"रायगडावर पदग्रहण...!"

          आज तब्बल साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा "छत्रपती शिवाजी महाराज" हे तीन शब्द उच्चारले की लगेच अंगावर रोमांच उभे राहतात, रक्त सळसळते, मनात एक आगळा वेगळा जोश तयार होतो, मराठी साम्राज्याचा जोश, हिंदवी स्वराज्याचा जोश, भारत देशाचा जोश. हा जोश प्रत्येकाच्या मनात वर्षानुवर्षेच नाही तर युगानुयुगे राहीलं यात तीळ मात्र शंकाच नाही. "छत्रपती शिवाजी महाराज की जय" असं म्हणुन तयार होणारा हा जोश अगदी त्या व्यक्तीच्या शरीरातल्या अनुरेणु पर्यंत पोहोचतो, अंगातली मरगळच निघून जाते. आदर्श पुत्र, आदर्श योद्धा, आदर्श राज्यकर्ता म्हणून खुप नावलौकिक तर झालच पण आदर्श व्यक्ती म्हणून आजही "छत्रपती शिवाजी महाराजांच" नाव घेतलं जात आणि घेतलं जाईल. पण हा आदर्श आपण जपतोय का? आज प्रत्येकाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज आहेत पण तनात, कणाकणात आणि आपल्या कामात शिवाजी महाराजांचा आदर्श आहे का? मी आणि माझे सचिव रो प्रशांत उबाळे आम्ही दोघांनी हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आमचा "रोटरी पदग्रहण सोहळा २०१९-२०" स्वराज्याची पहिली राजधानी "रायगड" येथे च करण्याचा विचार मनात पक्का केला होता. रायगडावर पदग्रहण...! अनेकांच्या भुवया उंचावल्या की हे कसं शक्य आहे. एखादा ठाम निश्चय प्रामाणिकपणे मनाशी बाळगल्यावर आणि त्याचा जिद्दीने पाठपुरावा केल्यावर त्याची फलश्रुती किती सुंदर असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमची "रोटरी रायगड ट्रिप".

          एखाद्या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेचा अध्यक्षीय पदभार रायगडासारख्या पावन भूमीवर स्वीकारणे आणि तिथल्या मातीतला जोश प्रत्येकाच्या मनात भरून पुढच्या कामाची आखणी करणे या सारख मोठं भाग्य ते कोणतं...! छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना त्यांच्या सोबतच्या प्रत्येक साथीदाराचा जितक्या आत्मीयतेने विचार केला तीच आत्मीयता आम्ही मनाशी बाळगून ट्रिप मध्ये सहभागी प्रत्येक सदस्याचा आम्ही तितक्याच आत्मीयतेने काळजी घेण्याचा प्रयत्न केला, हेही भाग्य आम्हाला लाभले. कपाळावर भगवा तिलक, डोळ्यात तेजस्वी अस्मिता, ओठांवर छत्रपती शिवरायांचे नाव, हातात रायगड माहीती पुस्तक आणि मनात रायगडावर ट्रेकिंग करत जायची जिद्द या सर्व गोष्टी मनात पक्या बसवून आमची रायगड ट्रिप सुरू झाली. प्रवासातल्या हर एक टप्प्यावर, निसर्गरम्य वातावरणात प्रत्येक साथीदाराचं एक सुंदर अस्तित्व सर्वांसमोर येत होतं. अगदी दिलखुलास, मनमुराद ट्रिपचा प्रत्येक क्षणाचा आनंद घेत एकमुखी दत्त, मिनी बालाजी, वाई गणपती अशी पवित्र देवस्थाने करत पाचगणी वॅक्स म्युसीयम मध्ये 9D शो चा मनसोक्त आनंद घेऊन ट्रिप चा मुक्काम रायगड पायथ्याशी पोहोचला.

