जीवनाचे सार

जीवनाचे सार माझ्या हेच आहे

कोण माझे? मी कोणाचा? पेच आहे


फुलवली एक बाग, केले कष्ट कोणी?

जो तो फक्त फुलांची करतो वेच आहे

कोण मोठा? कोण छोटा? शर्यतींची

चालली दिनरात रस्सीखेच आहे


मीच वेडा पळतो सदा सर्वांसाठी

कधी न कळले लागली मज ठेच आहे

विश्वास होता, होणार नाही घात पात

पण आजही पाणी तिथे मुरतेच आहे


काय मिळते पारदर्शी वागण्याने?

दांभिकाला या जगी शिरपेच आहे

काय नवखे जीवनी? कंटाळलो मी

पात्र दुसरे पण कथानक तेच आहे


माणसाला थांबतो का रे काळ कधी?

कष्टाचे रक्त नेहमी जिरतेच आहे

जीवनाचे सार माझ्या हेच आहे

कोण माझे? मी कोणाचा? पेच आहे...


- डॉ संदिप टोंगळे

   एम. डी. मेडिसिन (आयु)

   माढा, सोलापूर

Comments

Popular Posts