"मनातला देव"



          आज रोजीपर्यंत देव या संकल्पनेबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे. देवाचं अस्तित्व, देवाची किमया, देवाबद्दलची नास्तिकता या आणि अश्या किती तरी विषयावर चर्चा, लेख, भाषणे, वादविवाद रंगलेले आहेत. तरीसुद्धा मला वाटते की, कितीही विभिन्न मतप्रवाह मांडले गेले असले, तरी देखील "देव" हा विषय अजूनही अनुत्तरित च राहिला आहे!

          आस्तिक देव मानतात, देवावर श्रद्धा, विश्वास ठेवतात. नास्तिक देव मानत नाहीत. देवावर विश्वास ठेवत नाहीत. पण तुम्ही आस्तिक असलात किंवा नास्तिक असलात, पण देव ही अत्यंत मूलभूत अशी संकल्पना आहे आणि ती जगातल्या एकूण सर्व लोकांच्या मनामध्ये खोलवर पोचलेली आहे हे प्राथमिक सत्य आहे. म्हणजे तुम्ही पक्के नास्तिक आहात आणि देव मानत नाही असे ठाम सांगत असाल, तर ‘तूम्ही काय मानत नाही म्हणालात?’ अशा प्रश्नाचे उत्तर देण्याकरता तरी निदान तुम्हाला देव ही संकल्पना मनात आणावीच लागते.

          'पण मुळात देव ही संकल्पना आहे तरी काय?' याचा विचार केला जातो का? नास्तिक माणसे आपण काय नाकारत आहोत याचा खोलवर विचार करून ते नाकारत असतात का? आणि आस्तिक माणसे तरी आपण नेमकी कशावर श्रद्धा ठेवत आहोत, ज्याच्यावर श्रद्धा ठेवत आहोत ते आपल्याला नीट समजले आहे का? या प्रश्नाचा विचार करतात का? दोघे ही मनात श्रद्धा च ठेवतात. आस्तिक देव असल्याची श्रद्धा आणि नास्तिक देव नसल्याची श्रद्धा. पण आपल्या मनानी तरी खरं काय मानायचं?

          एकदा मी आमच्या गावातल्या माढेश्वरी मंदिरात बसलो होतो मग सहज गंमत म्हणून एक प्रयोग केला. देवळाच्या प्रवेशद्वारात बसलो आणि देवदर्शन करून बाहेर पडणार्‍या प्रत्येक व्यक्तीला विचारू लागलो, की “काय झालं का देवदर्शन?” सर्व माणसे ‘हो’ असेच उत्तर देऊन पुढे जात होती. 'तुम्हाला खराखुरा देव भेटला का?' असा माझ्या प्रश्नाचा खरा अर्थ होता. पण प्रश्नातल्या देवदर्शन शब्दातली गम्मत कोणाच्याच लक्षात आली नाही! प्रत्येक जण येतोय आणि अतिशय मनोभावे देवमूर्ति चे वंदन करुन जातोय पण कोणीच विचार सुद्धा करत नाही की नेमकी ही आपण कशावर श्रद्धा ठेवत आहोत.

          देवावरच्या श्रद्धेमुळे मनाला शांती मिळते असंही काही लोक सांगतात. असं सांगणार्‍या माणसांना देवाचा शोध घ्यायचाच नसतो. त्यांना फक्त त्यांच्या मनातला देव या संकल्पनेवरच्या श्रद्धेचा उपयोग काऊन्सेलिंग करणा-या एखाद्या सायकॉलॉजिस्टप्रमाणे करून घ्यायचा असतो. त्यांची श्रद्धा म्हणजे फक्त मनाला शांती मिळविण्याकरीता एखाद्या सायकियाट्रिस्ट डॉक्टरशी केलेला व्यवहार असतो. तर इतर काही श्रद्धावान आस्तिक माणसे देवाला नवस बोलून काही मिळवण्याचा प्रयत्न करतात. तो तर चक्क देण्याघेण्याचा व्यवहार असतो. त्यांना फक्त देवाचा उपयोग करून घ्यायचा असतो. पण तरी प्रश्न अनुत्तरित च आहे की ' देव ही एक फक्त संकल्पना आहे की त्याचं खरच अस्तित्व आहे?'

