"मनात पेटलेली ठिणगी"

          आज ठिकठिकाणी "पानी फाऊंडेशन" ची कामे अगदी जोरात, जोमात आणि जोशात सुरू आहेत. गावकऱ्यांमधला हा एकोप्यातला उत्साह पाहून असं वाटतंय की समाजात एक नवचैतन्य नक्कीच निर्माण झालंय. एखाद्या ठिणगीमुळे वणवा पेटतो आणि बघता बघता लाखो एकर जंगल सुद्धा पेटून राख करू शकतो. तसंच ही प्रत्येकाच्या मनात पेटलेली श्रमदानाची ठिणगी समाजात नवचैतन्याचा वणवा तयार करत आहे. आणि आता हा वणवा समाजमनातल्या षडरिपुंची राख केल्याशिवाय शांत होणार नाही. लोकं एकत्र येऊन श्रमदान करणं हीच खरी समाजाची संपत्ती असते. मागील काळात कुठेतरी ती हरवली होती पण या ठिणगी मुळे पुन्हा ती सापडली आहे. एकत्र हसत खेळत, गाणे म्हणत, घोषणा देत अगदी उत्साहात श्रमदान केलं जातं आहे. त्यानंतर एकत्र बसून गप्पा मारत चहा नाष्ट्याचा आनंद घेतला जात आहे. काही ठिकाणी तर एकमेकांची सुख दुःख वाटून घेत श्रमदान सुरू आहे. किती मोठा बदल समाजमनात झाला आहे. वणवा पेटलाय आणि याला कारण ठरलीय ती प्रत्येकाच्या "मनात पेटलेली ठिणगी"

          खरंतर आम्ही श्रमदान करणं ही खूप मोठी गोष्ट नाही कारण अशा प्रकारचं कठीण आणि खडतर कष्ट आपला बळीराजा शेतकरी रोज करत आलाय, आपल्याला खायला मिळावं म्हणून...... मग आपण प्रत्येकाने त्याच्या साठी हा खारीचा वाटा तरी उचलायलाच हवा.

#हे_बळीराजा_सलाम_तुझ्या_जिद्दीला

#प्रत्येकाला_विनंती_आहे_आपण_नक्की_श्रमदान_कराच

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Comments

Popular Posts