वेळ

दिवस रात्र धावणाऱ्या या जगात
कोणालाच कोणाचा मेळ नाही,
सगळी सुखं तर आहेत आयुष्यात
पण थोडं हसण्यासाठी वेळ नाही...

नात्यांचा विसर पडतोय हळूहळू
नाती म्हणजे काही खेळ नाही,
मातृत्वाची कदर तर आहे मनात
पण "आई" म्हणायला वेळ नाही...

मित्रांची यादी भरलीय पूर्ण
पण कोणाशी बोलायला वेळ नाही,
थकलेल्या डोळ्यात भरलीय झोप
पण झोपायला कोणाकडे वेळ नाही...

मनाचा झालाय फार गोंधळ
डोकं म्हणजे काही भेळ नाही,
अश्रूंच्या वाटांना चकवा देत
आता रडायला सुद्धा वेळ नाही...

पैसा हेच एकमेव ध्येय झालंय
याच्या विना प्रगतीचा काळ नाही,
पैशाच्या मागे असं धावतात सगळे
की दमायला सुद्धा वेळ नाही...

आता तूच सांग माझ्या आयुष्या
अशा आयुष्याचं काय होईल,
जिथे प्रत्येक क्षणाला मरणाऱ्यांना
जगण्यासाठी सुद्धा वेळ नाही...

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Comments

Popular Posts