"जगाचा पोशिंदा"


          अन्न, वस्त्र आणि निवारा या आयुष्याच्या मुलभुत गरजा, या गरजा आपल्या बळीराजा शेतकरी शिवाय पूर्ण होऊच शकत नाहीत. धान्याशिवाय अन्न नाही, कापसाशिवाय वस्त्र नाही, लाकडाशिवाय निवारा नाही. आपलं सगळं आयुष्यच ज्या बळीराजावर अवलंबून आहे त्याच्या शिवाय पूर्णच होऊ शकत नाही तोच आज अपूर्ण आहे. "जगाचा पोशिंदा" मानल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांवरच आज उपाशीपोटी राहण्याची वेळ आलीय. आपला अन्नदाता शेतकरीच आज अन्न, वस्त्र, निवारा या मुलभुत गरजांना मुकतोय. महाग बियाणे, बेभरवशाचा पाऊस, आयुष्याशी खेळ खेळणारा बाजारभाव या गोष्टीने शेतकरी अगदी त्रस्त आहे. शेतीइतका बेभरवशाचा कोणताही व्यवसाय नसेल. जरा कुठे महागाई वाढली की, नोकरदारांचे पगार वाढतात. मात्र, पुन्हा त्यांचे पगार कमी झाल्याचे एकही उदाहरण नाही. पण शेतक-यांकडे माल नसतो तेव्हा धान्याचे भाव वाढलेले असतात. ते धान्य त्याच्याकडे आले की, ते थेट निम्म्यावर येतात. शेअर मार्केट पाच-दहा टक्क्यांनी कोसळले, तर त्याची लगेच बातमी होते. मात्र, धान्याचे भाव पंधरा दिवसात थेट अर्ध्यावर आले तरी कुणाला त्याची साधी चौकशी करावीशी वाटत नाही. अशा परिस्थितीत शेतकरी कसा जगणार? आणि तोच नाही जगला तर आपण कसे जगणार?

          स्वातंत्र्यानंतर उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी असं धोरण होत पण ते आता कुठे दिसत नाही. उलट शेतीलाच कनिष्ठ दर्जा मिळतोय. कष्ट करुन, उन्हातान्हात घाम गाळणाऱ्या या शेतकऱ्यांना कवडीमोलाचीही किंमत जर या देशात मिळत नसेल तर माझा देश सुजलाम सुफलाम म्हणण्याची आम्हाला लाज वाटली पाहिजे. 'काहीही बन पण शेतकरी नको बनू' असं म्हणणारी पीढी आपण तयार करतोय. आजचा तरुण या बिकट परिस्थिती मुळे शेतीकडे पाठ फिरवतोय. शेतीकडे आजची सुशिक्षित पीढी आकर्षित होत नाही. जगामध्ये एकमेव उत्पादन असे आहे, ज्याचा भाव तो उत्पादन करणारा (शेतकरी) ठरवत नाही, तर इतर लोक (व्यापारी, दलाल) ठरवतात. इतर उत्पादनात त्या मालाचा योग्य भाव ठरवून मार्केटमध्ये आणतात. पण शेतक-यांना मात्र त्याच्याच शेतमालाचा भाव ठरविण्याचा अधिकार नाही. शेतीबाबतचे हे धोरण बदलले पाहिजे. मुबलक वीज आणि पाणी पुरवठा, उत्कृष्ठ बी बियाणे, प्रत्येक पिकाला हमीभाव जर दिला तरच शेती व्यवसायाला पहिल्याप्रमाणे उत्तम दर्जा मिळेल.

          एक कप चहाला आम्ही १५-२० रुपये मोजायला तयार असतो पण एक कोथींबीरची जुडी १० रुपयाला झाली तर कासाविस होतो. शेती, शेतकरी आणि शेतमाल याकडे असं जर दुर्लक्ष होत राहील आणि असाच जर कनिष्ठ दर्जा मिळत राहिला तर भविष्यात शेतीच उरणार नाही. मग खाणार काय? मोटारी का सॉफ्टवेअर, रसायने का वीज? का हे साखर कारखाने? आजचा ऊस उत्पादक शेतकरी हा पारंपारिक शेतीसाठी एक समस्या बनत चालला आहे. १६ ते १८ महिने लागवड, इतर हंगामी पिकांकडे दुर्लक्ष, पारंपारिक शेतीचा अभाव, पाण्याचा अतिरिक्त वापर (पाणी मुबलक आहे म्हणुन किंवा कोण विचारतो म्हणुन...) या गोष्टींमुळे शेत जमीनीचा कसं कमी होत चालला आहे. या कडे लोकांच लक्षच नाही. शेतक-यांची अनुकरणाची प्रव्रुत्ती सुद्धा शेतीला घातक ठरत आहे. कांद्याचा भाव वाढतो आहे असे दिसले रे दिसले कि जो तो कांदेच लावणार. मग एवढे उत्पादन होते कि मागणी पेक्षा पुरवठाच एवढा वाढतो कि शेतक-यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. ज्या कांद्याला काही महिन्यांपुर्वी सोन्याचा भाव मिळवत होता तोच कांदा अक्षरश: फेकुन द्यावा लागतो. शेतक-यांनी आता फक्त ऊसाच उत्पन्न घेऊन मुबलक पैशाला बळी न पडता पारंपारिक शेती कडे लक्ष दिलं पाहिजे. आलटून पालटून पीकं घेवुन शेतीचा कस वाढवला पाहिजे.

