ही माणसे


ईश्वरास ही पुरून उरतात ही माणसे
माणसातल्या माणसाला छळतात ही माणसे

जळून खाक झाली तरी बघणारे गप्प होते
उचलून पोर नेली तरी सारे काही ठप्प होते
कचऱ्यात अर्भकाला फेकतात ही माणसे
नैतिकतेच्या पोकळ गप्पा मारतात ही माणसे
माणसातल्या माणसाला छळतात ही माणसे

दाखवून जनतेला मृगजळाची तहान
होतात हीच लोकं पुन्हा त्यांच्यासाठीच महान
ढोंगीपणाचा कळस गाठतात ही माणसे
भावनांचा सुद्धा व्यापार करतात ही माणसे
माणसातल्या माणसाला छळतात ही माणसे

सुख-दुःखांचे सौदे ही रित जगण्याची
देवाकडे सुखासाठी भीक मागण्याची
वाळवी फार झाली जगण्यात माणसाच्या
टाकून कात पापे पुन्हा करतात ही माणसे
माणसातल्या माणसाला छळतात ही माणसे

सत्ता संपत्तीवानच फक्त थोर झाले
कमवून वाममार्गे तेच दानशूर झाले
फक्त पैशा सभोवताली फिरतात ही माणसे
नाविन्य काय उरले जगण्यात माणसाच्या
मरण्या आधीच शतदा मरतात ही माणसे
माणसातल्या माणसाला छळतात ही माणसे

- डॉ संदिप टोंगळे

Comments

Popular Posts