॥अवतारी मन॥


"यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत
अभ्युत्थानं अधर्मस्य तदात्मानं स्रुजाम्याहं"॥७॥
"परित्राणाय साधुनां विनाशायच दुष्कृतां
धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे"॥८॥अध्याय॥४॥

          नरेंद्र प्रभु यांचा ब्लॉग "संभवामी युगे युगे" वाचला होता मागे एकदा. मनात तेच प्रश्न आले? की खरच दुष्ट शक्तींचा नाश करण्यासाठी भगवान कृष्ण पृथ्वीवर अवतारित होतील का? वचन पूर्ण करतील का? आणि अवतारित झालेच तर कोणत्या अवतारात येतील? मनुष्याच्या की निसर्गाच्या? असे अनेक प्रश्न डोक्यात आले पण मनात एकच विचार आला की खरच अवतार असतात का? आणि असतील तर त्याच नेमकं स्वरुप कसं असेल?

          मित्रांनो, आपण म्हणतो की दृष्ट शक्ती वाढली आहे त्याचा विनाश झाला पाहिजे. यासाठी आपण एखाद्या देव अवताराची वाट पाहतोय. आणि तो भगवान कृष्ण सांगुन गेलाय की ' संभवामी युगे युगे......' म्हणजे तो नक्की येईलच किंवा आला ही असेल आपल्या मध्ये. मग तो नरेंद्र मोदी असेल का? की अरविंद केजरीवाल? की आण्णा हजारे असतील का? की कोणी अभिनेता की प्रणेता असेल? कोण असेल नेमकं? असं सर्वांच्या मनात असेलच. पण मी ठाम पणे सांगतो की तुमच्या मनातला देव अवतार आलाय. दुष्ट शक्ती चा नायनाट करायला तो आलाय. आता तुम्ही म्हणालं कुठे आहे? कधी आला? कोण आहे तो? मित्रांनो सांगतो पहा पटतयं का?

          रामायण, महाभारतात सांगीतलयं म्हणून आपण गृहीत धरून चालू की वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी देव अवतार घेईलच. हा देव अवतार आपण दुसर्यात का पाहतो? त्यापेक्षा स्वत:त का नाही पहात? मला वाटत प्रत्येकाच्या मनात एक देवरुपी आणि एक राक्षसरुपी माणुस आहे. चांगला आणि वाईट हे दोन्ही विचार मनात असतातच. सर्वानी मनातल्या वाईट विचारावर मात करून चांगल्या विचाराचा अवलंब केला की आपोआप दुष्ट शक्ती चा नाश होईल आणि हाच असेल तो अवतार जो सर्वाना अपेक्षित आहे पण या साठी 'बदल' अपेक्षित आहेत. माणुसकीत बदल, संस्कृतीत बदल, चालीरीतीत बदल, निसर्गात बदल आणि महत्वाच म्हणजे वागण्यात बदल हा अनिवार्य आहे. मनुष्य मनातील 'बदल' हाच खरा या कलयुगासाठी श्रीकृष्णा चा अवतार आहे. आणि हेच माझ्या कल्पनेतील "अवतारी मन"......

          Change is the law of nature. बदल हा निसर्गाचा नियम आहे. या बदलाची सुरुवात आपण आपल्यापासून च केली तर सर्व जग त्याच अनुकरण करेल. डार्विनच्या सिद्धांतात सांगितल्याप्रमाणे जो बदल करत येणाऱ्या परीस्थितीशी जुळवून घेत राहील तोच जिवंत राहील, ही गोष्ट सगळीकडेच खरी ठरते. त्यामुळे माणसाने स्वतःमधे बदल करत परीस्थितीशी जुळवून घ्यायला शिकलं पाहिजे. तरंच प्रगती होणं शक्‍य आहे. थोडक्‍यात काय तर “बदल हा अनिवार्य आहे.’ म्हणजेच Change is inevitable.

सर्वांत प्रमुख गोष्ट म्हणजे, बदल करण्याची मानसिक तयारी पाहिजे. बदल हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे आपल्याला परिस्थितीनुसार आपल्या स्वभावात, वर्तनात बदल करावाच लागेल. आपण जर आपल्या वागण्या-बोलण्यात बदल करणार नसू तर त्याचे विपरित परिणाम आपल्याला आयुष्यामध्ये भोगावे लागतात. त्यामुळे अहंभाव सोडून आपल्या स्वभावात आणि वर्तनात योग्य ते बदल करावेच लागतात. जीवनाकडे सकारात्मक दृष्ट्या पाहिल्यास काहीही अशक्य नसते. प्रयत्न करीत राहावे आणि फळ निसर्गावर सोडून द्यावे. चांगल्या गोष्टी पेरत जाव्या. निसर्ग नियमानुसार फळ मिळतेच. चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळते.

          आपल्या सर्वांच्या मनात भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतलाय आता त्याचा कसा आणि कधी वापर करायचा हे ज्याच त्याने ठरवलेलं बरं? कारण आज काल खुप जण समाजसेवे च्या मार्गाने बदल करू इच्छितात तर काहीजण सांस्कृतिक, नैसर्गिक तर काही जण राजकीय मार्गाने बदल घडवत आहेत. पण बदल झालाच पाहिजे आणि त्यासाठी सर्वानी प्रयत्नशील रहायला हवं. हे एक मानसिक युद्ध आहे त्यात विजय आपल्या बदलेल्या मनाचाच होईल. कोणत्याही युगात "अवतारी मन" च जिंकतं आणि जिंकत राहिल......

- डॉ संदीप टोंगळे

Comments

Popular Posts