Monday, March 27, 2017

हरवलेला "डॉक्टर काका"


          मागे एकदा मी एका बँकेचा account opening form भरत होतो. तो फॉर्म भरता भरता एक कॉलम आला त्यात मला माझा व्यवसाय लिहायचा होता. मी क्षणभर विचार केला आणि "डॉक्टर" असं लिहिलं. आता तुम्हाला वाटतं असेल 'यात विचार करून लिहिण्यासारखं काय आहे......? डॉक्टर आहे म्हणल्यावर लगेच डॉक्टरच लिहून टाकायचं, दवाखाना चालवणारा डॉक्टर हा व्यवसायच आहे ना.......?' पण मी क्षणभर जो विचार केला त्यात मला वाटलं की डॉक्टर हा व्यवसाय नसून सेवा आहे आणि सेवा हा कॉलम इथे कुठे दिसत नाही. म्हणून मग मी त्या कॉलम मध्ये डॉक्टर लिहून "व्यवसाय" हा शब्द खोडुन त्याठिकाणी "सेवा" असं लिहिलं आणि फॉर्म जमा केला. पण नेहमीप्रमाणे माझ्या डोक्यात वेगवेगळ्या विचारांची चक्र सुरु झाली. कधी काळी रुग्ण हे डॉक्टरला जवळजवळ देवासारखे मानत असायचे. तेव्हा "फॅमिली डॉक्टर" ही संकल्पना होती आणि हा फॅमिली डॉक्टर फक्त कुटुंबाचा डॉक्टरच नसायचा तर वडीलधा-या आजोबांचा मित्र, समवयस्कांचा सल्लागार आणि लहान चिमुकल्यांचा "डॉक्टर काका" सुद्धा असायचा. डॉक्टरची फी त्या काळातही दिली जायची. पण ते नाते दुकानदार आणि ग्राहक असे मुळीच नव्हते. त्या नात्यात एकमेकांबद्दल खरेपणा आणि जिव्हाळा होता. आज प्रत्येक क्षेत्राचे व्यावसायिकरण होत चाललंय, पण वाईट याचं वाटतं की त्यात "डॉक्टरकी" सुद्धा मागे नाही. आज "डॉक्टरकी" कडे एक व्यवसाय म्हणूनच खूप जण पाहतात. आज डॉक्टर आणि रुग्ण यांच्या सुंदर नात्यातला खरेपणा आणि जिव्हाळा यांचा बळी देऊन आपण हे व्यावसायिकरण का करतोय? हा प्रश्न पडतोय. डॉक्टर आणि रुग्ण यांचे नाते अगदी कायद्याने दुकानदार आणि ग्राहकाचे करून आपण या नात्यातला ओलावाच नष्ट केला आहे का? डॉक्टरांना अमानुष मारहाण करणं चुकीचंच आहे पण अशी मनःस्थिती आणि परिस्थिती का निर्माण होतेय हे ही जाणून घेतलं पाहिजे ना......? खरंच "डॉक्टरकी" हा व्यवसाय आहे की सेवा? याचा कुठेतरी आज विचार करण्याची वेळ आली आहे. समाजाला आरोग्यासोबत नितीमूल्याचे धडे देणारा, लहान मुलांना कडू औषधांसोबत चॉकलेट देणारा "डॉक्टर काका" आज कुठेतरी हरवला आहे, त्यालाच शोधण्यासाठी हा लेख प्रपंच......

