"गोष्ट एका पैशाची"


          "मैं ग्राहक को ...... रूपये अदा करने का वचन देता हूँ" असं प्रत्येक नोटे वर लिहिलेलं असतं. ती नोट 5 रूपये, 10 रूपये, 500 किंवा 1000 रूपये ची असो हे वाक्य प्रत्येक नोटे वर लिहिलेलं असतच. याचा अर्थ ती नोट म्हणजे पैसे नसतातच, ते एक वचन असतं, पैसे देण्याचं वचन. (बघितल्या का खिशातल्या सगळ्या नोटा तपासून, आहे ना हे वाक्य). म्हणजे प्रत्यक्षात पैसे दिलेले किंवा घेतलेले नसतात. मग आपण सगळेच कशाच्या मागे लागलोय, पैशाच्या की वचनाच्या? समजा पैश्याच्या मागे लागलोय तर मग कुठे आहेत पैसे, ही तर सगळी वचनं गोळा करून ठेवली आपण. प्रत्यक्षात पैसे कुठे आहेत हे? नाही ना? पडला ना प्रश्न? (ठेवा आता नोटा खिशात). या सर्व नोटा म्हणजे पैसे नाहीत ही आपली currency आहे, 'रुपया' ही आपली currency आहे. हीच currency प्रत्येक व्यवहाराचे सक्षम साधन आहे. पण हा विषय मांडण्यासाठी खुप खोलात जावं लागेल. Illuminati, petro dollar, gold dollar, World bank, RBI हे सर्वच विषय खुप खोलात जावून मांडावे लागतील.(आणि तेवढा मी ज्ञानाने सक्षम ही नाही, आणि जेव्हा होईल तेव्हा नक्की लिहीलच.)

          मित्रांनो माझा आजचा विषय हा नाही. मला एवढच म्हणायचय की आपण सर्वच ज्या गोष्टीच्या मागे लागलोय म्हणजे पैशाच्या, हा पैसा मिळविणे एवढाच उद्देश आहे का आपल्या आयुष्याचा? पैसा इतका महत्वाचा आहे का? की त्यापुढे आपण माणुसकी विसरत चाललोय, माणुसकीसाठी दिलेली 'वचनं' विसरत चाललोय. (माणसाने माणूस म्हणून जगण्याचं दिलेल वचन). सगळी सुख, समाधान, आनंद पैशावरच अवलंबून असतात का? पैसा हेच संपत्तीचे किंवा श्रीमंतीचे मोजमाप आहे का? मान्य आहे की या कलयुगात पैशाशिवाय काही होत नाही, प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो पण पैसा हेच सर्वस्व आहे का? पैशाला इतकं अवाजवी महत्व देणं योग्य आहे का?

          पैशाने गादी विकत घेता येईल, पण शांत झोप नाही, पैशाने घर विकत घेऊ शकतो पण घरातलं घरपण नाही, पैशाने घड्याळ विकत घेऊ शकतो पण गेलेली वेळ नाही, पैशाने पद विकत घेता येईल पण आदर नाही, पैशाने पुस्तके विकत घेऊ शकतो पण ज्ञान नाही, पैशाने माणुसकीचं वचन विकत घेऊ शकतो पण खरी माणुसकी नाही. पैसा हेच सर्वस्व नाही. पैसा जरुर कमवता येईल पण त्यासाठी आपण माणुसकी गमवायला नको. पैशाची पूजा जरूर करू पण पैशाचे गुलाम नको बनायला. हे लक्षात ठेवू की माणसासाठी पैसा आहे, पैशासाठी माणूस नाही. पैसा हे एक सुखी राहण्याचं साधन असू शकत पण फक्त पैसाच सुख देतो हे मला अजिबात मान्य नाही. कारण गडगंज मालमत्ता असलेल्या व्यक्तीला जर अपत्यच नसेल तर या पैशात कसलं सुख आहे.पायी चालताना, सायकल हवी वाटते, सायकल चालवताना गाडी, गाडी चालवताना कार हवी वाटते. आपल्या गरजा वाढत जातील तसं आपण हे सर्व पैशाने विकतही घेऊ शकतो, पण मग हेच सुख आहे का? पैशाने घेतलेल्या या materialistic गोष्टी तुम्हाला क्षणभर आनंद अवश्य देतील पण सुख आणि समाधान या गोष्टीत नसतं.

