आयुष्य म्हणजे दुसरं काय?

अंतरीतली सल लपवून
आयुष्याला हसवणं,
अश्रूंना बांध घालून
स्वतःलाच फसवणं...

अपेक्षांचं ओझं घेऊन
निखाऱ्यावर चालणं,
जखमांना कुरवाळत
हळूच फुंकर घालणं...

अशाच जखमांनी भरलेला पाय,
आयुष्य म्हणजे दुसरं काय?

तहानेच्या लोभात
मृगजळामागे पळणं,
त्यागाच्या भ्रमात
हृदयाला जाळणं...

सरळ साध्या रस्त्यावर
अचानक येणारी वळणं,
क्षणिक सावध होऊन
अपघात टाळणं...

वेड्यावाकड्या रस्त्यावर
मार्ग दाखवणारी माय,
आयुष्य म्हणजे दुसरं काय?

धो धो पावसात
आसव टिपवणं,
भयाण दुष्काळात
अश्रू सुद्धा लपवणं...

हातात दिवा घेऊन
वादळाला चकवणं,
आयुष्याची ज्योत
शेवटपर्यंत टिकवणं...

उकळून थंड झालेल्या
दुधावरची साय,
आयुष्य म्हणजे दुसरं काय......?

- डॉ. संदीप सोमेश्वर टोंगळे.

Comments

  1. फारच छान मी ही लिहिलं आहे या विषयावर
    https://www.jeevanekprawas. blogspot.com

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts