कधी कधी

कधी कधी हसऱ्या चेहऱ्यात
रक्ताळलेल्या भावनांचं असतं मौन,
कधी कधी उनाड वाऱ्यात
झुडपांचं झुळझुळणं असतं गौण...

कधी कधी न कळत्या क्षणात
भान हरवून जात मनं,
कधी कधी हळुवार झुळकेत सुद्धा
गळून पडतं हिरवं पानं...

कधी कधी मनातल्या संयमात
सुरू असतं आकांड तांडव,
कधी कधी निरव शांततेत
उखडून पडतो सजलेला मांडव...

कधी कधी भळभळत्या जखमेत सुद्धा
जाणवतात आशेचे सूर,
कधी कधी सुकलेल्या झाडांना सुद्धा
फुटतात नवीन अंकुर...

कधी कधी कनवाळू मनात
असते निष्ठुर वाणी,
कधी कधी कोमेजलेल्या नारळात सुद्धा
असते मुबलक पाणी...

कधी कधी चिडतो आपण
तीचं असतात माणसं प्यारी,
कधी कधी खडकाला सुद्धा फुटतो पाझर
निसर्गाची किमयाच न्यारी,
निसर्गाची किमयाच न्यारी......

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Comments

Popular Posts