Monday, February 8, 2016

"मनातलं लिखाण"


          "हो मीच लिहितो" हेच उत्तर गेले 15 दिवस झालं मी माझ्या प्रत्येक ब्लॉग वाचकांच्या प्रश्नांना देतोय. "हे तुम्ही लिहिताय सगळं?" हाच तो प्रश्न. पण हाच प्रश्न माझ्यासाठी खुप मोठी compliment वाटते मला. कारण वाचक माझ्या लिखाणावर सहमत आहेत आणि त्यांना ते नक्की आवडत आहे हाच सकारात्मक विचार या प्रश्नातुन उमगतोय मला. फक्त त्यांना एवढं वाटतय की अशी लिखाणाची कला अचानक संदीप मध्ये कुठून आली? एवढं कसकाय लिहु शकतो हा? असे विचार कुठून येतात डोक्यात? आणि एवढा वेळ मिळतोच कसा? हे सर्व प्रश्न माझे नातेवाईक, मित्र, आप्त आणि वाचक यांच्या सर्वांच्या मनात आहेत आणि याच सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मी हा लेख लिहायला ठरवलं आणि सुरुवातच केली.

          मित्रांनो, मी काही हाडाचा लेखक नाही पण मनातलं कागदावर उतरवणं हा माझा लहानपणी पासून चा छंद. मी इयत्ता सातवीत असताना माझ्या चुलत बहिनी च लग्न झालं तेव्हा मी खुप रडलो होतो कारण माझ्या लहान मनाला ते दृश सहन च झालं नाही की आपली ताई आपल्याला सोडून जातेय. ते ही कायमची दुस-याच्या घरी, नाशिक ला. ती पण खुप रडली होती. ती गेल्यावर एक पंधरा दिवसानी मी तिला पत्र लिहीलं होत. माझ्या आयुष्यातलं मी लिहिलेलं पहिलच पत्र आणि तिथेच झाली माझ्या "मनातलं लिखाण" लिहिण्याची सुरुवात.

          त्यानंतर मी खुप वेळा खुप काही लिहीलं पण प्रत्येक वेळी फाडून टाकलं. (फक्त एक कागद अजुनपर्यंत फाडला नाही तो म्हणजे लग्न जमल्यावर माझ्या बायको ला कविते सकट लिहिलेलं पहिलं पत्र) किती तरी वेळा माझ्या लिखाणाची कागदं सगळी कच-यातच गेलेली आहेत. मनात असेल ते लिहायचो, एखादी गोष्ट मनाला पटली किंवा पटली नाही की लगेच कागदावर लिहून पुन्हा कच-यात टाकायचो. पण कच-यात गेलेला प्रत्येक कागद माझ्या मनात कायमचा उमटत जात होता. हे सर्व असच होत गेलं वयाच्या तिशी पर्यंत. मी, माझं मन, मनातील विचार, माझं लिखाण माझ्या पुरतच मर्यादित होत. पण इतकं लिहून झाल्यावर मनात कुठेतरी विचार आला की या मनातल्या विचारांचा आपण काहीच उपयोग करत नाही. चांगले विचार समाजापुढे मांडून योग्य समाजबांधणीत खारीचा वाटा उचलायला काय हरकत आहे. म्हणून नंतर एखादा subject घेऊन लेख लिहायला सुरुवात केली. पुस्तक वाचन, ब्लॉग वाचन, लेख वाचन करून करून लेख लिखाणाची खुप आवड निर्माण झाली. मग ते लेख whatsapp वर टाकत गेलो आणि आता ब्लॉग सुरु केला. तर असा झाला माझ्या पहिल्या पत्रापासून, लेख लिखाण ते ब्लॉग पर्यंत चा प्रवास......

          Writing is my love. If you love something, you find a lot of time. I write for two hours a day, usually starting at midnight; at times, I start at 11. - A Great Late A. P. J. Abdul Kalam. आपल्या मनातल्या विचारांना मूर्त रूप द्यायचं असेल, तर आपण त्यांना कागदावर उतरवतो. मनातल्या विचारांचा गोंधळ कागदावर उतरवला की ब-यापैकी कमी होऊन जातो. आणि प्रश्नांची उत्तरे ही आपोआप मिळत जातात. मनातला ताण तणाव दूर व्हायला मदत होते. आपण मित्राजवळ आपली सुख दुःख व्यक्त केल्यावर जो मोकळेपणा वाटतो तसा मनातलं कागदावर उतरवल्यावर सुद्धा वाटतो.

          वाचना-याला कुठे ना कुठे आपण यात आहोत ही जाणीव होणे हीच लिखाणाची कला आहे. मी लिहितो ते तुमच्या माझ्या मनातलंच असतं फक्त मी त्याला कागदावर उतरवून मूर्त स्वरुप देतोय एवढच. मनातल्या प्रश्नांची उत्तर, ती कागदावर उतरवत गेलं की आपोआप मिळत जातात. मी काय खुप अनुभवी किंवा खुप मोठा लेखक वगैरे नाही पण माझ्या मनाला जे जे वाटत, जे जे मनात विचार येतात ते ते मी लिहित राहतो आणि लिहित राहील. खरं तर लिहिण्याचे खूप फायदे होतात. आजच्या जीवनशैलीतला ताणतणाव कमी करण्याचं महत्त्वाचं काम लिखाणातून होऊ शकतं. प्रत्येकाने किमान आपली दैनंदिनी एका डायरीत लिहायची सवय जरी लावली तरी बराचसा तणाव कमी व्हायला मदत होईल.

          वाचनाने ज्ञान वाढतं, लोकांसमोर बिनधास्त बोलल्याने माणूस हजरजबाबी होतो, मात्र लिहिण्याने माणसाचा विचार नेटका तसंच काटेकोर होतो. आपण जे लिहितोय तसच आपण पण वागलं पाहिजे असा एक मनात नियम च तयार होतो. आपल्याच लिखाणातुन विचारांची प्रगल्भता वाढली की वागण्यातला बदल आपोआपच जाणवू लागतो. आपल्या पैकी कोणीच 100% perfect नसतच आपल्या मनातल्या चांगल्या विचारांची देवाण घेवाण च आपल्याला perfect बनवू शकते. आणि एकदा का लिखाणाची आवड निर्माण झाली की कितीही व्यस्त असलो तरी आपण वेळ काढून लिखाण करतोच.

          कविता, लेख लिहिणे हा माझा छंद आहे, कोणाच्या भावना अथवा मन दुखवायचा माझा हेतू अजिबात नसतो. आणि कोणाला उपदेश किंवा सल्ले देण्या इतका मी मोठा ही नाही. जे चांगल मनात येईल ते मी लिहित असतो. जर कोणाला काही पटत नसेल किंवा चुकीच वाटत असेल तर तुम्ही मला बिनधास्त सांगू शकता. माझ्या या लिखाण कलेतुन किंवा वैयक्तिक विचार धारेतुन समाजासाठी जे करता येईल ते करायला मी स्वताला बांधील समजतो.

          Either write something worth reading or do something worth writing.

- डॉ संदीप टोंगळे