"माझं अस्तित्व"


          कधी कधी गर्द आभाळ भरून येतं, विजा चमकतात, सोसाट्याचा बेभान वारा सुटतो आणि पावसाचे चार थेंब जमिनीवर पडले की लगेच मातीचा एक अगदी गोड सुगंध दरवळू लागतो. तो सुगंध अंगात एक रोमांच, एक वेगळा उत्साह निर्माण करतो. पण एवढे ढग भरून येऊन ही कधी कधी पाऊस न पडताच ते गर्द ढग तसेच निघून जातात. न बरसताच ते ढग दृष्टी आड होतात. माझं ही काही दिवस झाले असंच होत होतं. डोक्यात विचार येत होते आणि न बरसताच निघून जात होते. डोक्यात वीज चमकल्यासारखं विचारांचा कडकडाट व्हायचा पण कागदावर उतरवायची उर्मीच अंगात येत नव्हती. मग ते डोक्यात चमकलेले विचार कित्येक वेळा न बरसताच निघून गेलेले आहेत. डोक्यात आलेले विचार कागदावर उतरवले की मोकळं वाटतं, एक निराळा आनंद, तृप्ती असते मनात त्यावेळी. जसं पावसाची एखादी सर जोरदार बरसून गेली की वातावरण किती फ्रेश होत तसच डोक्यातले विचार कागदावर बरसले की मन अगदी प्रसन्न होऊन जातं. आकाशातल्या ढगांना योग्य उब मिळाली की ते मनसोक्त बरसूनच जातात. तसंच डोक्यातल्या विचारांना योग्य वाट मिळाली की ते बरसतातच पण कधी कधी तशी मनस्थिती, वेळ आणि वातावरण जुळून यावं लागतं. एकदा हे जुळून आलं की विचारांची डोक्यात आलेली उर्मी कागदावर उतरवायला वेळ लागत नाही. माझ्या विचारांचे ही काही दिवस झाले त्या न कोसळणाऱ्या ढगांसारखेच हाल आहेत. आम्ही दोघेही कधी कधी सुकेच आणि कधी कधी बरसून ओले......

          पण आज मात्र तो सगळं भान हरपून मनसोक्त बरसतोय. जमिनीवर कोसळून रस्त्याने सुसाट धावतोय, नाचतोय, बागडतोय, पानांवर, फुलांवर, झाडांवर थेंब बनून स्वतःच एक वेगळं अस्तित्व निर्माण करतोय. स्वतःच्या अस्तित्वाचा ठसा निसर्गावर उमटवून त्या निसर्गाच रंग रूप च बदलून टाकलंय. काल परवापर्यंत माझ्या घरासमोरच पिंपळाच झाड अगदी सुकलं होतं, पण आज मात्र ते स्वतःच खर हिरवं मनमोहक रूप जगाला दाखवतय. निराशेनं गळून पडलेली त्याची पानं पुन्हा नव्या उत्साहाने उमलत आहेत. या पावसाची लोभसवाणी जादू पाहून मग मीही मनाशी ठरवलं की आपण ही आज मनसोक्त, मनमुराद, बेभान होऊन बरसायचं, मनाच्या आत कुठेतरी कोपऱ्यात मंद वाजणारी तार असते, तिला हलकच छेडून कान थोडावेळ बंद करून जे डोक्यात विचारांचे सूर तयार होतील ते कागदावर अलगद उतरवायचे. पावसाचा थेंब जमिनीवर पडला की कसा सुगंध दरवळतो तसा डोक्यातला विचार शब्दांच्या रूपाने कागदावर उमटला की एक वेगळाच सुगंध आसमंतात दरवळायला सुरुवात होते, अगदी हृदयापर्यंत जाऊन भिडतो. तसंच मला माझ्या मनात येणारे विचार शब्दांवाटे सजवायचे आहेत आणि दरवळणाऱ्या मनमोहक सुगंधासारखे प्रत्येकाच्या हृदयात रुजवायचे आहेत.

          खरंच काल पर्यंत तो कुठेच नव्हता, पण आज मात्र सगळीकडे तोच तो आहे. काल पर्यंत त्याचं अस्तित्व कुठेच नव्हतं पण आज मात्र त्याने स्वतःच या सुंदर सृष्टीचं अस्तित्व बदललंय. काल माझंही काही अस्तित्व नव्हतं, आज सुद्धा ते अगदी नावापुरतच आहे. पण माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसावर मला माझं अस्तित्व कोरायचंय. माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणाला मला सजवायचंय. माझं सुंदर अस्तित्व मला तयार करायचंय. तळपत्या सूर्याला पाहून पाहून जमीनीला भेगा पडतात पण ती पावसाची वाट पाहणे काही सोडत नसते. वाहणारे ढग हजारो मैलांच्या प्रवासाचा विचार करून मध्येच कधी थकत नाहीत. खळखळाट करत वाहणारी नदी कधीच कसल्याही अडथळ्याला घाबरत नाही. अडचणी आणि आव्हानाशिवाय जगण्याला काहीच मजा नाही. आव्हानाचा सामना करण्यात जी मजा आहे ती ऐशोआरामात मुळीच नाही. कितीतरी आव्हानाचा सामना करून हा पाऊस आज बरसतोय आणि अडचणींवर मात करून निसर्गाच अस्तित्वच बदलून टाकतोय. तसं मी ही माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाचा सामना करत जगण्याची मजा घेतोय आणि सुगंध दरवळणारं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. त्या मनमोहक पावसाने जसं सुष्टीचं अस्तित्व निर्माण केलं तसं "माझं अस्तित्व" निर्माण करायचं असेल तर येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करण्याशिवाय पर्याय नाही.

- डॉ. संदीप सोमेश्वर टोंगळे.

Comments

Popular Posts