श्वासांचा हिशोब

आपण निसर्गाला दिलेल्या
बेहिशोबी जखमांच्या बदल्यात
आज निसर्गच मागतोय
आपल्या जगण्याचा हिशोब

अतिशय महागडं, न परवडणारं
कशानेच भरून काढता येत नाही,
किती उरलंय ते ही माहिती नाही
कसलाच हिशोब नसताना
आपण जे वारेमाप उधळलं
आज निसर्गच मागतोय
त्या आयुष्याचा हिशोब

स्वतःच्या स्वार्थी सुखासाठी
निसर्गाला विद्रुप बनवलं
अतिशय क्रूर राक्षसासारखं
अक्षरशः पोट भरून
फुटेस्तोवर ओरबाडून खाल्लं
आज निसर्गच मागतोय
त्या प्रत्येक घासाचा हिशोब

बुद्धीच्या विकृत गर्वाने
सत्ता संपत्ती ची रास लावली
त्याचं बुद्धीच्या जोरावर
चंद्रावर सजीव शोधणारे आपण
आज जगायला धडपडतोय
आज निसर्गच मागतोय
आपल्या अस्तित्वाचा हिशोब

विषाणू हे एक निमित्त आहे
निसर्ग आपल्याला काहीतरी
सांगण्याचा प्रयत्न करतोय
नीट कान उघडून
लक्ष देऊन ऐकलं तर
सहज समजेल प्रत्येकाला
नाहीतर मांडावा लागेल
आपल्या श्वासांचा हिशोब

- डॉ संदिप टोंगळे

Comments

Popular Posts