"होरेगल्लू"

         आयुष्याच्या जीवघेण्या धावपळीत घेतलेली थोडीशी विश्रांती म्हणजे होरेगल्लू. होरेगल्लू म्हणजे असा दगड की जिथे परिश्रम करून आलेले लोक डोक्यावरचं ओझं क्षणभर खाली ठेऊन थोडा विसावा घेतात, गप्पा गोष्टी करतात आणि पुन्हा आपापल्या वाटेने निघून जातात. मागे एकदा सुधामुर्तींनी लिहिलेल्या "गोष्टी माणसांच्या" या पुस्तकातील "होरेगल्लू" ही कथा वाचण्यात आली होती. (होरेगल्लू हा कन्नड शब्द आहे.) याच कथेच्या निमित्ताने आजच्या आमच्यासारख्या तरुण पिढीच्या मानसिक परिस्थितीबद्दल काही प्रश्न डोक्यात निर्माण झाले आणि सवयीप्रमाणे काही लिहावंसं वाटलं म्हणून हा लेखन प्रपंच......

          पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात अशी विश्रांतीची ठिकाणे पाहायला मिळायची. एका मोठ्या घनदाट झाडाखाली बसण्यासाठी एक मोठा दगड (होरेगल्लू) असायचा, पाणी पिण्यासाठी थंडगार पाण्याचा माठ असायचा, जिथे परिश्रम करून थकलेले वाटसरू क्षणभर विश्रांतीसाठी थांबायचे, डोक्यावरचं ओझं खाली ठेऊन, गप्पा मारत बसायचे आणि पुन्हा ताजेतवाने होऊन आपआपल्या वाटेने निघून जायचे. आज शारीरिक श्रमापेक्षा मानसिक श्रम जास्त वाढलंय त्यामुळे मला वाटतं आजच्या भयाण धावपळीच्या युगात सुद्धा प्रत्येकाला गरज आहे होरेगल्लू रुपी मानसिक विश्रांतीची...... डोक्यातले सगळे विचार काही काळ बाजूला ठेऊन आपण थोडी विश्रांती घेतली पाहिजे, आयुष्याच्या प्रवासात येणारे नवनवीन मित्र जोडले पाहिजेत, ओळखीच्या किंवा अनोळखी वाटसरू व्यक्तींसोबत छान दिलखुलास मनमोकळ्या गप्पा मारल्या पाहिजेत. थंडगार वाऱ्याची एखादी हळुवार झुळूक जशी सुखद गारवा देऊन जाते तशी ही विश्रांती सुखद क्षण देऊन पुन्हा ताजेतवाने करते आणि आपण आणखी उत्साहाने काम करण्यास तयार होतो.

          जीवनातील काही क्षण मनापासून जगले तर ती आपल्या मनासाठी विश्रांतीचं असते. आपल्या सगळ्या व्यापातून, रोजच्या ताणतणावातून कधी तरी अधून मधून अशी विश्रांती घ्यायला हवी त्यामुळे मन आणि बुद्धी आणखी तल्लख होते. आपण शारीरिक परिश्रम झालं की शरीर थकलं असं म्हणतो आणि विश्रांती घेतो मग मनाच्या कष्टामुळे मन सुद्धा थकतच ना त्याला विश्रांती नको का? अशी मनाला विश्रांती न दिल्यामुळे आजकाल तरुण मानसिक रुग्णांची संख्या खूप वाढलीय. याला कारण अतिरिक्त ताणतणावच आहे. यातून मुक्त व्हायचं असेल तर मनाला कधी तरी थोडीशी विश्रांती द्यायला आपण शिकलं पाहिजे. कौटुंबिक, आर्थिक आणि सामाजिक ताणतणावामुळे आजची आमची तरुण पिढी मानसिक रुग्ण बनत चाललीय. गरज नसलेल्या गोष्टींचा हव्यास, संशय वृत्ती, अतिसंवेदनशीलता, खोटी अस्मिता, असुरक्षितता या गोष्टींमुळे मनावर बराच ताण येतोय आणि यातून तरुण मुलं बाहेर पडतच नाहीत. यातून बाहेर पडून मनाला थोडी विश्रांती दिली तर पुन्हा ताजेतवाने होऊन आपण आपआपल्या जीवनप्रवासाला निघू शकतो. गरज आहे फक्त मनाच्या विश्रांतीची...... जीवनप्रवासात कुठेतरी, कधीतरी थांबण्याची...... गरज आहे असे विश्रांतीचे क्षण ओळखण्याची...... मनाच्या वेगवान हालचालींना अलगद कधीतरी ब्रेक देण्याची......

          मी मागे दोन महिने माझ्या सगळ्या लिखाणापासून विश्रांती घेतली होती. माझे सगळे social media accounts बंद ठेवले होते. मनाच्या लहरींच्या वेगासारखंचं धावणाऱ्या मोबाईल या यंत्रापासून जरा स्वतःला दोन हात लांब ठेवलं होतं. ती माझ्या साठी एक होरेगल्लू रुपी मनाची विश्रांतीचं होती. अशी विश्रांती घेऊन पुन्हा refresh होऊन नवीन सुरुवात करता येते. गतकाळात घडलेल्या घटनांपासून बोध घेऊन पुढे जीवनाची वाटचाल करता येते. यश-अपयश, सुख-दुःख, चांगले-वाईट क्षण, चढ-उतार हे आपल्या सर्वांच्या आयुष्यात येतंच असतात आणि यायलाही हवेत. त्याशिवाय आयुष्य जगण्याला मजा येत नाही. पण या सुंदर आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर कधी तरी, कुठे तरी आयुष्यात थोडी विश्रांती आपण घ्यायलाच हवी. पुन्हा जिद्दीने उभं राहण्यासाठी...... पुन्हा वैचारिक प्रगल्भता आणण्यासाठी...... पुन्हा मनाला नवी पालवी फुटण्यासाठी...... पुन्हा नवं आयुष्य जगण्यासाठी...... आपल्या जीवनप्रवासात "होरेगल्लू" रुपी क्षणाची गरज आहे आणि आपण प्रत्येकाने ती गरज ओळखायला हवी.

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Comments

Popular Posts