"मी मरणार कधी?"


शरीराने थकलेली
कमरेत वाकलेली
मनाने व्याकुळलेली
एक म्हातारी आली,
आणि विचारतेय
"मी मरणार कधी?"

डोळ्यात भरली होती
आयुष्याची जड कथा,
वंशाच्याच दिव्याने
दिलेली असह्य व्यथा,
नवरा गेल्यावर
तो पुसलेला माथा,
एकटीनेच जगलेलं आयुष्य
खाल्लेल्या असंख्य लाथा
ती सारखं विचारतेय
उरलेलं सुरलेलं माझं
आयुष्य सरणार कधी
एवढंच सांग बाळा,
"मी मरणार कधी?"

तिला हवंय
सुटकेचं मरण,
तिच्याच शेतातलं
लाकडाचं सरण,
तिच्या या दुःखाला
मी औषध काय देऊ,
सगळंच सोसलंय तिने
त्या ओंजळीत काय ठेऊ,
ती पुन्हा विचारतेय,
देव मला बघणार कधी,
खरंच सांग बाळा
"मी मरणार कधी?"

काय सांगू आणि
कसं सांगू मी तिला,
तिच्याकडेच आहे की
अनुभवांची शिदोरी,
कोणाच्याच हातात नसते
आपल्या आयुष्याची दोरी,
ती पुन्हा पुटपुटतीय
माझ्या आयुष्याचे हे
दिवस भरणार कधी,
एकदाच सांग बाळा
"मी मरणार कधी?"

बोलता बोलता नकळत
तिच्या अश्रूने वाट धरली,
लगेच भावनांना आवरत
आयुष्यात उरलेल्या पुंजीची
पिशवी तिने भरली,
आयुष्य जगण्याच्या
याच रितीमुळे
ती मनातच भरली,
आता मीच
विचारतोय देवाला,
हीचं हे भयाण आयुष्य
सार्थ ठरणार कधी,
तूच सांग बाबा
"...... .................... कधी?"

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Comments

Popular Posts