          ३५० किमी प्रवासाचा थकवा कमी पण रायगड चढायची जिद्द मनात जास्त होती. पहाटे ६ ला उठून ट्रेकिंग ची सुरुवात केली. ट्रिपच्या प्रत्येक साथीदाराला रोटरी टी शर्ट, पाण्याची बाटली आणि खाद्य पदार्थ यांची पिशवी देऊन ट्रेकिंग सुरू झाली. प्रवासाचा थकवा शरीरात थोडासा होता आणि पुरेशी झोप नसल्याने अंगात थोडी मरगळ होती, पण एका साथीदाराने "छत्रपती शिवाजी महाराज की जय" असा जयघोष केला आणि कुठून कोणास ठाऊक पण आमच्या सर्वांच्या अंगात आणि मनात असं बळ निर्माण झालं की सगळी मरगळ, थकवा कुठल्या कुठे निघून गेला. १४६० पायऱ्या चढताना १४४०० हृदयाच्या ठोक्यात, ३००० श्वासात फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायांचे अस्तित्व होते. आणि त्यामुळेच एवढा थकवा असताना सुद्धा आम्ही प्रत्येकजण गड चढू शकलो. वरून पावसाची रिमझिम सुरूच होती पण मनात रायगडाच्या अस्मितेचा धोधो पाऊस पडत होता त्यामुळे पावसाचा प्रत्येक थेंब हवाहवासा वाटतं होता. माझी मुलगी स्वरा आणि तिच्या सारखे १२ चिमुकले तर न थकता न बसता थेट रायगडावर पोहोचले.  गडावरच वातावरण तर इतकं निसर्गरम्य, मनमोहक आणि प्रेरणादायी होत की तिथल्या मातीतून सुद्धा स्वराज्याचा सुगंध दरवळत होता. टकमक टोक, हत्ती तलाव, बाजार पेठ, जगदीश्वर मंदिर असे बरेच स्पॉट रिमझिम कधी जोरात पडणाऱ्या पावसात बघत बघत आम्ही पोहोचलो नगारखाण्या जवळ.

           नगारखाण्याची पायरी चढत चढत आम्ही रायगडावरील सर्वात उंच ठिकाणी म्हणजे राज सभे मध्ये पोहोचलो. जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला होता. ते रायगडावरील सर्वांत उंच ठिकाण आणि मराठी माणसाच्या मनात सर्वांत उंचीवर असलेलं हे दैवत पाहून मन भरून आलं. रयतेच्या अस्तित्वासाठी हिंदवी स्वराज्याचा हट्ट मनात धरून किती तरी हालअपेष्टा, त्याग सहन करून माझे राजे छत्रपती शिवराय या सिंहासनावर बसले होते. आज त्याच क्षणाची प्रतिकृती तिथे बसविली आहे पण जस जस जवळ जाईल तस त्या मूर्तीतला जिवंतपणा मनात घर करून जात होता. ज्या ठिकाणी राजसभा भरायची त्या ठिकाणी आम्ही रोटरी पदग्रहणाची तयारी सुरू केली. रोटरीच्या प्रोटोकॉल नुसार माजी अध्यक्षांनी रोटरी बेल वाजवून राष्ट्रगीत सुरू केले आणि त्यानंतर रोटरीची १९-२० ची प्रार्थना झाली. त्यानंतर वेळ होती ती आम्ही पदभार स्वीकारायची...

          अंगावर शहारे होते, छत्रपती शिवरायांसमोर आम्ही आमच्या आयुष्यातल्या वेगळ्या पर्वाची सुरुवात करत होतो. हृदयाची धडधड वाढली, मनात जबाबदारीची जाणीव निर्माण झाली, हलगीच्या आवाजात आणि टाळ्यांच्या गजरात आम्हा दोघांचं तिथे जमलेल्या सर्वांनी जोरदार स्वागत केलं. तिथून पुढे पडलेलं प्रत्येक पाऊल जबाबदारीच्या पाऊलखुणा तयार करत हृदयावर कोरल जात होतं. नंतर माजी अध्यक्ष आणि सचिवांनी माझ्या आणि नूतन सचिवांच्या गळ्यात रोटरी कॉलर दिली आणि रोटरी चं साहित्य देऊन पदभार दिला. आणि पदभार स्वीकारून आम्ही नूतन अध्यक्ष सचिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी मूर्तीजवळ गेलो. महाराजांच्या मूर्ती ला हार अर्पण करून पदस्पर्श करून दर्शन घेतले. तो क्षण अजून सुद्धा माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीये आणि कधीच जाणार ही नाही. त्या मूर्तीतल्या जिवंतपणामुळे असं वाटत होतं की दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी राजे आम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि आमच्याशी हितगुज करत आहेत. त्यावेळी आम्हा दोघांच्या मनात असलेली ती सुंदर भावना शब्दात बांधून वर्णन करताना सुद्धा अंगात रोमांच उभा राहतोय. तिथून पाय हलत नव्हते पण नियमानुसार आम्हाला दिलेल्या वेळेच्या आत खाली यावं लागलं. येताना आणखी एकदा दर्शन घेतले आणि नेहमीप्रमाणे समाजासाठी आमच्या हातून चांगलं कार्य घडत राहो असा आशीर्वाद मनोमन घेतला. तो सर्व क्षण मनात पक्का बसवून आम्ही पुन्हा पदग्रहणाच्या जागेवर आलो आणि माझ्या राजांसमोर रायगडावर संपन्न झालेल्या पदग्रहणाबद्दल मनोगते व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप झाला.

