"ती"

पुन्हा "ती"च जन्मली,
म्हणून गटारात फेकली,
धनवान असुरांच्या दुनियेत
समाजाच्या क्रूरतेनं माखली...

"ती"च्या सोबतीला होते,
असंख्य "ती"चे तुकडे,
अर्धमेल्या "ती"ने
घातले निसर्गाला साकडे...

पुन्हा "ती"च जन्मली,
यात "ती"चा काय दोष?
कोणी तरी ऐकेल का
"ती"चा हा मूक आक्रोश...

"ती"ला गिधाडाने उचललं
अन् माणसातल्या माणसात ठेवलं,
"ती"चं ते लोभसवाणं रूप
एका मातेला भावलं,
अन् "ती"च्या वात्सल्यात मावलं...

मायेच्या ऊबेत, आयुष्य शिकत
वाट शोधली पणतीच्या प्रकाशात
भेदभावाची छेदून भिंत
झेप घेतली "ती"ने आकाशात...

"ती" जन्मली तेव्हा कपाळावर
ज्यांच्या पडल्या होत्या आठ्या,
आता "ती"चं यश बघून
त्यांच्या भावना झाल्या खोट्या...

गटारातलं आयुष्य "ती"चं
गिधाडातल्या माणसांनी वेचायला हवं,
"ती"ची हत्या करणाऱ्यांना
माणसातल्या गिधाडांनीच ठेचायला हवं...

तो नेहमीच उजवा, "ती" डावी,
तो नेहमी आधी, "ती" नंतर,
एकाच रक्ताची "ती" दोघं
तरी का पाडलंय आपण अंतर...

तो असो वा "ती"
दिवा असो वा पणती,
त्यांची माणसात करा गणती
हीच नम्र विनंती
सर्वांना करतेय "ती"......

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Comments

Popular Posts