"भारतीय"


          आपला देश स्वातंत्र्य झाला आणि तेव्हाच आपल्या या देशाचे सर्व नागरिक “भारतीय” या नावाखाली स्वतंत्र झाले. त्यानंतर या सार्वभौम राष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आणि समुदायाच्या भल्यासाठी भारतीय संविधानाने सात मुलभूत अधिकार देशाच्या प्रत्येक नागरिकाला प्रदान केले. “अभिव्यक्ती स्वातंत्र्य” हा त्या सात मुलभूत अधिकारांपैकी एक अधिकार. हा लोकशाही मुल्यांवर आधारित मुलभूत मानवी अधिकार आहे. स्वतःच्या मनातील विचार, संवेदना आणि भावना व्यक्त करता येण्याचं स्वातंत्र्य म्हणजेच “अभिव्यक्ती स्वातंत्र्य”. आणि हे आपल्या संविधानाने प्रत्येक “भारतीय” नागरिकाला बहाल केलं आहे. संवेदना आणि भावना व्यक्त करण्याची प्रेरणा तर प्रत्येक सजीवाला जन्मतःच मिळालेली नैसर्गिक देणगी आहे. पण बुद्धी कौशल्य असलेल्या मानवाला विचार व्यक्त करण्याचं, आपल मत मांडण्याचं स्वातंत्र्य आपल्या संविधानाने “भारतीय” या नावाखाली प्रत्येक नागरिकाला प्रदान केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात या सार्वभौम राष्ट्राची राज्यघटना लिहिली गेली. त्या द्वारे भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित केलं गेलं. ज्या देशात अनेक जाती, धर्म, पंथाचे लोक आणि विविध संस्कृत्यांचे समूह एकत्र येवून गुण्यागोविंदाने नांदतील अशा भव्य भारतीय देशाची कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिताना नक्कीच केली असेल. तेव्हाच्या सर्व भारतीयांनी एका सुराज्याची कल्पना करत देशाच्या सर्वांगीण विकासाचं ध्येय बाळगलं असेल. पण आजची परिस्थिती त्या ध्येयाला अनुरूप आहे का......? आपण सर्व “भारतीय” गुण्यागोविंदाने राहतो का......? सामाजिक सलोखा जपतोय का......? स्वातंत्र्य मिळवून आपण मुलभूत अधिकार आणि हक्क मिळवले खरे, पण देशाप्रती असलेल्या कर्तव्यापासून आपण लांब का पळतोय......? संविधानाने दिलेल्या मुलभूत अधिकारांची, हक्कांची आठवण आपल्याला वेळोवेळी (अवेळी) होते पण मुलभूत कर्तव्यांची जाणीव आपण योग्य वेळी आली की का विसरून जातो......?

          मित्रांनो, माझ्या नेहमीच्या सवयी प्रमाणे माझ्या डोक्यात अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ उठले. आणि कुठलेही मोहोळ उठले, की अंगावर (मनावर) डंक मारणाऱ्या माश्यांपासून पळ काढून प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या सोयीनुसार सुखरूप सुटत असतो. तशी काहीशी माझी ही अवस्था झाली होती. पण मी विचार केला, की डोक्याला या सतावणाऱ्या प्रश्नांची सवय लागलीच मुळी कशासाठी......? खरतरं या आणि अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीच हा लेख प्रपंच (ब्लॉग) सुरु केला आहे आणि तो ही आपल्याला “भारतीय” म्हणून मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळेच...... मग या प्रश्नांपासून (डंक मारणाऱ्या माश्यांपासून) आपण पळ का काढायचा......? त्यांच्याशी सामना केला तर आणि तरच उत्तरं मिळतील. हो ना......? त्या माशा तर डंक मारणारच त्यांचं ते कर्तव्यच आहे. पण आपण सारे “भारतीय” मात्र आपली कर्तव्य विसरत चाललोय. “भारतीय” म्हणून नागरिकाचं कर्तव्य, माणूस म्हणून माणुसकीचं कर्तव्य, लोकशाहीचा राजा म्हणून मतदानाचं कर्तव्य...... खरंच आपण आपली ही सगळी कर्तव्य विसरत चाललोय. मानवी मुलभूत हक्कासाठी आपण रस्त्यावर उतरतो, आंदोलन करतो, मोर्चे काढतो, सत्याग्रह करतो, उपोषण करतो, पण कधी आपण आपल्या कर्तव्यासाठी रस्त्यावर उतरलोय का? कर्तव्यात कमी पडलो म्हणून उपोषण केलंय का? आंदोलन, मोर्चे, सत्याग्रह, उपोषण फक्त हक्कासाठी...... आणि कर्तव्यासाठी......? काहीच नाही...... आपल्या स्वतःच्या घरात आपण आपल्या हक्कासाठी भांडतो, आपल्याला पाहिजे ते मिळावे म्हणून अडून बसतो, वादविवाद करतो पण त्याच सोबत आपण आपली घरातली सगळी कर्तव्य, जबाबदाऱ्या अगदी चोख पार पाडत असतो. घरातल्या हक्कासाठी जेवढा हट्ट करतो तेवढयाच अट्टाहासाने आपण घरातली कर्तव्य पण पार पाडतोच, मग तसचं जर आपण आपल्या देशाच्या बाबतीत विचार केला आणि घराप्रमाणेच देशासाठीची सगळी कर्तव्ये पार पडली तर घटनाकारांना, स्वातंत्र्यवीरांना तीच खरी श्रद्धांजली असेल आणि तेव्हाच आपण स्वतःला “भारतीय” म्हणवून घ्यायला लायक असू.