*(मला स्वत:ला शेतीतलं फार काही कळत नाही, हे अनुभव मी माझ्याकडे येणा-या गरीब शेतकरी पेशेंट्स कडून घेतले आहेत. कारण श्रीमंत शेतकरी तर फक्त ऊसच लावतो त्यामुळे तो काय अनुभव सांगणार.)*

          आम्ही लहान असताना नेहमी शेतात जायचो. आमच्या आजोबांनी एवढी सुंदर शेती फुलवली होती जणू नंदनवन च...... (त्यामुळे तेव्हा शेतात सारखं जाऊ वाटायचं) द्राक्ष, दाळींब, लिंबु, केळी, नारळ, बोरं, आंबे, चिंचा, उंबर असे किती तरी प्रकार खायला मिळायचे (आज पाहायला सुद्धा मिळत नाहीत.) शेतात जाणं म्हणजे जणू आमच्या साठी एक पर्वणीच असायची. आता आमच्या मुलांना आम्ही अशी शेती फक्त दाखवू तरी शकू का? किती सुंदर दिवस असायचे ते. आजचा शेतकरी पारंपारिक शेती विसरत चाललाय. त्यामुळे आमच्या सारख्या तरुण पिढीचा शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलत चाललाय. शेती या विषयाबद्दल नकारात्मक भावना निर्माण होतेय. शेती करण्याची पद्धत बदलली पाहिजे (बदल म्हणजे नुसता ऊस च लावणे नव्हे). झीरो बजेट नैसर्गिक शेती सारख्या पद्धतीकडे लोकांचा कल वाढला पाहिजे. शेतीमालाच्या भाव आकारणीच्या पद्धतीत कालानुरूप बदल केला पाहिजे. तरच शेती कडे बघण्याचा दृष्टिकोण सकारात्मक होईल. सर्वच शेतक-यांचे शेतीविषयी योग्य प्रबोधन झाले पाहिजे. त्यांना अनुदानं, निधी, सबसीडी, कर्जमाफी, विजबील माफी याची सवय न लावता त्यांचा आत्माभिमान, स्वाभिमान वाढवला पाहिजे, त्यांना जागरूक शेतकरी बनवलं पाहिजे. तरच शेतीचा आणि पर्यायाने तरुण पिढीचा सर्वांगीण विकास साधता येईल. माझ्या मते ज्या दिवशी एका सामान्य गरीब शेतक-याचा साखर कारखाना उभा होईल, शेतकरी स्वत: शेतमालाचा भाव ठरवेल आणि कोणत्याही दलालाविना बाजारपेठेत स्वत:च उत्पादन स्वत: घेऊन जाईल त्यादिवशी शेतीला चांगले दिवस आले असं म्हणता येईल. आणि ख-या अर्थानं त्याच दिवशी माझा बळीराजा "जगाचा पोशिंदा" होईल.

*(हा लेख मी जेव्हा पाहिल्यांदा लिहिला, पूर्ण ही झाला, खुप सुंदर मांडणी ही झाली होती आता मी हा लेख पोस्ट करणारच होतो पण चुकुन माझ्याकडून delete झाला, इतकं वाईट वाटलं, एक क्षण मला काही कळेनाच, खुप खुप अस्वस्थ झालो, बैचेन झालो. आपार कष्टाने पिक उभं करून ते पिक पावसाविना वाया गेल्यावर आपला बळीराजा शेतकरी या पेक्षा कितीतरी वाईट मानसिक स्थितीतुन जात असेल याची जाणीव झाली.)*

- डॉ संदीप टोंगळे

Comments

Popular Posts