“घडवणूक”

          “ओ पप्पा, रोज सारखी सारखी ती क्रिकेट मॅच काय बघत असता ओ तुम्ही? आता माझं चैनल लावा. ६५९ लावा, मला डोरेमॉन बघायचंय.” माझी मुलगी स्वरा लहान असताना (आताही लहानच आहे.) अशीच टीव्ही वर अधिराज्य गाजवायची. आणि मी ऐकत नाही असं तिला वाटू लागलं की वैतागून डायरेक्ट टीव्हीचा मेन स्विचच ऑफ करायची. ना रहेगा बास, ना बजेगी बासुरी......“हे बघ, आता शेवटचीच ओव्हर सुरु आहे, नंतर तू तुझच चैनल लावून बस.” असं काहीतरी सांगून मला तिची समजूत काढावी लागायची. किंवा “हा मोठा काटा सिक्स वर आला की तूझ चैनल लावतो” असं बोललं की मग ती बिचारी घड्याळातला मोठा काटा सिक्स वर यायची वाट बघत बसायची. आता १५ मिनिट तरी शांत बसेल अस वाटू लागायचं, पण थोड्याच वेळात बिचारी ती नसून बिचारा मीच आहे याची प्रचीती यायची, कारण मोठा सेकंद काटा पण असतो ना...... गुगली...... क्लीन बोल्ड...... बघा आता डोरेमॉन...... आता घड्याळात बघायची वेळ माझी होती...... मग शेवटी एक तह झाला की ऍड लागली की मॅच आणि त्यात पण ऍड लागली की डोरेमॉन...... मग काय दोघे मिळून टीव्ही बघत बसलो. टीव्ही बघताना एक जाहिरात लागली, चैनल बदलायचं सोडून आम्ही दोघेही अगदी अंतर्मुख होऊन ती जाहिरातच बघत बसलो. त्यात एका दुर्गम भागातून दूर अंतरावर असणाऱ्या शाळेत जाणारी मुलं दाखवली होती. मी पटकन तिला म्हणालो, “ते बघ, ती सगळी मुलं किती लांब दुसऱ्या गावातल्या शाळेला चालत जात आहेत, अगदी खेळत, बागडत, आनंदात...... स्वरा तु बसने जाते ना शाळेला......?” ती थोडी विचारात पडली. आणि दोन मिनीटांनी म्हणाली, “ती मुलं चालत शाळेत जातात पण, मला शाळेत घेऊन जायला बस येते......” ते आमचं संभाषण तिथेच थांबलं. पण नेहमीच्या सवयी प्रमाणे माझ्या डोक्यातलं विचारचक्र मात्र सुरु झालं. आणि कदाचित तिच्याही......

          आधुनिक सुखसोयीपासून लांब राहूनही अगदी आनंदात शाळेला चालत जाण्यातली मज्जा ही तिला कळावी, त्या निरागस मुलांशी तिला आपुलकीच्या धाग्याने जोडले गेल्याची भावना वाटावी, आपण सर्वजण एकाच समाजाचे घटक आहोत म्हणून त्यांच्याबद्दल तिला आत्मीयता वाटावी आणि समाजातल्या या भयाण विषमतेची तिलाही जाणिव असावी हा विचार माझ्या बोलण्यामागे होता. पण तिला ते समजावून सांगताना मात्र माझी क्षमता नक्कीच कमी पडली...... माझ्या स्वतःच्या मर्यादांची जाणीव अंतर्मुख करून गेली. पण ती सुद्धा थोडा वेळ का असेना पण विचार करू लागली. कदाचित मला नेमकं काय म्हणायचं आहे हे तिला थोडतरी समजल असेलच. ती शाळकरी मुलं आणि स्वरा एकाच समाजाचे घटक असून सुद्धा त्यांच्यात असणारी ही विषमता, ही दरी मन हेलावणारी आहे. पुरातन काळात श्रीकृष्ण आणि सुदामा एकाच शाळेत शिकत होते. त्यामुळे नैसर्गिकरित्या आपोआपच मुलांच्या सामाजिक आणि भावनिक जाणीवा समुद्ध होत होत्या. आज मात्र आपणच निश्चित केलेल्या जीवघेण्या स्पर्धेच्या जगात नवनवीन आधुनिक सुविधा मुलांना उपलब्ध होत आहेत. पण याच्याही पलीकडे जावून वंचित घटकांचा जर आपण विचार केला तर एक नवीनच आर्थिक आणि शैक्षणिक दरी आपण तयार करतोय का? हा विचार सुद्धा अंतर्मुख करायला लावतोय. प्रवाहाच्या विरुध्द प्रवास करताना त्रास होतो आणि धाडस ही लागत पण प्रत्यक्षात ते कोणालाच व्यवहार्य वाटत नाही. आजच्या या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात श्रमसंस्कार, श्रमप्रतिष्ठा या गोष्टी कालबाह्य ठरत आहेत का......? दिवसभर मुलांना थकवणारे उपक्रम घेऊन होणारी ‘Personality development’ ही मूल्यशिक्षणावर आधारित व्यक्तिमत्व विकासापेक्षा आधुनिक वाटतेय का......? काळ बदलला म्हणून माणसाची जगण्याची नीतीमूल्य पण बदलतात का......? माणसाच्या माणुसकीच्या जाणीवा पण बदलू शकतात का......? आपल्या मुलांची आधुनिक युगातली ‘Personality’ घडवताना आपण त्यांना आदर्श ‘माणूस’ घडवण्यात कमी पडतोय का......? आपण आपली माणूस म्हणून जगण्याची परिभाषाच बदलून टाकलीय का......? आपण आपल्या मुलांना ‘माणूस’ म्हणून वाढवायला विसरतो आहोत का......?

