"अट्टहासातलं आयुष्य"


जावी एखादी झुळूक 
अंतरंगाला स्पर्श करून
मनातल्या कटू अनुभवांना
मिळावा दरवळणारा सुगंध
मनात साचलेल्या भावनांना
मिळावी एखादी आसववाट...


चंद्राच्या शीतल उजेडात
सजवता याव्या हृदयाच्या जखमा
त्या खपल्यांच्या आत मिळावा
दिलासा काळजाच्या वेदनांना
खोलवर लपवून ठेवता यावा
दडपलेल्या मौनातला आक्रोश...


अपेक्षांची राख पेटवून 
पडावा मस्तकात प्रकाश
भयाण काळोखाला भेदून
मिटावा अंधार मनातला
व्यासंगाच्या उजेडात
मिळावा स्वार्थाला परमार्थ...


रात्रीच्या किर्रर्र शांततेत
मिळावा मुग्ध एकांत
सांगता याव्या अंतर्मनाला
उणिवेतल्या जाणिवा
अन् वाचता यावा अर्थ
या अट्टहासातल्या आयुष्याचा...


- डॉ संदिप सोमेश्वर टोंगळे

Comments

Popular Posts