बळ

खूप सारा ताणतणाव असताना सुद्धा 

चेहऱ्यावर हसू ठेवून 

सतत खंबीर राहणं तसं अवघडच... 

पण सवयीने लकब येऊन जाते. 

राहून राहून आपण माणूसच नाही 

तर लवचिक रबरबॅण्ड आहोत 

तोही हाय क्वॉलिटी असं वाटायला लागतं, 

खोटाच पण दंभ चढतो अंगावर... 

तेवढ्यात खूप मोठी संकटं झेललेली 

आणि आता सुद्धा झेलत असलेली 

निर्भीड माणसं समोर येतात...

ही माणसं समोर आलेल्या 

कसल्याही अडचणींवर मात करत, लढत 

त्यांच्या आयुष्याला आकार देत असतात...

यांची ही सुंदर लकब पाहून 

संघर्ष करताना आपल्याला जो त्रास होतो 

त्याबद्दल आपण ज्या तक्रारी करतो, 

थकलोय, वैतागलोय असं सांगतो 

त्याची खरंच लाज वाटू लागते 

आणि खोलवर विचार केला तर 

अशा व्यक्तींच्या प्रेरणेने बळही मिळू लागतं. 

लोकं आपलं सुखदु:ख 

सहज व्यक्त करून जातात 

पण त्याने फक्त हळहळ 

वाटण्यापलीकडे बऱ्याच गोष्टी घडतात. 

हे असे क्षण, ताण न घेता जिद्दीने उठून 

परिस्थितीशी दोन हात करण्याचे बळ देऊन जातात...


- डॉ संदिप टोंगळे

Comments

Popular Posts