Friday, August 17, 2018

आयुष्य

रोज एक नवीन पान जोडलं जात असं
पुस्तक म्हणजे आयुष्य,
चांगल्या वाईट परिस्थितीचा सारासार
हिशोब म्हणजे आयुष्य......

प्रत्येक क्षणाला नवीन
काहीतरी घडत राहतं,
पण त्या प्रत्येक
गोष्टीला अंत असतो,
दुःखाच्या क्षणी
सुखाची आस असते,
म्हणून तर आयुष्यात
वसंत असतो......

कधी कधी कडक
उन्हासारखी चिंता,
जळत राहते
दुखत राहते मनात,
कधी कधी सुखाच्या क्षणी
आनंद मिळतो,
तेव्हा घामाचाही
सुगंध येतो तळपत्या उन्हात......

आयुष्यात कधी कधी
काही गोष्टी नाईलाजाने
कराव्याच लागतात
मन मारून,
पण परिस्थिती बदलू
शकतात तेच लोक,
जे हिम्मत ठेवतात
उर भरून......

लपवता येतात बऱ्याच गोष्टी असा
पडदा म्हणजे आयुष्य,
रोज एक नवीन पान जोडलं जात असं
पुस्तक म्हणजे आयुष्य,
चांगल्या वाईट परिस्थितीचा सारासार
हिशोब म्हणजे आयुष्य......

या सुंदर निसर्गाच्या
लय बद्ध हालचालीत
रमतात बागडतात
दिशा दाही,
प्रेम जिव्हाळा नसलेल्या
नुसत्या दगड विटांच्या
घरात कोणाचंच
मन रमत नाही......

पैसा, प्रतिष्ठा, संपत्ती
नश्वर च आहे,
पोटभरून खाल्लं तरी
मन भागत नाही,
कितीही जमीन जुमला
कमवून ठेवला तरी
शेवटी सरणाला
एवढी जागा लागत नाही......

माझं आयुष्य
मला असंच हवंय
मला तसंच हवंय,
आयुष्य म्हणजे
अशा अपेक्षांचा
असतो आडोसा,
आयुष्य म्हणजे
अंधाऱ्या कोठडीत
एक कवडसा......

जगण्यातल्या चढ उतारांचा
सुंदर आलेख म्हणजे आयुष्य
रोज एक नवीन पान जोडलं जात असं
पुस्तक म्हणजे आयुष्य
चांगल्या वाईट परिस्थितीचा सारासार
हिशोब म्हणजे आयुष्य......

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Tuesday, August 7, 2018

मी तुमची "जात" बोलतेय......

कोणत्या पापाची
करतेय मी आज फेड
उठसुठ कोणीही
काढतंय माझी छेड

हिरव्या, भगव्या, निळ्या
पिवळ्या झेंड्यांनी
लावलंय मला वेड
तुमच्या या आघातांनी
झालाय माझा रंग रेड

माझा वापर करून
नका वाढवू
समाजात तेढ
राजकारणात तर
आधीच ठरलेय मी पेड

इतक्या वर्षांनी
आज माझ्या मनाचा
मी पिटारा खोलतेय
मी तुमची "जात" बोलतेय......

परिस्थिती विरुद्ध लढा माझा,
पण भलतेच माझे चालक झाले.
तुम्हीच केले मला पोरके,
नको नको ते मालक झाले.

हा दोष माझाच
मी तुम्हाला नाही रोखले,
चुकीच्या मार्गावर
जाण्याआधी नाही टोकले.

जरी शिवराय, टिळक
आंबेडकर मला लाभले,
तुमच्या या कृतींनी
माझे विचार दाबले.

क्रुर ही माझी
थट्टा बघून
मनात मी रडतेय
मी तुमची "जात" बोलतेय......

आता चौथ्या स्तंभाची
लेखणी सुद्धा टोचते आहे,
कसं सांगू तुम्हाला
कुठे कुठे बोचते आहे.

आजकाल माझं अस्तित्व
बऱ्याच जणांना रुचते आहे,
विध्वंसक विचार मनात ठेवून
नको नको ते सुचते आहे.