          पदग्रहण कार्यक्रम संपला पण त्या सर्व सोहळ्याची क्षणचित्रे मोबाईल सोबत मनाच्या मेमरीत सुद्धा जशीच्या तशी उमटून राहिली. नंतर आम्ही गड उतरू लागलो. गड उतरताना आभाळ मोकळं झालं होतं, रिमझिम थांबली होती. गडावर आच्छादलेली धुक्याची चादर हळूहळू सरकून हिरवागार निसर्ग डोळ्यासमोर दिसत होता. निसर्गाच्या निरनिराळ्या छटा दाखविणारं विलोभनीय दृश्य पाहून मन अगदी प्रफुल्लित झालं. पायात तशी ताकत राहिली नव्हतीच पण महाराजांच्या दर्शनाने मिळालेल्या आत्मिक शक्तीच्या बळावर आणि निसर्गरम्य वातावरणात गड उतरणं शक्य झालं. आता सुरू झाली होती परतीच्या प्रवासाची लगबग... ट्रॅव्हल्स मध्ये गाणी, डान्स, जोक सांगत प्रवास पुढे पुढे सरकत होता. दोन दिवसांचा हा अविस्मरणीय प्रवास कधी संपला कोणाला कळलंच नाही. "पदग्रहण रायगडावरच घ्यायचं." या तीन शब्दांचं सहज बोललेलं वाक्य इतक्या मोठ्या आणि सुंदर अनुभूतीत परिवर्तीत होईल असं स्वप्नात सुद्घा वाटलं नव्हतं. असा स्वप्नवत प्रवास संपत आला होता. पण या प्रवासाने दिलेल्या अनुभवांच्या शिदोरीत आपुलकी, काळजी, नियोजन, संयम अशा कित्येक गोष्टी दिल्या ज्या आयुष्यभर उपयोगी पडतील. या प्रवासात सहभागी असलेल्या सर्वांनी अगदी मोलाचे सहकार्य केले. त्यातल्या प्रत्येकाकडून खूप काही सकारात्मक शिकायला मिळाले.

           मला या ट्रिप साठी मिळालेल्या सहकार्याबद्दल ज्ञात, अज्ञात अशा सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. रोटरी रायगड ट्रिप मध्ये घालवलेले हे सगळे सुंदर क्षण सहजासहजी विसरता येऊच शकत नाहीत. या ट्रिप मधील प्रत्येकाने मला खूप काही दिले आहे त्या सर्वांचा मी आयुष्यभर ऋणी राहील. रोटरीच्या या सुंदर नियोजित रायगड ट्रिपच्या प्रवासातील अनुभवाचे माझ्या मनाच्या शिंपल्यात अनेक आठवणींचे मोती आहेत ते मोती मी नेहमीच ओंजळीत घेत राहील आणि क्षणासाठी मी स्वत:ला विसरून त्या आठवणीत रमून जाईल......

धन्यवाद !

- डॉ. संदिप सोमेश्वर टोंगळे
   अध्यक्ष २०१९-२०
   रोटरी क्लब ऑफ माढा

Comments

Popular Posts