          आज आपल्या देशातली आणि आपल्या सभोतालची परिस्थिती जर पाहिली तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क दाखवताना आपण स्वतःला “भारतीय” म्हणवून देशाप्रती जबाबदारीची भावना (Sense of Responsibility) मनात न ठेवता कितीतरी बेताल वक्तव्य करतोय हे लक्षात येऊन जात. मी कोणावर टीका करत नाहीये आणि टीका करण्या इतका मी मोठा पण नाहीये. पण आज जर आपल्या देशावरच चुकीची टीका होऊ लागली असेल तर माझ्यासारखे “भारतीय” शांत तरी कसे राहू शकतील...... अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आपापल्या सोयीनुसार देशाविरुद्धची वक्तव्य करून आपण नेमकं काय साधण्याचा प्रयत्न करतोय हेच लक्षात येत नाही? आपण आपल्या घरात सुद्धा अशीच बेताल वक्तव्य करतो का? नाही ना? अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे आपण आपले विचार, आपलं मत मांडू शकतो हे जरी खर असलं तरी आपलं मत मांडताना जबाबदारीची भावना असायला हवी. आपल्या देशाच्या लोकतांत्रिक प्रमुखांबद्दल आपण आपलं परखड मत मांडू शकतो तेही या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळेच. पण देशाबद्दलचा स्वाभिमान आणि जबाबदारीची भावना मनात जर ठेवली तर अशी वक्तव्य आपण नक्कीच करणार नाही. आज काल आपल्या मानसिकतेवर संशयाचं भूत बसलंय. पंतप्रधानापासून सामान्य जनतेपर्यंत सर्वांवर संशय घेतला जातोय आणि विशेष म्हणजे त्यातून भारतीय लष्कर सुद्धा वाचलेलं नाही. आता तर सर्वात मोठी लोकशाही नियंत्रित करत असलेल्या भारतीय निवडणूक आयोगावरच संशय घेतला गेला. आपल्या सद्सदविवेकबुद्धीचा वापर करून आपण नेमकं कोणावर, कशावर आणि का संशय घेतोय याचा विचार करायला सुद्धा आपण तयार नाही. पण आता हे आपल्या मनातलं काळाने जन्माला घातलेलं संशयाचं भूत कुठल्याच बाटलीत बंद करता येत नाही, अशी आपली सर्वांचीच गोची झालीय. त्यामुळे फार गंभीर गोष्टी आपल्या डोळ्यासमोर घडून सुद्धा त्याच गांभीर्य जाणवत नाही. सभोवताली गर्द काळोख असला तरी थोडा वेळ एकटक बघत राहिल्यावर त्या अंधारातल्या गोष्टी सुद्धा स्पष्ट दिसू लागतात. पण आपल्या कडे तेवढा सुद्धा वेळ नसतो आणि लगेच संशय घेवून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली चुकीचं वक्तव्य करून आपण मोकळे होतो.

