"भावनांचा जळून आता कोळसा होईल...!"

          जळत असलेल्या मेणबत्तीचं थोडंस मेण चुकून हातावर पडलं किंवा चुकून उदबत्तीचा छोटासा चटका बसला तरी वेदनेने किती व्याकुळ होतो आपण... तो इवलुसा चटका काही क्षण का होईना पण बधीर करतो आपल्याला... सर्व काही आलबेल सुरू असताना नकळत अंगावर पडलेल्या छोट्याशा संकटामुळे सुद्धा भावना दुखावतात आपल्या... पण त्या आगीत होरपळणाऱ्या देहाचा कोळसा होईपर्यंत याच भावना सुखाच्या निद्रेत असतात. एखाद्याला डोळ्यादेखत जाळण्याइतका टोकाचा राग, द्वेष का करतात लोकं? आणि हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहून सुद्धा कमालीचे शांत राहून आपण तरी काय साध्य करतो? नेमकी असली कोणती मानसिकता घेऊन आपण या समाजात वावरत आहोत हाच मोठा प्रश्न पडतो. अशा विकृत घटना, ते जळून कोळसा झालेले चेहेरे पाहून, त्या किंकाळ्यांचा आवाज ऐकून डोळ्यात, कानात तप्त ज्वालामुखी ओतल्यासारखं वाटतंय. कान, डोळे बंद केले तरी मनात लागलेली आग आपण कशी विजवणार...? आज आपलं मौन हीच खरी हिंसा ठरतेय. या घटनांना खरे जबाबदार आपणच आहोत. आपल्या मुलांना आपण एखादं झाडं लावून त्याचं जोपासन करून वाढवायला शिकवत नाही पण खेळण्यातली बंदूक, गदा, तलवार मात्र आपण आवडीने हातात देतो. साधू संतांनी सांगून ठेवलेली शब्द संपत्ती आपण मुलांना शिकवत नाही पण अर्वाच्य शब्द संग्रह त्या मुलांचा तयारच असतो. कुठल्या दिशेने चाललंय हे सर्व... अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आपली हीच तरुणपिढी प्रसारमाध्यमांवर आग ओकते, त्या आगीत सदविचारांना नग्न करून जाळलं जातं. भविष्यात हीच तरुणपिढी घरी स्वतःच्या बापाला सुद्धा शिव्या द्यायला घाबरणार नाही. त्या जाळलेल्या देहांसोबत आपण संस्कारांची सुद्धा अगदी राखरांगोळी केलीय... हिंसा फक्त कृतीतूनचं होत असते असं नाही तर त्याला हातभार आपल्या मौनातून मिळतोय हे लक्षात येईपर्यंत आपल्याच "भावनांचा आता जळून कोळसा होईल...!"

- डॉ संदिप टोंगळे

Comments

Popular Posts