Sunday, December 11, 2016

"एक सुंदर जमलेली रेसिपी"


          एखादा खाद्यपदार्थ तयार करताना अनेक पदार्थ एकत्र मिसळुन ती "रेसिपी" तयार केली जाते. त्यात मिसळलेल्या प्रत्येक पदार्थाचे कमी किंवा जास्त असे योग्य प्रमाणच ती रेसिपी चविष्ट आणि सुंदर जमायला मदत होते. त्यातल्या प्रत्येक पदार्थाचे आणि त्याच्या योग्य प्रमाणाचे विशेष महत्व आहे. एखादा पदार्थ कमी किंवा जास्त पडला तर त्या रेसिपी ची मज्जाच जाते. नेमकं असचं असत नवरा बायकोच्या नात्याचं. हो ना! खरच नवरा बायकोचं हे नातं म्हणजे "एक सुंदर जमलेली रेसिपी"च आहे. एखाद्या रेसिपीमध्ये असलेल्या अनेक पदार्थांप्रमाणे नवरा बायकोच्या आयुष्यात येणारे अनेक क्षण असतात. हे क्षण आनंद, सुख:, समाधान, यश, इच्छापूर्ती, प्रेम, हुरहुरी, काळजी, विश्वास या आणि अशा अनेक भावनांनी सजलेले असतात आणि दुःख, अपयश, अपेक्षाभंग, संशय, अविश्वास, समस्या, राग, अहंकार, वेदना अशा अनेक अनुभवांनी भरलेले असतात. वैवाहिक आयुष्यात येणाऱ्या अशा प्रत्येक क्षणाला महत्व आहे. यातल्या प्रत्येक क्षणाला सकारात्मकपणे शिकून आणि अनुभव घेवून आयुष्याची "रेसिपी" अगदी सुंदर करता येईल.

          खरच नवरा बायकोचं नातं हे किती अनाकलनीय असतं ना......? पूर्वी कधीच एकमेकांना पाहिलेले नसताना सुद्धा जन्मभर एकमेकांसोबत तितक्याच आत्मीयतेने रहाण्याची ओढ़ असते. आधी अनोळखी असणारं हे नातं हळूहळू होत जाणारी ओळख आणि स्पर्श यामुळे अधिकच फुलू लागतं. नंतर रुसवा, फुगवा, हट्ट, भांडण, अबोला या भावना विश्वात हे नातं चांगलच बहरू लागतं. एकमेकांशी समजुतीने वागताना, विश्वास ठेवताना, आधार देताना, सांभाळताना नकळत हे नातं चांगलच मूरतं. लोणचं मुरलं की त्याचा आस्वाद जेवणातली लज्जत वाढवतो तसच नवरा बायकोच नातं मुरलं की आयुष्याला एक हवीहवीशी वाटणारी वेगळीच चव येते. हे नातं विश्वास आणि प्रेम यावर अवलंबून असतं. वेळोवेळी कसोटीचे कठीण क्षण येत जातात. कोणत्या क्षणी कसे वागावे हे नीट कळले आणि पाऊलं सांभाळून पडली तरच हे आयुष्य चवदार होऊ शकते. नवरा बायकोचं नातं हे एकमेकांबद्दलच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपापल्या आवड निवडींना मुरड घालून जोडीदाराच्या आवड निवडीला प्राधान्य देत स्विकारलेले सुंदर सहजीवन आहे असं माझं मत आहे.

          आपण सर्वजणच आपल्या आयुष्यात अगदी लहानपणापासूनच किती तरी नाती निर्माण करतो तर काही नाती नकळत निर्माण होतात पण या सगळ्या नात्याना एकच बाजू असू शकते आणि एकच नाव असत. या नात्यांचा आवाका, मर्यादा, अपेक्षा ह्या सगळ्यांना एक सीमा असते. काही नात्यांसाठी ठळक अधोरेखित केलेली तर काही नात्यांसाठी अस्पष्ट होत गेलेली. पण ह्या सगळ्या पलिकडच अमर्याद असं नातं नवरा बायकोच आहे. सुरवातीला जरी अपेक्षाचं ओझ असलं तरी हळु हळु ते कमी होत जातं. एकमेकांच्या मनातील भावना न सांगता कळु लागतात. या नात्यात भांडण, वादविवाद किंवा मतभेद असणं अगदी साहजिकच आहे, कारण दोन वेगवेगळ्या वातावरणात वाढलेले, दोन वेगवेगळया विश्वात जगलेले हे दोन लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा तो कलह सहाजिकच नैसर्गिक असतो. आणि तो व्हायला ही हवा कारण ज्या दिवशी तुम्ही हक्काने भांडता त्या दिवशी तुमचा एकमेकांवरचा विश्वास वाढलेला असतो की हे नातं आपलं आहे, हक्काचं आहे. तो दिवस खरतर साजराच केला पाहिजे. 