          आजच्या या विचित्र स्पर्धात्मक युगात आपण नको त्या गोष्टीची स्पर्धा करू लागलोय, आधी मार्क मिळविण्यासाठी स्पर्धा आणि आता पैसे कमविण्यासाठीची स्पर्धा. ही स्पर्धा अगदी जोमाने सुरु आहे. पण "डॉक्टरकी" हा वैद्यकीय "व्यवसाय" म्हणून या स्पर्धेत भरडला जातोय याचं खरंच वाईट वाटतं. "डॉक्टरकी" हा व्यवसाय नाही सेवाच आहे असं मी ठासून सांगतोय खरं पण अनेकांच्या मनात वाटतं असेल की मग आम्ही डॉक्टरांनी नुसती सेवा केली तर आमचा उदरनिर्वाह कसा होणार? आणि कुटुंब तरी कसं चालणार? डॉ. प्रकाश बाबा आमटे, डॉ. नरेंद्र दाभोळकर अशी कितीतरी नाव आज आपण आदराने घेतो. त्यांचीही कुटुंब व्यवस्थित चालली आहेतच की, आणि उदरनिर्वाहात तरी कुठे कमी आहे. उलट आम्हीच सर्व डॉक्टर कमी पडतोय आमच्या मानसिकतेत...... हो खरंच आमच्या मानसिकतेत बदल हवा आहे. खरंतर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासूनच मानसिकता बदलू लागते. वैद्यकीय प्रवेशापासूनच जो पैशाचा हिशोब सुरु होतो तो कधी नंतर संपताना दिसतच नाही. मग पुढे जाऊन निष्कारण पैसे कमवायच्या स्पर्धेत त्या हिशोबाच्या पाठीमागे मृगजळाचा शोध घेत प्रत्येक डॉक्टर धावतो. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून शिक्षण पूर्ण होई पर्यंत तिथे सेवाभाव, समाज बांधिलकी कोणी शिकवत नाही, त्यामुळे मानसिकता नंतर वेगळ्या दिशेने बदलत जाते, त्या मृगजळाचा शोध घेत...... अति पैशे कमविण्याच्या अतिहव्यासापोटी मेडिक्लेम कंपन्यांना फुगवून बिले देणे, खोटे मेडिक्लेम तयार करणे, खोटी कागदपत्रे बनवून देणे, स्त्रीभ्रूणहत्येसारखं पाप करून अनैतिक मार्गानी पैसा मिळवणे, स्त्रीगर्भाची हत्या करून ते खाण्यासाठी कुत्रे पाळणे किंवा ती अर्भके पुरणे या आणि अशा कितीतरी वाईट गोष्टींच्या दिशेने काही डॉक्टरांची मानसिकता बदलत चाललीय आणि समाजातली विश्वासार्हता गमावून डॉक्टर-रुग्ण संबंधात शेवटी बाधा येऊ लागलीय आणि याच कारणामुळे आजकाल डॉक्टरांवरील विश्वास कमी होऊन सामाजिक उद्रेक होताना दिसतोय. त्यात रुग्ण आणि डॉक्टर दोघेही होरपळले जात आहेत.

          डॉक्टर-रुग्ण संबंध तणावपूर्ण होण्यात खरंतर दोन्ही बाजू कारणीभूत आहेत. एकीकडे डॉक्टरकी च व्यावसायिकरण आणि दुसरीकडे रुग्णाच्या नातेवाईकांचा गरज नसलेला अतिभावनिक उद्रेक. 'टाळी एका हाताने कधीच वाजत नसते.' रुग्ण आणि डॉक्टर यांच्या संवादात, व्यवहारात पारदर्शकता असायलाच हवी. रुग्णांनी डॉक्टरांना आपल्या आजाराविषयी, केलेल्या तपासण्याविषयी, घेतलेल्या दुसऱ्या डॉक्टरच्या सल्ल्याविषयी प्रामाणिक पणे सांगणं गरजेचं आहे आणि तितक्याच आत्मीयतेने डॉक्टरनी सुद्धा रुग्णाला आश्वस्थ करणं गरजेचं आहे. संवादात आणि व्यवहारात अशी पारदर्शकता आली तर अविश्वास आणि उद्रेकाला जागाच राहणार नाही. पारदर्शकता जशी डॉक्टरांकडून अपेक्षित आहे तशी रुग्णांकडून पण आहे. रुग्णाच्या अज्ञानाचा डॉक्टरांनी गैरफायदा घेऊ नये आणि रुग्णांनीही डॉक्टरांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये. रुग्ण आणि डॉक्टर यांच्या नात्यामध्ये तारतम्य, समजूतदारपणा, आस्था, सबुरी, विश्वास आणि माणुसकीची गरज आहे. आपला भारतीय समाज अतिशय भावना प्रधान आहे. आपल्या देशात कोणत्याही व्यक्तीला किंवा कोणत्याही विषयाला एकतर डोक्यावर घेऊन नाचतात किंवा पायदळी तुडवून नामोहरम करतात. अधे मधे काही नसतं, चांगला असो किंवा वाईट असो उद्रेक नेहमी टोकाचाच असतो. त्यामुळे एकेकाळी नोबेल सर्विस मानली जाणारी वैद्यकीय सेवाच आज व्यावसायिकरणाच्या विचित्र मायाजाळात अडकल्यामुळे आरोपीच्या पिंजऱ्यात उभी आहे. आपण सर्वजणच कोणत्याही विषयाकडे शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून कधीच पहात नाही, नेहमीच कोणत्याही गोष्टीसाठी भावनांचा आधार घेऊन मूल्यमापन करून निर्णय घेण्याची घाई करतो. शास्त्रीय दृष्टिकोनाचा अभाव आणि निर्णयाची भावनिक घाई यामुळे हा उद्रेक होतोय आणि या झालेल्या उद्रेकात आपण सर्व समाज घटकच बळी पडतोय हे कोणाच्याच लक्षात का येत नसेल याचंच आश्चर्य वाटतं.

