Tuesday, January 26, 2016

"माझ्या मनातला खराखुरा प्रजासत्ताक देश"          आपल्यातील च काही लोकांच्या मनात असा ही विचार येत असेल की आपण देशभक्त आहोत हे अनुभवण्यासाठी आपल्याला काही विशिष्ट दिवसच का हवेत? का कशासाठी? मला ही पहिले असच वाटायचं की हे 26 जानेवारी, 15 ऑगस्ट हे राष्ट्रीय सण कशाला पाहिजेत? आपण आपली देशभक्ती रोज च साजरी केली, रोजच व्यक्त केली, रोज च देशाचा विचार करुन वागलो तर कशाला पाहिजे एवढा अट्टाहास......? पण आता लक्षात येतयं की हे राष्ट्रीय सण खूप गरजेचे आहेत आणि अनिवार्य आहेत, कारण आपण आता हळूहळू विसरु लागलो आहोत कि २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट हे दिवस बघण्याची स्वप्ने बघत, किती यातना सोसत, किती मोठी कुर्बानी देत त्या शुर वीरानी आपले बलिदान दिले होते. या दिवसा बद्दल सन्मान असणे किंवा या दिवशी का होईना आपल्या देशभक्ती ची अनुभूती होणे हे त्या वीर स्वतंत्र सेनानी ना श्रद्धांजली अर्पण केल्या सारखेच आहे.

          देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. आमचा भारत देश हा एक मोठा लोकशाही देश आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राज्य आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली मिळाला. त्यादिवसापासून प्रजेची सत्ता सुरु झाली. प्रजेच्या हाती सत्ता म्हणजे प्रजासत्ताक. आज ही प्रेजेच्याच हाती सत्ता आहे पण ज्या प्रजेला या प्रजासत्ताक ची गरज आहे त्या प्रजेच्या हाती सत्ता नाही राहिली. सत्तेच्या चाव्या सतत एकाच प्रजेकडे ( म्हणवून घेणारे राजकीय घराणे ) रहात आहेत आणि खरी प्रजा दुर्लक्षित होत चाललीय.

          लोकशाही म्हणलं की राजकारण आलचं पण ज्या गलिच्छ राजकारणाने प्रजेचा आवाज च दाबला जातोय ते राजकारण काय कामाचं. राजकीय पक्ष व त्यांच्या कारभाराबाबत बोलण्या एवढा मी मोठा व विचारवंतही नाही. मात्र एवढे नक्की की, सध्याच्या राजकारणात प्रामाणिक व सचोटीने काम करणाऱ्यांची कमी आहे. निष्ठावंत व प्रामाणिक राजकर्ते घडविले पाहिजेत. चांगले काम करण्यासाठी चढाओढीने स्पर्धा झाली पाहिजे.( येथे चढ़ाओढीने स्पर्धा होतीय पण ती फक्त भ्रष्टाचारासाठी). निवडणूक काळात दिखाऊ प्रचार करण्याची व खोटी आश्वासने देण्याची वेळच येता कामा नये. तरच ती खऱ्या अर्थाने लोकशाही व प्रजासत्ताक व्यवस्था म्हणता येईल.

          भारतात बिगर राजकीय व निष्पक्षपाती प्रशासकीय सेवा ही एक महान संपत्ती आहे. परंतु या संपत्तीलाही या गलिच्छ राजकारणामुळे वाळवी लागली आहे, ही खरच दु:खाची बाब आहे. जातीयवाद, भ्रष्टाचार आणि राजकारण हे आपल्या प्रशासकीय सेवेची दिवसेंदिवस झीज करत आहे. सध्याच्या प्रक्रियेत राजकीय पक्षांच्या घोषणा, नितीमुल्ये आणि कार्यक्रमांनी आपला अर्थ गमावला आहे. मला वाटतं भारताची एकात्मता आणि एकता आज संकटात आलीय. भारतीय राजकारण, संस्कृती- सहिष्णुता यांचीही स्थिती वाईटच आहे. पण या सर्व गोष्टीना कुठे ना कुठे आपण जबाबदार आहोत. सर्व काही राजकर्त्यावर सोडून आपण मोकळे होतो पण तसं न करता आपण पण या लोकशाही चा एक महत्वाचा घटक आहोत हे लक्षात ठेवून आपण सर्वानी च त्यात सक्रीय सहभाग घेतला तर या देशाला "खराखुरा प्रजासत्ताक देश" होण्यापासुन कोणी रोखू शकत नाही.