          हा लेख लिहावा असा वाटला त्याचं कारण असं की मी काल देवाच्या अस्तित्वावर प्रकाश टाकणारी एक छोटी स्टोरी वाचली ती अशी की 'एक छोटा मुलगा, आज त्याने काही ठरवले आहे. त्याला देवाबरोबर जेवायचे आहे. तो देवाच्या शोधात निघाला. काही खाण्याच्या वस्तू आणि पाण्याच्या बाटल्या बरोबर घेऊन तो घराबाहेर पडला. देवाला शोधत खूप चालला. एका बागेत गेला. थोडी विश्रांती घेण्यासाठी एका बाकावर बसला. जवळच एक म्हातारी होती. तिच्याकडे त्याचे लक्ष गेले. तिला बहुधा तहान लागलेली होती. त्याने जवळचे पाणी तिला दिले. ती पाणी प्याली. बाटली परत देताना ती हसली. इतके सुंदर हसणे तो प्रथमच बघत होता. त्याने तिला खाऊ दिला. ती परत तसेच हसली. ते हास्य बघण्याचे त्याला वेडच लागले. तो उठला. दिवस सरत आला होता. आता त्याला घरी परतायचे होते. तो तिथून निघाला. थोडे पुढे गेला. वळून पाहिले. ती म्हातारी गोड हसत होती. तो धावत तिच्याकडे आला. तिला मिठी मारली. तिनेही प्रेमाने त्याला कुशीत घेतले. जरावेळाने तो निघाला. घरी पोचला. आज तो खूपच खुश दिसत होता. आईने विचारले त्याला, मग तो सांगू लागला, ‘देव कितीतरी थकला होता आई! भुकेला, तहानेलाही होता. तरी खूप गोड हसत होता.’ इकडे ती म्हातारीही घरी पोचली. केवढी आनंदी, केवढी तृप्त! रोजचा शीण नव्हता. एकटेपणाची बोच नव्हती. तिच्या मुलाला सारेच अनपेक्षित होते. ‘कुठे होतीस दिवसभर?’ त्याने आईला विचारले. ती त्या दैवी तंद्रीतच होती. म्हणाली, ‘मला वाटत होते त्यापेक्षा खूप तरुण आहे रे देव! तरुण कसला? बाळच!! न मागता मला सारे दिले. प्रेमाने मिठीही मारली!’ म्हातारीच्या देहावर वसंत ऋतू अवतरला होता. केवढा आनंद, केवढी तृप्ती, केवढे समाधान!!

          माझ्या whatsapp ग्रुप मध्ये आलेली ही छोटीशी गोष्ट मी वाचली आणि 'देव' या संकल्पने चा खरा अर्थ कळाला. सगळा सार या छोट्याशा गोष्टीत कळुन आला. मनात वाटलं की, आपण देव शोधतोय आणि देव आपल्याच सोबत फिरतोय निरंतर...... आपल्या मनामध्ये...... हाच असेल का तो माझ्या "मनातला देव" ? आपण याच मनातल्या देवाला बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतोय. आपण नेहमी देवाला बाहेर च्या जगात शोधण्याचा प्रयत्न करतो पण तो आपल्यात च आहे आपल्या मनात आहे. बाहेर च्या जगात देव नाही याचा अर्थ असा नाही की मंदीरे अनावश्यक आहेत. ही मंदीरेच आपल्याला आपल्या मनातल्या देवाशी जुळवुन ठेवतात, मनातल्या देवाशी संपर्क करायला शिकवतात. "देव" हा आपल्या आत च कुठेतरी हरवला आहे त्याला च शोधण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे......

- डॉ संदीप टोंगळे

Comments

Post a Comment

Popular Posts