Saturday, January 23, 2016

मनाला वाट्टेल ते......

मनाला वाट्टेल ते......

          आपण आपलं दैनंदिन जीवन जगत असताना कितीतरी चांगल्या गोष्टी करायच्या टाळतो कारण लोकं काय म्हणतील, कसं वाटेल ते लोकांना, लोकांना नाही पटणार, उगीच लोकांमधे चर्चा होईल असे नानाविध विचार कायम डोक्यात घर करून असतात. या विचारांमूळे आपण जीवनाचा खरा आनंद गमावून बसतो. एखादा आनंद साजरा करायचा असेल तर लगेच मनात विचार येतो की असं उड्या मारणं, नाचणं, हुर्र्रे करणं बर दिसेल का? शोभेल का ते? आपण आपल्या मनापेक्षा लोकांच्या मनाचा विचार जास्त करतो. लोकं, समाज, नातेवाईक, मित्र या सर्वांचा विचार केलाच पाहिजे आणि करवाच पण तो मर्यादित असावा. कारण त्यापेक्षा आपल्याला होणारा आनंद महत्वाचा असतो.

          बघा कधीतरी, छोटासा आनंद साजरा करताना सुद्धा किती छान वाटत ते, तुमच्या छोट्या छोट्या यशात मोठा आनंद व्यक्त करताना किती उमेद निर्माण होते ते. तुमच्या कुटुंबासोबत ते यश सेलिब्रेट करुन पहा किती उत्साह येतो मनात पुढच कामं करण्यासाठी. मनातल्या इच्छांना मोकळा मार्ग दाखवा. मनातल्या इच्छा दाबुन त्याचा कधीतरी उद्रेक होतोच की, भविष्यात मानसिक किंवा शारीरिक त्रास ही होऊ शकतात. पण त्या गोष्टी सहज टाळता येऊ शकतात मनातल्या विचारांना वाट दाखवून......

          क्रिकेट च्या सामन्यात एखादी विकेट पडली की तो बॉलर असा काही आनंद व्यक्त करतो की असं वाटत ही त्याची आयुष्यातली पहिली च विकेट असेल किंवा त्याला असं वाटत असेल की आपण किती मोठं यश मिळवलयं. त्या सेलिब्रेशन मधे तो उड्या मारतो, नाचतो, लोळतो, काहीही करतो पण तो आनंद साजरा करतोच. तो असं मनात ठरवत नाही की पुढची विकेट गेल्यावर दोन्ही विकेट चा आनंद एकदाच साजरा करू. तो आनंद त्याच वेळी सेलिब्रेट करतो. आणि त्याच वेळी सेलिब्रेट झाला पाहिजे. आपण ही आयुष्यात असे सेलिब्रेशन नेहमी केलेच पाहिजे, आयुष्य जगण्याचा आनंद मनसोक्त घेतलाच पाहिजे.

          मी एक दिवस असाच क्लिनिक मध्ये बसलो होतो तेव्हा एक ओळखीचीच कैंसर ग्रस्त महिला तिच्या 2 वर्षाच्या मुलीला तपासण्यासाठी घेऊन आली. मी तपासलं आणि रक्ताची तपासणी करण्यासाठी waiting रूम मधे बसवलं. थोड्यावेळाने कसला तरी आवाज येतोय म्हणून मी पहायला गेलो तर माझी नजर waiting रूम मधे बसलेल्या त्या महिले कड़े गेली. ती महिला तिच्या बाळा सोबत खेळत होती. बाळाचं बोलणं, चालणं, हालचाली यावर ती बेभान होऊन हसत होती, त्या बाळाची छोट्यात छोटी प्रत्येक गोष्ट ती आनंदाने सेलिब्रेट करत होती. ते पाहून माझ्या मनात विचार आला की ही महिला कैंसर ग्रस्त असून किती आनंदाने राहतेय, पुढे येईल तो क्षण मनसोक्त सेलिब्रेट करतेय. आणि आपण नसलेली दुःख कुरवाळत बसतोय, आयुष्याबद्दल तक्रारी करतोय. आपण सुद्धा असाच आनंद साजरा केला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक विजयाचा. आपणही असच हसलं पाहिजे, नाचलं पाहिजे मनसोक्त आणि स्वताला म्हटलं पाहिजे कर मनाला वाट्टेल ते......

- डॉ संदीप टोंगळे