          आपल्या देशातली सहिष्णुता ही असहिष्णुतेच्या हातात हात घालूनच चालत आहे. पण फरक इतकाच आहे कि देशातली सर्वसामान्य जनता, ज्यांना शांततेत जगायचं आहे ते सतत सहिष्णुता दाखवतात आणि ज्यांना मानवी समूह-गटातटात आपलं वर्चस्व दाखवून सत्तेसाठी राजकारण करायचं आहे ते कायम असहिष्णू वर्तन करतात. रस्त्यावर भाजी विकायला बसणाऱ्या एक गरीब माणसाला या तुमच्या असहिष्णुतेशी काही देणं घेणं नसतं पण दहा-दहा अंगरक्षक घेवून सतत परदेश वाऱ्या करणाऱ्या लोकांना आपल्या देशात असहिष्णुता जाणवते आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ज्यांची बेताल वक्तव्य जगप्रसिध्द आहेत त्यांना या देशातल्या असहिष्णुतेचा त्रास होतो याच खरंच नवल वाटत. आपण आज महासत्तेच्या जवळ आहोत पण आपली मानसिकताच बदलत नसेल तर त्या महासत्ता होण्याचा काय उपयोग...... आजकाल तर आपली मानसिकता फक्त स्थानिक सत्तेच्या राजकारणात केंद्रित झालीय. जी काही अस्मिता, स्वाभिमान आहे ते सगळ फक्त स्थानिक राजकारणासाठी वापरलं जात पण देशाची अस्मिता, देशाचा स्वाभिमान यात मात्र आपणच “भारतीय” म्हणून कमी पडतो हे नक्की. त्यासाठी आपला विवेक जागा झाला पाहिजे. कोणतही राजकारण असो, हा आपल्यासाठी क्षणिक विषय असतो म्हणून आपण सदसदविवेकबुद्धीचा वापर करून देशाची अस्मिता कायम जपली पाहिजे. अलीकडे राजकारणात जनतेसाठी पारदर्शकतेचा दावा केला जातो पण सगळीच गुपितं उघडी झालेली कुठल्याही सत्तेला नको असतात. जनता खूप शहाणी व्हावी आणि तिला सगळं कळावं असं जगातल्या कुठल्याही सत्तेला, सत्ताधाऱ्याला किंवा विरोधकाला सुद्धा वाटत नसतं. विरोधक सत्ताधाऱ्यांची गुपित सांगून जनतेला सत्य सांगितल्याचा दावा करतात पण ते सुद्धा त्यांना पुढे सोयीचं ठरेल इतपतच सत्य सांगत असतात. त्यामुळे मला एवढच म्हणायचं आहे की कोणाच्या सहिष्णू किंवा असहिष्णू (अ)पारदर्शक वक्तव्याबद्दल वाईट वाटून घेण्यापेक्षा आपण सर्व “भारतीय” जनतेने आपला विवेक जागा ठेवुन सतर्क राहणं गरजेचं आहे.

          एक जुनी रूपक कथा आहे, शंकर भगवान आणि शेतकऱ्या बद्दलची. मला ती येथे सांगावीशी वाटतेय, एकदा पृथ्वीवर खूप अनाचार माजतो त्यामुळे शंकर भगवान संतप्त होतात. त्यावेळी प्रथाच असायची की शंकराने शंख वाजविला तरच पाऊस पडायचा. पण या वेळी शंकर भगवान ठरवतात की, जोपर्यंत ही दुष्ट दुनिया सुधारणार नाही तोपर्यंत मी शंख वाजवणार नाही आणि शंख वाजवला नाही तर पाऊस पडणार नाही. मग शंकर भगवान शंख वाजवीत नाहीत मग त्यावर्षी पाऊस पडत नाही. पुढच्यावर्षी ही तसंच होतं आणि अशी वर्षामागून वर्ष जातात पण शंकर भगवान चा शंख काही वाजत नाही. पृथ्वीवर दुष्काळ पडतो, जमीन अगदी दगडासारखी टणक होते. पृथ्वीवर हाहाकार माजतो, लोक प्रायश्चित्त करू लागतात. पण शंकर भगवान ला कसलीही दया येत नाही. एकदा शंकर पार्वती विमानातून जात असताना खाली एका शेतकऱ्याला बघतात. तो शेतकरी भर दुपारी आपल्या शेतात नांगरणी करत असतो. त्याच उघडबंब शरीर घामाने ओलचिंब झालेलं असतं. मात्र तो स्वतःच्याच विश्वात रममाण होऊन नांगर चालवत असतो. जणू काही कालपरवाच पाऊस पडून गेलाय. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते. शंकर भगवान विमानातून उतरून त्याच्या जवळ जातात आणि म्हणतात ‘काय हा मूर्खपणा आहे? कशाला त्रास करू घेतोस? नुसत्या घामाच्या पाण्यावर शेती होत नसते आणि पावसाचं स्वप्न पण बघू नकोस.’ तो शेतकरी एकदाच शंकर भगवान कडे बघतो आणि नांगर चालवणं सुरुच ठेवत म्हणतो, ‘तुमचं बरोबर आहे, पण नांगारण्याची कला विसरू नये म्हणून मी शेत नांगरत आहे. नांगर चालवायचंच विसरलो तर नुसता पाऊस पडून तरी काय उपयोग? नुसती फायद्याची शेती मी करत नाही आणि मेहनतीतून आनंद पण मिळतोच ना......?’ त्याच्या या उत्तराने शंकर भगवान हडबडतात आणि विचार करू लागतात, अरेच्या...! मला पण शंख वाजवून बरीच वर्ष झाली, मी शंख वाजवायची कला विसरून तर नाही ना गेलो...? मागचा पुढचा विचार न करता ते झोळीतून शंख काढतात आणि जोरजोरात फुंकू लागतात. शंखाच्या ध्वनीने ढगांचा गडगडात सुरु होतो आणि मुसळधार पाऊस पडू लागतो. त्या अलोट पाण्याचं स्वागत करायला त्या शेतकऱ्याच्या घामाचे बिंदू आधीच हजर असतात.