          आपल्या वैवाहिक, व्यावसायिक आणि सामाजिक आयुष्यात रोज नवनवीन समस्या आपली परीक्षा घेण्यासाठी तयारीतच असतात. पण अशा समस्यांना प्रगतीतले अडथळे न समजता आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याच्या पायऱ्या समजून समस्येवर उपाय शोधला पाहिजे. पण त्या आधी आपण त्या समस्येचा मनापासून स्वीकार करायला शिकलं पाहिजे. ज्या क्षणी आपण समस्येचा स्वीकार करू, त्या क्षणी त्या समस्येचा आपल्या मनावरील ताण कमी झालेला आढळेल. त्यानंतर ती समस्या सोडविण्यासाठी आपण यशस्वी प्रयत्न करू शकू आणि अशाप्रकारे वैवाहिक जीवनातल्या तणावातुन सहजरित्या मुक्त होता येईल. आपल्या सर्वांचेच आयुष्य म्हणजे असंख्य चांगल्या आणि वाईट घटनांची साखळी असते. काही घटना अपेक्षित असतात, तर काही घटना अनपेक्षित घडतात आणि त्याची वेळही माहित नसते. प्रत्येक घटनेच्या वेळी बरेच वेळा आपण ‘प्रतिक्रिया‘ (Reaction) देत असतो. त्याऐवजी आपण 'प्रतिसाद' (Response) देण्याचा प्रयत्न केला तर आयुष्यातील बराच ताणतणाव (tensions) कमी होण्यास मदत होईल.

          या वैवाहिक, सांसारिक जीवनात आपण रोज नव्या आनंदांना, नव्या मानसिक धक्यांना, सुख दुःखाला सामोरे जातं असतो आणि ह्या सगळ्यांत आपण एकटे नाही ही भावनांच नेहमी खूप उत्साह, उमेद आणि बळ देऊन जाते. त्यामुळे नवरा बायकोचं हे सुंदर नातं खूप प्रेमाने जपलं पाहिजे आणि फुलांना पाणी शिंपडून फुलवतात तसं वेळोवेळी या नात्यावर प्रेम शिंपडून हे नातं फुलवलं पाहिजे. एकमेकांच्या सवयी, त्रुटी, गुण दोष जाणून घेऊन त्यासह एकमेकांना स्विकारायची तयारी ठेवली पाहिजे. नवरा बायकोच्या या नात्यामध्ये एकमेकांचा आदर करुन स्वाभिमान जपणे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि कसल्याही बिकट परिस्थितीत या एकमेकांबद्दलच्या आदराला आणि स्वाभिमानाला  तडा जाऊ न देणं ही दोघांची ही नैतिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी दोघांनीही नीट संभाळली तर नक्कीच हे नात मजबूत होईल, यशस्वी वैवाहिक आयुष्याची सुंदर घडी बसायला मदत होईल आणि मानसिकरित्या मजबूत राहून आपल्या व्यवसायात प्रगती करता येईल.

          मला तर असं वाटतं की, नवरा बायकोचं नातं हे नेहमी मित्र मैत्रिणीच्या नात्या सारखंच असलं पाहिजे. आणि तसं खूप ठिकाणी असतही पण मध्येच एखाद्या विषयात इगो जागा होऊन आपल्या नकळत आपल्यातले नवरा बायको जागे होतात आणि कलह सुरु होतो मग छान रंगत आलेली मैत्री फिसकटते. आपण नेहमीच मैत्रीत केलेली थट्टा किती सहज सोडून देतो. पण हेच जर का नवरा बायको मध्ये घडलं तर आपण थोडा वेळ एकूण घेतो आणि नंतर आपल्या आतली मैत्री विसरून नवरा बायको या नात्याला जाग येते, इगो जागा होतो आणि कलह सुरु होतो. म्हणून आपण ज्या त्या वेळी जे ते नाते जपू शकलो तर नवरा बायकोतली खूप सारी भांडणे सुरु होण्या आधीच संपू शकतील. एखाद्या क्षणी नवऱ्याचा किंवा बायकोचा खूप राग आला तर तेव्हा मित्र किंवा मैत्रीण बनुन समजुन घ्यायला पाहिजे म्हणजे राग आपोआप कमी होईल आणि काही वेळ मित्र किंवा मैत्रीण होण्याने आपली चिडचिडही होणार नाही. बिकट परीस्थिती शांतपणे हाताळायची आपल्याला सवय लागेल आणि मनात आणि घरात शांतता राहिल. असचं जर प्रत्येक नवरा बायको पक्के मित्र मैत्रीण झाले तर हे नातं म्हणजे नक्कीच "एक सुंदर जमलेली रेसिपी"च असेल.

          आज आमच्या वैवाहिक जीवनाला ६ वर्षे पूर्ण झाली. या जीवन प्रवासात आयुष्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या कठीण टप्प्यांवर माझी सावली बनून खंबीरपणे मला साथ देणाऱ्या माझ्या पत्नीला या ६ वर्ष यशस्वी सहजीवनाच्या खुप खुप शुभेच्छा......

- डॉ. संदीप सोमेश्वर टोंगळे.