माझा प्रवास शून्याकडे......


          एक छोटीशी मुंगी तिच्या आकारापेक्षा हजारो-लाखोपटीने मोठं असलेलं वारूळ तयार करण्याचं स्वप्न पहाते आणि अपार कष्ट करून असंख्य, अगणित अडचणींना सामोरे जात जिद्दीने ते अस्तित्वात आणते. सुरुवातीलाच जिथे वारुळ तयार करायचं आहे त्याखालची जमीन समांतर नसते. तिथूनच त्या इवल्याश्या मुंगीचा संघर्ष सुरू होतो. त्या मुंगीला ती जमीन आधी समांतर करावी लागते. अनेक अडथळ्यांचा सामना करत, आयुष्यातील चढ, उतार सहन करत ती मुंगी ती वारुळाची जागा समांतर करते. हीच समांतर जमीन म्हणजे अपूर्णतेकडून शून्याकडे प्रवास आहे. म्हणूनच शून्याला जास्त महत्व आहे. आणि याच शून्य समांतर जमिनीवरच ती मुंगी तिच्या स्वप्नातलं वारूळ बांधण्यासाठी पुन्हा नवा संघर्ष करते. आणि तीचं ते स्वप्न सत्यात उतरवते. तिचा हा प्रवास अपूर्णते कडून शून्याकडे आणि पुन्हा शून्याकडून स्वप्नाकडे जाणारा असा सुंदर प्रवास आहे.

          मला वाटतं प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील प्रगतीचा प्रवास ही असाच असतो. स्वप्न पाहणं, ते पूर्ण व्हावं म्हणून तशी अनुकूल समांतर परिस्थिती निर्माण करण्यासाठी संघर्ष करणं आणि तशी परिस्थिती निर्माण झाल्यावर स्वप्नाच्या दिशेने पुन्हा संघर्षमय वाटचाल करणं, मला वाटतं कुठल्याही प्रगत माणसाची यशोगाथा या पेक्षा वेगळी नसावी. फरक फक्त कमी जास्त संघर्षाचा असतो, तो ही प्रत्येकाच्या आयुष्यात असणाऱ्या वर्तमान परिस्थितीमुळे, सभोतालच्या वातावरणामुळे आणि मानसिकतेमुळे...... पण या सर्व प्रवासात शून्य समांतर परिस्थितीला खूप महत्व आहे. अपूर्णत्वाकडून शून्याकडे जाणारा प्रवासच खूप खडतर आहे. पण यात स्वत:च्या अपूर्णत्वाची जाणीव असणं ही तितकंच महत्वाचं...... अपूर्णाची पूर्णावस्था आधी शून्याच्याकडेच घेऊन जाते नंतर स्वप्नांसाठी संघर्ष सुरू होतो. माझ्या ही आयुष्यात "माझा प्रवास शून्याकडे"च सुरू आहे......

          आयुष्याच्या या सुंदर मांडणीत संघर्षमयी यशोगाथा लिहिण्याचं सामर्थ्य आणि संधी प्रत्येकाला मिळतेच पण काहींचा प्रवास या शून्याच्या आधीच अडकून बसतो ते स्वतःच अपूर्णत्व ओळखू शकत नाहीत आणि काही जण शून्याच पूर्णत्व ओळखून पुढे जातात, ध्येयाची दिशा ठरवतात आणि यशस्वी होतात. "मी करू शकतो" हा सकारात्मक विचार आणि "आणि हे मीच करू शकतो" हा आत्मविश्वास माणसाला ध्येयापर्यंत पोहोचायला बळ देतो. पण खरी कसरत असते ती शून्यपर्यंतच्या प्रवासाची...... सर्वात आधी स्वतःच्या अपूर्णत्वाला ओळखणं खूप महत्त्वाचं असतं. वेगळ्या आवेशात, फाजील आत्मविश्वासात माणूस अडकून राहिला की तो स्वतःला ओळखू शकत नाही. स्वतःच स्वतःला ओळखण्याची कसब आधी शिकली पाहिजे. ती समजून घेऊन त्या दिशेनं वाटचाल केली पाहिजे.

