"अश्रूंचा दुष्काळ"

भावनांना ही इच्छा होते कधी तरी
अश्रूंच्या ओलाव्यात भिजायची,
अन भिजून ओलं चिंब झाल्यावर
पुन्हा नव्या रुपात सजायची...

एकदा दुःखाचा लळा लागला की
आनंदाची सुद्धा वाटू लागते भीती,
आनंदासोबत दुःखाचा ही उत्सव
आयुष्य जगण्याची हीच खरी नीती...

सुख दुःख मिश्रित भावनांना
अश्रूंच्या ओंजळीत जपवता यावं,
आयुष्य म्हणजे दुसरं काय असतं
दुःखाला सुखाच्या मागे लपवता यावं...

या जीवन प्रवासात अश्रूंची साथ असेल
तर सुख दुःखाची जोडली जाते नाळ,
मनसोक्त आयुष्य जगण्यासाठी
कधीच पडू नये "अश्रूंचा दुष्काळ"......

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Comments