          या रूपक कथेत शंकर भगवान यांचा राग, अहंकार आणि त्यांचा निर्दयी निश्चय हे असहिष्णुतेचं एक उदाहरणच आहे असं मला वाटतं. पण त्या शेतकऱ्याने दाखवलेला विवेक हा खरंच मेहनतीचे सार सांगून जातो. हा शेतकरी म्हणजे आपणच आहोत. आपण विचारांची भूमी नांगरत ठेवावी आणि नेहमी सत्याचं पीक घ्यावं. ज्यामुळे आपला विवेक जागा राहील आणि एकदा का आपला विवेक जागा राहीला की देशाबद्दलची अस्मिता पण कायम मनात राहील. आपल्या सर्वांच्याच घरात मोठ्यांचा आदर, सन्मान करायला शिकवलं जातं, आपल्या सर्वांच्याच घरात अडीअडचणी, समस्या असतात त्यावर घरातले सर्व सदस्य एकत्र येऊन तोडगा काढतात, आपल्या सर्वांच्याच घरात भांडणे मतभेद होतात पण त्यावर शांतपणे तोडगा काढला जातो, आपल्या सर्वांच्याच घरात हक्कासोबत जबाबदारीची भावना आणि विवेक जपला जातो मग हे सगळं आपल्या देशासाठी का नाही करायचं......? आपलं घर आपल्याला प्रिय असतं, आणि ते आयुष्यभर राहील याची आपण काळजी घेतो मग देशाबद्दल पण असा विचार केला तर...... मला माहितीय आपल्या घरासारखं एवढ्या मोठ्या देशाचा विचार करणं, आपण प्रत्येकाने त्या सर्व गोष्टी आमलात आणणं खूप कठीण आहे पण अशक्य नक्कीच नाही. आपण हक्काच्या मुद्द्यावर लगेच एकत्र येतो, सर्वांचे विचार ही लगेच जुळतात मग कर्तव्यासाठी आपण नक्कीच एकत्र येऊ शकतो. फक्त आपल्या सद्सदविवेकबुद्धीला जराशी चालना मिळाली की आपल्या मनातली घराबद्दल असणारी अस्मिता नक्कीच देशाबद्दल वाटू लागेल. माझं बोलणं अनेकांना नक्कीच अतिशयोक्तीचं वाटतं असेल पण मला वाटतं आपल्यासाठी, आपल्या देशासाठी ही अतिशयोक्ती करायला काय हरकत आहे. जसं सत्तर वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी झगडलो तसं आज आपला विवेक जागा करून देशाची अस्मिता जपण्यासाठी आपण सर्व "भारतीय" मिळून झगडु. आपल्या सर्वांचं राज्य वेगळं, आपलं गावं वेगळं, आपलं घर वेगळं, आपला धर्म-जाती वेगळ्या, आपली विचारसरणी, संस्कृती वेगळी आहे, पण हे सगळं जरी वेगळं असलं तरी आपण सर्व "भारतीय" म्हणून एकच आहोत आणि एकच राहू.

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Comments

Popular Posts