जगायला जमलं राव...


वाईट अनुभवांची 
संख्या थोडी वाढली
की आपल्या आयुष्याची
उलथापालथ झाली
असं वाटू लागतं...

दुःखाची जरा अधिक
तीव्रतेने जाणीव होऊ लागली,
अगदी मनासारखं न होता
सगळं उलटं घडू लागलं की
माणूस तत्वज्ञान बोलू लागतो,
मग त्याला अनेकदा
अध्यात्माची गोडी लागते...

त्याला मग कधी
आध्यात्मिक विज्ञान
कधी कर्म, कधी जीवनाचं मर्म
तर कधी जगण्याचा धर्म
अशी नाव लावतो आपण...

थोडक्यात काय,
सुखांकडे कानाडोळा करून
दुःखाची कारणे शोधतो,
असं का घडलं याचा शोध घेतो
आणि उत्तरं नाही सापडली
की अनाकलनीय तर्क लावून
त्याला लेबल लावतो...

आणि मग यालाच
जीवन ऐसे नाव,
अनुभव समृद्धता वगैरे
गोंडस वर्णन करून
आयुष्य असंच असतं असं म्हणत
आपलं रहाटगाडं खेचत राहतो...

हेच जर हसत, खेळत
नाचून, गावून जमलं,
तर जगायला जमलं राव
असचं म्हणायचं ना...?

- डॉ संदिप टोंगळे

Comments