Sunday, February 14, 2016

"या जगण्यावर शतदा प्रेम करावे"


          आज काल "प्रेम" म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येते एक प्रेयसी, एक प्रियकर आणि त्यांची प्रेमकहानी. याशिवाय प्रेम नसतचं का? दोन्ही भिन्न लिंगी व्यक्तींनी एकमेकांवर केलेलं प्रेम म्हणजे प्रेम, बस्स हेच असतं का प्रेम? दोघांची मन एकमेकांत खुप गुंतणं (या valentine day पुरतीच का होई ना) हेच असतं का प्रेम? बरं मग हे प्रेम असतं तरी काय? प्रेमाची काही व्याख्या असते का? प्रेमाच्या काही अटी किंवा नियम वगैरे असतात का?

          मित्रांनो, मला वाटतं प्रेम ही मनातली एक अत्यंत सुंदर भावना आहे. ते सर्व प्राणिमात्रांसाठी एक वरदान च आहे. प्रेमाची व्याख्या किंवा नियम असं काही नसतं. (व्याख्येत बसवायला प्रेम म्हणजे काय पायथागोरसचा सिद्धांत आहे......? की न्यूटनचा नियम......?) या सृष्टीत जशी हवा ही सर्वत्र पसरलेली आहे जी आपण श्वासाद्वारे घेतो तसचं हे प्रेम ही सर्वत्र पसरलं आहे, ते आपण मनाच्या उत्तम हालचाली द्वारे घेतलं पाहिजे. हवेनी जशी सृष्टी व्यापली आहे तसं प्रेम हे सारं जीवन व्यापून टाकणारी अद्वितीय भावना आहे. प्रेम या भावनेचा सर्वच सृष्टीने योग्य वापर केला तर हे सर्व जगच बदलून जाईल, अगदी प्रेममय होईल.

          फार पूर्वी पासूनच माणसाच्या मनात प्रेम ही भावना हळुहळु वृद्धींगत होत गेलीय. गुहांमध्ये राहणार्‍या आदिमानवी नर-मादीचं पुढे जाऊन शेती करणार्‍या कुटुंबप्रेमी माणसांमध्ये रूपांतर झालं. माणसानं लग्न प्रकिया निर्माण केली. एक नवरा, एक बायको असं नातं गेल्या शेकडो वर्षात रुजू लागलं. माणूस संस्कारित होत गेला आणि त्याची 'प्रेमाची कथा'च बदलत गेली. आजकाल प्रेम म्हणजे एक स्टाइल झालीय. जो तो आपल्या सोयी नुसार प्रेमाची व्याख्या बदलत चाललाय. प्रत्येकाच्या मनात प्रेम म्हणजे एक अजब रसायन होत चाललयं. पण प्रेम हे असं नसतच हे कोण सांगू शकेल का या आमच्या तरुण पिढीला?

          आपल्या लहानश्या वासराला जेव्हा गाय मायेनी चाटते ते प्रेम असते. घाबरलेल्या आपल्या बाळाला जेव्हा आई प्रेमाने कवटाळते ते प्रेम असते. आणि, आपण जेव्हा आपल्या आई बाबांच्या प्रेमाने पाया पडतो आणि ते मायेची मिठ्ठी मारतात ते प्रेम असते...... प्रेम हे वेगळ असं काही नसतच. ती  मनातली अकल्पनीय, अवर्णनीय अशी एक सुंदर भावना आहे. प्रेम हे कशावर ही होऊ शकतं. वस्तु, वास्तु, व्यक्ती, पक्षी, प्राणी, निसर्ग, वेळ, ठिकाण, पुस्तक आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावर आपण प्रेम करु शकतो. प्रेम या सुंदर भावनेला एका गोष्टीपुरतं मर्यादित न ठेवता या सुंदर सृष्टीवर च प्रेम करायला शिकलं पाहिजे. मंगेश पाडगावकर यांनी सांगितल्या प्रमाणे 'या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे'. खरच ते आपल्याला या आयुष्यावर प्रेम करायला शिकवून गेले.

          प्रेमाची भावना प्रत्येकात असते. अगदी प्राणीमात्रात सुद्धा. मी तर म्हणेन की प्राणी करतात तेच प्रेम सर्वात श्रेष्ठ असतं. अपेक्षा, मोह, इर्षा असं काही नसतं प्राण्यांच्या प्रेमात. उलट मानवी प्रेमात आता खुप विकृति आलीय. प्रेम साध्य नाही झालं की समोरच्या व्यक्तीचं नुकसान करुन त्रास देणं हे कुठलं प्रेम? मुलींच्या चेह-यावर acid फेकणं, आत्महत्या करणं, मानसिक त्रास देणं यात प्रेम कुठेच दिसत नाही. खरचं प्रेम ही एक खुप सुंदर गोष्ट आहे पण स्वत:च आणि दुसर्‍याचं 'आयुष्य' त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. जगण्यापेक्षा प्रेम अधिक महत्त्वाचं असूच शकत नाही. कितीही प्रेमात आकंठ बुडाला आणि पुढे प्रेमभंग झाला तरी, या प्रेमभंगातून बाहेर पडता येतं. पुन्हा नव्या उमेदीनं जगता येतं. अशा प्रेमाव्यतिरिक्त ही जीवनात खूप काही करण्यासारखं आहे. आयुष्यात अशी खुप क्षेत्र आहेत जी तुमच्या devotion ची वाट पहात आहेत. तुमच्या मनातल्या प्रेमाची ही ताकत त्या कामात टाका. तुमच्या व्यवसायावर, तुमच्या ध्येयावर प्रेम करा. ते काम फुलून येईल. आपलं मन सरसरून उठेल, तरारून उठेल. मनात आगळा वेगळा जोश निर्माण होईल.

          कधी कधी आपण आपल्या अंगावर थोडी जरी माती पडली तरी ती आपण पटकन झटकुन टाकतो. आपल्याला तिची कीळस वाटते. पण कधी विचार केलाय का की आपल्या मनाला लागलेली धूळ कशी साफ करणार आपण? आपण सर्वच आपल्या बाह्य स्वरुपावर खुप प्रेम करतो पण कधी आपल्या मनावर प्रेम केलयं का? दुनियादारीच्या नादात आपण स्वत:वरच प्रेम करायला विसरत चाललोय. Don't forget to love yourself. या आपल्या सुंदर "आयुष्यावर च प्रेम" करायला शिकलं पाहिजे.
         
ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन
जब प्यार करे कोई, तो देखे केवल मन

- डॉ संदीप टोंगळे