जोडोनिया धन उत्तम वेव्हारे। उदास विचारे वेच करी।।१।।
उत्तमची गती तो एक पावेल। उत्तम भोगील जीवरवाणी।।२।।

          खूप खूप पैसा मिळविणे हेही काही पाप नाही. टाटा, मित्तल, बिल गेट्स या व्यक्तींनी खुप पैसे मिळविले, पण ते समाजासाठी खर्चही केले. संत तुकारामांना या श्लोकातुन हेच सांगायचे आहे की चांगल्या मार्गानी पैसे मिळवा व ते चांगल्या कामासाठी सढळ हाताने खर्च करा. तुकाराम महाराजांकडे खानदानी सावकारी होती. दुष्काळासारख्या वाईट परिस्थितीत त्यांनी लोकांना खुप मदत केली. दुष्काळात त्यांनी लोकांचे हाल पाहिले. ‘अन्न अन्न’ करत मरणारे जीव पाहिले. त्यांनी त्या लोकांची सर्व कर्जखाती, गहाणखाती नदीत बुडवुन टाकली. अति कंजूसपणा करुन पैसा साठवून ठेवून करायच काय? भांड्यात साठवून ठेवलेलं कितीही चांगल दही असलं तरी ते कालांतराने खराब होतच त्याचा योग्य वेळी वापर झाला तर फलदायी ठरत, तसचं पैसा साठवून ठेवण्यापेक्षा उपयोगात आणला तर फायदा होतोच. आपल्या कमाईतला काही हिस्सा समाजकार्यासाठी खर्च करणे म्हणजे सफल जीवन असं मी मानतो.

          पैशाने च सुख मिळते, सुखी राहण्यासाठी पैसाच पाहिजे असं जर गृहीत धरलं तर मग BMW सारख्या luxurious गाड्यातल्या प्रवासात जो आनंद आहे तो बैलगाडीत मोकळ्या हवेत, निसर्गाशी गप्पा मारत मिळू शकत नाही का? आणि जर रडायचं असेल तर ते मर्सिडीज च्या स्टेअरिंग वर डोकं ठेऊन रडावं, रस्त्यावर कुठेतरी कोपऱ्यात किंवा आपल्या घरातल्या फाटक्या उशीवर डोकं ठेऊन रडण्यात काय फायदा? हो ना? सुख पैशात नाही आपल्या आनंदात आहे. काही जण म्हणतात पैशाने पैसा जोडत श्रीमंत होता येत पण मला वाटत, माणसाने माणूस जोडत गेलं तर अधिक श्रीमंत होता येतं, समाजाला उपयोगी असं काम करता येतं आणि हीच श्रीमंती खुप मौल्यवान असते. अशी नोटे वरची वचनं संभाळत बसण्यापेक्षा असं एक माणुसकीच वचन पाळू की ज्यातून दिव्यसमाज निर्माण करता येईल.

टिप - काहीना ब्लॉग ला reply द्यायचा आहे आणि ब्लॉगवर reply देता येत नसेल तर माझ्या मो नं 9561646178 whatsapp वर आपला अभिप्राय कळवला तरी चालेल. काही suggestions द्यायचे असतील तरी चालतील. आपला प्रत्येक सल्ला माझ्यासाठी पैशापेक्षा नक्कीच जास्त मौल्यवान असेल.

- डॉ संदीप टोंगळे
Contact no. 9561646178

Comments

Popular Posts