पैशाचं कवच

          आजकाल प्रत्येकाच्या मते पैसा, प्रसिद्धी, पद आणि पुरस्कार या चार गोष्टी म्हणजेच खरं 'यश'. जो धनवान तोच महान... यशाची व्याख्या सर्वसामान्यांच्या लेखी या पेक्षा वेगळी कधीच नसते. पण हे सगळं मिळून सुद्धा, मनाप्रमाणे यशस्वी होऊन सुद्धा माणूस सुखी, समाधानी कधीच होत नाही. पैसा आणि प्रसिद्धीचा अति हव्यास माणसाला सुखापासून नेहमी लांबच ठेवतो. खोट्या नश्वर भौतिक गोष्टीत रमून आनंदी राहण्यापेक्षा एक पायरी खाली उतरुन समाधानी राहणं जास्त महत्त्वाचं असतं. सुख शोधायचं नसतं, तर ते मानायचं असतं. 

          आशावादी, प्रयत्नवादी राहण्याइतकंच समाधानी राहणं जास्त महत्त्वाचं आहे. नुसतं सकारात्मकतेचा डंका वाजवून उपयोग नाही तर त्यासोबत स्वीकारात्मकता अंगी बाळगली तर खऱ्या यशाची चव मनमुराद चाखता येते. आपला स्वभाव, संस्कार यातल्या कमतरता आपल्या इतक्या त्या कोणालाच समजू शकत नाहीत. पण या कमतरतेवर विजय मिळवून स्वतःला आतून परिपूर्ण बनविण्याचा ध्यास आपल्याला समाधानाच्या परमोच्च शिखरावर नेऊन बसवतो. 

          स्वःताच्या स्वत्वाचं सुंदर अस्तित्व निर्माण करणं आणि पैसा, प्रसिद्धीच्या हव्यासात अहंकाराला गोंजारत बसणं यात जमीन आसमानचा फरक आहे. कोणतीही गोष्ट सहज स्वीकारण्याची सवय अंगी बाळगली की अहंकाराला मनात जागा राहत नाही. 'मीच पैसेवान, मीच महान आणि मीच उत्कृष्ट हा अहंकार माणसाला आयुष्याच्या खऱ्या आनंदापासून दूरच ठेवतो. आपलं सुंदर अस्तित्व आणि गोंजारलेला अहंकार यातला फरक बऱ्याचदा क्षितिजाच्या रेषेसारखा भासमान असतो. त्याचा उगम आणि शेवट कळणं तसं कठीणच... पण हाच फरक समजून घेण्याचा प्रयत्न करणं म्हणजे खरं आनंदी आयुष्य समजून घेणं. 

          माणसाची सर्व धनदौलत, संपत्ती मौल्यवानचं असते, पण तरीही राजमुकुट परिधान करणं हे परमोच्च यशाचं चिन्ह मानलं जातं. तसचं समाधान हा माणसातल्या सर्व गुणातला मुकुटमणी आहे. माणसाच्या अंगी कितीही चांगले गुण असले आणि समाधान नसेल तर तो यशस्वी कसा होऊ शकेल...? स्वतःच्या सुंदर स्वत्वाला न जपता फक्त पैशाचं कवच घालून माणूस किती काळ खोटं आयुष्य जगू शकेल...? रोजच्या ताणतणावाच्या जगण्यात रोज अपयश, दु:खाचा, टिकेचा सामना करावा लागत असताना समाधानी आणि सकारात्मक राहून स्वीकारात्मकता अंगी बाळगणे हाच यशस्वी जीवनाचा आणि सुखी जीवनाचा मूलमंत्र आहे.


- डॉ संदिप टोंगळे

   एम. डी. मेडिसिन (आयु)

   माढा, सोलापूर

Comments

Popular Posts