पुढच्या पिढीचे जातीय विचार
मी रोज वाचते आहे,
मला नको असताना
मी प्रत्येकाच्या मनात
उगीच पोहोचते आहे.

माझं मला माहिती,
मी कशी सोसतेय?
मी तुमची "जात" बोलतेय......

माझा कारभार
कुणी कारभारी बघतोय,
जो तो आजकाल
माझ्या नावावर
आरक्षण मागतोय.

मजबूत होता समाज आधी
गचाळ राजकारणामुळे
नेमका तोच सुकला जातोय,
आधुनिक सुखसोयींपासून
नेहमीच मुकला जातोय.

गुण्यागोविंदाने राहणारा
भारतीय समाज
लेखणीनेच उकरला जातोय,
ज्यावर लोकशाही उभी
तोच खांब पोखरला जातोय.

मला कळतंय
ही वाळवी माझ्यात घुसतेय,
मी तुमची "जात" बोलतेय......

माझ्या म्होरक्याला
राजकारणाचं बळ आहे,
मी तुमच्यासमोर व्यक्त केली
ही जनसामान्यांची कळ आहे.

मतांच्या बेरजेसाठी
राजकारण्यांनी टाकलेली
माझी गळ आहे,
आजची परिस्थिती
हे गचाळ राजकारणाच
कडवट फळ आहे.

माझं अस्तित्व
म्हणजे समुद्राचा तळ आहे,
समाजातला जातीभेद
म्हणजे मनातला मळ आहे.
त्यालाच चिटकून बसलात
तर नाश अटळ आहे.

मी आज माझ्या मनातली
व्यथा सांगतेय,
मी तुमची "जात" बोलतेय......

जुन्या काळातला
तुमचा व्यवसाय म्हणजे मी,
वर्षानुवर्षे त्यालाच
कवटाळत बसलाय तुम्ही.

सर्वांना सारखं बनवलं
कोणाला काय कमी,
शिक्षणाने माणूस माझ्यातून
बाहेर पडेल याची देते मीच हमी.

भूतकाळ तुमचा
पोखरलाय आम्ही
आता फक्त
शिक्षणच येईल कामी

माझं अस्तित्व संपून टाका
हे मीच म्हणतेय,
मी तुमची "जात" बोलतेय......
मी तुमचीच "जात" बोलतेय......

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Wednesday, July 4, 2018

"भान"

          व्हाट्सअप्पच्या एका चुकीच्या msg मुळे किती टोकाची विध्वंसक गोष्ट घडू शकते हे साऱ्या जगाने शरमलेल्या डोळ्यांनी पाहिलं. आधुनिकतेचा आणि पुरोगामीत्वाचा ढोल बडवत आपण कुठेतरी चुकीच्या रस्त्याने जात आहोत का? हे बघण्याची वेळ आज आपण आपल्यावर आणलीय. पोरं पळवून न्यायची टोळी आली अशी अफवा ऐकून आपण त्यांचा जीव घोटला पण आपला सद्सद्विवेक केव्हाच कोणीतरी पळवून घेऊन गेलंय हे आपल्याला कधी कळणार आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करताना आपण ना "जाण" ठेवतोय ना "भान".

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Tuesday, May 22, 2018

"जनसामान्यांचा बिग बॉस......"