          प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या, संकटं, अडचणी तर येतातच पण येणाऱ्या समस्या, संकट आणि अडचणीच्या क्षणांना अनुभवाच्या शिदोरीत बांधून, ती जपून ठेवण्याची कला सुद्धा आपण जोपासली पाहिजे. जर आयुष्यात कधी आपल्या समोर एखादी मोठी समस्या उभी राहिली तर समोर असलेल्या आपल्या समस्येच्या बाजूला दुसऱ्या माणसाच्या मोठ्या समस्येची रेषा जर आपण आखली तर आपली समस्या ही समस्याच नसून आपल्याला मिळालेली सुवर्णसंधी आहे असा आत्मविश्वास तयार होऊ लागतो. आलेल्या संधीला ओळखणं आणि एखाद्या समस्येला सुद्धा संधीच रूप देणं हीच खरी शून्याकडे यशस्वी वाटचाल आहे. स्वतःची स्वतःशी असलेली ओळख हीच आपल्याला प्रगतीचा मार्ग दाखवते. अशी स्वतःची ओळख झाली की शून्याकडे जाणारा धूसर मार्ग स्पष्ट दिसू लागतो.

          माझ्या आयुष्यात आलेल्या समस्यांना संधी समजून अनुभवाच्या शिदोरीत बांधण्याची कला तर मी शिकलो पण ते पेलवण्याचं सामर्थ्य अजून सुद्धा पूर्णतः माझ्या मध्ये नाही हेही मी समजून घेतोय, स्वतःच अपूर्णत्व मी आता कुठे नीट ओळखू लागलोय. माझ्यात असलेलं हे अपूर्णत्व पूर्ण करण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतोच. वाचन, लिखाण, थोरामोठ्यांची भाषणे, वैचारिक गप्पा यातून मिळेल तेवढं सामर्थ्य, जिद्द मिळविण्यासाठी मी निरंतर धडपडत असतो. माझी ही धडपड मला अपूर्णत्वाकडून शून्याकडे घेऊन चाललीय. सामर्थ्य मिळविण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नात जर मी कमी पडलो तर शून्याकडे जाणारा हा माझा प्रवास नक्कीच खडतर असेल याची ही मला पूर्ण जाणीव आहे. प्रामाणिक प्रयत्न करत राहून सकारात्मकपणे ध्येयाकडे जाणारी वाटचाल नक्कीच फलदायी ठरते यात शंका नाही.

          मनुष्य प्राण्याला नकारात्मक तुलना करण्याची खूप सवय लागली आहे. मी तर म्हणतो की तो शापच आहे. हीच तुलना अधोगतीकडे घेऊन जातेय हे लक्षातच येत नाही. पृथ्वीतलावर येणारा प्रत्येक माणूस वेगळा आहे त्याच वेगळं असं विशेष अस्तित्व आहे. आपण दुसऱ्याच्या व्यक्तिमत्वावर भाळतो आणि तसंच बनण्याच्या आग्रही प्रयत्नात स्वतःच्या सुंदर अस्तित्वाला हरवून बसतो. त्यामुळे आधी आपण स्वतःला ओळखायला शिकलं पाहिजे. आपल्या आत असणाऱ्या सुप्त गुणांची पारख, आत्मविश्वासाची ओळख आणि अपूर्णत्वाची जाणीव माणसाला पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग दाखवत असते. माझ्या आयुष्यात आलेल्या सर्व चांगल्या वाईट क्षणांना मी अनुभवाच्या शिदोरीत बांधून ठेवत, समस्येला संधी समजून, माझं हरवलेलं सामर्थ्य मिळविण्यासाठी "माझा प्रवास शून्याकडे......" प्रयत्नपूर्वक सुरूच राहिल.

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Comments

Popular Posts