          आपल्या जगण्यातल्या नीतीमूल्यांचा विकास हा कुटुंब, समाज आणि शाळा यावर अवलंबून असतो. सर्वात आधी आपल्या कुटुंबात आदर्श नीतीमूल्यांच आचरण असलं पाहिजे तर त्याचा योग्य परिणाम आपल्या पाल्यांवर होतो. मुलांना घडविण्यात कुटुंबाची सगळ्यात महत्वाची भूमिका असते. सहा वर्षापर्यंतची मुलं घडविण्यात घरच्यांचा हातभार जास्त महत्वाचा असतो कारण त्या वयात त्या लहान मुलांवर आपल्या पालकांच्या आचरणाचा प्रभाव जास्त पडत असतो. त्यानंतर जसा जसा सामाजिक संपर्क वाढत जाईल तसा तसा सामजिक मुल्यांचा विकास होत जातो. प्रसार माध्यमं, प्रसिद्धी माध्यमं आणि प्रभावी सामाजिक संघटना यांच्या संपर्कामुळे नैतिकता, सामाजिक बांधिलकी आणि परिवर्तन या विचारांचा प्रभाव पडू लागतो. शिक्षणामुळे स्वतंत्रता, समानता, अहिंसा, सहिष्णुता, धैर्य आणि भावनिक नैतिकता या मुल्यांचा विकास होऊ लागतो. आपल्याला पुढच्या पिढीत माणसं घडवायची असतील तर त्यांना हे मूल्य शिक्षण मिळण ही काळाची गरज बनत चालली आहे. त्यात आपल्यासारख्या पालकांची जबाबदारी जास्त महत्वाची आहे. पालकत्व म्हणजे फक्त जन्माला घातलेल्या मुलाला किंवा मुलीला चांगलं चुंगलं खाऊ घालण आणि सर्व भौतिक सुखसुविधा देणं इतकंच असत का? त्याला उच्च दर्जाची मूल्यशिकवणं हे ही काम आपलंचं आहे ना? त्यासाठी सर्वात आधी आपण स्वतः एक ‘माणूस’ म्हणून विकसित व्हायला पाहिजे. आपण आपल्या पाल्यांच्या शिक्षणात मूल्य शिकवली नाहीत तर पुढे जावून त्यांच्या शिक्षणाचं सुद्धा मूल्य राहणार नाही. समाज आणि शिक्षणाच्या माध्यमातून बदलत्या काळाची मूल्यशिक्षणाची गरज लक्षात घेऊन जुन्या - नव्याचा मेळ साधून एक आदर्श व्यक्तिमत्वाची पिढी घडविता येऊ शकते. आपल्या भारतीय संस्कृतीतून होणारे मूल्य संस्कार, जीवनविषयक आदर्श शिकवण, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आधुनिक विचारसरणी यांचा समन्वय साधत आपण आपल्या पाल्यांवर संस्कार घडवून त्यांना ‘माणूस’ म्हणून जगायला शिकवलं पाहिजे.

          "स्वरा, तू अजून खूप लहान आहेस. पण भविष्यात तू एक संवेदनशील व्यक्ती म्हणून खूप मोठी व्हावीस,  तू तुझ्या आयुष्यात आदर्श मूल्य जपावीत, तुझ्या भावनिक, आर्थिक आणि सामाजिक जाणिवा अधिकाधिक समृद्ध होत जाव्यात, तुला सामाजिक नीतीमूल्यांची चांगली जाण होत जावी, तुला समाजाच्या खऱ्या वास्तविकतेचं नेहमी भान असावं असं मला वाटतं. म्हणूनच तुझ्या चिमुकल्या डोक्यावर विचार करण्याचा भार मी टाकला...... पण या पेक्षा भयाण वास्तव दिसेल तुला तू मोठी झाल्यावर...... ती विषमता सुद्धा बैचेन करेल तुला...... पण त्यासाठी तुझी आणि तुझ्यासारख्या प्रत्येक मुलामुलींची विचारसरणी आदर्श नीतीमुल्यांना धरून असावी म्हणून हा एक लेख प्रपंच......” आपण सर्वजणच आपल्या पाल्यांची “घडवणूक” योग्य व्हावी म्हणून धडपड करत असतो पण त्यासाठी आधी आपण स्वतःच माणूस म्हणून आपली “घडवणूक” केली पाहिजे.

- डॉ. संदीप सोमेश्वर टोंगळे.

Comments

Popular Posts