          जगातल्या कोणत्याही डॉक्टरला आपला रुग्ण बरा होऊ नये असे कधीच वाटत नसते, किंबहुना रुग्णाच्या उपचारात औषधांचा अपेक्षित परिणाम दिसला नाही तर आम्ही डॉक्टरसुद्धा रुग्णाच्या नातेवाईकांइतकेच अस्वस्थ असतो, पण ते आम्ही कोणालाच सांगू शकत नाही, ही खरी वस्तुस्थिती आहे. वैद्यकीय महाविद्यालयात आम्ही शिकलेले वैद्यकशास्त्र सामान्य माणसाला कळेल अशा बोलीभाषेत कसे सांगावे, हे सुद्धा आम्हाला कोणी शिकवत नाही, ते आम्हाला रुग्णांच्या अनुभवातून अवगत होत जात. संभाषणकला अवगत करणे, ऐकून घेण्याची कसब शिकणे, संयम वाढवणे, रुग्णाच्या सहवेदना जाणून घेणे, रुग्णाने सांगितलेल्या माहितीतून कशाला महत्त्व द्यायचे याची बौद्धिक चाळणी लावणे या गोष्टी अनुभवातूनच आत्मसात कराव्या लागतात. या आम्हाला कोणी शिकवत नाही. खरंतर आमच्या कडे येणारे रुग्णच कळत नकळत आम्हाला या गोष्टी शिकायला मोलाची मदत करतात. रुग्ण आणि डॉक्टर यांच्या नात्यातल्या जिव्हाळ्यामुळे बऱ्याच गोष्टी आम्हा डॉक्टरांना शिकता येतात आणि त्याचा फायदा बाकी रुग्णांना ही होतो ही या नात्यातली जमेची बाजू आहे. कधी कधी डॉक्टरांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि अतिरिक्त ताणतणावामुळे रुग्णांना डॉक्टरच्या रागाला ही सामोरे जावे लागते आणि कधी कधी रुग्णांचा संयम सुटला की त्याचा फटका डॉक्टरलाही बसतो. इथे दोन्ही बाजूने एकमेकांची मानसिकता समजून घेण्याची गरज आहे. कारण अशावेळी उद्रेक झाला की मग स्फोट होतो. डॉक्टर व रुग्ण यांच्या नात्यातला जिव्हाळा तसाच जपायचा असेल तर त्यांच्यातला सुसंवाद फार महत्त्वाचा आहे. रुग्णाचं दृश्य शरीर व अदृश्य मन या दोन्हींचा विचार करून सुयोग्य संवाद व स्वच्छ व्यवहाराद्वारे डॉक्टरांनी रुग्णाला आश्वस्थ करणं गरजेचं आहे. आणि रुग्णांनीही प्रामाणिकपणे आपल्या आजाराविषयी माहीती सांगून आणि संयम ठेवून समजून घेणे गरजेचे आहे. प्रत्येक डॉक्टरांना प्रत्येक वेळी हे जमेलच असंही नाही पण त्या दृष्टीने आपण प्रामाणिक प्रयत्न मात्र नक्की करू शकतो. चला तर आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूयात आपल्या आतला हरवलेला तो "डॉक्टर काका" शोधण्याचा.......

- डॉ. संदीप सोमेश्वर टोंगळे.