कळलंच नाही...


बराच काळ निघून गेला,
बरंच काही सांगून गेला,
पण कसा गेला
कळलंच नाही...

का नाही केली जाणाऱ्या
काळाची हयगय,
जगण्याच्या धावपळीत
कधी वाढलं वय
कळलंच नाही...

सायकलच्या चाकावर
फिरणार आयुष्य,
कधी गाडीच्या वेगानं
धावू लागलं
कळलंच नाही...

खांद्यावर चढून
डोक्याची मालिश करणारे
मुलीचे चिमुकले हात,
खांद्यापर्यंत कधी पोहोचले
कळलंच नाही...

कधी तरी मी होतो
आई वडिलांची जिम्मेदारी
कधी मुलीसाठी
झालो जिम्मेदार
कळलंच नाही...

काही दिवस असेही होते
भर दिवसा पण बिनधास्त
झोप मिळत होती,
कधी रात्रीची सुद्धा
झोप उडाली
कळलंच नाही...

बरेच रंग भरले
आयुष्याच्या नाट्यपटावर
कोणते रंग
अंतरंग रंगवून गेले
कळलंच नाही...

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Comments

Popular Posts