          भारत हा खरोखरच एक असामान्य प्रजासत्ताक देश आहे आणि भारताइतकी विविधता आणि वाद एकात एक गुंफलेला दुसरा देशही या जगात नसेल. इतक्या सर्व विविधतेतून एकता हीच खरी भारताची ताकत आहे. पण याच एकतेला आव्हान देण्याचं काम गेली 60-70 वर्षे काही भारत द्वेषी राष्ट्रांकडून होत आहे. पण त्याला उत्तर देण्यास भारतीय जनता नेहमी सज्ज राहिली आहे. पण मला वाटतं गेल्या 5-10 वर्षात भारतीय जनतेत एकात्मतेची भावना कुठेतरी हरवली आहे. याला कारणीभूत आहे आजचा आमचा युवावर्ग हो युवावर्गच !(म्हनवनार्या राजकीय घराणेशाहीने त्यांच्या स्वार्थापोटी या युवा वर्गाला निष्कारण बांधून ठेवलयं आणि धर्म,जात,पात इ. याच विष दिवसागणिक पाजलं जातय. हे कुठे तरी थांबलं पाहिजे).

          स्वातंत्र्यानंतरचा तत्कालीन युवावर्ग उत्साहात होता. परंतु, आज आमची नैतिकता, जबाबदारी ढासळलेली दिसून येते. याचं कारण मागच्या पिढीचा पुढच्या पिढीशी संवाद कमी पडतोय किंवा तो नाहीच. त्यामुळे भारतीय अस्मिता, एकात्मता, स्वातंत्र्याची किम्मत या आमच्या युवावर्गाला नाही. पुढच्या आणि मागच्या पिढ्यांत संवाद होणे जरूरीचे आहे. त्यासाठी त्यांना एका व्यासपीठावर आणणे जरूरीचे आहे. या संवादातून मागल्या पिढीतून पुढल्या पिढीत संवाद होऊ शकेल. भारतीय अस्मिता ज्यामुळे पुन्हा मिळाली ते स्वातंत्र्य म्हणजे काय, त्याचा अर्थ आमच्या पिढीला मागल्या पिढीकडून कळेल. भारतीय संस्कृती, सहिष्णूता, अहिंसक विचारधारा, भारतीय विद्वत्तेची परंपरा सांगणारे लेख या सगळ्यांची जाणीव आम्हाला व्हायला हवी. तरच  स्वातंत्र्याचा अर्थ आमच्या सारख्या युवावर्गाला कळेल.

          Make in India आणि अशा इतर ही खुप योजना भारतात सुरु होत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे, त्याला आपण सहकार्य करून बळ दिलं पाहिजे. (किमान आपल्या देशासाठी तरी पक्ष,पक्षश्रेष्ठी बाजूला ठेवून सर्वच नेत्यांनी या व अशा देशोपयोगी योजनांसाठी एकत्र यायला हवं, सध्या ती काळाची गरज बनलीय). ज्या दिवशी आपली भारतमाता एका हातात कमळ व दुसर्या हातात कंदील घेऊन हत्तीवर स्वार होऊन इंजिनाच्या दिशेने ठीक 10 वाजून 10 मिनिटाने प्रस्थान करेल त्या दिवशी या भारतमातेला महासत्ता बनण्यापासून कोणी रोकू शकणार नाही. यातला गमतीचा भाग सोडला आणि जर खरच असं झालं तर भारताला महासत्ता बनण्यास वेळ लागणार नाही. त्यासाठी सर्वांची मानसिकता बदलायची गरज आहे. त्यातआमच्या युवापिढीचा हातभार खुप मोलाचा असेल. आमच्या सारख्या युवा वर्गा कडे जास्त लक्ष देऊन त्यांच्या मनात देशभक्ति,देशाची अस्मिता,देश अभिमान जागृत केला पाहिजे. आणि तेव्हा च निर्माण होईल "माझ्या मनातला खराखुरा प्रजासत्ताक देश"......!

          माझ्या सर्व देशबांधवांना प्रजासत्ताक दिनाच्या खुप खुप शुभेच्छा......!

- डॉ संदीप टोंगळे