"मी कोण?"

मी प्रकाशातला अंधार
की अंधारातला कवडसा?
मी मिणमिणता दिवा
की दिव्याचा आडोसा?

मी वट वृक्षाखालचं रोपटं
की रोपट्याची सावली?
मी भिजलेला कापूस
की कापसाची बाहुली?

मी शब्दांची रचना
की रचनेतला प्राण?
मी अपूर्ण पुस्तक
की पुस्तकाचं शेवटचं पानं?

मी रोखलेला श्वास
की श्वासातला अडथळा?
मी नसलेला आभास
की जाणवणाऱ्या कळा?

मी एक नश्वर माणूस
की फक्त माणसाचं तन?
मी माझ्यातली सृष्टी
की सृष्टीचा एक कण?

मी वादळातलं मौन
की गर्दीतला गौण?
प्रश्न एकच "मी कोण?"

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Comments