          आज काल रिऍलिटी टीव्ही शोच वारं खूपच पसरत चाललं आहे. टीव्ही हे खूप प्रभावी प्रसारमाध्यम आहे त्यामुळे त्यावर दाखविण्यात येणाऱ्या बऱ्याच गोष्टींचा प्रभाव जनसामान्यांच्या मनावर पडत असतो. मला कोणावर टीका करायची नाहीये पण "बिग बॉस" सारख्या कार्यक्रमातून आपण समाजापर्यंत कसला संदेश देत आहोत हेच समजत नाहीये. उच्चभ्रू समजले जाणारे सेलिब्रेटी एकत्र एका घरात राहतात, भांडण करतात, प्रेम करतात, गेम खेळतात मग या गोष्टींशी जनसामान्यांचा संबंध काय......? त्यातून कोणता चांगला प्रभावी संदेश आपण समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहोत......? या बाबतीत माझं मत कदाचित चुकतही असेल पण मला वाटतं की "बिग बॉस" या टीव्ही शो ने एक "जनसामान्यांचा बिग बॉस" हा रिऍलिटी शो सुरू करावा. त्यात रोज खस्ता खात स्वतःच कुटुंब चालवणारा गरीब नोकरदार, निसर्गाशी लढत स्वतःचा उदरनिर्वाह करणारा गरीब शेतकरी, गरिबीतून उच्च शिक्षण घेऊन नोकरीसाठी वणवण भटकणारा तरुण, रस्त्यावर छोटंसं दुकान मांडून व्यवसाय करणारा गरीब उद्योजक, ए सी ऑफिस मध्ये बसून व्यवसाय करणारे उच्चभ्रू व्यवसायिक, तळहाताच्या फोडाप्रमाणे जनतेची काळजी घेणारे आणि सेवा करणारे (?) लोकनियुक्त प्रतिनिधी, समाजाप्रती बांधिलकी जोपासून समाजसेवेचं व्रत बाळगणारे समाजसेवक, या जनसामान्यांचाच घटक असणारे पण स्वतःच्या कर्तृत्वाने पोस्ट मिळविलेले प्रशासकीय अधिकारी, याच समाजाच्या आरोग्यव्यवस्थेवर उदरनिर्वाह करणारे डॉक्टर, इंजिनियर, लोकनियुक्त आमदार, खासदार, या सर्वांना न्याय मिळवून देणारे न्यायाधीश, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान या सर्वांचाच या "जनसामान्यांचा बिग बॉस" मध्ये समावेश असावा. या सर्वांना दहाच दिवस एकत्र एका घरात ठेवावं. एकमेकांच्या समस्या, वेदना, सल या दहा दिवसांत ते समजून घेऊ शकतील. भर उन्हात, घामाच्या धारेत कष्ट करत जगणं आणि ए सी ची हवा खात मानसिक तणावात जगणं काय असतं हे एकमेकांना कळू शकेल. एकत्र राहून मैत्री करतील, एकमेकांची दुःख वाटून घेतील, वादविवाद करून तोडगा काढतील. त्यामुळे समाजापर्यंत किमान खरी परिस्थिती तरी पोहोचेल. 'हम सब एक है' चा नारा देऊन या एकत्र...... होऊ द्या असाही एक "जनसामान्यांचा बिग बॉस......"

- डॉ. संदीप सोमेश्वर टोंगळे.

Saturday, May 19, 2018

मनातला "कचरा"


          दैनंदिन जीवनातल्या अनावश्यक गोष्टी आपण कचऱ्यात टाकून देतो तसंच मनात येणारे अनावश्यक विचार सुद्धा आपण कचऱ्यात टाकून द्यायला हवेत. पण टाकून दिलेला कचरा म्हणजे टाकाऊ वस्तू असो वा मनात येणारे निरूपयोगी विचार असो हे दुसऱ्याला त्रासदायक होतील अशा ठिकाणी आपण टाकायला नको. कारण आजकाल कुरकुरे, चिप्स यांची रिकामी पाकिटे, पाण्याची रिकामी बाटली यांचा कचरा रस्त्यावर खूप प्रमाणात पडलेला दिसतो. याच कचऱ्यामुळे पावसाळ्यात गटारी तुंबून गटारीतलं घाण पाणी बाहेर येऊन रस्त्यावर साठू लागतं आणि रोगराई पसरू लागते. स्वच्छता कामगार आपलं गाव स्वच्छ ठेवण्याचं त्यांचं काम अगदी व्यवस्थित करत असतात पण एक गावकरी म्हणून आपण असा कचरा कचरपेटीतच टाकून त्यांना छोटीशी मदत करू शकतो आणि पावसाळ्यात होणाऱ्या संभाव्य आजारांपासून खूप जणांची मुक्तता करू शकतो. चला तर मग हा भौतिक कचरा कचरपेटीच टाकू आणि मनातला "कचरा" योगधारणेद्वारे नष्ट करू म्हणजे कोणत्याच कचऱ्याचा कोणाला त्रास होणार नाही.

- डॉ. संदीप सोमेश्वर टोंगळे.