविण्यात यशस्वी होते, ते आदर्श गाव !! सार्वजनिक खतोत्पादक शौचालये, व्यायामशाळा, सौरदिवे, सेंद्रिय शेती, स्मशानभूमी, समाजमंदिर, वाचनालये, बचत गट, बिनविरोध निवडणुका, गावातच रोजगाराची निर्मिती इत्यादी गोष्टींनी युक्त असणारे गाव म्हणजे आदर्श गाव !! पण "दादा" या सर्व संकल्पनांचा विचार केला तर आपले गाव यातल्या प्रत्येक गोष्टीत कुठेतरी कमी पडतेय याबद्दल अतिशय खेद वाटतो. पण इतिहासाचे गोडवे गात भविष्याच्या कोरड्या आशेवर जगणाऱ्याचा वर्तमानकाळ बहुदा चांगला नसतो हाच आजवरचा अनुभवसिद्ध इतिहास आहे, नव्हे  तेच आजचे खरे वास्तव आहे. मग काय केले पाहिजे आपण? आजपासून आपण प्रतिज्ञा करूया, एक नवा इतिहास घडविण्याची !! प्रतिज्ञा करूया एका नव्या परिवर्तनाची !! सगळे मिळून एकदिलान प्रयत्न करण्याची !! एक नवं आदर्श गाव निर्माण करण्याची !!!

                    बदल हा घडत नसतो तो घडवावा लागतो, परीवर्तन ही काळाची गरज आहे, जो बदल घडवून आणतो तोच टिकतो हे हि इतिहासाने अनेकवेळा सिद्ध केलेले आहे. म्हणून परिवर्तनाची हि लढाई आता आपल्या सारख्या तरुण पिढीला लढावीच लागणार आहे, बदल हा घडवावा लागणारच आहे. यासाठी लोकांच्या दृष्टिकोनात बदल घडला पाहिजे. श्रमदान, सामूहिक प्रयत्न यांचे महत्त्व समजावून सांगून लोकांना ते पटले पाहिजे. आळस झटकून लोक गावासाठी पर्यायाने स्वतःसाठी कामाला लागले पाहिजेत. आपला प्रश्‍न आपणच एकत्रित येऊन व्यवस्थितरित्या सोडवू शकतो असा लोकांना विश्‍वास वाटला पाहिजे आणि जादूची कांडी फिरावी तसा गाव बदलत गेला पाहिजे. सामूहिक कामात लोकांच्या एकीची आवश्‍यकता आणि शासकीय विकासकामात लोकसहभागाचं महत्व गावाला पटलं पाहिजे. गावातला तरुण सुशिक्षित होतकरू वर्गच गावाची खरी संपत्ती आहे आणि हा तरुण वर्गच गावाचा विकासाभिमुख बदल घडवू शकतो. गावातील तरुणांच्या विचार आणि आचारांची दिशा आणि दशा योग्य असली की समृद्ध गाव निर्मिती ला वेळ लागणार नाही. गावाच्या विकासात अशा विचार आणि आचारांची श्रीमंती असलेल्या तरुणपिढीचा सहभाग असेल तर आदर्श गावं निर्मिती नक्की होईलच. तेंव्हाच आपण सर्वार्थाने आणि अभिमानाने म्हणू शकू की, "गावं माझं वेगळं"......

धन्यवाद......!

आपलाच एक तरुण गावकरी
- डॉ. संदीप टोंगळे

टीप - ब्लॉग वर प्रतिक्रिया देता येत नसेल तर तुमच्या प्रतिक्रिया 9561646178 या नंबर वर व्हाट्सअँप वर दिल्या तरी चालतील. धन्यवाद.